स्वयंभू १

------------

स्वयंभू   १ 

@ आरती पाटील - लेखिका 

  सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

" मावशी ..... ए अनु मावशी......" राजाराम हातात पेपर घेऊन धावत - धावत अनुराधा मावशीला आवाज देत घरी आला.

" काय रे काय झालं एवढं धावत यायला ? " अनुराधा मावशीने बैलांना चारा देत विचारलं. 

" मावशी एक गोंधळ झाला आहे. ही बातमी बघ." असं म्हणतं राजारामने पेपर अनु मावशीच्या हातात दिला आणि म्हणाला," ' मातृत्व ' हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक मुलं दगावलं आहे आणि जबाबदार म्हणून तुझ्या लेकाला डॉ. मंदारला अटक केली आहे पोलिसांनी. हे बघ पेपरात नाव सुद्धा आहे." 

अनुराधाला क्षणभर कळतंच नाही काय झालंय, ती म्हणाली ," असं कसं होऊ शकतं ? मंदार गुरांना भाकरी खाऊ घालताना सुद्धा दोनदा बघतो खराब झालेली नाही ना म्हणून. तो रुग्णांच्या बाबतीत असा कसा वागेल ?" 

" हो मावशी, माहित आहे मला म्हणून तर बातमी बघून चकित झालो आणि तुला सांगायला धावत आलो. " राजाराम दम खात बोलतो .  

तेवढयात घरातून वसुंधरा बाई ( अनुराधा मावशीच्या सासूबाई ) बाहेर येतात आणि विचारतात," काय गं, काय गोंधळ सुरु आहे ?" 

" आई अहो, आपल्या मंदारला अटक झाली आहे. " अनुराधा कापऱ्या आवाजात सांगते. 

" काय ? आपल्या मंदारला अटक ? कश्यासाठी ? माझं लेकरू लोकांची सेवा करतो आणि त्यालाच अटक ? वसुंधराबाई.

" हो आई , डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक मुलं दगावलं आहे आणि जबाबदार म्हणून मंदारला अटक केली आहे." अनुराधाच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. 

" अनु , असं खचून कसं चालेल ? एवढी संकटे पेललीस तू. खरं तर आता तुझे आराम करण्याचे दिवस पण बहुतेक तुझा संघर्ष अजून संपलेला नाही. तेव्हा तयार रहा. मी आहेच तुझ्यासोबत." वसुंधराबाई म्हणाल्या. 

***********

हा - हा म्हणता बातमी सर्व गावात पसरली. घरी येऊन कोणी सांत्वन करत होतं तर कोणी कुजबुजत होतं.  अनुराधाने राजारामला आवाज दिला," राजाराम, चल पटापट तयारी करायला घे. आपल्याला तालुक्याच्या गावी निघायचं आहे." राजाराम निघायची तयारी करू लागला. 

अनुराधा," आई , तुम्ही राहाल ना एकटया नीट ? मी शेजारच्या पूनमला सांगून जातेय. ती ठेवेल लक्ष. तुम्हांला काही वाटलं तर तिला आवाज द्याल ?" 

वसुंधराबाई ," माझी काळजी नको करुस अनु, जा तू आणि सांभाळ तुझ्या लेकाला." 

वसुंधराबाईंचा निरोप घेऊन अनुराधा राजारामसोबत निघाली. गावाच्या वेशीवर बस साठी उभी असलेल्या अनुराधाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. 'एवढं खाच - खळग्यांनी भरलेलं आयुष्य पाहिलं. आता अजून एक संघर्ष ?' थोडया वेळाने तालुक्याला जाणारी बस आली आणि अनु , राजाराम त्यात चढले. मागच्या सीटवर बसलेल्या अनुच मन खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतासोबत भूतकाळात प्रवेश करत.

