स्वयंभू ३
@ आरती पाटील - लेखिका
सामाजिक कथा- ठाणे विभाग.
अनुराधा सर्व अपमान , टोमणे सहन करून आपल्या कामाला लागायची. होणारा त्रास टाळता येणार नाही पण त्या त्रासाकडे दुर्लक्ष नक्की केलं जाऊ शकतं. म्हणून अनुराधा लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या घरासाठी राबायची. इकडे अनुराधाला फुल- शेतीत चांगला नफा होऊ लागला. घरात पुरुष मंडळी नाहीत, सासरे अंथरुणाला खिळलेले त्यामुळे आता सर्व व्यवहार अनुराधा करत होती. बाजारात जाणं, दर ठरवणं सर्व आता अनुराधा पाहत होती. सासूबाई किंवा नणंदा काही बोलूच शकत नव्हत्या. कारण आज फक्त अनुराधामुळे त्यांना दोन वेळच अन्न मिळत होतं. सासऱ्यांची औषधे येत होती. शिवाय आता कुठे सर्वांना अनुराधाची किंमत कळत होती. नणंदा आणि सासूबाई सुद्धा आता दुसऱ्यांच्या शेतीत मजुरी करायला तयार होत्या पण अनुराधाने ' नाही ' म्हणून सांगितलं. नणंदा दुसऱ्यांच्या घरी जाणार, त्या बाहेर कामाला ( मजुरीला ) जातील तर गावातली लोकं त्यांना सुद्धा नावे ठेवतील. लग्ने ठरणार नाहीत. कारण त्यावेळी उच्च जातीतील स्त्रीया घराबाहेर पडत नव्हत्या. सासूबाईचं वय झालं होतं त्यामुळे त्यांना मजुरीला पाठवणं बरोबर वाटत नव्हतं अनुराधाला.
गावात अनुराधाला अजून त्रास होऊ लागला. लोक तिला शेत मजुरीसाठी बोलावणं टाळत. कोणी बोलावलं तरी नेहमी पेक्षा कमी दर सांगत. अनुराधाचा संघर्ष वाढत चालला होता. त्यामुळे आता ती शेत मजुरीसाठी आसपासच्या गावात जात होती. आपल्या लहान लेकराला असं दिवसभर सोडून जाताना तिला अनंत यातना होतं परंतू पर्याय नव्हता. मंदार सुद्धा लहान होता. त्याची नजर दिवसभर आईला शोधत असे. संध्याकाळी आई आल्यावर सोडत नव्हता. आईच्या प्रेमासाठी दिवसभर आसुसलेला जीव रात्री मायेच्या कुशीत निजत होता.
एकदा गावातील बाबांचे ( सासऱ्याचे ) मित्र त्यांना भेटायला आले. अनुराधाने त्यांचं चहा- पाणी केलं. विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, की त्यांच्या मुलाला अनुराधाचे थोरले दीर काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या गावी भेटले होते. दीर म्हणाले की, 'छोटा भाऊ सर्व सोडून पळून गेला. घरातल्या सर्वांचं मी एकटयाने का करायचं ? शिवाय दोन्ही बहिणींच्या लग्नात सर्व विकून लग्ने करावी लागली असती ? मग त्याचं आणि त्याच्या बायको मुलांचं काय ? त्यामुळे नावावर असलेल्या जमिनीचा त्याने चांगल्या भावात सौदा केला. तालुक्याला एक घर घेऊन ठेवलं. बायकोला माहेरी पाठवलं आणि जमीनीचे नवे मालक जमीन ताब्यात घ्यायला येण्याच्या २ दिवस आधी बायकोला माहेरून आण्यासाठी जातो असे सांगून घर सोडले. ' मित्राच्या तोंडून मुलाने केलेला विश्वासघात ऐकून बाबांना दुःख झालं. पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलं आणि दुसऱ्यांच्या घरून आणलेली लेक आज आधार देत होती.
