स्वयंभू   २ 

---------

स्वयंभू   २ 

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

रवी तालुक्याला जिथे राहत होता, तिथे शेजारी राहणाऱ्या मुली सोबत पळून गेला होता. या गोष्टीसाठी अनुराधाला जबाबदार धरलं जात होतं. आधीच सासरच्या वागणुकीमुळे दुःखी अनुराधाच्या आयुष्यात आता नवीन वादळं आलं होतं. त्या दिवसापासून अनुराधाचा छळ घरात अजून वाढला. ८ महिन्याचं बाळ सांभाळायचं, घरातलं करायचं, टोमणे ऐकायचे हेच आयुष्य झालं होतं तिचं. ज्याचा आधार होता तोच पळून गेला होता. बाळासाठी म्हणून ती जगत होती. तिच्या दुःखावर फुंकर घालणारं कोणी नव्हतं.

 ७ - ८ महिन्यांनी थोरली जाऊ मुलांना घेऊन माहेरी गेली. ८ दिवसांनी मोठे दीर जाऊबाईंना आणायला म्हणून गेले ते रात्र झाली तरी आले नाहीत. कदाचित आज थांबून उद्या येणार असतील असं वाटल्याने सासू- सासरे निश्चित होते पण दुसरा दिवस मावळायला आला तरी कोणी आलं नाही तेव्हा मात्र सर्वांना काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी गावातील कोणाला तरी सुनेच्या माहेरी चौकशी करायला पाठवणार होते. 

सकाळी गावातील एका तरुण मुलाला घरी बोलावून सासरे समजावून सांगतच होते की एक माणूस धावत आला आणि म्हणाला," तात्या तुमच्या शेतात २ -३ माणसं आली आहेत आणि ते तुमचं शेतातल्या घरातलं सामान बाहेर फ़ेकतायत. मी त्यांना ओरडायला लागलो तर म्हणतायत की, शेत आता त्यांचं आहे." हे ऐकून सासऱ्याच्या तोंडच पाणी पळालं, ते धावत शेतात गेले. थोडी भांडणं झाली परंतू त्यांनी जमिनीचं / शेतीचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावे २ दिवसापूर्वी झाल्याचे कागद दाखवले. खाली थोरल्या मुलाची सही होती. रवी पळून गेल्यापासून घरात कर्ता म्हणून निर्णय घेण्यासाठी म्हणून सासऱ्यांनी  शेत जमीन मोठ्या मुलाच्या नावे केली होती. राहत घर आणि २ एकर पडीक जमीन सोडून सर्व मोठ्याच्या नावे होतं. 

ज्याने जमीन घेतली होती तो म्हणाला," हे बघा काका, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. तुमच्या मुलाच्या नावाने जमीन होती. मी त्यांना विचारलं सुद्धा होतं की घरातील बाकी जणांचा विचार घेतला का ? त्यावर ते म्हणाले की, छोटा भाऊ जबाबदारी टाकून पळून गेला आहे. २ बहिणींची लग्ने आहेत म्हणून जमीन विकायला काढली आहे. म्हणून मी थोडे जास्तीचेच पैसे देऊ केले. आता तुमच्या मुलानेच तुम्हांला फसवले असेल तर मला माहित नाही. " असं बोलून त्याने उरलेलं सामान बाहेर फेकायला सुरुवात केली. 

सासरे घरी आले. अनुराधाने त्यांना पाणी दिलं, पाण्याचा तांब्या हातात होता आणि त्यांचा हात थरथरू लागला. अचानक काय झालं हे कळायच्या आत सासरे हात - पाय वाकडे करत जमिनीवर पडले. अर्धांग वायूचा झटका आला होता.  आधीच घरात जे सुरु होतं ते भयंकर होतं, त्यात घराचा आधारवट असलेले सासरे या अवस्थेत. घराला जणू नजर लागली होती. अनुराधाने शेजारच्यांच्या मदतीने सासऱ्यांना तालुक्याच्या गावी सरकारी इस्पितळात नेलं. अनुराधा आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सांभाळून सासऱ्यांची सुद्धा काळजी घेत होती. एक मागोमाग एक घडलेल्या घटनांमुळे सासूबाई आणि नणंदांना काही सुचत नव्हतं. अनुराधा स्वतः खंबीर होऊन सर्व करत होती. आठवड्याभराने सासऱ्यांना इस्पितळातून सोडलं. घरी आल्यावर त्यांच्या डोळ्यांना सतत अश्रुधारा लागल्या होत्या. आता पुढे कसं होणार हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. 

