Login

स्वरागिनी भाग 4 (अंतिम )

Marathi Story
स्वरागिनी भाग 4 (अंतिम )

मागच्या भागात आपण वाचले रागिणी ने मोठ्या हिमतीने विजय आणि आनंदिताईंच्या विरोधात जाऊन स्वराचे गाण्याचे शिक्षण सुरू केले होते.
आता पुढे.......

*******
स्वराच्या मेहनतीचे आणि रागिणीच्या इच्छाशक्तीचे चीज झाले. नशिबाने रागिणीला स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

आज जेव्हा रागिनी स्वराला सोडवायला क्लासला गेली त्यावेळी प्रदीप ने दिला भेटण्यासाठी बोलून घेतले होते.
प्रदीपच्या चेहऱ्यावर हास्याची एक रेष उमटली होती. रागिनीला आपल्या हातातले पेपर दाखवत तो म्हणाला,

" तुम्हाला जी संधी पाहिजे होती ती माझ्या हातात आहे आणि या संधीचं सोनं करायचं काम तुमच्या हातात."

रागिनी कोड्यात पडली होती. प्रदीप च्या हातातल्या पेपर कडे बघत तिने विचारले,

"काय आहे या पेपर्स मध्ये"

प्रदीप सांगू लागला
"आपल्या शहरात सर्वात मोठी सिंगिंग कॉम्पिटिशन होणार आहे. जिंकणाऱ्याला पाच लाख रुपये रोख आणि एक ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शहराची गान कोकिळा म्हणून गौरविण्यात येणार आहे."

हे एकूण रागिणीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने घाई घाई घाईत विचारले
"मग स्वराला यामध्ये भाग घेता येईल ना."

"हो येईल पण एक अडचण आहे."

"अडचण कोणती अडचण?"

"ही स्पर्धा दोघांच्या ग्रुप मध्ये होणार आहे. म्हणजे स्पर्धेत भाग घेणारा एकटा नसून दोघांचा ग्रुप असेल.
जसे भाऊ-बहीण, वडील मुलगा, बहिणी- बहिणी किंवा मग आई आणि मुलगी."

आई आणि मुलगी हे ऐकून रागिनी विचारात पडली.

"काय झालं मी म्हणालो होतो संधीच सोन करणे तुमच्या हातात आहे."

"मित्र-मैत्रिण नाही चालत का किंवा मैत्रिणी मैत्रिणी. आपल्या क्लासमध्ये कितीतरी अजून चांगले गायक आहेत स्वरा बरोबर कोणीही चालेल ना."

"हो नक्कीच आहेत. पण मला वाटलं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी चालून आली आहे तर ती तुम्ही अशी सोडणार नाहीत."

हे ऐकल्यावर रागिणीला काय बोलावे ते सुचेना.

"नाही पण मी कसं गाऊ शकते."

"का नाही स्वरा बरोबर तर तुम्ही रोज रियाज करत आहात. अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे."

"नाही हे शक्य नाही माझे घरचे यासाठी तयार होणार नाहीत."

"ठीक आहे तुमची मर्जी माझं काम होतं तुम्हाला सांगणं.
असेही तुम्हाला तुमचं स्वप्न दुसऱ्यांच्या हातात द्यायचं असेल तर.".....

यानंतर प्रदीप काहीही न बोलता मुलांना शिकवायला गेला.

रागिणीच्या डोक्यात मात्र विचार चक्र सुरू झाले. तिच्या कानात प्रदीप चे एकेक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. काय करावे ते तिला सुचत नव्हते. स्वराचा क्लास संपल्यानंतर ती सरळ आई कडे गेली.
घडलेली सगळी हकीकत तिने आईला सांगितली आणि बाबांच्या फोटो समोर बसून रडू लागली.

