स्वयंभू   १३  

-----

स्वयंभू   १३  

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

कोर्टाच्या तारखेदिवशी सकाळी.......

स्वरा," मंदार तुझ्या जखमा बऱ्या आहेत ना ? म्हणजे कोर्टात येऊ शकशील ना ?" 

मंदार," हो ताई, मी ठीक आहे. " 

स्वरा," नक्की ना ? बाळा आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी, तेव्हा काहीही झालं तरी खचू नकोस. कोणी काहीही बोललं तरी चिंता करू नकोस. जे आहे ते खरं - खरं सर्व बोलायचं आहे तुला. कोणी काहीही बोललं तुला तरी , फक्त एकच लक्षात ठेवायचं ,' आज सर्वातून सुटका होणार आहे. तुला फक्त खरं बोलायचं आहे. बाकी सर्व मी बघून घेईन अगदी सर्व.' " 

मंदार," हो  ताई , आलं लक्षात." 

स्वरा," व्हेरी गुड...! चल मग आपण निघुयात. " 

स्वरा मंदारला घेऊन कोर्टात निघते. रेवती आणि कृष्णकांत ( स्वराचे आई- बाबा ) अनुराधा जवळ हॉस्पिटलमध्ये थांबलेले असल्यामुळे स्वरा आणि मंदार दोघेच कोर्टात जातात. कोर्ट सुरु व्हायला अजून थोडा अवधी असल्यामुळे मंदार बाहेरच उभा असतो. स्वरा आपल्या जुनिअरला काहीतरी समजावत होती. इकडे एक माणूस मंदारच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि त्याच्या कानाजवळ काहीतरी बोलतो. त्यानंतर मंदार काहीसा विचलित होतो. स्वराचं मंदारकडे लक्ष जातं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव ती सहज टिपते, शेवटी एक मुरलेली वकील होती ती. 

स्वरा मंदार जवळ जाते आणि हाताच्या इशाऱ्यानेच ' काय झालं ?' विचारते. मंदारच्या डोळ्यात पाणी उभं राहतं आणि तो फक्त एकच शब्द बोलतो ," आई." 

त्यावर स्वरा म्हणाली," मंदार बाळा , मी सकाळी काय म्हणाले होते ? तू बाकी काही विचार करू नकोस. बाकी सर्व बघायला तुझी ताई समर्थ आहे. मी आहे. तू कसलं ही दडपण घेऊ नकोस. " 

मंदार," पण ताई , " आई ?" 

स्वरा ," ते मी बघते. " 

स्वराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मंदार कोर्टात पाय ठेवतो. थोडयावेळात जज येतात. सर्वजण उठून अभिवादन करतात आणि कारवाईला सुरुवात होते. जज केसची पुढे नेण्याची अनुमती देतात. 

अँड. पवार उभे राहतात आणि काही कागद पुढे करत म्हणतात," मिलॉर्ड, इन्स्पेक्टर रेघेच्या चौकशीचे 'हे' रिपोर्टस आणि 'हे' मृताच्या पोस्टमार्टमचे रिपोर्टस. यात स्पष्ट लिहिलेलं आहे की, डॉ. मंदारच्या दिलेल्या औषधांच्या ओव्हर डोस मुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. " रिपोर्टसची दुसरी प्रत अँड. पवार स्वराकडे देतात. 

जज रिपोर्टस पाहतात आणि म्हणतात," प्रतिपक्षाच्या वकिलाला काही बोलायचं आहे ?" 

स्वरा उभी राहते आणि म्हणते," येस मिलॉर्ड !" 

अँड. स्वरा," मी पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची उलट तपासणी राखून ठेवते आणि विटनेस बॉक्स मध्ये श्री. राजन यांना बोलावण्याची अनुमती मागते." 

जज," परवानगी आहे !" 

कोर्टात श्री. राजन यांच्या नावाचा पुकारा होतो. श्री राजन येऊन विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर स्वरा त्यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," राजनजी, तुमचा न्यायालयावर विश्वास आहे का ?" 

अँड. पवार," हा काय प्रश्न विचारताय ?" ( चिडून )

अँड. स्वरा," अँड. पवार, हा प्रश्न या केसशी निगडीतच आहे. " 

अँड. स्वरा," हा तर श्री. राजनजी , मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते," तुमचा न्यायालयावर विश्वास आहे का ?" 

राजन ," हो , माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे." 

अँड. स्वरा ," मग तरी तुम्ही कोर्टाच्या निर्णय येण्याची वाट न बघता डॉ. मंदार यांच्यावर हल्ला करवलात ?" 

राजन," हे साफ खोटं आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये."  

