स्वयंभू   १२    

------

स्वयंभू   १२    

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

कोर्टातून सर्वजण घरी आले. रेवतीने सर्वांसाठी चहा बनवला आणि कप हातात देत कोर्टात काय झालं ? असं विचारलं. अनुराधाने कोर्टात जे -जे झालं ते सविस्तर रेवतीला सांगितलं. स्वरा अजून तिच्या ऑफिसमध्ये बसून केस संबंधित नोट्स काढत होती. या केस संबंधित अजून ठोस साक्षी -पुरावे तिला जमा करायचे होते. थोडासा हलगर्जीपणा सुद्धा केस उलट करून ठेवू शकत होता. ८ दिवसानंतरची कोर्टाची पुढील तारीख मिळाली होती. या कालावधीमध्ये इन्स्पेक्टर रेघे यांचा चौकशी रिपोर्ट आणि मृताचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणार होता. मिळालेल्या कालावधीमध्येच स्वराला तिचं काम करायचं होतं. 

घरी आल्यावर स्वराने मंदारला आवाज दिला. मंदार आल्यावर म्हणाली," मंदार, सध्या केस आपल्या बाजूने असली तरी कधीही पलटी होऊ शकते. कारण खोटे साक्षी- पुरावे सुद्धा उभे केले जाऊ शकतात. तेव्हा आता रोज रात्री जेवल्यावर माझ्याकडे येऊन त्या दिवशी काय झालं होतं किंवा त्या मुलाचा मृत्यू होईपर्यंत काय- काय झालं होतं ते मला रोज सांगायचं अगदी रोज. समजलं का ?" मंदार मानेनेच होकार देतो.

आता हे रोजच झालं होतं. रोज मंदार त्यावेळी घडलेलं सविस्तर सांगायचा आणि स्वरा नवीन काही वाटलं तर ते टिपून घ्यायची. कोर्ट तारखेच्या २ दिवस आधी रेवतीला काही सामान आणायला मार्केटमध्ये जायचं होतं. रेवती निघाली तेव्हा मंदार म्हणाला," मामी, मी घरात बसून कंटाळलो आहे. मी पण येतो तुझ्यासोबत म्हणजे तुला ही मदत होईल आणि मला ही फ्रेश वाटेल."  रेवती मंदारच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि ' चल ' म्हणते. त्यावर अनुराधा म्हणते ," मग मी एकटी घरात थांबून काय करू ? मी पण येते तुमच्यासोबत. तस ही दादाला आणि स्वराला यायला अजून अवकाश आहे. तोपर्यंत येऊ आपण. " 

मंदार, रेवती आणि अनुराधा मार्केटमध्ये खरेदी करत असतात. मंदारला सुद्धा बाहेर पडून जरा बरं वाटत होतं. बरीच खरेदी केल्यावर तिघेही लस्सी घेतात आणि घराकडे निघतात. मार्केटमधून डायरेक्ट रिक्षा न मिळाल्यामुळे तिघेही रिक्षा शोधत पुढे चालत येतात. त्या रस्त्याला थोडी शांतात असते. काही पाऊल चालल्यावर अचानक मंदारवर हल्ला होतो. ३- ४ जण काठीने मंदारला मारायला सुरुवात करतात. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मंदार भांबावतो. मरणाऱ्याचे चेहरे मंकी कॅपने झाकलेले होते. प्रकार लक्षात येताच रेवती आणि अनुराधा हातातलं सामान खाली टाकून मंदारच्या दिशेने धावतात. रेवती आणि अनुराधा यांना मध्ये आलेलं पाहून हल्ला करणाऱ्यांनी त्या दोघीना ढकलून दिलं. आईला आणि मामीला असं ढकलून देताना पाहून मंदारला राग अनावर झाला आणि त्याने त्यांना मारायला सुरुवात केली. मंदार आवरत नाहीये हे पाहून त्यातील एकाने चाकू काढला आणि मंदारवर चाल करून गेला. अनुराधाने ते पाहिलं आणि ती ती धावत मंदारच्या दिशेने धावली. मंदारवर वार होणार इतक्यात अनुराधा मध्ये आली आणि मंदारवर होणारा वार अनुराधाच्या हातावर झाला. रक्ताची कारंजी उडाली. मंदार आईला असं पाहून घाबरतो. हल्ल्यात तो ही बराच जखमी झाला होता पण आईची जखम पाहून तो कावरा - बावरा झाला. 

