स्वयंभू   १४  

-----

स्वयंभू   १४  

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

अँड. स्वरा, " मिलॉर्ड , मी कोर्टाला विनंती करते की, डॉ. मंदार यांना कोर्टासमोर आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी." 

जज ," परवानगी आहे." 

अँड. स्वरा," तर डॉ. मंदार रंगले, कोर्टाला सांगा त्या मुलाला म्हणजेच ' प्रशांतला ' ऍडमिट केल्यापासून काय - काय झालं ?" 

डॉ. मंदार ,"  त्या दिवशी दुपारच्या दरम्यान श्री. राजन आणि त्यांच्या घरचे प्रशांतला घेऊन हॉस्पिटलला आले. त्याला मी तपासलं तेव्हा लक्षात आलं की, त्याला किडनीचा त्रास आहे. पण नक्की काय त्रास आहे आणि किती पसरला आहे यासाठी काही टेस्टस कराव्या लागणार होत्या. मी माझे सिनिअर डॉ. प्रमोद यांना रुग्णाच्या तपासाचा अहवाल दिला. त्यानंतर ते सुद्धा येऊन रुग्णाला तपासून गेले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या इंस्ट्रक्शन प्रमाणे तपासण्या सुरु केल्या. सर्व तपासण्या पूर्ण होऊन रिपोर्टस मिळायला दोन दिवस गेले. तोपर्यंत मी रुग्णाचा त्रास कमी होण्यासाठी पेनकिलर दिल्या होत्या.

दोन दिवसांत सर्व रिपोर्टस आल्यावर लक्षात आलं की, किडनीला इन्फेकशन आहे आणि एक किडनी २० %  खराब झाली आहे. मी सर्व रिपोर्टस सिनिअर डॉक्टरांना दाखवले. त्यांच्या इंस्ट्रक्शन प्रमाणे पुढच्या उपचारांना सुरुवात झाली आणि या सर्व गोष्टींची कल्पना आम्ही श्री. राजन आणि त्यांच्या घरच्यांना आधीच दिली होती. प्रशांतला जो त्रास होता त्यामुळे त्याचा जीव जाईल असं काही नव्हतं. कारण एक किडनी जरी खराब झाली तरी माणसं जगतात आणि प्रशांतची किडनी २० % खराब होती. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरु केले. 

प्रशांतच्या तब्बेतीत फरक दिसत होता. शिवाय मी माझं काम व्यवस्थित करत होतो आणि रोज सिनिअर डॉक्टरांना अपडेट सुद्धा देत होतो. ज्या औषधांचा सारखा उल्लेख केला गेला कि त्या औषधाचं प्रमाण मी जास्त दिल्यामुळे प्रशांतचा मृत्यू झाला. ते औषध मी योग्य प्रमाणातच दिलं होतं आणि जरी थोडा जास्त डोस झाला असता तरी प्रशांतचा त्यात मृत्यू झाला नसता फक्त त्याची झोप जास्त झाली असती. कारण अजून काही टेस्ट बाकी असल्यामुळे हेवी मेडिसिन आम्ही सुरूच केल्या नव्हत्या. त्या टेस्टस झाल्यानंतर प्रशांतच्या शरीराची कुवत किती हेवी मेडिसिन घेण्याची आहे ? ते पाहून त्यानुसार त्या  सुरु केल्या गेल्या असत्या. 

ज्या दिवशी प्रशांतचा मृत्यू झाला, त्या दिवशी मी माझ्या घरी होतो. रात्री नाईट ड्युटी करावी लागली म्हणून मी सकाळी घरी आलो. दुपारी ३- ४ च्या दरम्यान पोलीस आले आणि मला अटक केली. मी जेव्हा सकाळी घरी आलो, त्याआधी मी पहाटे लवकरच हॉस्पिटल मधून निघायच्या आधी माझ्या रुग्णांना चेक केलं होतं. म्हणजेच सकाळी ९ चा राउंड मी सकाळी ७ लाच घेतला होता. त्यावेळी सुद्धा प्रशांत अगदी छान होता. त्यावेळी त्याला कोणताही औषध दिलं नव्हतं. त्यामुळे मला अटक झाली तेव्हा कळलंच नाही नक्की असं कसं झालं ? कारण प्रशांतचा जीव जाऊ शकतच नव्हता. 

