स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रींया भाग 1

Swatantra Ladhyatil Striya


8 मार्च हा \"महिला गौरव दिन\" म्हणून आपण साजरा करतो .
तसे पाहिले तर प्रत्येक दिवस हा, महिला गौरव दिन असायला पाहिजे.
कारण दररोज ची जीवघेणी स्पर्धा ती पार करत असते.
या स्पर्धेमध्ये तिच्या सहनशीलतेचा, अगदी कस लागलेला असतो.
या दिवशी आपण समाजातील अशा काही महिलांचे सत्कार समारंभ आयोजित करतो, ज्यांनी एक उल्लेखनीय कार्य केलेले असते, किंवा करीत आहे. की ज्यामुळे सामाजिक प्रगती साध्य होते, किंवा काहींच्या विस्कळीत आयुष्याला योग्य दिशा मिळते.


अशा काही कार्यतत्पर माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या कार्याचा मी मनापासून सन्मान करते आणि तुमच्या या कार्याला मोहर लागून, त्याला अनमोल असे कोंदण मिळावे.अशी सदिच्छा मी देते.

पण मी..
आज मागे जाणार आहे. कारण आपण सध्या सर्व भारतीय \"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव\" साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यात क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे.

या स्वातंत्र्या साठी अनेकांनी आपल्या घरांदारावर निखारे ठेवले होते. अन् आपले आयुष्य स्वातंत्र्य यज्ञात झोकुन दिले होते. देव, देश आणि धर्मासाठी, कशाचीही पर्वा न करता, दिवसरात्र कार्य करत राहिले आहे. आणि म्हणुनच आज आपण स्वतंत्र देशात सुखाने, समाधानाने राहात आहोत.

या स्वातंत्र्य चळवळीत स्त्रिया ही मागे नव्हत्या. त्याही अगदी पदर खोचुन या कार्याची धुरा सांभाळत होत्या. जे जे जमेल ते ते आवडीने करत असत. एखादा निरोप पोहोचवणे, किंवा खबर काढुन आणणे म्हणा. त्या चोख करत होत्या. क्रांतिकारकांना वेळच्या वेळी जेवण तयार करून देणे. ते जेवन त्यांच्यापर्यंत बेमालूम पणे पोहोचवणे. या कामात त्या तरबेज होत्या. तर काही जणी प्रत्यक्ष कृती करून आपला खारीचा वाटा उचलत होत्या.

काही क्रांतिकारक सहा सहा महिने घरी फिरकतही नसायचे.किंवा काही तुरुंगात शिक्षा भोगत असत .या बिकट परिस्थिती मध्ये सर्व कुटुंबाचा भार तिच्यावर येऊन पडत होता. सासु, सासरे, मुलं, याबरोबरच दुखणी. आणि बाहेरच्या परिस्थितीला पण सामोरं जात होत्या. तर काही पतिची प्रेरणा बनुन होत्या .

यमुनाबाई विनायक सावरकर आणि दगडाबाई शेळके या विरांगणांचा अल्प परिचय करून देण्याचा माझा हा छोटास प्रयत्न आहे.

यमुनाबाई या भाऊराव चिपळूणकर, ठाणे. याची कन्या होय.
भाऊराव हे जवाहर रियासत चे दिवाण होते. अतिशय सुखवस्तू हे कुटुंब होते. घरी सगळीच रेलचेल होती. या वैभवशाली घरात वाढलेली ही बालिका. हिचा विवाह विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झाला.

विनायक यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत हवी होती. आणि ती मदत भाऊराव चिपळूणकर यांनी केली होती. त्यानंतर सावरकर हे लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले.

यमुनाबाई यांना माई या नावानेच ओळखले जात होते. माहेरी चांदीच्या ताटात जेवणारी ही यमु सासरी मात्र तारेवरची कसरत करत करत संसार फुलवत होती. प्रत्येक पाऊल हे परिक्षेचे असायचे. चार लेकरं पदरात होती. या सर्वांचे करताना माईचा जीव मेटाकुटीला येत होता. कारण सावरकर हे अंदमानात होते.

त्यांना देशसेवेच्या वेडाने जणू झपाटलेले होते. मोठा मुलगा चार वर्षाचा असताना, त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे, देवाघरी गेला. कारण त्यावेळी सावरकर लंडन येथे होते.

