स्वातंत्र्य सैनिक भाग ३

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची

स्वातंत्र्य सैनिक भाग ३


"अयं ताराआक्का एवढ्या घाईनं कुठं चालली हाईस?" बाबुराव ताराआक्काच्या मागून आवाज देत आला.


बाबुरावचा आवाज ऐकून ताराआक्का जागीच थबकली. बाबुराव जवळ आल्यावर ताराआक्का हळू आवाजात म्हणाली,

"घरला शांताचे मालक आल्यात. भाकरी संगट खायला दूध घ्यायला चंदाकडं गेले व्हते. रामभाऊ घरला हाइत हे कुणाला सांगू नगा. म्या जाते." 


बाबुराव रामभाऊचा मावसभाऊ असल्याने ताराआक्काला त्याच्यावर संशय आला नव्हता. तिने विश्वासाने रामभाऊ आपल्या घरी आल्याचे त्याला सांगितले होते.


बाबुराव मनातल्या मनात म्हणाला,

"म्या तर आक्काच्या घराकडं डोळे लावून बसलो हुतो, मंग रामभाऊ आलेला मला दिसला कसा नाय. पोलीस स्टेशनात जाऊन ही खबर देऊन इतो. रामभाऊ फरार व्हायच्या आता पोलिसांना गावला पाहिजे." 


बाबुराव पळतच पोलीस स्टेशनाच्या रस्त्याने धापा टाकत टाकत निघाला होता.


दुसरीकडे रामभाऊने गरम भाकरी दुधात चुरुन खाल्ली. रामभाऊचे मन तृप्त झाले होते. रामभाऊच्या पायाच्या जखमांकडे बघून शांताला कसंतरी झालं. हळदीचा लेप करुन तिने रामभाऊच्या पायाला लावला.


"आवं, स्वतःची काळजी घेत जा. पायाला किती लागलंया. तुमच्या वहाना कुठं गेल्या?" शांताने काळजीने विचारले.


"जंगलातून येता येता तुटल्या, मंग फेकून दिल्या. तू हळद लावलीया, आता बरं वाटलं. म्या जरा पडतो, विज्या आला की मला उठीव." रामभाऊ एवढं बोलून निद्रेच्या अधीन झाले.


लग्न झालं तेव्हा रामभाऊ १२ वर्षांचे होते, तर शांता ७ वर्षांची होती. लग्नानंतर तीन वर्षांनी शांता पहिल्यांदा सासरी आली होती. गावात जाण्याआधी रेल्वेचे रुळ ओलांडून जायला लागायचे. शांताला रेल्वेच्या रुळांवरुन जायला भीती वाटायची, तर रामभाऊ तिला आपल्या खांद्यावर बसवून रुळ ओलांडत होते. शांता वयाने लहान असल्याने अल्लड होती. रामभाऊ तिला सांभाळून घेत होते.


नवरा म्हणेल ती पूर्वदिशा हे शांताला तिच्या आईने लहानपणीचं शिकवले होते. रामभाऊ घरी नसताना शांताला तिच्या आजूबाजूचे लोकं रामभाऊ विरोधात तिचे कान भरायचे. रामभाऊला तिने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ देऊ नये, असे सगळेजण तिला शिकवायचे, पण शांताने रामभाऊंना कधीच अडवले नव्हते.


रामभाऊंसमोर बोलण्याची ताकद शांतामध्ये नव्हती. रात्रीच्या प्रवासाने दमल्याने रामभाऊला गाढ झोप लागली होती.


संध्याकाळी सहाच्या दरम्यान राजाराम धावतपळत ताराआक्काच्या कोपीत आला.


"रामभाऊ, उठ अन पसार व्हय. घात झालाय. बाब्याने तू इथं असल्याची खबर पोलिसांना दिलीय. मी त्यास्नी अडून धरतो. तू पळ पटकन."


राजारामने दिलेला निरोप ऐकून गाढ झोपलेले रामभाऊ क्षणाचा विलंब न लावता ताराआक्काच्या घरातून दिसेल त्या वाटेला पळत सुटले. पोलिसांनी रामभाऊला पळताना पाहिलं होतं. पोलीस त्यांच्या मागावर पळत होते. 


ओसाड गायरानावर रामभाऊ पळत होते आणि त्यांच्यामागून पोलीस पळत होते. पळता पळता रामभाऊच्या पायात काटा घुसला. काटा असा टोकदार होता की, तो पायाच्या आरपार गेला होता. पायातून भळभळ रक्त वाहू लागले होते. आता रामभाऊला पळता काय चालताही येत नव्हते. 


रामभाऊने जागीच बसून घेतले. पोलिसांनी रामभाऊ भोवती गराडा घातला होता. आपलं उपरण फाडून पायाला गुंडाळले.


"साहेब, पळून पळून दमला असाल. वाईचं पाणी पिऊन घ्या." राजाराम पाण्याची एक किटली घेऊन पोलिसांच्या दिशेने घेऊन जात म्हणाला.


रामभाऊला पळून जाता यावे, म्हणून राजाराम पाण्याचे आमिष पोलिसांना दाखवत होता. राजारामचा हेतू रामभाऊच्या लक्षात आला होता. 


रामभाऊ ओरडून म्हणाले,

"अयं भावा, आरं असं करु नगं. या गोऱ्यांच्या कुत्र्यांना पाणी द्यायची काय बी गरज नाय. ते पाणी जमिनीवर ओतून दे."


रामभाऊच्या आवाजातील तोरा ऐकून राजारामने आपल्या किटलीतील पाणी जमिनीवर ओतून दिले. पोलीस आता जास्तचं चिडले होते. रामभाऊला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी दोन पोलीस त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले. 


"म्या सरकारी पाव्हना हाय. स्टेशनात जायला मला गाडी पायजे. म्या पायी येणार नाय." रामभाऊने आपली अट सांगितली.


रामभाऊ ऐकत नाहीये, हे बघून पोलीस आपली जीप घेऊन त्यांच्या जवळ गेले. रामभाऊ मानाने स्वतः जीपमध्ये जाऊन बसले.


रामभाऊला त्यांच्या मुलाला भेटता आले नाही.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe
🎭 Series Post

View all