स्वयंभू   ५ 

--------

स्वयंभू   ५ 

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

४ तासांच्या प्रवासानंतर अनुराधा तालुक्याच्या गावी पोहचली होती. तिथून रिक्षाने कृषी विभाग. गेटवर तिने आपलं नाव सांगितलं आणि तिथे उपस्थित लिपिकाने यादीतील नाव चेक करून अनुराधाला सभागृहाचा रस्ता दाखवला. अनुराधा पहिल्यांदा अशी बाहेर पडली होती त्यामुळे थोडी भीती होतीच. अनुराधा दबकत- दबकत सभागृहात पोहचली. तिने पाहिलं की तिथे तिच्या व्यतिरिक्त एकही स्त्री नाहीये. उपस्थित सर्व पुरुष तिच्याकडे पाहू लागले. नाही म्हणालं तरी अनुराधाला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. ती एकाबाजूला उभी राहिली. 

थोड्यावेळाने कृष्णकांत तिथे आला. त्याने अनुराधाला पाहिलं आणि आवाज दिला. बसायला खुर्ची दिली. शेती विषयीची माहिती देण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांना कृष्णकांतने अनुराधाची ओळख करून दिली. " ह्या आहेत अनुराधा ताई. मी म्हणालो होतो ना. मला थांबवून मला विकसित शेती पद्धतीबद्दल उत्सुकतेने विचारलेलं. त्या ह्याच. 

शेती तञ् ," नमस्कार अनुराधा ताई. मी रावजी निबाळे. तिथे शेतीच्या आधुनिक पद्धती आणि सरकारी योजना , या बद्दल माहिती द्यायला आलो आहे. यादीत एका महिलेचं नाव पाहून नवल वाटलं होत मला. मला कृष्णकांत म्हणाला होता तुमच्याबद्दल. तुम्ही शेतीच्या आधुनिक पद्धतीकडे वळताय , खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या या शेती संदर्भात असलेल्या कार्यशाळेत पहिल्यांदा एका महिलेने भाग घेतला आहे. खरंच खूप कौतुक आहे तुमचं.  आता होणाऱ्या कार्यशाळेत नीट लक्ष द्या. यात खूप काही आहे जे आयुष्य बदलेल. अनुराधाने होकारार्थी मान डोलावली.  

दीप प्रज्वलन आणि गणपती पूजनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. परदेशात झालेली ' हरित क्रांती ', नंतर ' हरित क्रांतीने' भारतात आणलेला बदल, त्यानंतर आलेल्या अधिकच्या आधुनिक पद्धती, यावर माहिती सांगितली गेली. आधुनिक पद्धतीने शेतीची लागवड यावर माहिती सांगितली गेली आणि नंतर त्यावर कार्यशाळा घेतली गेली. कोणत्या पिकांची लागवड कधी करावी ? त्याचा पिकांचा कालावधी ? आपली शेती त्या पिकासाठी तयार आहे का ? हे पाहण्यासाठी , मातीचा कस पाहण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्या. त्या चाचण्या कुठे- कुठे होतात याची माहिती पहिल्या दिवशी देण्यात आली. अनुराधा मन आणि डोकं शांत ठेवून सर्व टिपून घेत होती.  

पहिल्या दिवसाची कार्यशाळा संपल्यावर कृष्णकांतने अनुराधाला विचारले," काय अनुराधा ताई , कसा होता पहिला दिवस ? कशी वाटली माहिती ? " 

अनुराधा ," भाऊ खरं सांगू ? आले तेव्हा थोडी चलबिचल होती मनात पण इथे आल्यावर , इथे कार्यशाळा सुरु झाल्यावर एक उत्साह आला. खूप नवीन माहिती मिळाली. एवढी वर्षे शेती केली तरी सुद्धा काही गोष्टी खूप नव्याने समजल्या. खूप छान होता आजचा दिवस. " 

कृष्णकांत," मग आता कुठे राहायचं ठरवलं आहे ? इथे बाजूला धर्मशाळा आहे तिथे कि माझ्या घरी ? " 

अनुराधा," भाऊ , मी इथे धर्मशाळेतच राहीन." 

कृष्णकांत," म्हणजे मला आज जेवण नाही मिळणार ............." 

अनुराधा ," म्हणजे ?" 

कृष्णकांत ," म्हणजे माझी आई, बायको आणि मुलं ( सारंग आणि स्वरा ) सुद्धा म्हणालीत की तुम्हाला घरी घेऊन या. बायको तर म्हणाली की, त्यांना नाही घेऊन आलात तर जेवण देणार नाही." 