प्रभात, शालिनी आणि विश्वास. यामध्ये, शालिनी ही पण अल्पायुषी ठरली. बालपणीच देवाघरी गेली.

माई. म्हणजे यमुनाबाई सावरकर.
याही एक देशभक्त.
पतीला काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यानंतर, मुलाचा उपचाराविना मृत्यू झाला होता. पण त्या जराही डगमगल्या नाहीत. इंग्रजांची माणसे रोज रोज येऊन परेशान करत असत. या न त्या कारणाने त्रास देत असत.

त्यांनी अशा या परिस्थितीत स्वतःला सावरून इतर महिलांमध्ये देशाभिमान जागवण्यासाठी, अभियान सुरू केले. सोबतीला येसूवहिनी ही होत्या. म्हणजे सावरकरांच्या मोठ्या भावाची बायको.
म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू , बाबाराव उर्फ गणेश सावरकर. यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.

माईंच्या धीराचा हा एक अनुभव..

सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात जायचे होते. पण त्यापूर्वी ते मुंबई येथे डोंगरी जेलमध्ये होते. अंदमानात जाण्यापुर्वी माई त्यांना भेटायला गेल्या. कारण त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजे \"परतून पुन्हा न येणे\" असे तेव्हा होते. डोंगरी येथील जेलमध्ये सावरकर आणि माई यांची भेट झाल्यावर दोघेही खूप भाऊक झाले. हुंदके दाटून डोळे भरून आले. पण सावरकरांनी मात्र स्वतःला सावरले.

आणि ते माईला म्हणाले, "मी काडी काडी जमवून संसार करणार्यातला नाही. असा संसार चिमणी-पाखरे, कावळे ही करतात. मी मात्र माझ्या देशालाच परिवार समजतो. आणि या देशाचा संसार मी मांडला आहे. याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. जोपर्यंत माझा देश स्वतंत्र होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहील. मला तोपर्यंत स्वस्थता लाभणार नाही. यमु हे बघ, एक ज्वारी चा दाना, जेव्हा जमिनीत रुजतो तेव्हाच एक कणीस तयार होते. अशाच प्रकारे या देशाची पुढची पिढी चांगली आणि स्वतंत्र जगवायची असेल तर, समृद्ध भारत घडवायचा असेल तर.. आपल्याला रुजावेच लागेल. "
यमुना हे सर्व स्तब्ध होऊन ऐकत होती. काय बोलावे... तिला काहीच कळेना.
"यमु,ही आपली शेवटची भेट असंच समज, पुढच्या जन्मात अवश्य भेटु."

हे ऐकल्यावर मात्र माईचा बांध फुटला. हुंदके अनावर झाले. पण लगेचच स्वतः च्या भावना आवरुन त्या सावरल्या. आणि पतिच्या पायांना स्पर्श करून म्हणाल्या, "तुम्ही बिल्कुल चिंता करू नका. आपण पुन्हा नक्कीच भेटु.तेही याच जन्मी. पुढचा जन्म कुणीपाहिला आहे? मला माझे मन सांगते आहे. आणि तुमच्या दृढ निश्चयावर देखील, माझा पुर्ण विश्वास आहे. ही शिक्षा पूर्ण करुन तुम्ही नक्कीच परत याल. ब्रिटिशांना भारतातुन हाकलायचे आहे ना ? ते काही नाही तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या." माईच्या या वाक्याने सावरकरांना केवढा धीर आला होता.

पण इकडे माईच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. विव्हळ अंतकरणाने त्या घरी परतल्या, घरी येऊन देवा समोर बसल्या आणि म्हणाल्या, "हे देवा, आता सगळा भार तुमच्या खांद्यावर आहे, ह्यांना सुखरूप परत आणा."

त्या नंतर माईंनी स्वतः ला देशभक्ती आणि समाज जागृती साठीच्या कार्यात झोकुन दिले.
सावरकरांनी अंदमानात लिहलेले "कमला " हे महान काव्य याचे पूर्ण स्वरूप माईच्या [ तारूण्यतील ]व्यक्तित्वाशी मिळते जुळते आहे. यावरून, जगण्याची प्रेरणा किंवा शक्ती म्हणजेच माई त्यांच्या सोबत होत्या.

स्त्री ही एक शक्ती आहे. भक्ती आहे. मायेची सावली आहे. प्रेरणा बनुन गरूडभरारी घेणारी आहे.
माईना माझे शत शत नमन .


🎭 Series Post

View all