Feb 23, 2024
नारीवादी

स्वार्थी कौतुक.... स्त्री सुक्त

Read Later
स्वार्थी कौतुक.... स्त्री सुक्त
स्त्री सुक्त आणि त्यांचे विचार

साक्षी ,"बाबा उठा चला आरतीला देवीच्या "

बाबा जरा आजोबासोबत गप्पा मारत बसले होते... सोबत काका ,आणि शेजारचे काका ही होते..

गप्पा रंगात आल्या होत्या म्हणून ते आरतीला येणार
नाहीत असे दिसत होते..

साक्षी केव्हाची हाक देत होती ,इकडे आरती सुरू झाली होती ,आणि दोघी मायलेकी आजोबा आणि बाबा यांची वाट बघत होत्या..काका तर कधीच देव धर्म पाळत नसत हे माहीत होते म्हणून त्यांना बोलवले नाही..

पण ह्या दोघांनी ही टाळले ,काय तर हे बायकांचे काम आणि पूजा ,पोथी ,आरती मग आम्हाला का उगाच मध्ये पडायचे.. आजोबा ही सुरू लावून म्हणाले..

साक्षी पुन्हा आली ते प्रसाद घेऊन ,आणि सोबत देवाची आरती घेऊन...सगळ्यांना आरती दिली..

साक्षीला सगळ्यांचे हे वागणे अजिबात आवडले नाही ,तिला राग आला होता , तिचा राग सगळ्यांना जाणवला ही होता...

आजोबा, "किती तो राग साक्षे तुझ्या नाकावर, नाही आवडत एखाद्याला मग काय बळेच मन नसतांना येऊ का आम्ही ,मनात आहे ना देव बस झालं तर.."

तिच्या बाबांनी ही सूर मिळवला ,"साक्षी कश्याचा ही राग मानत जाऊ नकोस ,हे चांगले लक्षण नाही ...उठसुठ राग.."

साक्षीला आता पुन्हा राग आला ,हे लोक स्वतःचे लक्षण काय कसे ह्याचे परीक्षण नाही करत ,सगळे पुरुष सारखेच.. मी चांगल्या कारणास्तव रागावले आहे हे ही कळत नाही यांना...

साक्षी ,"बाबा स्त्री सुक्त ,तसे देवीचे सुक्त असते ज्यात देवीची स्तुती केली जाते तिला प्रसन्न करण्यासाठी म्हणून निदान त्यासाठी तरी यायला हवे ना, आणि आरतीची मला सवय लावून तुम्ही नामानिराळे होत आहात..."

बाबा, "तू आणि मी ह्या विषयावर नंतर बोलू ,आधी तू जाऊन आईला सांगा आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आहे ,जरा गरमागरम पोहे कर, आणि सोबत चहा ही...काकांना तिच्या हातचे पोहे खायचे आहेत.."

साक्षीला पुन्हा राग आला ,सकाळपासून आई राबते आणि आताच कुठे जरा ती निवांतपणे बसणार तोच पोहे ,ही काय वेळ आहे का त्रास देण्याची...मी ही करू शकते हे माहीत असून ही आईला त्रास का तर तिच्या हातचे आवडतात... तिच्या हातचे जेवण आवडते...ह्या सबबी सांगून स्त्रीला चढवले जाते...

साक्षी आत जाऊन पुन्हा बाहेर आली आणि म्हणाली ,"बाबा मी काय म्हणते मी करते ना चहा तसे पोहे ही केले असते पण ही वेळ नाही ना पोह्याची.."

बाबा रागावले तिच्यावर, "तू का करशील पोहे ,आणि हे तू का सांगतेस ही वेळ नाही ते...असे कुठे असते ग...काका कधी येणार आपल्याकडे ,त्यांना आवडतात हे आईला ही माहीत आहे...त्यांच्यासाठी अशी कोणती वेळ ठराविक का पाळायची.."

साक्षीला आता कमाल वाटली ,काकांच्या घरी काकू म्हणेल ते होते...कोणी घरी गेले की आलेले पाहुणे बाईचा तोरा पाहूनच म्हणतात ,जेवण ,नास्ता काही नको ,आत्ताच जेवून आलो आहोत ,का तर काकूच्या स्वभावात तिखटपणा आडवा येतो.. खुद्द काका ही बेवेळी काही मागत नाही पण इथे आले की जेवण ,नाश्ता, आणि बरेच काही हवे असते...

साक्षी, "बाबा आईच्या हातचे असे काय खास असतात हो पोहे जे मी नाही करू शकत.."

बाबा, "साक्षी काय लावले आहेस तू हे, जा जरा आईला मदत करु लाग आत जाऊन.."

साक्षी, " तरी सांगा ना बाबा ."

बाबा, "आईच्या हाताला चव आहे ,खूप अप्रतिम जेवण बनवते ,पोहे तर लुसलुशीत असे जे कोणाकडे ही मी खाल्लेले नाही...आजी ही असे बनवू शकत नव्हती ,शिरा तर जणू रोज सत्यनारायणाचा प्रसाद ,खूप काही आहे सांगण्यासारखे...तुला नाही कळणार ते..."

साक्षी.."पण बाबा ह्या कौतुकाचा काय उपयोग तिला ,तिच्या मेहनतीला काय उपयोग...शेवटी होणार त्रास वाढतो , कष्ट चुकत नाही उलट वाढतात... थोडी स्तुती केली की ती ही पळते पोहे करायला.."

काका ,"बायकांची सुक्त हवीच कश्याला रे इतकी ,मी म्हणूनच माझ्या बायकोची स्तुती करत नाही डोक्यावर बसतात..हे मनातच ठेवलेले बरे असते..."

साक्षीला काकांच्या बोलण्याचा राग आला , म्हणूनच काकू काही रस घेत नसतील यांना काही करून खाऊ घालण्यात...नाहीतर तिने ही धावून धावून काकाची चव सांभाळली असती..

साक्षी, "बाबा हे स्त्री सुक्त जरा इथेच गुणगुणत बसण्यापेक्षा तिच्या ही कानावर पडू देत जा ,तुम्ही कौतूक करतात पण ते स्वार्थी कौतुक वाटते ,अगदी काम करून घ्यायचे आहे म्हणून केल्यासारखे...हेच शब्द तिच्या कडे तिच्या बाजूला जाऊन तिची मदत करून केले तर तिला खूप बरे वाटेल ,नाहीतर काही दिवसांनी तुमचे ही हाल काकांसारखे होतील हे नक्की.."

साक्षीने बोललेले एकूण एक शब्द काकाला चांगलाच टोचला आणि त्यांनी तिच्या समोर हात जोडले ,आणि आजोबांनी पाठ थोपटली..

©®अनुराधा आंधळे पालवे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//