स्वयंभू   ४ 

------------

स्वयंभू   ४ 

@ आरती पाटील - लेखिका 

कौटुंबिक + सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

अनुराधा स्वतःच्या जमिनीत राबत होती , शिवाय बाजूच्या गावातही मजुरीला जातं होती. एके दिवशी दुसऱ्या गावाच्या शेतात मजुरीने काम करताना शेतात एक गोंधळ होतो. शेत मालक एका माणसावर चिडला होता आणि त्याला मोठयाने ओरडत होता. म्हणत होता की ," तुम्ही आता आम्हांला शिकवणार ? आम्ही आणि आमच्या बापजाद्यांनी आयुष्य घालवली यात, तेच तुम्ही आम्हांला शिकवणार ? निघा इथून..." 

अनुराधाला नक्की काय झालं ते कळालं नव्हतं.

भाग ३ वरून पुढे..........

अनुराधाने झालेला गोंधळ पाहिला होता पण नक्की काय झालंय याची कल्पना तिला नव्हती. तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या रखमाला विचारलं," मालकाला एवढं त्या माणसावर ओरडायला नक्की झालंय तरी काय ?" 

रखमा," काही नाही गं , हा माणूस कृषी विभागातून आला आहे. आपले शेत मालक या गावाच्या पंचांपैकी एक आहेत. सरकार शेतकऱ्यांना काही पिकं घ्यायला सांगतंय. त्यासाठी सरकार स्वतःच्या पदरचे काही पैसे पण देणार आहे म्हणतात. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभागात शेती ' कशी ' करायची ? हे शिकवणार आहेत. त्यासाठी सरकारतर्फे प्रस्ताव ठेवायला त्यांच्याकडून हा कृषी विभागाचा माणूस आला होता. मालकांशी बोलून गावातल्यांची सभा घेऊन हे सांगायचं होतं त्या माणसाला. दोन दिवसापासून फेऱ्या मारतोय तो माणूस. म्हणून मालक म्हणाले,' आम्ही आणि आमच्या बापजाद्यांनी आयुष्य घालवली यात, तेच तुम्ही आम्हांला शिकवणार ? ' जाऊ दे, आपल्याला काय ? चल , जेवणाची वेळ झाली. जेवून घेऊयात." 

असं म्हणून रखमा ज्या झाडाखाली जेवण ठेवलं होतं तिथे निघाली. अनुराधा मात्र काहीतरी विचार करत होती. थोडं विचार करून अनुराधा शेतातल्या दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडली आणि कृषी विभागाचा माणूस गेला त्या दिशेने धावत सुटली. काही अंतरावर तिला तो माणूस दिसला आणि अनुराधाने आवाज द्यायला सुरुवात केली. " भाऊ, ओ भाऊ ...."

कृषी विभागाच्या माणसाने मागे वळून पाहिलं आणि तिथेच थांबला. अनुराधा धापा टाकत आली आणि म्हणाली," भाऊ ते तुम्ही शेतीविषयी काहीतरी सांगायला आला होतात ना ? ते मला सांगाल का ?" 

त्या माणसाने अनुराधाकडे पाहिलं आणि म्हणाला," ताई , तुमचं नाव कळेल का ? "

अनुराधा ," माझं नाव अनुराधा रंगले. बाजूच्या गावात राहते. "

तो माणूस ," माझं नाव कृष्णकांत बिडे,  बरं ताई माहित तर मी देईन पण तुम्हांला पुढे शेती खरंच शिकायची असेल तर तालुक्याला यावं लागेल. २- ३ दिवसात शिकवलं जात आणि जर तुम्ही सरकारने सांगितलेली पिकं घेणार असाल तर तुम्हांला त्यासाठी योग्य ती मदतही केली जाते." 

अनुराधा," भाऊ, मला खरंच यामध्ये रस आहे. तुम्ही मला माहिती द्याल का ?" 

कृष्णकांत," नक्की देईन, पण माहिती पूर्ण आणि व्यवस्थित द्यायला थोडा वेळ लागेल. " 

अनुराधा," आता तर मी मजुरीवर आहे. तुम्ही पुन्हा कधी येणार आहात ? " 

कृष्णकांत," उद्या बाजूच्या गावात याच कामासाठी जायचं आहे. तुमची हरकत नसेल तर मी सकाळी लवकर येऊ माहिती देतो? " 

अनुराधा," चालेल दादा, चालेल दादा उद्या घरीच या म्हणजे घरच्यांना पण त्याबद्दल कळेल." असं म्हणून अनुराधाने घराचा पत्ता कृष्णकांतला दिला आणि परत शेतावर निघून गेली. 

******************************

दुसऱ्या दिवशी सकाळी..........

अनुराधा," आई घर व्यवस्थित दिसतंय ना ?" 

सासूबाई ( वसुंधराबाई )," हो गं , अनु छान दिसतंय घर. किती धावपळ करतेय ?" 

अनुराधा," तसं नाही आई, कृष्णकांत दादा कृषी विभागात कामाला आहेत. आपलं घर बघून त्यांना असं नको वाटायला की घरात मेहनत नाही घेत , ते शेतात काय घेणार ? म्हणून जरा व्यवस्थित करतेय. " 

तेवढयात बाहेरून आवाज आला," ताई..... अनुराधा ताई..." 

