Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वयंभू   ६ 

Read Later
स्वयंभू   ६ 

स्वयंभू   ६ 

 

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

 

कृषी विभाग मधून ज्ञान आणि योजना, कृष्णकांत - रेवतीच्या घरातून आपुलकी , माया घेऊन अनुराधा आपल्या मंदार बाळाच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघाली. ३- ४ तासांचा प्रवास सुद्धा तिला अनेक महिन्यांचा भासत होता. अनुराधा घरी आली आणि अंगणात खेळणाऱ्या मंदारने अनुला घट्ट मिठी मारली. २ दिवस बाळापासून दूर असलेल्या अनुचा बांध फुटला. तिने मंदारला मिठी मारली, त्याचे पापे घेऊ लागली. सासूबाईला अनुराधा येण्याची चाहूल लागली आणि त्या पाणी घेऊन बाहेर आल्या. वात्सल्य आणि मायेचा तो क्षण पाहून त्या तिथेच थांबल्या आणि तो क्षण आपल्या डोळ्यांनी टिपू लागल्या. 

थोड्या वेळाने अनु मंदारपासून बाजूला झाली तेव्हा सासूबाई तिथे असल्याचे तिला जाणवले. अनुराधा पटकन उठून सासूबाईंच्या पाया पडली. सासूबाई म्हणाल्या, " औक्षवंत हो, कीर्तिवंत हो. " आज सासूबाईंच्या आशिर्वादात ' अखंड सौभाग्यवती रहा.' हा शब्द नव्हता. सासूबाईंना आता तिची काळजी होती, हे त्यांच्या आशिर्वादातून कळतं होतं. अनु घरात आली. बाबांच्या तब्बेतीची विचारपूस केली. घरात सर्वांना तिथे काय - काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. छोटी नणंद चहा घेऊन आली आणि अनुराधाच्या हातात देत," काय - काय झालं वहिनी तिथे ?" असा प्रश्न विचारतं अनुच्या बाजूला येऊन बसली. आज अनुराधाला ते घर आपलं वाटतं होतं. जिथे ती जिव्हाळा अनुभवत होती. 

अनुराधाने सर्व सांगायला सुरुवात केली. कृषी विभागात झालेली कार्यशाळा, तिथले अनुभव, सरकारी योजना, कृष्णकांतच्या घरचे, तिथलं वातावरण, रेवतीने मंदारला घेऊन येण्यासाठीचा केलेला आग्रह सर्व कसं ती भरभरून बोलत होती. तिथे बसून ऐकणाऱ्या सासऱ्यांना ती घरातली ' कर्ती स्त्री ' दिसत होती. जे काम घरातल्या मुलांनी करायला हवं ते परक्या घरातून आलेली सून करत होती. घर सांभाळत होती, शेती सांभाळत होती, नणंदांच्या लग्नाचा विचार करत होती, घराचा डोलारा सांभाळत होती. 

दुसऱ्या दिवशी अनुराधाने कार्यशाळेत शिकवल्यानुसार मातीचे नमुने शेतीतून घेतले आणि पोस्ट ऑफिसला निघाली. गावातून जाताना ऐकून येणारे टोमणे, कटू शब्द , तिरकस नजर यांची तिला सवय झाली होती. लोकांकडे लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नव्हता आणि सर्वांकडे दुर्लक्ष करण्यासाठीचा घरातून पाठिंबा होता. अनुराधा पोस्ट ऑफिस मध्ये पोहचली आणि तिने तालुक्याच्या ठिकाणी माती परीक्षणाला पाठवली. पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा सर्वांच्या नजरा तिच्याकडेच होत्या. बहुदा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा एखादी स्त्री पहिल्यांदाच आली होती. अनुराधा आपलं काम करून निघूनही गेली. पाहणारे पाहतच राहिले. 