' ३० वर्षांपूर्वी ' संगीता मोहिले ' लग्न करून या शेतकरी कुटुंबात आली. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे संगीताचं नाव बदलून ' अनुराधा रवी रंगले ' केलं. घरी सासू- सासरे, २ नणंद , १ मोठा दीर, त्यांची बायको सोनाबाई, त्यांची २ मुलं, असा मोठा परिवार होता. हातावरची मेहंदी सुद्धा उतरली नव्हती आणि घरातल्या कामांना सुरुवात झाली. अनुला आधीपासून कामाची सवय होती, म्हणून तिला फारसं काही वाटलं नाही. पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की नणंद कोणत्याही कामांना हात लावत नाहीत. उलट सर्व त्यांच्या हातात द्यावं लागतं. त्या ही वर  थोडं मागे - पुढे झालं तर आरडाओरडा सुरु व्हायचा. जाऊ बाईंनी आधी सहन केलंच असणार म्हणून त्याचा वचपा म्हणून त्या अनु वर सर्व कामे टाकू लागल्या. सासूबाईंचं म्हणणं की, लेकी त्यांच्या सासरी जाऊन करणारच आहेत, त्यांना इथे तरी आराम करून द्या. दुसरीकडे जाऊ एवढे वर्ष करतेय तर तिला ही आराम हवा. त्यामुळे घरातली सर्व कामे अनुराधावर पडू लागली. त्यातूनही दुपारचा थोडा वेळ मिळाला तर सासू तिला कधी गोधड्या धुवायला काढून देई तर माळ्यावर वर्षानुवर्षे पडलेली भांडी, तर कधी पितळी भांडी ज्यांचा वापर फक्त सणासुदीला व्हायचा. सकाळी ५ वाजता दिवस सुरु व्हायचा तो रात्री उशिरा संपायचा. घरातलं, शेतातलं सर्व करता - करता अनुराधा पार थकून जाई. आपल्या संसाराचा भाग म्हणून ती सर्व करत होती. 

काही महिन्यांनी अनुराधाला दिवस गेले. घरी सासू - सासरे आणि नवरा सोडल्यास फारसा कोणाला आनंद नाही झाला. सुरुवातीचे ३ महिने अनुराधाला खूप जड गेले. सारख्या उलट्या, अन्नाचा कण पोटात ठरत नव्हता. जमेल तेवढं करून सुद्धा नणंदांचे आणि जाऊबाईंचे टोमणे सुरूच होते. हळू हळू दिवस पुढे सरकत होते.  काही दिवसांनी रवीला तालुक्याच्या गावी नोकरी लागली आणि रवीने शेतीतून हात काढून तालुक्याला जायचं ठरवलं. त्याच्या या निर्णयावर कोणालाही आपत्ती नव्हती. रवी नोकरीच्या ठिकाणी तालुक्याच्या गावी गेला तर अनुराधा बाळंतपणासाठी माहेरी गेली. यथावकाश अनुराधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला.  मुलगा झाल्याचे कळताच सासू- सासरे आणि नवरा अनुराधाला भेटायला तिच्या माहेरी आले. अनुराधाच्या माहेरच्यांनी त्यांच्याकडून होईल तसं बाळाचं बारसं घातलं. बाळाचं नाव ठेवलं ' मंदार'. 

दोन महिन्याच्या मंदारला घेऊन अनुराधा पुन्हा सासरी आली आणि पुन्हा तिच्या कामाचे चक्र सुरु झाले. त्यात बाळ रडू लागलं की अनु हातातली कामे टाकून बाळाला घेत ही गोष्ट जाऊबाईला पटत नव्हती. त्यामुळे टोमणे देणे, घालून- पाडून बोलणे सुरूच असायचं. ' आम्ही सुद्धा मुलांना सांभाळून घराचं सर्व केलंय आणि यांना मुलाला घेऊन बसायचं कारणच पाहिजे.' असं ऐकवलं जाई. अनुराधाचा छळ कमी होतं नव्हता. रवी घरी आल्यावर अनुराधाने तिला त्याच्यासोबत तालुक्याच्या गावी नेण्याविषयी विचारणा केली. रवीने उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारून नेली. काही दिवसांनी त्यांच्या गावात राहणार मनोहर तालुक्याच्या गावी गेलेला असताना त्याला कळलं की रवी जिथे राहत होता, तिथल्या शेजारी राहणाऱ्या मुलीबरोबर पळून गेला आहे. गावी येऊन त्याने ही गोष्ट रवीच्या घरच्यांबरोबरच पूर्ण गावलादेखील सांगितली. 

सर्वजण अनुराधाला दोष देऊ लागले. 'तुला तुझा नवरा सांभाळता नाही आला का ? त्याला काय हवं नको ते पाहिलं नसेल म्हणून दुसरी शोधावी लागली त्याला.' नवरा आपल्याला सोडून दुसरीसोबत पळून गेला हे दुःख असताना आता तिलाच यासाठी जबाबदार धरलं जातं होतं. ८ महिन्याच्या बाळाकडे पाहून तिला अजून रडू येत होतं. 

क्रमश : ......................

🎭 Series Post

View all