स्वातंत्र्य सैनिक भाग २

कथा एका स्वातंत्र्य सैनिकाची

स्वातंत्र्य सैनिक भाग २


सूर्याचे किरण डोळ्यावर आल्यावर आणि पक्षांचा किलबिलाट कानावर पडल्यावर रामभाऊंनी डोळे उघडले. झाडाखालचा वाघ केव्हाच फरार झालेला होता. रामभाऊ झाडावरुन खाली उतरले. तोंडाला पाणी मारल्यावर त्यांना तरतरी आली होती. उजेडात रस्ता दिसत होता. 


रात्रीच्या अनवाणी पायाला झालेल्या जखमाही उजेडात दिसत होत्या. रामभाऊंनी त्याकडे दुर्लक्ष केले. ऊन व्हायच्या आता रामभाऊंना गोंदवल्याला पोहोचायचे होते. रामभाऊ झपझप पावले टाकत निघाले होते.


—---------–––------------------------------------


"बाब्या, तू या वक्ताला इथं काय करतोस? सारखं आक्काच्या घराकडं डोळे लावून काहून बसलास?" राजारामने विचारले.


"आरं लेका, शांता वहिनी आक्काच्या घरला हाय. रामभाऊ तिला एक ना एक दिस भेटायला इथं इलचं. म्या त्याचीच येण्याची वाट बघत हाय." बाबुरावने उत्तर दिले.


"आरं, पण काहून? तुझं त्याच्या सवाद्यानं काही काम हाय का?" राजारामला प्रश्न पडला होता.


"तुला ठाऊक नाय व्हयं. रामभाऊला जो हुडकून देईल, त्याला पोलिस बक्षीस देणार हाय." बाबुरावने सांगितले.


"तू त्या गोरा लोकांकडून बक्षीस घेण्यासाठी आपल्याच भावाला पकडून देणार हाईस. आरं तो कसाही असला तरी आपल्या मावशीचा ल्योक हाय." राजाराम बाबुरावला समजावून सांगत होते.


"तू मला शिकवू नगंस. तू तुह्या कामाला जाय." बाबुराव असं बोलल्यावर राजाराम तेथून निघून गेले.


राजारामला कल्पना होती की, बाबुरावला कितीही समजावून सांगितलं, तरी शेवटी त्याला जे करायचं आहे, तो तेच करणार. राजाराम आपल्या कामाला निघून गेले.


१२ मार्च १९३० रोजी गांधीजींच्या दांडीयात्रेला साबरमती आश्रमापासून सुरुवात झाली होती. या यात्रेत गांधीजींसोबत त्यांचे निवडक ७८ अनुयायी होते, यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोकं ३८५ किमी अंतर पायी चालले होते.


दांडी यात्रा जसजशी पुढे जाऊ लागली, तिच्यातील गर्दी वाढू लागली होती. रामभाऊ याच गर्दीचा एक भाग होते. ही यात्रा दांडी येथील समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३० रोजी पोहोचली होती. त्या दिवशी सकाळी चिमूटभर मीठ गांधींजींनी हातात घेऊन कायदेभंग केला. कायदेभंग चळवळीची मोठी सुरुवात दांडी यात्रेपासून झाली.


दांडी यात्रेत सहभागी झाल्यावर गांधीजींचे विचार रामभाऊंच्या कानावर पडले, तेव्हाच आपणही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीतरी करायचे हे त्यांनी मनोमन ठरवले होते.


इंग्रज सरकार शेतकऱ्यांना मारुन मुटकून त्यांच्या जमिनी आपल्या नावावर करुन घेत होते. एके दिवशी सरकारचे काही प्रतिनिधी शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी रामभाऊच्या वस्तीवर गेले होते. 


रामभाऊने आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगितले की, आपण ह्या लोकांना जमिनीचा ताबा घेऊ द्यायचा नाही. ह्या जमिनी आपल्या बाप-दादाच्या आहेत. आपण सगळे एकत्र येऊन उभे राहिलो, तर हे गोरे लोकं आपोआप निघून जातील.


रामभाऊ व त्याच्या वस्तीवरील लोकांनी विरोध गेल्यावर सरकारचे प्रतिनिधी माघारी फिरले होते. एकीचे बळ कामी आल्याचा आनंद रामभाऊला झाला होता. 


शेतकऱ्यांच्या जमिनीचे कागदपत्र सरकारच्या ताब्यात असल्याने ते पुन्हा जमिनीचा ताबा घ्यायला येण्याची शक्यता होती, म्हणून रामभाऊ रात्रीच्या वेळी चार ते पाच जणांना घेऊन सरकारी ऑफिसमध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांसोबतच इतर महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी गाठोड्यात भरले. 


पोलीस मागे लागल्यावर जवळच एका ठिकाणी प्रेत जळत होतं, त्या जळत्या प्रेतावर रामभाऊंनी ते कागदपत्राचं गाठोडं टाकलं. कागदपत्रे जळून खाक झाल्याने आता इंग्रज सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊ शकणार नव्हते, त्यांच्याकडे त्या संबंधीचा काही पुरावाच शिल्लक नव्हता. 


पोलिसांना चकवा देऊन पळण्यात रामभाऊंना यश आले होते. रामभाऊंना जो पकडून देईल, त्याला सरकारकडून १०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


दुपारपर्यंत रामभाऊ गोंदवल्याला पोहोचले होते. ताराआक्काच्या कोपीत लपतछपत ते पोहोचले. 


रामभाऊला दारात बघून ताराआक्का म्हणाली,

"शांते, पाहुणे आले बघ. राती तुला वाईट सपान पडलं व्हतं. पाहुणे बघ धडधाकट हाईत." 


बऱ्याच दिवसांनी रामभाऊला बघून शांताचे डोळे पाणावले होते.


"शांते, लई भूक लागलीय. पटकन भाकरी वाढ. तुह्या हातची भाकरी खाऊन लई दिस झाल्यात. विज्या कुठं दिसत नाय." रामभाऊने विचारले.


शांताने भाकरी करण्यासाठी चूल पेटवली. ताराआक्काने रामभाऊला पाणी दिले व ती म्हणाली,


"विज्या ह्यांच्यासंगट बाजारात गेलाय. घरी राहून त्यो शांताला तरास देत राहतो. मंग मीच त्याला ह्यांच्यासंगट धाडलं. तुम्ही आता आल्यासरशी चार दिस रहा." 


रामभाऊ गोंदवल्याला आल्याचे बाबुरावला समजेल का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all