स्वातंत्र्य... तिच्या नजरेतून!
विषय-व्याख्या स्वातंत्र्याची
"आई... आपण हा फ्लॅग का गं लावतोय?" नुकतीच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायला लागलेली चार वर्षाची समृद्धी आपल्या आईला, शिवानीला विचारत होती. घराच्या गच्चीवर दोघी मायलेकी तिरंगा लावत होत्या. पांढरा शुभ्र फ्रॉक घातलेली समृद्धी, हातात तिरंगा घेऊन अगदी अभिमानाने उभी होती.
"समु, आधी आपण हा झेंडा लावू हां." शिवानीने तिच्या हातातला झेंडा घेतला आणि एका उंच बांबूवर मोठ्या अभिमानाने चढवला. तो बांबू तिने दोरीच्या साह्याने अजूनच पक्का केला.
"आज तेरा तारीख... पंधरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा झेंडा अगदी असाच दिमाखात फडकत राहिला पाहिजे..." मनाशीच विचार करत तिने दोरीची गाठ अजूनच आवळली. दोघी मायलेकींनी राष्ट्रध्वजाला सॅल्युट केलं आणि राष्ट्रगीत म्हटलं. समुने मोठ्या आवाजात "भारत माता की जय" घोषणा दिली. दोघीजणी जिना उतरून खाली येत होत्या.
"आई... सांग ना गं... आपण हा झेंडा का लावलाय?" समृद्धीने परत प्रश्न विचारला.
"समु... आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षं झाली ना... म्हणून आपण सर्व भारतीय आपापल्या घरावर हा आपला तिरंगा झेंडा लावतोय." शिवानी बोलत होती आणि बोलता बोलता दोघी घरात आल्या. शिवानीने तिला ग्लासमध्ये दूध प्यायला दिलं आणि घाईघाईने ती स्वयंपाकघरात जाऊ लागली.
"आई... स्वातंत्र्य म्हणजे काय गं?" समुने अगदी निरागसपणे प्रश्न विचारला.
"स्वातंत्र्य म्हणजे....? खरंच अगदी निरागसपणे किती गहन प्रश्न विचारला समुने! खरंच स्वातंत्र्य म्हणजे काय? काय आहे स्वातंत्र्याची व्याख्या...? देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली ही स्वातंत्र्याची अगदी साधी, सरळ आणि सोपी व्याख्या...! पण ही व्याख्या प्रत्येक व्यक्तिपरत्वे, प्रसंगापरत्वे वेगवेगळी असू शकते किंबहुना ती असते... एखाद्यासाठी ती व्याख्या बंधनातून मुक्तता मिळविणे एवढी असू शकते तर एखाद्यासाठी रोजचं दोन वेळचं जेवण कोणत्याही प्रकारचा अपमान सहन न करता अगदी सहज मिळावं एवढी असू शकते... एखाद्यासाठी मनासारखं काम करायला मिळणं ही स्वातंत्र्याची व्याख्या असू शकते तर एखाद्यासाठी आपली कला मनमुरादपणे जपणं ही असू शकते...
एक 'स्त्री' म्हणून, एक 'आई' म्हणून माझी स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे? समाजात वावरताना पुरुषांनी स्त्री आपल्यासारखी व्यक्ती आहे हा विचार पहिले करावा... अबला म्हणून सतत बोचणाऱ्या नजरा न मिळता त्याच नजरेत तिच्याप्रति योग्य मान सन्मान दिसून यावा... कधी घरी यायला उशीर झाला ना तर रस्त्याने कोणत्याही स्त्रीला एकटी अगदी सहज, कोणालाही न घाबरता घरी येता यावं... प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत स्त्री हा थट्टेचा विषय असते नेहमी... हे सर्व न होता स्त्रीला योग्य तो आदर मिळावा... ऑफिसमध्ये पुरुष सहकाऱ्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या स्त्री सहकाऱ्याला केवळ ती स्त्री आहे म्हणून न हिणवता त्या स्त्रीला समानतेची वागणूक दिली जावी... प्रत्येकच स्त्रीला उंच भरारी घ्यायची आहे... तिच्या कुटुंबाने तिचे पंख कापण्यापेक्षा तिच्या पंखात बळ भरायला मदत करावी..." शिवानी स्वतःच्याच विचारांच्या गुंत्यात हरवली होती.
"आई... बाबा पण अशाच तिरंग्यात झोपून आला होता ना गं...!" बाबांच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या समुने तिच्या कमरेला अचानक विळखा घातला आणि तिच्या बोलण्याने शिवानी भानावर आली. सहा महिन्यांपूर्वी सागरला सीमेवर वीरमरण आलं होतं. जेव्हा त्याचं तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव तिने पाहिलं... त्याच्या चेहऱ्यावर अभिमान अगदी स्पष्ट दिसत होता... समुच्या बोलल्याने तिच्या डोळ्यांत आठवणींचा सागर गोळा झाला होता. त्या सागराला डोळ्यांच्याच कडांवर तिने अलगद अडवलं आणि समुला मिठीत घेतलं.
"हो बेटा... कारण तुझा बाबा शूरवीर होता... तुला माहिती... आपल्या देशातल्या सर्व लोकांच्या सुरक्षिततेसाठी तुझ्या बाबांसारखे सैनिक दिवस रात्र आपल्या देशाच्या सीमेवर असतात... शत्रू देशाने आपल्या देशावर हल्ला करू नये म्हणून तिथे राहून ते सतत सीमेवर कार्यरत राहतात... आणि चुकून शत्रू देशाने हल्ला केलाच तर त्यांच्यामुळेच आपल्यासारख्या लोकांना त्याची झळ लागत नाही... तुला माहिती समु! आपल्या देशावर आधी इंग्रजांचं राज्य होतं... तुझ्या बाबांसारख्या लाखो लोकांनी बलिदान दिलं म्हणून आपण आज स्वतंत्र भारतात राहतोय..." शिवानी बोलत होती.
"पण आई... आपलाच बाबा का गं गेला तसा...?" समु शिवानीला अजून घट्ट मीठी मारत बोलली.
"समु... आपला बाबा कुठेच गेला नाही... तो आपल्या सोबतच आहे... तुला माहिती समु... आमचं लग्न झालं ना तेव्हाच त्याने मला सांगितलं होतं... स्वतःच्या पायावर उभं राहायचं... आणि आपल्या घरात जी गोड गोड समु येईल ना तिलासुद्धा खूप शिकवायचं आणि मोठं करायचं... बाबा कायमच आपल्या सोबत आहे बेटा... ते बघ त्या तिरंग्याकडे बघ... तुझ्या बाबाचा हसरा चेहरा त्यात दिसतोय की नाही..." दोघी मायलेकी समोरच्या मैदानात उंच फडकणाऱ्या झेंड्याकडे बघत होत्या. इतक्यावेळ डोळ्यांच्या कडांवर अडवलेला सागर अगदी ममसोक्त बरसत होता.
जय हिंद!
सर्व वीरपत्नींना समर्पित!
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा