स्वातंत्र्य सैनिक भाग ५

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची

स्वातंत्र्य सैनिक भाग ५


मनोहररावांच्या रुपाने शांताला देव भेटला होता. तिची व तिच्या मुलांची होणारी उपासमार टळली होती.


रामभाऊंना एका आंदोलनाच्या दरम्यान अटक झाली होती, त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 


शांता दिवसभर मनोहररावांच्या वस्तीवर कामाला जात होती. पडेल ते काम ती करत होती. झाडाच्या सावलीत आपल्या लहान मुलीला झोळी बांधून त्यात झोपवायची. तिचा मोठा मुलगा विजय मनोहररावांच्या मुलांसोबत खेळायचा. मनोहररावांची बायको शांताच्या मुलांसाठी काहीही मोबदला न घेता दूध द्यायची.


आठवड्यातून एक दिवस शांताला सुट्टी मिळायची. सुट्टीच्या दिवशी शांता घरीच असायची. शेजारीच मोठा भाया, जाऊ रहायचे, पण त्यांनी शांताकडे व तिच्या मुलांकडे कधीच लक्ष दिले नव्हते. शांताची जाऊ ही तिची सख्खी मोठी बहीण होती, तरी तिचा जीव शांतासाठी कधीच तुटला नव्हता.


एके दिवशी शांता सुट्टीच्या दिवशी आपल्या घरात काम करत बसलेली होती, त्यावेळी शांताची शेजारीण चंपा तिच्या घरात आली.


"शांते, लई कामात दिसतीया." चंपा शांताच्या घरात येत म्हणाली.


आपल्या हातातील काम बाजूला ठेवत शांता म्हणाली,

"चंपे, आज माह्या घराची वाट कशी गावली?"


चंपा शांताच्या समोर जाऊन बसत म्हणाली,

"तुच घरला राहत न्हाय, मंग तुह्या घरची वाट कशी काय गावलं? तुह्या घराचं दार आज उघड दिसलं, मंग म्हणलं चला लई दिस झाल्यात, शांतीची भेटगाठ नाही." 


"काय करती बाई, कामाला नई गेलं, तर पोटाला भाकरी मिळत न्हाय. आज सुट्टी व्हती, म्हणून तुला मी गावले." शांताने सांगितले.


"शांते, तुला तुह्या धनीचा राग येत नई का? ते तिकडं तुरुंगात जाऊन बसलया अन तुला इकडं घर चालवावं लागतंया. तू त्यास्नी घर सोडून जाऊ द्यायला नग व्हतं." चंपा म्हणाली.


यावर शांता म्हणाली,

"चंपे, माहे धनी चांगल्या कामाला जात्यात. चोरी-दरोडा घालाले जाती नई, ते आपल्या देशासाठी लढत हाईत. आज त्यास्नी माघार घेतली, तर उंदया आपुल्या पोरास्नी गुलामीचं जीणं जगाया लागलं. माहे धनी वाईट काम करत नई."


"तुही जाऊबाई कांता तुह्या आणि तुह्या धन्याबद्दल लई वंगाळ बोलत व्हती." चंपा म्हणाली.


"हे बघ चंपे, कांता माही बहीण बी हाय. तिला जे बोलायचं असलं ते ती बोललं. मला ते काई बी सांगू नगं. मला समधं ठाऊक हाय. तुह्यासाठी चहा केला असता, पर फकी संपेल हाय." चंपा उठून जाण्यासाठी शांता असं बोलली.


चंपा आपल्या जागेवरुन उठत म्हणाली,

"घरला लई काम पडलीया. चहा प्यायला तुच माह्याघरी ये. कांताचं बोलणं माह्या कानावर आलं हुतं, म्हणून मी तुला सांगाया आले व्हते. मी माह्या घरला जाते."


चंपा आपल्या घरी निघून गेली. चंपासारख्या अनेक बायका शांताजवळ येऊन कांताबद्दल किंवा तिच्या नवऱ्याबद्दल काहीतरी बोलून तिला भडकवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण शांता त्यांना अजिबात भीक घालत नव्हती.


शांता एकही अक्षर शिकलेली नव्हती, पण तिचे विचार खूप उच्च होते. आपला नवरा एक चांगलं काम करतो, याची जाणीव तिला होती. आपला नवरा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटतो आणि ते झटणं पुढच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे, हे तिला कळत होते.


मनोहररावांकडे काम करत असल्याने शांता तिच्या जाऊबाईकडे मदत मागण्यासाठी जात नव्हती, हे तात्याला व कांताला पचत नव्हते. शांताला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी तात्याने एक ठरवले की, काही झालं, तरी शांताला मनोहररावांच्या घरी कामाला जाण्यापासून रोखायचे म्हणजे रोखायचे. आता हे नेमकं कसं करायचं? हा विचार तात्या करत होता.


कांताने शांताला आपल्या घरी बोलावून मनोहरराव व त्यांची बायको किती कपटी आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न तिने केला. शांता मात्र दरवेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. शांता आपलं ऐकत नाहीये, हे बघितल्यावर तात्याने विचार करुन एक कल्पना शोधून काढली.


कुरापती तात्याच्या डोक्यात काय शिजत असेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all