मला अटक झाली त्यानंतर मला बोलण्याची संधीच दिली गेली नाही. त्यात प्रशांतच्या घरच्यांनी पोस्टमार्टम होऊ दिला नाही. पोस्टमार्टम झाला असता तर कारण तरी कळलं असतं. आता सुद्धा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे हा १०० % चुकीचा आहे किंवा मुद्दाम चुकीचा बनवला गेला आहे. आता पुढे तपासामध्ये काय निष्पन्न होतं त्यावर अवलंबून आहे पण हा पोस्टमार्टम चुकीचा हे मात्र खरं." 

डॉ. मंदारच्या बोलण्याने पोस्टमार्टम करणारे डॉक्टर जांभकर यांना घाम फुटला. स्वरा जज साहेबांकडे पाहत म्हणते.

अँड. स्वरा," मिलॉर्ड, डॉ. मंदार यांनी जेव्हा मला सांगितलं की , ज्या औषधांच्या ओव्हर डोस मुले प्रशांतचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे मुळात त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकत नाही. त्यामुळे मी इतर एक्सपर्ट डॉक्टरांशी भेटून यावर चर्चा केली आणि त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे की या औषधांच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू होणार नाही. हे काही एक्सपर्टचे अहवाल आहेत." असं म्हणत स्वरा काही कागद पुढे करते. 

अँड. पवार," स्वरा मॅडम, तुम्ही तर आता म्हणत होतात की हा मर्डर आहे. मग ते प्रूफ करा ना." 

अँड. स्वरा," करणार ना. ते करणारच आहे , त्याच साठी आले आहे मी. एक- एक पायरी पुढे जाऊयात ना." 

अँड. पवार खाली बसतात आणि अँड स्वरा पूण बोलायला सुरुवात करतात," मिलॉर्ड, या केसमध्ये मला सुरुवातीपासूनच शंका होती की कोणीतरी डॉ. मंदार यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी पोस्टमार्टम " मातृत्व " मध्ये न करता दुसरीकडे करण्याची परवानगी मागितली होती पण तिथेही गुन्हेगार पोचलाच. पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काहीतरी चूक करतोच. तश्याच काही चुका तिथे गुन्हेगाराने केल्या आहेत. 

इन्स्पेक्टर रेघेच्या चौकशीचे आदेश आल्यानंतर पी. एस. आय. सारंग बिडे यांनी ही केस सांभाळली. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे आज खूप खुलासे होणार आहेत. त्यामुळे मला   पी. एस. आय. सारंग बिडे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी. " 

जज," परवानगी आहे." 

कोर्टात पी. एस. आय. सारंग बिडे नावाचा पुकारा होतो. पी. एस. आय. सारंग बिडे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर स्वरा त्यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," पी. एस. आय. सारंग बिडे इन्स्पेक्टर रेघे यांच्या पश्चात ही केस तुम्ही सांभाळताय ?" 

पी. एस. आय. सारंग बिडे ," हो." 

अँड. स्वरा, " पी. एस. आय. सारंग बिडे तुम्ही तुमच्या या केसच्या संबंधित शोधाचा अहवाल कोर्टासमोर सांगा. " 

पी. एस. आय. सारंग बिडे," इन्स्पेक्टर रेघे , यांच्या नंतर ही केस माझ्या हातात आली. यावर मी काम सुरु केलं, त्यानंतर एक-  एक नवीन गोष्टी माझ्या समोर येऊ लागल्या. 

पहिली गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर रेघेनी डॉ. मंदार यांना वेळेवर कोर्टात हजर न करणं. दुसरी म्हणजे, मृताच्या घरच्यांनीच पोस्टमार्टमसाठी नकार देणं , डॉ. मंदार यांच्यावर हल्ला होणं. या गोष्टी नक्कीच सुसंगत नव्हत्या. त्यामुळे पोस्टमार्टमच्या अहवालात सुद्धा फेरफार केला जाईल अशी मला आधीपासूनच शंका होती. त्यामुळे मी पोस्टमार्टमचे मुख्य डॉक्टर डॉ. सावंत यांना आधीच भेटून सांगितलं होतं की, रिपोर्ट पोलिसांना त्यांच्या ऑफिसिअल मेल वर पाठवा आणि त्यांची प्रत कोर्टात जमा करा. ही आहे पोस्टमार्टम केलेल्या मुख्य डॉक्टर, डॉ. सावंत यांनी बनवलेली खरी पोस्टमार्टम रिपोर्ट." असं म्हणत पी. एस. आय. सारंग बिडे यांनी कागद पुढे केले. 

क्रमश : ..........

🎭 Series Post

View all