फुलांच्या शेतीतून आणि मजुरीतून मिळणारा पैसा अनुराधा जोडून ठेवत होती. त्यांच्या २ एकर जमिनीच्या आजूबाजूला असलेली जमीनसुद्धा पडीक होती. त्यामुळे अनुराधाने बाजूची जमीन कमी किंमतीत मिळेल असा कयास बांधला होता. तिने जमीन मालकाशी जमिनीबद्दल विचारलं, परंतू एका स्त्रीने येऊन असा पुरुषी व्यवहार त्याला आवडलं नाही. त्याने सुपीक जमिनीच्याही दुप्पट रक्कम अनुराधाला सांगितली. अनुराधा म्हणाली," पडीक जमिनीची तुम्ही सुपीक जमिनीच्याही दुप्पट रक्कम सांगतायत." त्यावर जमीन मालकाने," तुम्हांला परवडत असेल तर घ्या. नाहीतर जा." अश्या भाषेत उत्तर दिल्यामुळे अनुराधा काहीही न बोलता तिथून जाते. एक स्त्री म्हणून कोणत्याही कामात कमी नव्हती, कोणत्याही व्यवहारात कमी नव्हती. पण समाजात फक्त एक स्त्री म्हणून कमी आखली जात होती.
इकडे घरी आल्यावर रात्री अनुराधा एका कोपऱ्यात बसून खूप रडली. झोपी गेलेला मंदार हुंदक्यांच्या आवाजाने उठला आणि आईला रडताना पाहून तो ही रडू लागला. अनुराधाच्या लक्षात आलं, की स्वतः खंबीर झाल्याशिवाय ती घराला सावरू शकणार नाही. अनुराधाने बाळाचे आणि स्वतःचे डोळे पुसले आणि एक संकल्प घेऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिने बैल नांगराला लावून शेत नांगरायला सुरुवात केली.
सासूबाईंनी म्हणाल्या," अगं अनु फुलांचा काळ नाही आला अजून, वेळ आहे अजून त्याला. "
त्यावर अनुराधा म्हणाली," माहित आहे आई मला पण मी दुसरं पीक घेण्यासाठी शेत नांगरतेय."
सासूबाई," दुसरं पीक ?"
अनुराधा," हो आई, आपल्याकडे जमीन कमी आहे म्हणून हातावर हात धरून नाही बसता येणार मला. आता या जमिनीमध्ये १२ ही महिने शेती होणार. ज्या पिकासाठी जो उत्तम काळ असेल, त्यावेळी ते पीक घ्यायचं. वन्संची लग्ने आहेत, बाबांची औषधे, घरात पण पैसे लागतातच ना ? मग असंच बसून कसं चालेल?"
सासूबाईंच्या डोळ्यात पाणी येतं, त्या अनुराधाला मिठी मारून रडू लागतात आणि माफी मागू लागतात," आम्हांला माफ कर गं अनु..... तुला आम्ही खूप त्रास दिला. रवी पळून गेला त्यासाठी सुद्धा तुलाच दोष दिला. तुला किती यातना झाल्या असतील याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा 'ह्यांच्या' मित्रांनी त्यादिवशी घरी येऊन थोरल्या चिरंजीवांनी केलेले पराक्रम सांगितले. त्यादिवशी मला कोणी म्हणालं असतं तर ,की तुमच्या मुलगा असा वागला म्हणजे तुम्हीच संस्कार द्यायला कमी पडलात म्हणून. आधी खचलेली मी अजून तुटले असते. तू मात्र सर्व सहन केलंस. एवढंच नाही आम्ही सर्व असं वागूनही तू मात्र या घराचा डोलारा सांभाळालास. ज्या नणंदांनी तुला त्रास देण्यात काहीही कमी ठेवली नाही , त्यांच्याच लग्नाच्या विचारात तू शेतात राबतेयस. तुझी माफी मी कोणत्या तोंडाने मागू ?"
अनुराधा सासूबाईंना मिठी मारते आणि रडत म्हणते," आई, तुम्ही माफी मागू नका, फक्त यापुढे मला साथ द्या. तुमच्या साथीच्या बळावर मी सर्व करेन."
सासूबाई," हो बाळा , यापुढे तू जे करशील त्यात माझी तुला साथ असेल. आता कोणी काहीही बोलो, तू तुझी पुढे पडणारी पाऊले थांबवू नकोस. मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे." आज एका नव्या नात्याची सुरुवात झाली होती.
अनुराधा स्वतःच्या जमिनीत राबत होती , शिवाय बाजूच्या गावातही मजुरीला जातं होती. एके दिवशी दुसऱ्या गावाच्या शेतात मंजुरीने काम करताना शेतात एक गोंधळ होतो. शेत मालक एका माणसावर चिडला होता आणि त्याला मोठयाने ओरडत होता. म्हणत होता की ," तुम्ही आता आम्हांला शिकवणार ? आम्ही आणि आमच्या बापजाद्यांनी आयुष्य घालवली यात, तेच तुम्ही आम्हांला शिकवणार ? निघा इथून..."
अनुराधाला नक्की काय झालं ते कळालं नव्हतं.