तेजश्री मागील काही दिवसांत होत असलेल्या घटनांमुळे थोडीशी चिंतित राहू लागली होती. ती चांगली पत्नी नाहीये असं तिला वाटू लागलं होतं.
तसं बघितलं तर तिचा स्वयंपाक हळूहळू सुधारू लागला होता. ती भाजीपोळी बरोबरच इतर पदार्थ सुद्धा ट्राय करू लागली होती. तिला स्वयंपाक बनवण्यात हल्ली इंटरेस्ट येऊ लागला होता. काही पदार्थ चांगले बनायचे, तर काही बिघडायचे. पण ती पदार्थ बिघडला म्हणून आता थांबणार नव्हती. चुकांतूनच तर माणूस शिकतो हे तिला समजलं होतं.
ती सकाळी लवकर उठायला लागली होती. आज तर रोहित उठायच्या अगोदरच ती तयार झाली होती. ती आरशासमोर उभी होती. रोहित उठताच त्याची नजर तिच्यावर पडली. ती डोळ्यांना काजळ लावत होती. तो थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला. तिची गुलाबी कलरची साडी, कानांतील झुंबर, मोकळे केस, हातावरील फिकट पडू लागलेली मेहंदी, त्याने तिला एंगेजमेंटला घातलेली अंगठी या सर्व गोष्टी तो न्याहाळत होता. तो विचार करत होता, नुकतंच लग्न झालेली मुलगी किती छान दिसते ना! तिला जाणवलं की तो तिला न्याहाळतोय. तिने त्याच्याकडे नजर फिरविली. त्याने लगेच त्याची नजर दुसरीकडे वळवली. तो उठून अंघोळीला गेला. ती गालातल्या गालात हसू लागली.
पाणी गरम करणं, स्वयंपाक बनवणं ही सर्व कामं आटोपली होती. आज तिला फ्रेश वाटत होतं. तिचा मूड आज खूप चांगला होता. तिने चहा तयार ठेवला होता. ती कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकत होती. त्याने चहा पिला. त्याला तो खूप छान वाटला. पातेल्यामध्ये आणखी चहा होता. त्याने तो पण कपामध्ये ओतून पिऊन टाकला. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तिने बघितलं की पातेलं रिकामं होतं.
तो म्हणाला, "सॉरी गं. मला चहा खूप आवडला म्हणून तुझ्या वाट्याचा पण मीच पिऊन टाकला."
ती हसून म्हणाली, "थँक्यू."
ती खूप खुश झाली होती. त्यालाही तिला आनंदित बघून बरं वाटत होतं. तिने त्याचा टिफिन रेडी केला. त्याच्यासाठी पोहे देखील बनवले. तिने पोहे कढईतून काढून दोन प्लेटमध्ये टाकले. दोन लिंबाच्या फोडी प्लेटमध्ये ठेवल्या. त्या पोह्यांवर खोबऱ्याचा खिस पण टाकला. तसेच तिने विकत आणलेले बारीक सेव देखील पोह्यांवर पसरवले. दोन चमचे घेतले. ते प्लेटमध्ये ठेवले. दोन्ही प्लेट ट्रे मध्ये ठेवल्या. तो ट्रे घेऊन तिने टेबलवर ठेवला.
तो पेपर वाचत होता. पोह्यांचा छान सुगंध येत होता. त्याने पेपरची घडी घालून तो टेबलवर ठेवला. त्याने पोह्यांकडे बघितलं. पोहे छान वाटत होते.
तो म्हणाला, "आज मस्त झालेले वाटताय पोहे."
ती म्हणाली, "बघ खाऊन. सांग नंतर कसे झालेत ते."
तिने एक प्लेट त्याच्या हातात दिली. त्याने लिंबाची फोड पोह्यांवर पिळली. पोह्यांवरील खोबरं आणि शेव पोह्यांबरोबर एकत्र केले. नंतर पोहे खायला सुरुवात केली. ती त्याच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागली. त्याला ते जाणवलं.
तो म्हणाला, "खूप छान झालेत पोहे. एकदम भारी."
तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं.
तो म्हणाला, "तू पण घे."
ती म्हणाली, "हो. घेते."
पोहे संपल्यावर तो कामावर जाण्यासाठी निघायच्या तयारीत होता. तो शर्ट टाईट करता-करता त्याच्या शर्टचं बटन तुटलं! खाली पडलेलं ते बटण तिने उचललं.
ती म्हणाली, "थांब मी लावून देते."
ती सुई-दोरा शोधू लागली. तिला तो मिळेना. नंतर त्यानेच तिला सांगितलं की सुई-दोरा कुठे ठेवला आहे. तिने पटकन सुईमध्ये दोरा घालायचा प्रयत्न केला. थोडा वेळ लागला. कसाबसा तिने दोरा सुईमध्ये ओवला. ती बटण लावू लागली. बटण लावता-लावता सुई तिच्या बोटामध्ये शिरली! बोटांतून रक्त येऊ लागले. तिचे डोळे देखील लाल झाले होते.
तो म्हणाला, "अगं हळू ना. सोड ते. खाली बस तू."
त्याने तिला खाली बसवलं. सुई-दोरा बाजूला ठेवला. घरामध्ये असलेला फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला. तिला सुई टोचल्याच्या वेदनांपेक्षा बटन लावायला जमलं नाही याचा जास्त त्रास होत होता. त्याने दुसरं शर्ट घातलं व तो निघून गेला. ती विचारांत मग्न झाली.
आज तिला कळलं होतं की आई किती गोष्टी सांभाळत होती. एका गृहिणीला स्वयंपाक, धुणी-भांडी, साफसफाई, मुलं सांभाळणं यांबरोबरच अनेक छोटी-छोटी कमेही करावी लागतात. घरात काय कमी आहे याचाही हिशोब ठेवावा लागतो. खरंच गृहिणी बनणं सोपं थोडीच असतं!
आत्ता कुठे तिचा स्वयंपाक खुलायला लागला होता. तिला आत्मविश्वास येऊ लागला होता. त्यात मधेच अशा घटनांमुळे तिला जाणीव होत होती की तिला खूप काही शिकावं, बघावं लागणार आहे. ती थोडीशी नाराज झाली होती. पण तिला आता विश्वास होता की, हळूहळू का होईना पण जसं ती स्वयंपाक शिकली तसंच इतर छोटी-मोठी कामं पण शिकेलच!
पुढील भाग लवकरच.
खाली स्क्रोल करून मला follow करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया comment मध्ये नक्की कळवा.
Share करायला विसरू नका.
©Akash Gadhave