आईवर झालेला हल्ला पाहून मंदार चवताळतो आणि त्या हल्लेखोरांवर धावून जातो. मंदारचा आवेश खूप होता. त्यामुळे मंदार हाताला येईल त्याने मारायला सुरुवात करतो. त्याचा आवेश पाहून हल्लेखोर पळू लागतात. मंदार त्यांच्या मागे जाणार तोच रेवती त्याला आवाज देते. मंदार मागे वळून पाहतो तर अनुराधा रक्ताच्या थारोळ्यात होती. मंदार धावत परत अनुराधाकडे जातो. तो स्वतः डॉक्टर असल्यामुळे तो योग्य ती काळजी घेत त्वरित जवळच हॉस्पिटल गाठतो. अनुराधावर उपचार सुरु होतात. इकडे रेवती फोन करून झालेला सर्व प्रकार स्वराला सांगते. हल्ला झालेला असल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात येतं. 

मंदारची केस माहित असल्यामुळे पोलीस व्यवस्थित चौकशी करतात आणि हल्ला झालेल्या जागी देखील जातात. अज्ञात हल्लेखोरांवर केस दाखल केली जाते. स्वरा तातडीने अनुराधा आत्याला बघायला हॉस्पिटलला येते. अनुराधाचं रक्त जास्त गेल्यामुळे ती बेशुद्ध होती. स्वरा बाहेर बाकडावर बसलेल्या मंदारच्या पाठीवर हात ठेवते. मंदार लहान मुलासारखा स्वराच्या कुशीत शिरून रडू लागतो. रडतच म्हणतो," स्वरा ताई , तो हल्ला माझ्यावर झाला होता. आईमध्ये आली. माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय. आज हल्ला झालंय , उद्या आपल्या घरावर चाल करून येतील. तुम्हांला सर्वांना सुद्धा माझ्यामुळे त्रास होईल ताई. मी काय करू ताई ? " 

स्वरा ," शांत हो बाळा." 

मंदार डोळे पुसत म्हणतो," ताई, मी माझी राहायची सोय दुसरीकडे कुठेतरी करतो. नाहीतर तुम्हांला पण त्रास होईल." 

स्वरा," चूप.... एकदम चूप... तू लहान आहेस का ? सर्व गोष्टी तुला समजवायला ? काही होणार नाही आणि आपल्या घरावर हल्ला करण्याची कोणाचीही बिशाद नाही. कळलं ? तुमच्यावर जो हल्ला झालंय तो सुद्धा घराच्या बाहेर झालाय, येतंय का लक्षात ?" 

मंदार," म्हणजे मला नाही कळलं तुला काय बोलायचं आहे ते."

स्वरा," म्हणजे आपली घरावर हल्ला नाही होऊ शकत. त्याच कारण मी त्याला नंतर सांगेन. तू घराबाहेर पडल्यावरच हल्ला झाला. तेव्हा आता जास्त टेन्शन घेऊ नकोस. आत्याला मी बघून आले आणि डॉक्टरांशी पण बोलले. त्यांना फक्त अशक्तपणा राहील. एक बोलू मंदार ?" 

मंदार ," ह्म्म्म..." 

स्वरा," आज अनु आत्यामुळे तू वाचलास. त्यामध्ये आल्या नसत्या तर चाकू तुझ्या पोटाच्या आरपार असता. " 

मंदार," माहित आहे ताई मला. सर्व प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरच तर झाला. आई मध्ये नसती आली तर आता मी फक्त एक डेड बॉडी असतो. " 

स्वरा," मंदार...." 

मंदार," खरंच बोलतोय ताई. आईने मला कसं मोठं तुला चांगलंच माहीत आहे. त्यात घर सांभाळायचं, शेत सांभाळायचं, दोन आत्यांची लग्ने, माझं शिक्षण, आजी- आजोबा. आजवर ती सर्वांसाठी फक्त करतच आली आहे. तिने फक्त सहनच केलं आहे. आणि आज ...? माझ्यामुळे आईवर ही वेळ आली आहे. कुठे आईला आता आराम द्यायचा विचार करतो होतो. इकडे तर आईच्या डोक्याचा ताप होऊन बसलोय मी. " मंदार स्वतःच दोष देत होता. 

स्वरा," काळजी नको करुस मंदार ही वेळ जास्त दिवस नाही राहणार. मी राहू देणार नाही. माझ्या छोटया भावाला कोणी विनाकारण त्रास नाही देऊ शकत. २ दिवस अजून कळ काढ. त्यानंतर नाही होणार तुम्हांला कोणताही त्रास." स्वराने आश्वासक नजर आणि विश्वासाने हात हातात घेतला. 

स्वराच्या आश्वासक बोलण्याने मंदार थोडा रिलॅक्स होतो. स्वराला आता आपल्या कामाला वेग द्यावा लागतो. कारण आता अजून उशीर करून चालणार नव्हतं. स्वरा आता फक्त कोर्टाच्या तारखेची वाट पाहत होती. 

क्रमश: ..................

🎭 Series Post

View all