स्वयंभू   ९   

------

स्वयंभू   ९   

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

बस तालुक्याला पोहचल्यावर अनुराधाने कृष्णकांत दादाला फोन केला. घडलेलं सर्व अनुराधाने सांगितलं. त्यावर कृष्णकांत म्हणाला," हो ताई, मी वाचला पेपर. मी येतोच डायरेक्ट पोलीस स्टेशनला. " असं बोलून कृष्णकांत फोन ठेवतो. इकडे अनुराधा पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागली. सकाळपासून अनुराधा उपाशी होती पण त्यावेळी तिला कशाचीही जाणीव नव्हती. अनुराधा पोलीस स्टेशनला पोहचली आणि तिथे मंदारला भेटायचं आहे असं सांगितलं. तिथे बसलेल्या इन्स्पेक्टरने एक तिरका कटाक्ष अनुराधाकडे टाकला आणि म्हणाले," आता नाही भेटता येणार." 

अनुराधा ," का ?" 

इन्स्पेक्टर," का म्हणजे ? गुन्हेगाराला आता तुम्हांला भेटता येणार नाही. " 

अनुराधा," पण साहेब, एकदा मुलाला भेल्याशिवाय मला पुढे कसं जाता येईल ? " 

इन्स्पेक्टर," एकदा सांगितलं ना नाही म्हणून ?" 

" त्या नाही पण मी नक्कीच भेटू शकते." मागून एका मुलीचा आवाज आला. अनुराधा आणि इन्स्पेक्टर त्या आवाजाकडे पाहतात. त्या आवाजाकडे पाहिल्या बरोबर इन्स्पेक्टर धडपडत उठून उभे राहतात. मागे कृष्णकांत बिडे आणि त्यांची कन्या अँड. स्वरा बिडे उभे होते.  अँड. स्वरा बिडे , क्रिमिनल केसेस सांभाळायच्या. खूप नाव होतं त्या क्षेत्रात. आपल्या क्षेत्रात चांगली मुरलेली वकील म्हणून प्रसिद्ध. गुन्हेगारच नाही तर इतरही बरेच जण तिला वचकून असायचे. क्रिमिनलच्या केसेसमुळे पोलिसांशी तिचा थेट संबंध यायचा त्यामुळे तिच्या हाती काही धागे - दोरे होतेच. तिच्या कामात अडथळा आणायचं काम सहसा कोणी करत नव्हतं.    

स्वरा आत प्रवेश करत विचारते," मी मंदारची केस घेत आहे, मग मी भेटूच शकते ना त्याला ?" 

इन्स्पेक्टर आतल्या बाजूला हात दाखवत ," हो मॅडम, जा तुम्ही आत. " 

स्वरा," आणि मंदारची आई ?" स्वराने हाताची घडी घालत विचारलं. 

इन्स्पेक्टर ," हो.. हो.. त्या पण भेटू शकतात. " 

स्वरा," मी मंदारला भेटून येते तोपर्यंत पोलीस रेकॉर्डची एक प्रत तयार ठेवा, मला हवी आहे, अगदी एफ. आय. आर ते सकाळी कोर्टासमोर आरोपीला सदर केलेल्या कागदपत्रांपर्यंत सर्व. " असं बोलून स्वरा आपल्या अनु आत्या आणि बाबांबरोबर मंदारला भेटायला आत जाते. मंदार आत बसलेला असतो. सर्वांना पाहून मंदार धावत जातो आणि आईला मिठी मारतो. अनुराधा त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. 

स्वरा कडक आवाजात विचारते ," मंदार, हा सर्व काय प्रकार आहे ?" तिचा आवाज ऐकून कृष्णकांत आणि अनुराधा सुद्धा गार होतात. स्वरा नजर रोखून मंदारकडे पाहत होती. 

मंदार ," स्वरा ताई, मी खरंच काहीच नाही केलं. माझी या प्रकरणात १% सुद्धा चूक नाहीये. " 

स्वरा," प्रत्येक गुन्हेगार आपण निर्दोष असल्याचेच सांगतो." अजूनही स्वराच्या आवाजातला गंभीरपणा कमी झाला नव्हता.

मंदार," ताई, मी आईच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो गं. खरंच माझी काहीही चूक नाहीये. मला अडकवलं जातंय." 

मंदारने आईच्या डोक्यावर हात ठेवून सांगितल्यावर स्वराच्या आवाज नरम झाला.

