Login

स्वातंत्र्य सैनिक भाग ४

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची

स्वातंत्र्य सैनिक भाग ४


पोलिसांच्या जीपमध्ये बसून रामभाऊंना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. रामभाऊंची खबर दिल्याच्या बदल्यात बाबुरावला १०० रुपयांचे बक्षीस मिळाले होते.


पोलिसांनी रामभाऊंना तुरुंगात टाकले. तुरुंगाची अवस्था बघितल्यावर रामभाऊ म्हणाले,

"म्या इथं जमिनीवर झोपणार नाय. मला कापसाची गादी पायजे. माझ्या मागण्या मान्य केल्या नाय, तर मी रातभर कोणास्नी बी झोपू देणार नाय." 


रामभाऊंनी 'भारत माता की जय' हा नारा चालू ठेवला. रामभाऊ माघार घ्यायला तयार नाही, हे कळल्यावर पोलिसांनी त्यांना कापसाची गादी आणून दिली.


रामभाऊ तुरुंगात राहिले, पण तेही स्वतःच्या मर्जीनेच. इंग्रज सरकारपुढे आपली मान त्यांनी झुकवली नाही. 


रामभाऊंना पोलिसांनी पकडून नेल्यावर शांता खूप रडली होती, त्यातच तिच्या पोटात कळा यायला लागल्या. ताराआक्काने गावातील सुईणीला बोलावून तिचे बाळंतपण केले. शांताला दुसरी मुलगी झाली होती. 


ते सगळं चित्र बघून बाबुरावला आपण खूप मोठा अपराध केल्यासारखे वाटत होते. पुढील तीन ते चार दिवसांनी रामभाऊला जामीन मिळाला होता. बाबुरावचा भाऊ राजारामने रामभाऊला जामिनावर सोडवून आणले होते. 


रामभाऊ ताराआक्काच्या घराच्या दिशेने निघाले असताना वाटेत त्यांची व बाबुरावची भेट झाली. रामभाऊला बघून बाबुरावला वाटले की, हा आता आपल्याला काही सोडणार नाही, पण उलटंच झाले.


"रामराम बाबुराव दादा." हात जोडून रामभाऊ म्हणाले.


बाबुरावने खोटं हसू चेहऱ्यावर आणलं.


"बाबुराव दादा, एवढं लाचार व्हायची काय बी गरज नाय. मला पकडून दिलं, त्याचं वाईट अजाबात वाटलं नाय, पण गोऱ्यांकडून बक्षीस तुम्ही घ्यायला नग व्हतं." रामभाऊ एवढं बोलून तेथून निघून गेले. 


बाबुरावने आपल्या खिशातील शंभर रुपयांची नोट काढून वाऱ्यावर सोडून दिली. 


या प्रसंगातून रामभाऊ किती मोठया मनाचे होते, हे समजून येते.


दोन आठवड्यांनी रामभाऊ शांताला व आपल्या दोन मुलांना घेऊन आपल्या गावी परतले. पुढील काही दिवस रामभाऊ घरीच होते. रामभाऊच्या भावाने गाय विकत घेतली होती.


चळवळीच्या निमित्ताने रामभाऊला जावे लागणार होते. जाताना रामभाऊ आपल्या भावाला तात्याला म्हणाले,


"तात्या, जो काही रुसवा-फुगवा असलं तो आपल्यात. लेकरांना त्याची सजा दिऊ नगस. लेकरांना गायीचं दूध देत जा. म्या येऊस्तोवर शांता अन पोरांकडं लक्ष ठीव."


तात्याने रामभाऊला शब्द दिल्याने दुसऱ्या दिवसापासून तात्याने आपल्या बायकोला रामभाऊच्या पोरांना दूध देण्यास सांगितले. तात्याची बायको चरवीभर दूध शांताला द्यायची, पण त्यात निम्मं पाणी आणि निम्मं दूध असायचं. शांताला तिची शाळा कळत होती, पण तरीही ती काहीच बोलत नव्हती.


लहान मुलीला पाठीशी व मुलाला हाताशी धरुन शांता गवत कापायला जात होती. गवत कापून ते विकून त्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह ती भागवत होती.


एके दिवशी शांता गवत कापत असताना शांताला चक्कर आली होती. शेतात काम करणाऱ्या इतर माणसांनी तिला जवळ असणाऱ्या वस्तीवर नेले. ती वस्ती मनोहररावांची होती. 


शांताच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर तिला शुद्ध आली होती. मनोहरराव व त्यांच्या पत्नीने शांताची विचारपूस केली. शांताची कथा ऐकून त्यांना तिची कीव वाटली होती. मनोहरराव जमीनदार असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती.


शांताला मनोहररावांनी त्यांच्याकडे घास कापणीच्या कामाला ठेवून घेतले. शांताचा मोठा मुलगा मनोहररावांच्या मुलांमध्ये खेळू लागला होता. शांता काम करत असताना तिच्या मुलीला झोका देण्याचे काम मनोहरराव किंवा त्यांची बायको करायचे. शांताला त्यांची बरीच मदत झाली होती.


मनोहररावांच्या रुपात तिला देवच भेटला होता. मनोहररावांमुळे शांताची होणारी उपासमार टळली होती. 


एका आंदोलनाच्या दरम्यान रामभाऊंना अटक झाली होती. तीन वर्षे त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all