Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वयंभू   ८

Read Later
स्वयंभू   ८

स्वयंभू   ८  

 

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

 

मी आणि सासूबाई घरी आलो. घरी आल्यावर रेवती ताईंनी मोठया नणंदेला मागणी घातल्याचे सर्वाना सांगितले. मोठी नणंद सुद्धा आनंदी होण्याऐवजी चिंतेतच दिसत होतं. अनुराधाने कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या," वहिनी, आपल्या घरची परिस्थिती सध्या अशी आहे का ? की त्यात लग्नकार्य करावं? हलाखीची परिस्थिती आहे आपली. दोन वेळेचं जेवण तुझ्यामुळे मिळतंय. त्यात लग्न ? " 

अनुराधा ," ताई, लग्न आज ना उद्या करायचंच आहे. त्यात मुलगा रेवती ताईंचा भाऊ म्हटल्यावर आपल्याला चौकशी करायची सुद्धा गरज पडणार नाही. तसं ही ते या वेळी पाहायला येत आहेत. नंतर पुढे पाहू काय करायचं ते. त्यामुळे आता कोणीही जास्त विचार करू नका. परिस्थितीनुसार ठरवूयात काय करायचं पुढे ते." 

असं म्हणून अनुराधा आपल्या कामाला लागते. आठवडा गडबडीतच जातो. ठरलेल्या दिवशी रेवती आपल्या आई- बाबा , मामा , कृष्णकांत आणि भावाला घेऊन पाहण्याच्या कार्यक्रमाला येते. चहा- पाण्याचा कार्यक्रम होतो रेवतीच्या भावाला अजयला अनुराधाची नणंद ज्योती आवडली. रेवतीच्या घरून आलेल्यां सर्वांना ज्योती पसंत असल्याचे सांगितले जाते.  अनुराधा सर्वांना विनंती करत बोलायला सुरुवात करते," रेवती ताई , काका -काकी ( रेवतीचे आई- बाबा ) तुम्हांला आमच्या घरची परिस्थिती माहित आहेच. लग्न म्हणल्यावर बराच खर्च येतो. आमची थाटामाटात लग्न लावण्याची परिस्थिती नाहीये." 

रेवती ," अनुराधा , आम्ही आधीच चर्चा केली आहे यावर. आम्हांला फक्त मुलगी आणि नारळ द्या. लग्न आपण मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मंदिरात लावूयात. " हे ऐकून अनुराधाला आणि घरातील सर्वांना खूपच आनंद झाला. अनुराधाच्या सासूबाई आणि सासरे यांना तर स्वर्ग २ बोट दूर दिसत होता.  त्याच दिवशी सुपारी फोडून लग्न ठरवलं गेलं. दोन महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त काढला गेला. आज खूप दिवसांनी या घराने आनंद पाहिला होता. घरात सुखाचे वारे वाहत होते. 

इकडे अनुराधाने आपल्या २ एकरच्या जमिनीत सरकारी करारानुसार शेती सुरु केली. एकीकडे तुती तर दुसरीकडे भाज्या. शेतीकडे लक्ष देत अनुराधा शेत मजुरी सुद्धा करत होती. रेवतीच्या घरच्यांनी मंदिरात लग्न करायचं असं सांगितलं असलं तरी लग्नासाठी खर्च येणारच होता. त्यामुळे अनुराधा पैशांची जुळवा- जुळव करत होती. या सर्वांत सुद्धा अनुराधावर बाहेर होणारी टीका - टिपणी थांबलेली नव्हती पण याकडे दुर्लक्ष करायचं असं ठरवल्यामुळे अनु पुढे जात होती. 

हा - हा म्हणता लग्नाचा दिवस येऊन ठेपला. अनुराधाने तिच्याकडून शक्य तितकं केलं होतं. मंदिरात दोन्ही घरातल्या मोजक्या माणसांसमोर हा विवाह सोहळा पार पडला आणि अनुराधाने एक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान मिळवलं. ज्योतीची प्रेमाने व साश्रू नयनांनी पाठवणी केली. 

