Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वयंभू   ७  

Read Later
स्वयंभू   ७  

स्वयंभू   ७  

 

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

 

अनुराधाने कृष्णकांतला पत्राने मातीच्या अहवालाबरोबर सरकारी कागदपत्र पाठवण्याची विनंती केली. आता तिला तिने पाठवलेल्या पत्राच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. अनुराधा नेहमीप्रमाणे बाजूच्या गावात मजुरीने शेतकामाला जात होती. १० - १२ दिवसांनी सकाळी ती शेतावर निघायच्या वेळी तिला अंगणात कोणीतरी असल्याची चाहूल लागली. लगबगीने बाहेर जाऊन पाहते तर समोर कृष्णकांत दादा सर्व परिवारासह आले होते. त्यांना पाहून अनुराधाला खूप आनंद झाला. तिने लगबगीने पुढे जात आग्रहाने ,' या ना आत या.' असे म्हणतं आत बोलावले. अनुराधाच्या घरी सर्वांना त्यांना पाहून आनंद झाला. सासूबाईंनी सर्वांना बसायला चटई अंथरली तर अनुराधा पटकन सर्वांसाठी पाणी घेऊन आली. नणंद आत त्यांच्या न्याहारीची तजवीज करू लागल्या. 

अनुराधा सासऱ्यांना सुद्धा बाहेर घेऊन आली. कृष्णकांतला तर घरचे आधी भेटले होतेच , अनुराधाने बाकी घरातल्याची ओळख करून दिली. घरी पाहुणे आले म्हणून अनुराधाने आज मजुरीवर जाणं रद्द केलं आणि तसा निरोप तिने तिच्या सोबत नेहमी जाणाऱ्या मैत्रिणीसोबत पाठवला. मंदार सारंग आणि स्वरा सोबत लगेच मिसळला. चहा- न्याहारी झाल्यावर अनुराधा म्हणाली," दादा , बरं झालं सगळ्यांना घेऊन आलात. तुम्हा सगळ्यांना पाहून खूप आनंद झाला." 

कृष्णकांत," तुझं पत्र मिळालं , मग यावंच लागलं. "

अनुराधा ,"  पण दादा मी पत्रात गंभीर असं काही लिहिलं नव्हतं." अनुराधा असमंजसपणे म्हणाली. 

रेवती," गंभीर नव्हतं कसं ? तू एवढी महत्वाची कागदपत्र पोस्टाने मागवली म्हणजे ? काहीही कारण असणारच ना ? 

कृष्णकांत," अनुराधा, तुझं पत्र वाचून रेवतीच्या लक्षात आलं की, कदाचित तुझ्या बाहेर पडण्यामुळे गावातली लोकं तुला त्रास देत असतील म्हणून पोस्टाने कागदपत्र मागवले असशील. घरी काही झालं असतं तर तुला त्यात पत्र लिहणं सुचलंच नसतं म्हणून आम्ही हा कयास बांधला. त्यामुळे मी स्वतःच तुला शेतातील माती परीक्षणाचा अहवाल आणि सरकारी कागदपत्र द्यायला आलो आहे. माझं एकट्याच्या येण्याने सुद्धा तुला नंतर त्रास होऊ शकतो म्हणून मी सहकुटुंबाच आलो." 

अनुराधा," दादा तुम्ही माझा किती विचार करता." अनुच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. 

कृष्णकांत ," बस.. बस.. आता गंगा - जमूना सुरु नको करुस. आपण कामाचं बोलूयात." असं म्हणत कृष्णकांतने पिशवीतून काही कागदपत्रे काढली आणि त्यातलं एक पुढं करत म्हणाला," हा शेतातील मातीच्या परीक्षणाचा अहवाल, यात मातीची स्थिती दिली आहे , म्हणजे किती क्षार, कोणते घटक मातीत आहेत ? मातीत किती पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे वगैरे. आता या अहवालानुसार तुमच्या या शेत जमिनीत तुतीचं पीक आणि भाज्यांचं उत्पन्न छान होईल. " 

अनुराधा," त .... तूतीचं पीक म्हणजे ?" 

कृष्णकांत," तुती म्हणजे रेशीम किड्यांचे खाद्य. रेशीम किडे या तुतीची पाने खातात आणि रेशीम तयार करतात. या शेतीसाठी अति जास्त पाण्याची आवश्यकता नसते. शिवाय सरकार या शेतीसाठी एकर नुसार सबसिडी देते. भाज्यांमध्ये सुद्धा काही विदेशी भाज्या लावल्या तर त्यावर सुद्धा सरकारी मदत मिळेल. " 

अनुराधा," दादा पण याचा लागवडीसाठी खर्च सुद्धा तेवढा येईल ना ? त्यात मला तुतीच्या शेतीबद्दल काही माहित नाही." 

कृष्णकांत," त्यासाठी सरकार कडून प्रशिक्षण दिलं जातं, कार्यशाळा घेतली जाते. अगदी २ दिवसांची कार्यशाळा असते. हा पण त्यासाठी तुला तिथे यावं लागेल. " 

अनुराधा," दादा पण मी सारखं बाहेर गेले तर गावात त्रास वाढेल. मला आता सवय झाली आहे पण घरी कोणाला त्रास झाला तर कसं करणार ?" 