स्वरा," अनु आत्या , बाबा तुम्ही आता बाहेर जाऊन बसा, मी मंदारशी बोलून येते किंवा बाबा तुम्ही आत्याला घेऊन घरीच जा. मी माझी कामे करून येईन. " 

अनुराधा," आणि मंदार ?" 

स्वरा," आत्या , आपल्याला कोर्टच्या प्रोसिजर प्रमाणे चालावं लागेल. तू जास्त टेन्शन नको घेऊस मी आहे ना ..!" 

स्वराच्या अश्या बोलण्याने अनुराधाला थोडा धीर येतो. अनुराधा कृष्णकांतसोबत जाते. इकडे स्वरा मंदारची सही घेऊन त्याचं वकीलपत्र घेते. त्यानंतर स्वरा त्याला ' नक्की काय झालं ' विचारते. मंदार त्याच्या माहिती प्रमाणे सर्व सविस्तर स्वराला सांगतो. स्वरा सर्व गोष्टी व्यवस्थित टिपून घेते. त्यातच तिला कळत की मंदारला अजून कोर्टात सदर केलेलं नाहीये. स्वरा मंदारला विश्वास देते की तो खरंच निर्दोष असेल तर काहीही झालं तरी ती मंदारला यातून बाहेर काढेल. स्वरा मंदारची पाठ प्रेमाने थोपटून तिथून जाते. 

तिथून बाहेर आल्यावर स्वराने इन्स्पेक्टरकडे कागदपत्रांची प्रत मागितली. त्यांनी जे कागदपत्र दिले ते घेऊन ती पोलीस स्टेशनमधून निघाली. तिथून बाहेर पडताच स्वराने काही फोन लावले आणि आपली यंत्रणा कामाला लावली. स्वराला रात्री घरी यायला वेळ झाला. अनुराधा ती येईपर्यंत आत- बाहेर फेऱ्या मारत होती. स्वरा येताना पाहून अनुराधा धावत तिच्याजवळ गेली आणि विचारू लागली," स्वरा मंदार सुटेल ना ? त्याला पोलिसांनी त्रास नाही दिला ना ? आता पण तो तिथे एकटा आहे , पोलिसांनी त्याला काही केलं तर ? तू पण त्याच्याशी अशी बोलत होतीस जसा तो खरंच गुन्हेगार आहे. " अनुराधाच्या डोळ्यात पाणी होतं. 

स्वरा ," आतू , तू आधी शांत हो. हे बघ माझं क्षेत्रच असं आहे , मला असं वागावंच लागतं. त्यामुळे मी त्याच्याशी तश्या पद्धतीने बोलले. माणूस कधीच चूक किंवा गुन्हा करणार नाही असं आपण गृहीत नाही ना धरू शकतं. परिस्थिती समोर भले- भले वाकतात , मी पाहिलं आहे. त्यामुळे तसं बोलले मी पण जेव्हा त्याने तुझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हाच विषय संपला. तो खरंच निर्दोष आहे. कारण तू त्याच्यासाठी सर्वस्व आहेस. आणि पोलिसांचं म्हणशील तर केस माझ्याकडे आहे म्हणल्यावर आता त्याला कोणी हात नाही लावणार. त्यामुळे तू निश्चित रहा. आता पुढे जे करायचं ते मी बघते. आणि काय गं आत्या, मी तुला लहानपणापासून पाहिलं आहे, तू कधीच एवढी अबला नव्हतीस, मग आता काय झालं ? मान्य आहे मंदार तुझा वीक पॉईंट आहे पण त्याच्यासाठीच तिला स्ट्रॉंग राहावं लागणार. तुझ्याकडे पाहून त्याच मनोबल वाढेल किंवा कमी होईल  कारण आजवर त्याने सर्व तुझ्याकडूनच मिळवलं आहे. तू स्ट्रॉंग आहेस हे पाहून त्याला आपोआप बळ मिळेल. तेव्हा आता तू स्वतः सावर आणि तयार हो एका लढाईसाठी. यात आम्ही सर्व तुझ्यासोबत आहेतच." 

अनुराधाला स्वराचं बोलणं पटतं आणि ती आपले अश्रू पुसते. स्वरा अनुला मिठी मारत म्हणते ," माय स्ट्रॉंग वूमन." अनुराधाच्या लक्षात आलं होतं कोर्ट म्हणजे आता सर्व संयमाने करायला हवं , शिवाय मंदार समोर कमजोर पडून चालणार नव्हतं. अनु पदर खोचून नवीन आवाहन पेलायला तयार झाली होती. 

क्रमश :  ................   

🎭 Series Post

View all