अँड. स्वरा," मिलॉर्ड,  २ दिवसांपूर्वी डॉ. मंदार यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले आणि त्याच हल्ल्यात त्यांच्या आईला देखील गंभीर दुखापत झाली आहे. डॉ. मंदार तुमच्या समोर आहेत, त्यांच्या अंगावरच्या जखमा तुम्ही पाहू शकता, शिवाय त्यांची आई अजूनही हॉस्पिटलला आहे. या आहेत डॉ. मंदार आणि त्यांच्या आईच्या मेडिकल रिपोर्टस. " असं म्हणत स्वरा रिपोर्टस पुढे करते. 

अँड. पवार," मिलॉर्ड , डॉ. मंदारच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा जीव गेला आहे, ही गोष्ट पेपरमध्ये आली आहे. जनसामान्यात सुद्धा राग असणारच ना ? त्यामधून सुद्धा कोणी असू शकतो हल्ला करणारा." 

अँड. स्वरा ," अँड. पवार साहेब, तुम्ही बोलताय यावर माझा १००% विश्वास बसला असता पण केव्हा ? जेव्हा तो हल्ला करणारे मंकी कॅप घालून आले नसते तर." 

अँड. पवार," तुम्हांला नक्की काय म्हणायचं आहे?" 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, जर जनसामान्यांमधून हा हल्ला झाला असता तर अर्थात डॉ. मंदारला पाहून त्यांना राग आला असता आणि त्यांनी येऊन डायरेक्ट हल्ला केला असता. ते हल्ला करण्यापूर्वी मंकी कॅप शोधात बसले नसते. ज्या अर्थी हल्लेखोरांनी मंकी कॅप घातल्या होत्या, त्या अर्थी हल्ला हा ठरवून केला गेला आहे. " 

अँड. पवार," हल्ला श्री. राजनजी यांची करवला आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता ?" 

अँड. स्वरा," मग तुम्हीच सांगा, यांच्या शिवाय दुसरं कोणाकडे कारण आहे हल्ला करण्याचा ?" 

अँड. पवार शांत राहतात. स्वरा पुढे बोलते," मिलॉर्ड, एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छिते, ते म्हणजे सुरुवातीपासून डॉ. मंदार यांचा एकदाही जबाब घेतलेला नाहीये. डॉ. मंदारचा जबाब घेण्यापूर्वी आता मला मी राखून ठेवलेली, मृताचा पोस्टमार्टम केलेल्या डॉक्टरांची म्हणजेच डॉ. जांभकर उलट तपासणी घेण्याची परवानगी देण्यात यावी."  

जज," परवानगी आहे." 

कोर्टात डॉक्टरांच्या नावाचा पुकारा होतो डॉ. जांभकर विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर स्वरा त्यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," तर डॉ. जांभकर , मृताचा पोस्टमार्टम तुम्ही केलात ?" 

डॉ. जांभकर ," हो. मीच केला." 

अँड. स्वरा," काय आहे रिपोर्टमध्ये ? " 

डॉ. जांभकर ," ते सर्व रिपोर्टमध्ये मेंशन केलेलं आहे. डॉ. मंदार यांनी दिलेल्या औषधांचा ओव्हर डोस झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. " 

अँड. स्वरा," पोस्टमार्टम तुम्ही एकटयाने केलं का ? " 

डॉ. जांभकर, " हो." 

अँड. स्वरा," अँड. पवार, तुम्ही पोस्टमार्टम रिपोर्ट बरोबर सबमिट केली आहे ना ?" 

अँड. पवार," हो , अर्थात ." 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, अँड. पवार यांनी सबमिट केलेल्या रिपोर्टस मध्ये डॉ. सावंत यांची सही आहे. आणि डॉ. जांभकर म्हणतायत की पोस्टमार्टम त्यांनी एकटयाने केलं आहे. " 

स्वराचं बोलणं ऐकून डॉ. जांभकर यांना घाम फुटतो. ते अँड. पवारांकडे पाहू लागतात. स्वरा पुढे बोलते. 

अँड. स्वरा," मिलॉर्ड , खरं तर ही केस डॉ. मंदारच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाच्या मृत्यूची नसून, मर्डरची आहे. यात डॉ. मंदार यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. " 

स्वराचं बोलणं ऐकून कोर्टात कुजबुज सुरु होते. श्री. राजनजी सुद्धा चकित होतात. आतापर्यंत एका डॉक्टरच्या  हलगर्जीपणामुळे एका मुलाच्या मृत्यूची केस आता मर्डरची झाली होती. अँड. पवार उभे राहतात आणि म्हणतात," तुम्ही जे बोलताय , त्याला पुरावा आहे का तुमच्याकडे?" 

अँड. स्वरा,"   अर्थात आहे, त्याशिवाय मी कसं बोलेन ? मला कोर्टाचे निमय माहित आहेत." 

स्वरा पुढे बोलते," मिलॉर्ड , आता येत्या काही तासांमध्ये ही केस अगदी स्वच्छ होईल. " 

स्वराचा आत्मविश्वास पाहून सर्वांच्या लक्षात आलं होतं की ही केस आता अगदी उलट होणार आहे.

क्रमश : .......... 

🎭 Series Post

View all