स्वत्व

How Woman Can Enjoy Their Life

" हॅलो , काय चालू आहे ?" नेहमीप्रमाणे शिल्पाने पूनमला फोन केला होता..

" काय सांगू? वैतागले आहे नुसते जीवाला, या दोन मुलांचे , घरातले, सासूसासर्यांचे करून जीव नुसता कंटाळला आहे बघ.."

" अग, हो.. किती त्रागा करशील?"


" अग काय करू मग? हि मुले जरासुद्धा शांतही बसत नाहीत.. ना अभ्यास करतात.. पाच मिनिटसुद्धा दुर्लक्ष झाले कि घराचे रणांगण झाले म्हणून समजा.. धाकटा लहान म्हणून रडणार आणि मोठा ? तो तर दिवसेंदिवस लहान होत चालला आहे बघ.."

" अभ्यासासाठी क्लासला जातो ना तो?"

" गेला तर जातो.. पण मला सांग तिथे केलेला अभ्यास पुरेसा आहे का? एवढा भलामोठा अभ्यासक्रम आहे. जरा तरी रिवीजन नको का करायला?"


"तुझे सासूसासरे सांभाळत असतील ना धाकट्याला?" शिल्पाने विचारले..


" तो काय ऐकतोय त्यांना.. पक्का बदमाश आहे.. मस्त घोळात घेतो त्यांना.. या शाळा पण बंद आहेत ना.. नाहीतर आधी कसे मुले शाळेत गेली कि डोक्याला तेवढा वेळ तरी शांती मिळायची.. जाऊ दे.. माझा विषय सोड.. तुझे सांग.. तुला तर बाई बरे आहे.. एकच मुलगी.. टेन्शन नाही कसले.."

" तू खूपच कंटाळलेली दिसते आहेस आज?" 

" कंटाळले? मै तो थक गई हूं.. परेशान हो गई हूं जिंदगीसे.. हे भगवान.. सकाळ संध्याकाळ नुस्ता नाश्ता करा.. स्वयंपाक करा.. भांडी घासा, कपडे धुवा.. नवर्‍याला सहन करा.."


" किती ती नौटंकी.." शिल्पा हसत हसत म्हणाली." मला सांग आपण मागे फुलांच्या प्रदर्शनाला गेलो होतो.. तिथे तू दोन झाडे घेतली होतीस. आहेत का चांगली?"

" कुठे ग.. हे सगळे करता करता स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.. झाडांकडे कुठे बघू?"


" मग तुझे भरतकाम?"

" धाकट्याने त्या दोऱ्यांचा चेंडू बनवला आहे.. दोघेही भाऊ खेळत असतात त्याने.. तू हसते आहेस?"

" काय करू मग? तुला किती अडचणी आहेत.."

" तेच तर सांगते आहे कधीपासून.. तुझे आपले बरे आहे.. काहीच टेन्शन नाही.."

" तुला वाटते असे?"

" मग त्या शिवाय का तू सतत काही ना काही करत असतेस.. कधी झाडे लावायला जा, कधी प्रदर्शनाला जा, कधी लायब्ररीत जा.. मला सांग ऑफिसचे काम सांभाळून कसे करतेस ग हे?"


" ह्याच वाक्याची वाट पहात होते मी..

तू मला सांग झाडांना पाणी घालायला किती वेळ लागतो? दोन मिनिट.. त्याला काही जास्त खतपाणी लागत नाही. तरिही ते होत नाही.. कारण इथे आपली इच्छाशक्ती कमी पडते.. आपण कारणे शोधतो पण त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न करत नाही.. तुला आपल्या शाळेतली स्वाती आठवते?"

" हो.. आता तिचे काय झाले?"

"ती नेहमी म्हणते, मला ना पुस्तके वाचायला आवडतात, पण वेळ नसतो.. आता ती बघ ऑफिसला जाताना एक तास आणि येताना एक तास ट्रेनचा प्रवास करते.. उलटा प्रवास असल्याने बसायला जागा मिळते.. पण तो वेळ ती ट्रेनमधली शॉपिंग कर.. गप्पाच मार असा घालवते.. हे तिनेच मला सांगितले.. पण एवढ्या वेळात एखाद, दुसरे पान नक्कीच वाचून होते.. हे लक्षात येत नाही तिच्या.. मग परत वाचायला वेळ मिळत नाही.. हे आहेच. "


" तिचे सोड.. मी काय करू ते सांग.."


" सगळ्यात आधी चारठाव सकाळ, संध्याकाळ स्वयंपाक करणे सोड.. दोन वेळेस पुरेसे कर.. आणि प्रत्येकाच्या मागण्या पूर्ण करण्यापेक्षा सगळ्यांसाठी जे करू ते खायची सवय लाव.. जर आपली आर्थिक क्षमता असेल तर कामासाठी बाई लाव ना.. माझा मामा नेहमी म्हणायचा कि आपल्याला जर परवडत असेल तर नक्की कामाला सहकारी ठेवायचे. एकतर आपले काम कमी होते आणि दुसरे त्यांनाही मदत होते.."


" नक्कीच माते, पुढे?"


" हो वत्से, अधीर नको होऊस.. सांगते एकेक.. त्यानंतर आपले जे छंद असतील ते जोपासायला लाग. मुलांचे म्हणशील तर ते जेव्हा शाळेत, क्लासला जातात तेव्हा तू हे नक्कीच करू शकतेस.. आणि मुलांना पण त्यांची कामे त्यांना करू देत कि.. आणि त्यांचा अभ्यास जेवढा घेता येईल तेवढा नक्की घे.. पण जिथे शक्य नसेल तेव्हा योग्य ती मदत घे..


कसे होते ना आपण बायका संसारात, आपल्या कामधंद्यात स्वतःला एवढे बुडवून घेतो ना कि स्वतःसाठी काही करता येते हेच विसरून जातो. म्हणजे बघ मित्रांसोबत पार्टी करायला जाताना नवरा कधीच मुलांची परिक्षा आहे का , घरात काही करायचे आहे का, हा विचार करत नाही.. आपण मात्र कोणाच्या लग्नाला एक दिवस जरी जायचे असेल तरी चार दिवसांची तयारी करून जातो....

हा छंद नंतर जपू, ते नंतर करू असेच चालते.. नंतरला अंतर असते म्हणूनच कदाचित म्हणत असावेत...

आणि सध्या उद्याचा भरवसा नाही.. नंतर कोणी पाहिले आहे...

सो सखी, जागी हो.. आणि जा या बिकट मोहिमेवर... सुरूवातीला नवरा, मुले, सासूसासरे या रूपाने अनंत संकटे येतील.. पण घाबरू नकोस.. यातून तावून सुलाखून निघालीस तर आयुष्य तुझेच असेल..."


" देवी , आपण हे जे काही अनमोल प्रवचन मला दिलेत त्यासाठी मी आपली शतशः ऋणी आहे.. हे सर्व मी एका व्रतासारखे सांभाळीन.. याची दक्षिणाही सांगितली तर कृपा होईल.."


"वत्से, हे स्वत्वाचे व्रत घेतल्यावर उतू नको मातू नकोस.. आणि अशीच कोणी समदुःखी दिसली तर सांगायला विसरू नकोस.."

" जशी आपली इच्छा.." पूनम म्हणाली.... आणि दोघीही जोरजोरात हसायला लागल्या...



हि कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई