स्वातंत्र्य सैनिक भाग ७(अंतिम)

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची
स्वातंत्र्य सैनिक भाग ७(अंतिम)

शांताची सासूबाई दारातून बाजूला व्हायला तयार होत नव्हती. शेवटी शांताने हातातील आपल्या मुलीला बाजूला ठेवले. सासूबाईंच्या हाताला धरुन शांताने दारातून बाजूला गेले व ती आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन घरात गेली. एरवी खाली मान घालून वागणारी शांता, आज मात्र आपल्या हक्कासाठी लढायला तयार झाली होती.

शांताचा तो रुद्रावतार बघून शांताची सासूबाई आश्चर्यचकित झाली. शांताच्या सासूबाईला तिला स्पष्टपणे काहीच सांगता येत नव्हते. शांता सासूबाईच्या बोलण्याला जुमानत नव्हती. शांता काही वाईट बोलत नव्हती, पण सासूबाईकडे लक्षही देत नव्हती.

शांताची सासूबाई तिला सतत टोमणे मारत होती, पण शांता तिच्याकडे दुर्लक्ष करत होती. आपलं काम भलं आणि आपण हे तत्व शांता पाळत होती. आपल्या मुलांना दोन वेळचं जेवण पोटभर देण्याकडे शांता जास्त लक्ष देत होती.

मनोहररावांच्या घरी जाऊन शांता कष्ट करत होती. आपला व आपल्या मुलांचा त्यावर उदरनिर्वाह भागवत होती. रामभाऊ घरी नसताना तिने आई व वडील दोघांची भूमिका निभावली होती. कोणी काही बोललं, तरी ती त्याकडे दुर्लक्ष करत होती.

रामभाऊ आपल्या सोबत गावातील ज्या माणसांना घेऊन गेले होते, त्यांच्या घरचेही येऊन शांतालाच बडबड करुन जात होते. त्या बायकांचं म्हणणं होतं की, 'रामभाऊंमुळे त्यांचे माणसं तुरुंगात गेले.' शांता त्यांच्या बोलण्याकडेही लक्ष देत नव्हती.

शांता अशिक्षित असली, तरी आपला नवरा कधीच काहीच चुकीचं करणार नाही, यावर तिचा ठाम विश्वास होता.

रामभाऊंची पूर्ण शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले होते. आपल्या विना मोठे झालेले पोरं बघून त्यांचे डोळे भरुन आले होते.

"शांते, तू तर लईच सुकून गेलीस ग." शांताचा सुकलेला चेहरा बघून रामभाऊ म्हणाले.

"धनी घरला नसलं तर बाईचा चेहरा कसा काय उजळलं? आता तुम्ही आलायसा, तर समदं ठीक व्हईल." शांता म्हणाली.

"माह्या देश प्रेमापायी तुमच्या समद्यांची लई तारांबळ उडाली असलं." रामभाऊ म्हणाला.

यावर शांता म्हणाली,
"तुम्ही चांगल्या कामापायी गेलता. मनोहररावांनी माही लई मदत केलती. तात्या भाऊजी अन आत्याबाईस्नी ते बी देखवलं गेलं नाय. माह्यावर नको त्यो आळ त्यांनी घेतला व्हता. मनोहरराव देवमाणूस हुते, त्यास्नी काही बी मनावर घेतलं नाय."

शांताचं बोलणं ऐकून रामभाऊंचे डोळे रागाने लाल झाले होते.

"आपुलेच दात नी आपुलेच ओठ. बोलाया तरी कुणाला जायचं? आता मी आलोया ना, आता कोणी बी तुला एक शबुद बी बोलणार नाय. मनोहररावांची भेट घिऊन म्या त्यास्नी माफी मांगतो."

मनोहररावांनी शांताला केलेल्या मदतीबद्दल रामभाऊंना कळताच त्यांनी मनोहररावांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, तसेच आपला भाऊ व आई जे बोलले होते, त्याबद्दल माफी मागितली.

काही स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले बलिदान दिले, तर काहींनी तुरुंगात शिक्षा उपभोगली होती. आंदोलनाचा वणवा आता थंड झाला होता. आपल्या भारतीयांनी इंग्रज सरकारला हात टेकवायला भाग पाडले होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. रामभाऊ व त्यांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचे फळ मिळाले होते.

रामभाऊंकडे स्वतःची शेती नव्हती. मनोहररावांनी आपली काही शेतजमीन खंडाने रामभाऊंना करायला दिली होती. रामभाऊ व शांता अतोनात कष्ट करत होते. काही वर्षांत रामभाऊंनी स्वतः शेती खरेदी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रामभाऊंना दोन मुली व एक मुलगा झाला. तीन मुली व दोन मुले असा रामभाऊंचा परिवार झाला. रामभाऊंनी आपल्या कष्टाच्या जोरावर गोदावरी नदीच्या कडेला जवळपास अठरा ते वीस एकर शेती विकत घेतली. शांताने त्यांची या सगळ्यात पुरेपूर साथ दिली.

पुढे जाऊन रामभाऊंची मोठी मुलगी मनोहररावांची सून झाली. रामभाऊ व मनोहररावांच्या घराचे नातेसंबंध कायमस्वरुपी जोडले गेले. आजरोजी रामभाऊ व शांता हे दोघेही या जगात नाहीत, मात्र त्यांचं नाव, त्यांनी केलेला त्याग हे सर्वच सर्वांच्या कायम स्मरणात राहील.

आपण सगळेजण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे रामभाऊ सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आहे.

मी या कथेत दाखवला तो रामभाऊंच्या आयुष्यातील एकदम थोडासा भाग दाखवला आहे, त्यांच्या आयुष्यात अजून त्यांनी काय त्रास सहन केला असेल? हे त्यांच्या आत्म्यालाच ठाऊक.

ऐतिहासिक कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन नक्की कळवा.

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all