 

**************** 

 

आता अनुराधा पूर्ण लक्ष शेतीकडे देऊ लागली. अधे-मध्ये सरकारी माणसं येऊन पिकांची पाहणी करून जातं होते. अनुराधा डोळ्यात तेल घालून पिकांची काळजी घेत होती. त्यावर खूप काही अवलंबून होतं. यावेळी अनुराधाच्या मेहनतीमुळे पीक तरारून आलं. सरकारी करारानुसार भाज्या तालुक्याला जाऊ लागल्या आणि तुतीच्या पानांवर रेशीम किडे पोसले जातं होते. सरकारकडून टप्प्या टप्प्याने पैसे येऊ लागले. गावात सगळीकडे पीक भरघोस आलं होतं पण त्यामुळेच बाजारभाव पडला होता. अनुराधाला मात्र सरकारी करारानुसार ठरलेला बाजारभाव दिला जात होता. 

अनुराधाला सरकारी करार केल्यामुळे बराच नफा झाला. पुढे - पुढे वर्षागणिक अनुराधा आपल्या शेतीचा पसारा वाढवत होती.  अनुराधाने बाजूची जमीन सुपीक जमिनीच्या दुप्पट किंमत देऊन विकत घेतली आणि स्वतःच्या अपमानाचा बदला घेतला. मधल्या काळात छोटया नणंदेचं सुद्धा सुयोग्य स्थळी लग्न झालं. अनुराधा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण मनाने पार पडत होती. हळू- हळू अनुराधा ट्रकटर चालवायला शिकली. गावात ती एकटी स्त्री होती जी शेती करून इतरांपेक्षा जास्त पुढे गेली होती. मंदार शाळेत जाऊ लागला होता. इतर मुलांच्या तुलनेत मंदार हुशार होता. त्याने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नाही. गावात तिच्याविषयी कुजबुज वाढतच होती. त्याचा परिणाम मंदारवर होऊ नये म्हणून मनावर दगड ठेवून अनुराधाने त्याला पाचवी पासूनच होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला. 

दिवाळी आणि उन्हाळाच्या सुट्टीत मंदार घरी यायचा. बाकी महिन्यांसाठी भरभरून प्रेम आणि माया तो घेऊन जात होता. मंदार उदार मनाचा संवेदनशील मुलगा होता. घराची परिस्थिती आणि समाजात आईचा होणारा अपमान तो जवळून पाहत होता. त्याला त्याचा त्रासही होत होता पण आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल, तो बदलवेल. त्यासाठी तो मन लावून शिकत होता. शिक्षणाने समाजात बदल घडवू शकतो , हा त्याचा ठाम विश्वास होता. 

१० वी ची परीक्षा झाल्यावर मंदार घरी आला होता. त्यावेळी बाबांना हृदयविकाराचा झटका आला. खूप प्रयत्न करूनही बाबांना वाचवता नाही आलं. या गोष्टीचं मंदारला खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं आणि त्याच वेळी मंदारने डॉक्टर बनण्याचा निर्धार केला. त्यानंतर कठोर परिश्रम करून शिष्यवृत्ती मिळवून मंदार यशाच्या पायऱ्या चढू लागला.            एम. बी.बी. एस. ला त्याने शिष्यवृत्ती मिळवून प्रवेश घेतला. मन लावून अभ्यास करू लागला. अनुराधाचा आनंद गगनात मावत नव्हता. ती करत असलेल्या कष्टाचं चीज होताना तिला स्पष्ट दिसत होतं. एका आईला आपला मुलगा यशाच्या पायऱ्या चढतोय यापेक्षा जास्त आनंद काय असेल ?

'एम. बी.बी. एस. ला सुवर्ण पदक मिळवलं मंदारने आणि त्या सोहळ्याला अनुराधा, कृष्णकांत, रेवती, वसुंधरा सर्व आत्या - मामा यांनी हजेरी लावली होती. अनुराधाच्या कष्टच सोनं होताना पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं.  पदक जाहीर झाल्यावर मंदारने ते सुवर्ण पदक आईच्या हाताने देण्यात यावं ही व्यासपीठाला विनंती केली. व्यासपीठाने मंदारच्या विनंतीचा स्वीकार करून अनुराधाला मंचावर बोलावलं. अनुराधाला आपल्या मंदारवर गर्व होत होता. अनुराधाने सुवर्ण पदक मंदारच्या गळ्यात घातलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळले.'  बसला ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला तशी अनुराधा भानावर आली. बस तालुक्याला पोहचली होती. 

 

क्रमश : ......................

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//