रेवती," अनुराधा , काहीतरी करावं तर लागेलच ना ? एक काम करू तू या वेळी मंदार आणि सासूबाईंना घेऊन ये. दोन दिवस त्यांना पण हवापालट होईल आणि तुझं काम सुद्धा होईल. कोणी विचारलंच तर सांगता येईल, तुझ्या माहेरी काही काम निघालं म्हणून जावं लागलं. सासूबाई सोबत असतील तर चिंता नाही. घरी मुलींसोबत बाजूच्या बायकांना सांगा २ दिवस सोबत करायला. " 

रेवतीच म्हणणं सर्वांना पटतं.  कृष्णकांत म्हणतो," पुढच्या आठवडयात कार्यशाळा आहे , तेव्हा तारखेला वेळेवर या. कागदपत्रांवर सुद्धा तिथेच सह्या कर. आम्ही सर्वजण तुम्ही वाट पाहू. आता निघतो. नाहीतर परतीची बस मिळणार नाही." असं म्हणत सर्व उठू लागले. अनुराधाने राहण्याचा आग्रह केला पण नोकरीमुळे ते शक्य नव्हतं. मुलांना सुद्धा गोंडस मंदार सोडवत नव्हता पण मोठ्यांनी चला म्हणल्यावर निघावं लागणारच ना ? घरातील सर्वांनी त्यांना प्रेमाने निरोप दिला. कृष्णकांत करत असलेली मदत पाहून अनुराधाला सुद्धा हुरूप आला होता. 

***********

 

सासूबाईंनी आजूबाजूला अनुराधाच्या घरी कामानिमित्त जात असल्यामुळे घरावर २ दिवस लक्ष ठेवायला आणि मुलींना सोबत करायला सांगितली. अनुराधाने शेतमालकाला सुद्धा २- ३ दिवस माहेरी जात असल्यामुळे येता येणार नाही असं सांगितलं. ठरलेल्या दिवशी अनुराधा सासूबाई आणि मंदार सोबत तालुक्याला निघाल्या. कृष्णकांतच्या घरी सर्वांचं प्रेमाने स्वागत झालं. चहा- न्याहारी झाल्यावर कृष्णकांत अनुराधाला कृषी विभाग मध्ये कार्यशाळेसाठी घेऊन जातो. अनुराधा पूर्ण लक्ष देऊन सुरु असलेलं सर्व टिपत होती, डोक्यात नीट बसवत होती. तिचं प्रशिक्षण व्यवस्थित सुरु होतं. 

इकडे कृष्णकांतच्या घरी रेवती आणि तिच्या सासू मध्ये असलेला समंजसपणा, प्रेम , आपुलकी पाहून वसुंधराबाईंना अनुराधा सोबत त्या जे वागल्या त्याबद्दल वाईट वाटत होतं. शिवाय एक नातं कसं असावं ते उमजत होतं. हा ..हा.. म्हणता २ दिवस संपले. अनुराधाने सरकारी अनुदानावर पीक घ्यायचं हे अटी- शर्थी वाचून मग ठरवलं. त्यानुसार करारावर सह्या झाल्या. त्यामुळे तिला बियाणं - खत यावर मोठी सूटही मिळाली. शिवाय पुढे या योजने अंतर्गत फवारणी - औषधे सुद्धा कमी दरात मिळणार होती. अनुराधा आनंदी होती. रात्री घरी जेवल्यावर सर्व एकत्र बसलेले असताना रेवती म्हणाली," काकी ( वसुंधरा बाई ) , अनुराधा, मला थोडं बोलायचं आहे. " 

अनुराधा आणि वसुंधरा बाई असमंजसपणे तिच्याकडे पाहतात. 

रेवती," अनुराधा त्या दिवशी मी तुमच्या घरी आले तेव्हा तुझी मोठी नणंद भावली मला माझ्या भावासाठी. माझा भाऊ सरकारी विभागात लिपिक म्हणून आहे. जास्त नाही पगार पण व्यवस्थित ठेवेल तो मुलीला. मी त्याच्या आणि माझ्या माहेरच्यांच्या कानावर घातलं आहे. ते मुलगी बघू मग पुढचं ठरवूं म्हणाले. तुमची काही हरकत नसेल तर पहाण्याचा कार्यक्रम करायचा का ?" 

अनुराधा आश्चर्याने रेवतीकडे पाहते व म्हणते," रेवती तुझा भाऊ म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. आम्हांला तर आनंदच आहे गं  पण............" 

रेवती," आता पण काय ?" 

अनुराधा सासूबाईंकडे पाहत म्हणाली," सध्या आमची परिस्थिती काय आहे हे तू पाहिलं आहेसच. हुंडा- लग्न खर्च याचाही विचार करावा लागेल. " अनुराधाच्या चेहऱ्यावर उदास भाव होते. 

रेवती म्हणते," या सगळ्या खूप पुढच्या गोष्टी आहेत अनु. आता तुम्ही फक्त एवढं सांगा आम्ही मुलगी पहायला येऊ की नको ?" 

अनु आणि सासूबाई एका सुरात म्हणतात," या ना या..." 

यावर सर्वांना हसू येतं.  पुढच्या रविवारचा पहाण्याचा कार्यक्रम ठरवून अनुराधा आणि सासूबाई एका उमेदीने आणि आनंद घेऊन घरी परततात.

 

क्रमश : .....................

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//