अनुराधाला सासऱ्यांच दुःख कळत होतं. अनुराधा त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली," बाबा, मला माहित आहे आपल्या घरात जे काही आतापर्यंत घडलं आहे त्यामुळे तुमची ही अवस्था आहे. आता या क्षणी सुद्धा तुम्हांला पुढे कसं होणार ? घर कसं चालणार ? दोन्ही ताईंची लग्ने कशी होणार ? याचीच चिंता आहे. बाबा, ' हे' सोडून गेल्यावर माझी सुद्धा हीच अवस्था होती. खूप त्रास झाला पण एक सांगू का ? जेव्हा घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारतो तेव्हाच पुढचा विचार करू शकतो. आपल्या सोबत जे झालं ते झालं आहे. स्वीकार करा. आता पुढे काय याचा विचार मी करते. " सासऱ्यांनी, सासूने आणि नणंदांनी चमकून अनुराधाकडे पाहिलं. अनुराधा पुढे बोलते," बाबा, लुटून नेणारा सर्व लुटून नेवू शकतो शिवाय नशिबाच्या. सगळं नीट होईल काळजी नका करू." माहित नाही का पण सर्वांना अनुराधाचं बोलणं ऐकून बरं वाटलं आणि स्वतःच्या वागण्याची लाज. अनुराधा या घरात आल्यापासून कोणीही तिच्याशी नीट वागलं नव्हतं. तरीसुद्धा तीच अनुराधा आज सर्वांचा आधार बनत होती. 

अनुराधाने माहेरी फुलांची शेती पाहिली होती, त्यात ती राबली होती. त्यामुळे तिने २ एकरच्या पडीक जमिनीमध्ये फुलांची शेती करायचा निर्णय घेतला. फुलांच्या शेतीला पाणीसुद्धा कमी लागत. त्यामुळे तिने फुलांच्या शेतीने पडीक माळरान फुलवायचं ठरवलं. स्वतःचे सोन्याचे कानातले मोडून तिने फुलशेतीच्या लागवडीसाठी लागणारा पैसा उभा केला. हा - हा म्हणता दिवस आणि महिने सरले आणि झेंडूच्या फुलांनी पडीक जमीन बहरली. सणवार असल्यामुळे फुलांना किंमत चांगली मिळाली आणि पहिलं पाऊल यशस्वी पडल्याने तिच्यातला आत्मविश्वास वाढला. आता घरात किमान जेवणाची भ्रांत होणार नव्हती. अनुराधा आपल्या शेतात काम करून दुसऱ्यांच्या शेतात मंजुरीने जाऊ लागली. मंदारला आणि घराला आता सासूबाई आणि नणंदा नीट सांभाळू लागल्या. मुलाने/ भावाने असं वागल्यावर परक्या घरातून आलेल्या अनुराधाने दिलेली साथ , अनुराधाची किंमत त्यांना कळली होती. 

स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या पडत्या घराला सांभाळायला बाहेर पडलेल्या अनुराधाच्या समोरचे संकट आणि संघर्ष अजून संपले नव्हते. नवरा हिला सोडून दुसऱ्या बाई सोबत पळून गेला, त्यामुळे कोणी तिचा रक्षणकर्ता उरला नाही म्हणून अनेक नजरा तिच्यावर आपलं लक्ष साधून बसले होते. सर्वांच्या बोचणाऱ्या नजरा तिला कळत होत्या पण काही पर्याय नव्हता. पुरुष तर पुरुष , स्त्रिया सुद्धा तिला त्रास देत. ती रस्त्याने किंवा कोणाच्या घराबाजूने जाऊ लागली की, बाया टोमणे द्यायच्या. ' दुसरी गल्ली माहीतच माहीतच का ? आमच्याच गल्लीतून जाते. आमचे पुरुष बाहेर बसतात, त्यांना स्वतःकडे खेचण्यासाठी करते ही. स्वतःचा नवरा नाही सांभाळता आला आता दुसऱ्याच्या नवऱ्याकडे पाहते. ' एक ना अनेक आरोप ती सहन करत होती. 

क्रमश : ....................

🎭 Series Post

View all