दुसऱ्या दिवशी अनुराधा मजुरी शेतीवर गेली. तिला रोजगाराने घेतलं आणि काम सुरु ही झालं परंतू अनुराधाच्या लक्षात येत होतं की बायकांमध्ये कुजबुज सुरु आहे. दुपारी जेवताना एकीने विचारलंच," काय गं अनुराधा, २- ३ दिवस होतीस कुठे ? नाही म्हणजे त्यादिवशी तुझ्या घराजवळूनच जात होते तेव्हा मंदार बाहेर खेळताना दिसला. आम्हांला वाटलं होतं तू माहेरी गेली आहेस. मंदार घरी होता म्हणजे तू माहेरी तर गेली नव्हतीस मग कुठे गेली होतीस ?" खरंतर अनुला वाटत होतं की ओरडून विचारावं? ' तुला काय घेणं- देणं आहे त्यांच्याशी ? मी कुठे होते यावर तुझं घर चालतं का ? कामातून एवढा वेळ कसा मिळतो दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला?' पण अनुराधाने शांतपणे परिस्थिती सांभाळत उत्तरं दिलं," भावाची तब्बेत बरी नव्हती. त्यालाच बघायला गेले होते. त्याला नक्की काय त्रास आहे माहित नव्हतं. मंदार अजून लहान आहे, त्यामुळे त्याला आजाराची लागण झाली तर ? म्हणून नाही नेलं त्याला." अनुराधाने खोटं बोलून वेळ निभावून नेली. त्याच वेळी अनुराधाच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, आपण सारखं बाहेर नाही जाऊ शकतं. त्यामुळे पुढे नणंदांची लग्ने ठरताना त्रास होईल. अनुराधा मनाशी काहीतरी ठरवतं पुन्हा कामाला लागली. 

संध्याकाळी घरी येताना अनुराधा पोस्टातून एक अंतरदेशी पत्र घेते. रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर अनुराधा पत्र लिहायला बसली. 

 

श्री. कृष्णकांत बिडे दादा यांस , 

स. न. वि. वि.  

 

नमस्कार दादा, 

मी व्यवस्थित घरी पोहचले आहे. तुम्ही दिलेली खेळणी मंदारला खूप आवडली. आशा आहे तुम्ही सर्व देखील स्वस्थ असाल. आज मी शेतातील मातीचे नमुने चाचणीसाठी पोस्टाने कृषी विभागात पाठवले आहेत. दादा एक विनंती आहे शक्य असल्यास मातीच्या चाचणीचे निकाल पाठवल्यानंतर सरकारी योजनेचे कागदपत्र मला पोस्टाने पाठवा. मी सर्व कागदोपत्रांची पूर्तता करून पोस्टाने पुन्हा पाठवेन. 

आईंना माझा नमस्कार सांगा. मुलांना अनेक आशीर्वाद, रेवतीची ही फार आठवण येते. आशा करते तेथे सर्व क्षेम असेल. 

                                                                                                                                            आपली विश्वासू ,

                                                                                                                                           ( अनुराधा रंगले )

 

अनुराधाने दुसऱ्या दिवशी शेत मजुरीवर जाण्याआधी पोस्टात जाऊन पत्र देऊन आली. अनुराधा आता मातीच्या चाचणी निकालाच्या प्रतीक्षेत होती. माती परीक्षणाचा निकाल यायला किमान १५- २० दिवस जाणार होते. अनुराधाला अजून एक काळजी होती ती म्हणजे ' आपल्या शेती सरकारी योजनेत नक्की येईल का ? कारण ती नापीक जमीन होती. ज्यावर तिने कष्ट घेऊन त्या जमिनीला थोडीफार सुपीक केली होती. कृषी विभाग आपल्याला पोस्टाने एवढे महत्वाचे कागद पाठवेल का ? जरी सरकारी कागदपत्र पोस्टाने पाठवले तरी आपल्याला त्यात लिहिलेलं सर्व नीट कळेल का ? त्यातल्या अटी - शर्थी नीट नाही कळल्या कळल्या आणि आपण सही करून कागदपत्र पाठवले तर नंतर काही त्रास झाला तर ? एक ना अनेक विचार तिच्या डोक्यात काहूर माजवत होते. 

 

क्रमश : ................................. 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//