कृष्णकांतच्या अश्या बोलण्यानंतर अनुराधा आणि कृष्णकांत दोघेही हसू लागतात. कृष्णकांत अनुराधाला घेऊन आपल्या घरी जातो. कृष्णकांतच्या घरात सर्वाचा स्वभाव खूप छान असतो. अनुराधा थोड्या वेळातच त्यांच्यासोबत मिसळून जाते. अनुराधा आणि कृष्णकांतची बायको रेवती मिळून स्वयंपाक बनवतात. अनुराधा आपल्यासोबत आणलेला फराळही बाहेर काढते आणि सर्वांना देते. जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा - गोष्टी करतात. मुलांना एक आत्या भेटली होती आणि अनुराधाला काही नवी नाती.

रात्री मंदारच्या आठवणीने अनुराधाच्या डोळ्यात पाणी होतं. आजवर त्याला कधीही एकट ठेवलं नव्हतं. तिच्या डोक्यात त्याचेच विचार सुरु होते. तो जेवला असेल का ? मी तिथे नाही हे पाहून रडत नसेल ना ? दिवसभर राहतो तो माझ्याशिवाय पण रात्री माझ्या कुशीतच झोप लागते त्याला. मंदारच्या विचारांचं काहूर अनुराधाच्या मनात उठलं होतं. अजून एक दिवस, मग परवा ती तिच्या पिल्लाजवळ असणार होती. 

दुसऱ्या दिवशी सभेत सरकारी योजनेबद्दल माहिती देण्यात आली. शिवाय सरकारकडून पिकानुसार सबसिडी आणि आर्थिक मदतही देणार होते. अनुराधाने सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असं ठरवलं. कार्यशाळा संपल्यानंतर अनुराधाने तसं बोलूनही दाखवलं. माहिती देणाऱ्याने अनुराधाचं नाव आणि पत्ता घेतला. ते म्हणाले," अनुराधा ताई , आज कार्यशाळा संपली. आता तुम्ही गावी जाऊन तुमच्या शेतातील मातीचे नमुने पोस्टाने चाचणीसाठी पाठवा. शेतातील नमुने कसे घ्यायचे ते आपण कार्यशाळेत शिकलो आहोत. मातीची चाचणी झाली की आपल्याला कळेल की तुमच्या शेतात कोणतं पीक घ्यायला हवं ? आणि दुसऱ्या पिकासाठी मातीला कसं तयार करायला हवं. चाचणीचे निकाल आले की तुमच्या शेतीतल्या मातीच्या प्रतीनुसार आपण तुमच्या शेतात कोणत्या सरकारी पिकला परवानगी घ्यायची ते ठरवू." 

**************** 

कृष्णकांतच्या घरी........

रेवती," अनुराधा ताई, उद्या सकाळी तुम्ही निघणार. हे दोन दिवस खूप छान गेले बघा. अजून थोडं थांबलात तर सर्वांना छान वाटेल. " 

अनुराधा," मला सुद्धा तुमच्यासोबत खूप छान वाटलं. तरी सुद्धा नाही राहू शकतं मी अजून..... रात्रीच्या बस असत्या तर मी आताच गेले असते. माझा बाळ , माझा मंदार माझी वाट बघत असेल रेवती वहिनी. अजून दोन वर्षांचा सुद्धा नाही तो. " 

रेवती," ताई 'ह्यांनी' तुमचा संघर्ष, तुमची जिद्द दोन्ही सांगितलं मला. तुम्हाला अजूनही त्रास सहन करावाच लागेल पण मला खात्री आहे , एक दिवस हाच समाज तुमचा उदो, उदो देखील करेल. ठीक आहे ताई, जा तुम्ही पण जाताना वचन द्या,' मंदारला घेऊन याल." रेवती हसून हात पुढे करते. 

अनुराधा साश्रू नयनांनी रेवतीच्या हातावर हात ठेवत म्हणते," नक्की वहिनी. एक दिवस नक्की घेऊन येईन मी त्याला. "  

रात्री जेवण आटोपून लवकर निजानीज झाली, उद्या अनुराधाला लवकर जे जायचं होतं. सकाळी रेवतीने लवकर उठून अनुराधासाठी नाश्ता बनवला. पोटभर खाऊ घालून आणि मंदारला काही खेळणी देऊन रेवतीने अनुराधाला निरोप दिला. अनुराधाचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

क्रमश : ......................

🎭 Series Post

View all