Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

स्वातंत्र्य सैनिक भाग १

Read Later
स्वातंत्र्य सैनिक भाग १
स्वातंत्र्य सैनिक भाग १

(सदर कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. माझे आजोबा कै. रामभाऊ रंभाजी सावंत हे स्वातंत्र्य सैनिक होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांचा खारीचा वाटा होता, असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचा आधार घेऊन त्याला कल्पनेची जोड देऊन या कथेत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.)

"तात्या, विज्या आणि त्याची माय कुठं गेलेत? घराला तर कुलूप हाय." रामभाऊंनी धापा टाकत टाकत आपल्या भावाला विचारले.

"तू तिकडं लढायला जाय अन तुझं जंजाळ आमच्या वाट्याला सोडून जाय." तात्या रागाने बोलले.

"तात्या, माझ्या मागावर त्या गोऱ्या लोकांची कुत्री लागल्यात. विज्याचं तोंड पाहून लई दिस झालेत. ते मायलेकरु कुठं गावतील? हे तर सांग." रामभाऊंनी आपल्या भावासमोर हात जोडून विनवणी केली.

या दोघांचा आवाज ऐकून तात्याची बायको बाहेर येऊन म्हणाली,
"घरी लहान लेकरु, पोटुशी बायको टाकून इकडं तिकडं उंडारत बसताना मायलेकराची याद येत नाय व्हय?"

"वहिनी, हे सगळं बोलायला माह्याकडे येळ नाय." रामभाऊ आता पार वैतागला होता.

"तिला सातवा महिना लागलाय. तिला ताराआक्का गोंदवल्याला घेऊन गेलती. बाळंतीण झाल्याबिगर आक्का तिला माघारी फिरु देणार नाय." तात्याच्या बायकोकडून ही माहिती मिळाल्यावर रामभाऊ तडक आल्या पावली माघारी फिरले.

तात्या आणि रामभाऊ दोघे सख्खे भाऊ. रामभाऊ आज इतक्या दिवसांनी तात्याच्या घरी गेला होता, तरी तात्या त्याच्यासोबत असा तुटक बोलत, वागत होता. तात्याने रामभाऊला पाणी सुद्धा विचारले नव्हते. 

रामभाऊ इंग्रजांच्या विरोधात लढत होता, हे तात्याला अजिबात पटत नव्हते. बघायला गेलं तर, तात्याची व रामभाऊची बायको या दोघी सख्ख्या बहिणी होत्या.

रामभाऊ स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्यावर तात्याने रामभाऊच्या बायकोला वेगळं काढून दिलं होतं. रामभाऊची बायको शांता गवत कापून विकण्याचे काम करुन त्यावर आपला उदरनिर्वाह करत होती.

रामभाऊने आपली ओळख कोणाला पटू नये, म्हणून तोंडाभोवती उपरणे गुंडाळून घेतले होते. रामभाऊचे डोळे फक्त दिसत होते.

रामभाऊची स्वारी आता गोंदवल्याच्या दिशेने निघाली होती. सरळ रस्त्याने गेल्यावर आपल्याला कोणी पकडेल, म्हणून रामभाऊ आडरस्त्याने जंगलाच्या वाटेने जात होते. भरभर चालता चालता वाटेत त्यांची चप्पल तुटली होती. तुटलेली चप्पल घालून चालता येत नसल्याने रामभाऊने आपल्या पायातील चप्पल काढून फेकली होती. 

अनवाणी पायाने रामभाऊंचा त्या जंगलातून प्रवास सुरु झाला होता. जंगलाच्या मध्ये गेल्यावर रामभाऊंना रस्ता भरकटल्यासारखे झाले होते. चालून चालून तहानभूक लागली होती. अंधार झाल्याने त्यांना जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. 

रात्र जंगलात काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रातकिड्यांचा, जंगली प्राण्यांचा आवाज त्यांना काहीच वाटत नव्हता. अश्या वातावरणात रहायची त्यांना सवय झाली होती. पाण्याच्या खळखळण्याचा आवाज घेत त्या दिशेने ते गेले. पाण्याचा ओढा बघून त्यांना आनंद झाला. पाणी पिऊन त्यांचे मन तृप्त झाले. पोटभर पाणी ते प्यायले होते. तहान तर भागली होती, पण आता पोटाची भूक भागवण्याची वेळ होती. रामभाऊंनी आजूबाजूला बघितले, तर त्यांना एक पेरुचे झाड बघितले.

पेरु तोडण्यासाठी ते झाडावर चढले, तोच त्यांना वाघाची डरकाळी ऐकू आली. रामभाऊंनी आवाजाच्या दिशेने बघितले, तर एक वाघ ओढ्याच्या दिशेने येत होता. रामभाऊ आपला जीव मुठीत घेऊन झाडावर बसून राहिले होते. वाघ पेरुच्या झाडाखाली येऊन कितीतरी वेळ तिथेच थांबला होता.

वाघ त्याच्या जागेवरुन हलल्याशिवाय रामभाऊंना खाली उतरता येणार नव्हते. दिवसभराच्या थकव्याने रामभाऊंना झाडावर बसल्या बसल्या झोप लागली होती.

रामभाऊ आपल्या बायको मुलाला भेटू शकतील का? बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//