स्वयंभू   ११    

------

स्वयंभू   ११    

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

कोर्टाची पुढील तारीख ३ दिवसानंतरची होती. स्वराने आपली यंत्रणा कामाला लावली होती. त्याच बरोबर मंदारवर काही दडपण राहू नये याचा ही प्रयत्न करत होती. अनुराधाने घरी सासूबाईंना मंदारला जामीन मिळाल्याचे सांगितले आणि सासूबाईंनी देव पाण्यातून बाहेर काढले. अचानक आलेल्या संकटाने सर्वजण भांबावले होते पण त्यातून बाहेर पडूच अशी जिद्दही होती. मंदार २ दिवस झाले तरी घरातून बाहेर पडत नव्हता. अनुराधाला आता माझ्या मुलाची काळजी वाटत होती. त्याच्या मनाला उभारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होती. 

कोर्टात जायचा दिवस उजाडला आणि स्वराने काही गोष्टी मंदारला समजावून कोर्टात कोर्टात यायला सांगितले. स्वरा आधी आपल्या ऑफिसला गेली आणि मग कोर्टात हजर झाली. जज आले आणि कारवाईला सुरुवात झाली. आपली बाजू मांडायला प्रतिपक्षाचे वकील अँड. पवार उभे राहिले. 

अँड. पवार ," मिलॉर्ड , जसं की आधी माझ्या अशिलांनी सांगितलं आहे की , ' प्रशांतच्या ' म्हणजेच राजन मोहिले यांच्या मुलाची ट्रीटमेंट डॉ. मंदार करत होते आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. हे सिद्ध करण्यासाठी मी कोर्टापुढे डॉ. मंदार यांनी लिहून दिलेल्या औषधांचे कागद जमा करत आहे. " असे म्हणत अँड. पवारांनी काही कागदपत्र कोर्टात सादर केले. पुढे ते म्हणाले," मिलॉर्ड, जे औषध डॉ. मंदार यांनी लिहून दिलं आहे, त्याची फक्त 2gm एवढीच मात्रा रुग्णाला दिली गेली पाहिजे होती. पण डॉ. मंदार यांनी ती मात्रा 4gm एवढी लिहिलेली आहे. औषधांचा ओव्हर डोस झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की सादर पुरावा पाहता कोर्टाने आरोपीला कठोर शिक्षा ठोठवावी. " 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, केस आता सुरु झाली आहे. काही पुरावे अँड. पवार यांनी सादर केले आहे. आता आम्हांला आमची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. मला श्री. राजनजी यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावण्याची अनुमती देण्यात यावी." 

जज,"  अनुमती आहे." 

कोर्टात राजन मोहिले यांच्या नावाचा पुकारा होतो आणि राजन विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहतात. 

अँड. स्वरा," तर राजनजी तुम्ही कोर्टाला सांगा की तुम्ही ज्योतिषाची पदवी कोणत्या विद्यापीठातून घेतली आहे ?" 

स्वराच्या या प्रश्नावर राजन आणि इतर सर्व तिच्याकडे पाहत राहतात. 

राजन ," मी कोणतीही ज्योतिषाची पदवी वगैरे घेतलेली नाही." 

अँड. स्वरा," मग कोण्या ज्योतिषांकडे शिकायला वगैरे ?" 

स्वराचा प्रश्न ऐकून राजनला राग आला आणि तो म्हणाला," मॅडम, तुम्ही काहीही प्रश्न काय विचारताय ? मी का कोणत्या ज्योतिषाकडे जाईन ?" 

अँड. स्वरा ," मग तुम्हांला कसं कळलं की तुमच्या मुलाचा मृत्यू हा डॉ. मंदारच्या हलगर्जीपणामुळे झाला ? " 

राजन,"  कारण तेच ट्रीटमेंट करत होते किती वेळा सांगू ?" 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, कोर्टाचे आदेश आल्यानंतर सुद्धा अजूनही मृताच्या बॉडीचा पोस्टमार्टम केला गेलेला नाहीये. त्यामुळे मृताच्या मृत्यूचे नेमकं कारण काय ?  हे माहित नाहीये. फक्त डॉ. मंदार यांनी लिहिलेल्या कागदावरून तेच मृत्यूचं कारण आहे, हे आपण गृहीत धरू नाही शकत त्यासाठी पोस्टमार्टमचा अहवाल अत्यावश्यक आहे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स येईपर्यंत कोर्टाने पुढील तारीख दयावी. " 

अँड. पवार ," आणि आरोपी पळून गेला तर ?" 

अँड. स्वरा ," तर....? " स्वरा अँड. पवारांकडे एक दृष्टी टाकत म्हणते. 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, मला विटनेस बॉक्स मध्ये इन्स्पेक्टर रेघे यांना बोलावण्याची अनुमती दयावी." 

कोर्टात इन्स्पेक्टर रेघे यांच्या नावाचा पुकारा होतो आणि इन्स्पेक्टर रेघे विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहतात. 

अँड. स्वरा," तर इन्स्पेक्टर रेघे , मला सांगा डॉ. मंदार यांना तुम्ही अटक कधी केलीत ? " 

इन्स्पेक्टर रेघे ," बुधवारी, ६ जानेवारी ला ." 

अँड. स्वरा , " आणि कोर्टात हजर कधी केलंत ?" 

इन्स्पेक्टर रेघे शांत उभे राहतात. 

