स्वातंत्र्य सैनिक भाग ६

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची
स्वातंत्र्य सैनिक भाग ६

कांताने शांताला आपल्या घरी बोलावून मनोहरराव व त्यांची बायको किती कपटी आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न तिने केला. शांता मात्र दरवेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. शांता आपलं ऐकत नाहीये, हे बघितल्यावर तात्याने विचार करुन एक कल्पना शोधून काढली.

तात्याची आई म्हणजेच शांताची सासूबाई तिच्या बहिणीकडे राहत होती. तात्या मावशीच्या गावी जाऊन आपल्या आईला घेऊन आला.

नेहमीप्रमाणे शांता आपल्या दोन लेकरांना घेऊन मनोहररावांच्या वस्तीवर कामाला गेली होती. बाहेर पाऊस पडत असल्याने शांता आपल्या मुलीला घेऊन मनोहररावांच्या वाड्याबाहेर असलेल्या पडवीत आडोशाला जाऊन बसली. मनोहरराव तिथेच खुर्चीवर बसलेले होते. पडवीत शांता, मनोहरराव व शांताची लेक तिघेच होते. मनोहरराव शांताच्या लेकीसोबत खेळत होते.

एव्हाना पाऊस थांबला होता. मनोहरराव आपल्या मुलीसोबत खेळत आहेत, हे बघून शांता त्यांच्याकडे टक लावून बघत होती.

"शांते, तू हे धंदे कराला वाड्यावर येती व्हय." आपल्या सासूबाईचा कणखर आवाज ऐकून शांताने वळून बघितले, तर तात्या व त्याची आई तिथे उभे होते.

मनोहररावांनी शांताची मुलगी तिच्याकडं दिली व ते आपल्या जागेवरुन उभे राहिले.

"तात्या, ही तुझी आय हाय का?" मनोहररावांनी विचारले.

"व्हय." तात्या होकारार्थी मान हलवून म्हणाला.

"तुम्ही इतक्या दिस कुठं व्हत्या?" मनोहररावांनी शांताच्या सासूबाईकडे बघून विचारले.

"म्या माह्या बहिणीच्या घरला व्हते." शांताच्या सासूबाईंनी उत्तर दिले.

"तुमची सूनबाई इथं काय धंदे कराला येती?" मनोहररावांनी आपला आवाज वाढवून विचारले.

"ती घास कापणीला येत असती, मंग इथं पडवीत कशापायी बसली व्हती? माहा लेक तिकडं तुरुंगात शिक्षा भोगतो हाय अन ही इकडं तुमच्याकडं बघत बसलीया." शांताची सासूबाई स्पष्टपणे बोलली.

"म्हातारे, तुह्या जिभेला काही हाड बीड हाय का नाय? तू काही बी बोलून राहिली. म्या तिला माही मानलेली बहीण मानतो अन तू हे सगळं बोलतीया. तुही सून जव्हा दोन लेकरांना घेऊन गवत कापत जंगलात फिरायची तव्हा तू कुठं गेली व्हती? बहीण समजून तिला काम दिलं. बिचारी लेकरांना घेऊन कामाला येती, आपल्या पोटापाण्यापायी ती कष्ट करती.

तुह्या वयाचा मान ठिवून मी गप हाय. तात्या हे समदं तुह्या डोक्यातलं असलं. अरे सुतळीच्या भाऊ घरला नसताना त्याच्या बायका-पोरांकडं लक्ष द्यायचं तुहं काम हाय. कशाला तिला तरास देतो.

आता इथून गपगुमान निघा. शांता घरला आल्यावर तिला जाच करु नगा, नाहीतर माह्याशी गाठ हाय." मनोहररावांचं तडफदार बोलणं ऐकून तात्या व त्याची आई तेथून निघून गेले.

शांताने पाणावलेल्या डोळयांनी हात जोडून मनोहररावांची माफी मागितली.

"शांते, तू कायले माफी मागती. तुहा काही बी दोष नाय. आपला समाजचं असा हाय." एवढं बोलून मनोहरराव घरात निघून गेले.

मनोहररावांच्या बोलण्याने तात्याचा प्लॅन धुळीत मिळाला होता, पण झाल्या प्रकाराचा शांताला खूप मनस्ताप झाला होता. शांता घरी गेल्यावर तिची सासूबाई तिच्या दारातच बसलेली होती.

"आत्याबाई, बाजूला व्हा. मला घरात जाऊ द्या." शांता अतिशय शांतपणे म्हणाली.

"हे माह्या पोराचं घर हाय. इथं तुह्यासारख्या बाईला प्रवेश नाय." शांताची सासूबाई म्हणाली.

"म्या तुमच्या लेकाची बायको हाय. तुमचा लेक सहा मासापासून घरला सुद्धा आला नाय. आत्याबाई तुम्ही माह्या अब्रूची लत्तरं वेशीवर टांगायला निघालात, ते पुरं नव्हतं का? माह्या घरात मला जाऊ देत नाय. ह्या दोन लेकरांपायी मला आत जाऊ द्या. लेकरास्नी भूक लागली असलं." शांता कळकळीने बोलत होती.

शांताची सासूबाई दारातून बाजूला व्हायला तयार होत नव्हती. शेवटी शांताने हातातील आपल्या मुलीला बाजूला ठेवले. सासूबाईंच्या हाताला धरुन शांताने दारातून बाजूला गेले व ती आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन घरात गेली.

शांताचा तो रुद्रावतार बघून शांताची सासूबाई आश्चर्यचकित झाली. शांताची सासूबाई तिला सतत टोमणे मारत होती, पण शांता तिच्याकडे दुर्लक्ष करत होती. आपलं काम भलं आणि आपण हे तत्व शांता पाळत होती.