अनुराधा आणि सासूबाई लगबगीने बाहेर आल्या. अनुराधा आणि सासूबाईं स्वागत करत आत यायला सांगतात. कृष्णकांत आत येतात. अनुराधा त्यांना बसायला चटई देते. सासरे बाहेरच आधार घेऊन बसले होते. कृष्णकांतने सर्वांना नमस्कार केला आणि स्वत: विषयी माहिती सांगितली. छोटी नणंद त्यांच्यासाठी चहा आणि न्याहारी घेऊन येते. कृष्णकांत घरी सर्वांना सरकारी योजना आणि शेती करण्याच्या आधुनिक पद्धती बद्दल समजावून सांगतो. शिवाय सरकारी योजने अंतर्गत तुम्ही जे पिकं घ्याल त्यासाठी तुम्हांला एक ठराविक रक्कम दिली जाईल. त्यामुळे दर कोसळले तरी तुम्हांला त्याचा जास्त त्रास होणार नाही. कृष्णकांतकडून सगळ्या गोष्टी समजून घेतल्यावर सासूबाई म्हणाल्या," तुम्हीं बोलताय ते पटतंय आम्हांला पण अनुराधा तिथे जाणार म्हणजे तिथे राहायचं वगैरे कसं करणार ना ?" 

कृष्णकांत," आई, सरकार कृषी ऑफिसच्या बाजूची धर्मशाळा देते राहायला, तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांना. शिवाय मी सुद्धा तिथे जवळच राहतो. घरी आई, आजी, बायको, मुली आहेत अनुराधा ताईंना हरकत नसेल तर २- ३ दिवस त्या आमच्या घरी राहिल्या तरी चालेल. " 

कृष्णकांतच बोलणं ऐकून सर्वांना त्याचं बोलणं पटत. अनुराधा जायला तयार होते. कृष्णकांत पुढील कार्यशाळेच्या तारखा अनुराधाला सांगतो. म्हणतो," ताई, आज पासून नवव्या दिवशी नवीन लोकांसाठी कार्यशाळा सुरु होईल. मी तुमचं नाव जाऊन नोंदवतो. तुम्ही वेळेत या. राहायचं कुठे ते तुम्ही ठरवा. आता मी निघतो." असं बोलून कृष्णकांतने सर्वांचा निरोप घेतला. 

कृष्णकांत गेल्यावर यावर घरांमध्ये चर्चा झाली. शेवटी अनुराधाचा जाण्याचा निश्चय झाला. आपल्या छोटयाश्या लेकराला सोडून जायचा जीव होतं नव्हता त्या माऊलीचा, पण जाणं भाग होतं. एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या म्हणजे खंबीर व्हावंच लागतं. आठ दिवस होते तिच्या हातात. अनुराधा नेहमी प्रमाणे स्वतःच्या शेतात काम करून आणि उरलेलं सासूबाईंना सांगून शेत मजुरीलाही जात होती. इकडे दुपारच्या वेळी नणंदांनी मिळून थोडा - थोडा करून कोरडा फराळ अनुराधासाठी बनवून ठेवला. ( प्रवासात आणि तिथे राहताना जेवणाची चिंता नसावी म्हणून ). 

इकडे तालुक्याला जायचा दिवस जवळ आला. तसं अनुराधाने शेत - मालकाला पुढचे चार दिवस येणार नाही असं सांगितलं. मजुरांचा दिवसांवर पगार असल्यामुळे शेत मालकाला फरक पडत नव्हता. इकडे उद्या पहाटेच्या बसने निघायचं म्हणून अनुराधा आपलं काम आवरून घरी निघाली आणि मागून बायकांच्या कुजबुजत हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला, ' त्या दिवशी आलेल्या माणसाकडे निघाली असणार गं. तो आला होता दुसऱ्या दिवशी हिच्या घरी. आता काय ४ दिवस... मज्जाच मज्जा.....एवढे महिने झाले नवरा पण नाही ना गं.' असं म्हणून खळखळण्याचा आवाज आला. खरंतर अनुराधाला खूप राग आला होता पण त्यांच्यावर ऊर्जा वाया घालवण्याची ना तिची इच्छा होती आणि ना वेळ.

अनुराधा घरी आली. आपले ४ दिवसांचे कपडे एका कापडाच्या पिशवीत भरले. खरंतर झाल्या प्रकारामुळे अनुराधाला वाईट वाटलं पाहिजे होतं पण एवढया जखमा आणि वेदना तिने सहन केल्या होत्या की आता तिला वेदना जाणवताच नव्हत्या. छोटया मंदारला कुशीत घेऊन अनु त्याला समजावत होती. सासूबाई आणि नणंदा तिच्यासाठीच फराळ तिच्या पिशवीत भरतात आणि म्हणतात," वहिनी , तुम्ही काळजी करू नका. आम्ही मंदारला व्यवस्थित सांभाळू." त्यांच्या या बोलण्याने अनुराधाला एक आधार मिळाला. 

सकाळी पहाटे सासूबाई अनुराधाला सोडायला बसपर्यंत आल्या. बस मध्ये बसून अनुराधा एका नवीन प्रवासाकडे निघाली होती. 

क्रमश : .................  

  

🎭 Series Post

View all