अँड. स्वरा," इन्स्पेक्टर रेघे , मी तुम्हांला काहीतरी विचारलं आहे नाही का ? तुम्ही डॉ. मंदार यांना कोर्टात हजर कधी केलंत ?"

इन्स्पेक्टर रेघे ," शुक्रवारी, ८ जानेवारीला ?" 

अँड. स्वरा," का ? म्हणजे तुम्ही इन्स्पेक्टर आहात तुम्हांला माहित असायला हवं की कोणत्याही आरोपीला अटक केल्यावर २४ तासांच्या आत कोर्टासमोर हजर करायचं असतं ? म्हणजेच तुम्ही डॉ. मंदार यांना कोर्टासमोर गुरुवारी, ७ जानेवारीला हजर करणं अपेक्षित होतं, बरोबर ना ?" 

इन्स्पेक्टर रेघे थोडं चाचरत म्हणतात, " हो." 

अँड. स्वरा," मग तुम्ही डॉ. मंदार यांना शुक्रवारी , ८ जानेवारीला का नाही हजर केलं ? गुरुवारी , ७ जानेवारीला ना कोर्टाला सुट्टी होती, ना कोणता सण होता मग हजर का केलं नाहीत." 

इन्स्पेक्टर रेघे," मला दुसऱ्या आरोपीकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे त्या दिवशी राहील." 

जज," इन्स्पेक्टर रेघे, हे कारण तुम्ही अजिबात कोर्टापुढे नाही देऊ शकत. नियम तुम्ही मोडू शकतं नाही." 

इन्स्पेक्टर रेघे," सॉरी मिलॉर्ड." 

अँड. स्वरा," बरं इन्स्पेक्टर रेघे, मला सांगा कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा अजून मृताचं पोस्टमार्टम का झालं नाही ? " 

इन्स्पेक्टर रेघे," मृताच्या घरच्यांनी बॉडीला हात लावू दिला नाही. शिवाय पोलिसांवरच अरेरावी करत होते." 

अँड. स्वरा," कोर्टाच्या आदेशात अडथळा आणऱ्यावर पोलीस कारवाई करू शकतात ना ?" 

इन्स्पेक्टर रेघे," हो." 

अँड. स्वरा ," मग तुम्ही का केली नाही ?" 

इन्स्पेक्टर रेघे," मृताचे नातेवाईक बॉडीजवळ जाऊ देत नव्हते. शिवाय तोडफोड करण्याची धमकी देत होते. बॉडी हॉस्पिटल मध्ये आहे आणि तिथे असा काही प्रसंग झाला तर दुसऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो होतो. " 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, इन्स्पेक्टर रेघे यांनी सांगितल्याप्रमाणे मृतांच्या घरच्यांनाच त्याला न्याय मिळवून द्यायचा नाहीये. किंवा त्यांच्याकडूनच ( घरच्यांकडूनच ) मुलाचा जीव घेतला गेला आहे आणि ते उघड होऊ नये म्हणून ते पोस्टमार्टम करू देत नाहीयेत." 

स्वराचं बोलणं ऐकून राजन मोहिले चिडतात आणि म्हणतात," आम्हीच आमच्या मुलाचा जीव घेऊ का ? स्वतःच्या अशिलाला वाचवण्यासाठी काहीही आरोप लावाल का ? " 

अँड. स्वरा," मग तुम्हीच सांगा का नाही तुम्ही पोस्टमार्टम होऊ देतं ? त्याने तुमच्या मुलाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. तरीसुद्धा तुमचा त्याला विरोध का आहे ?" 

राजन," मृत्यूनंतर सुद्धा माझ्या मुलाचे हाल नाही करायचे म्हणून." 

अँड. स्वरा," आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोस्टमार्टम होणं गरजेचं आहे. आता तुम्ही ठरवा. तुमच्या मुलाला न्याय मिळणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे की नाही ?" 

स्वरा जज साहेबांकडे तोंड करते आणि म्हणते," मिलॉर्ड, मृताच्या पोस्टमार्टमसाठी त्याच्याच घरच्यांचा विरोध असणं, इन्स्पेक्टर रेघेनी वेळेत डॉ. मंदारला कोर्टासमोर हजर न करणं या गोष्टी डॉ. मंदार यांच्यावर लागलेल्या आरोपामागे वेगळं कारण असल्याचे दर्शवतात. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की मृताचे पोस्टमार्टम " मातृत्व " मध्ये न होता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात यावं, जेणे करून उद्या असं वाटायला नको की , हॉस्पिटलने डॉ. मंदारला वाचवण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्ट चुकीचा दिला आहे. "

जज ," कोर्ट इन्स्पेक्टर रेघे यांच्या चौकशीचे आदेश देत आहेत , तसेच मृताचे पोस्टमार्टम सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्याचे व त्यामध्ये कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश देत आहेत. पुढील तारखेला कोर्टासमोर इन्स्पेक्टर रेघे यांच्या चौकशी रिपोर्ट आणि मृताचा पोस्टमार्टम रिपोर्ट सादर करण्यात यावा. " 

कोर्टाने पुढील तारीख दिल्यामुळे स्वरा सुटकेचा निःश्वास टाकते. तिला जे करायचं होतं त्यासाठी तिला पुरेसा वेळ मिळाला होता.

क्रमश : ........... 

  

🎭 Series Post

View all