अनघाने रडणाऱ्या रागिणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली,

" रागिनी तूच म्हणाली होतीस ना आता मागे हटणार नाही. असं समज बाबांनीच तुझी इच्छा पूर्ण केली आहे. त्यांचे स्वप्न करण्याची संधी त्यांनीच तुला दिली आहे. आत्तापर्यंत स्वरा च्या पाठीमागे उभी राहिलीस ना . आता स्वतःसाठी उभी रहा. मी आता तुझ्या पाठीशी आहे."

आईचे हे बोलणे ऐकून रागिणीला धीर आला ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली.

" खरंतर हे मी खूप आधीच करायला हवं होतं माझं चुकलं ग. मी माझ्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहू शकली नाही."
अनघा रागिनी चे डोळे पुसत म्हणाली.

"आई आता जो तू पाठीमागे हात ठेवलास ना तो पुरे आहे मला ही लढाई लढण्यासाठी."

असे म्हणून आत्मविश्वासाने रागिनी घरी पोहोचली.
आईचा पाठिंबा मिळाला होता पण कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तिला मधुकर रावांशी बोलणे योग्य वाटले.

रागिनी चे बोलणे ऐकून मधुकरराव एक दोन मिनिट शांत बसले. त्यानंतर पाठीमागे हातात हात घालून फेऱ्या मारू लागले.
हे बघून रागिनीची घालमेल वाढली.

"बाबा, काय वाटतं तुम्हाला?"
तिने पुन्हा एकदा घाबरत विचारले.

" स्वरा गात होती ते ठीक होतं. आपल्या घरची परिस्थिती तुला माहित आहे. तु गाणार म्हणजे.... घरात वादळ येणार आणि त्या वादळाला सामोरे जायला मी समर्थ आहे."

शेवटचे वाक्य ते एवढ्या पटकन म्हणाले की रागिनीला लवकर लक्षातच आले नाही.
दोन मिनिट ती नुसती शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिली.

"अगं बघतेस काय जा रियाजला सुरुवात कर. माझी सून आणि नातच जिंकले पाहिजे."
मधुकरराव हसून रागिणीला म्हणाले

हे ऐकून रागिणीलाही हसू आले.

"बाबा काय घाबरले होते मी. मला वाटले तुम्ही मला नाही म्हणताय."
असं म्हणत रागिनीने पळत जाऊन मधुकर रावांना नमस्कार केला.

आईबरोबरच आता मधुकर रावांचाही पाठिंबा रागिणीला मिळाला होता. तिने प्रदीप ला कळवून लगेचच रियाजाला सुरुवात केली. विजय आणि आनंदी ताईंना वेळेवर सांगायचे असे तिने ठरवले होते. प्रॅक्टिस साठी तिला आणि स्वराला आता दोन तास इन्स्टिट्यूट मध्ये थांबणे गरजेचे होते. घरातले काम आधीच आवरून ती क्लासला जात होती. हळूहळू रागिनी आणि स्वराला होणारा उशीर आनंदीताई आणि विजयच्या लक्षात आला.
विजयने एक दिवस रागिणीला विचारले
"एवढा उशीर का झाला आज?"

त्यावर लगेचच आनंदी ताई म्हणाल्या
" आज नाही रोजच याच वेळेस येतात दोघी."

"हो ते मी सांगणारच होते. स्वरा आणि मी एका स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याची प्रॅक्टिस चालू आहे म्हणून उशीर होतो."

"काय म्हणालीस स्वरा आणि तू?"
विजयने दरडावून विचारले.

"हो , ही आपल्या शहरात होणारी सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मी आणि स्वरा दोघीही गाणार आहोत."

"कोणाला विचारून तू हा निर्णय घेतलास. मला एकदा विचारावस पण वाटलं नाही का तुला?"

"विचारून काय होणार होते तू तिला परवानगी देणार होतास का?"
मधुकरराव मध्येच म्हणाले.

"अहो बाबा पण."...

"पण बिन काही नाही मी परवानगी दिली आहे माझ्या सुनेला. हा ...आता तुम्हाला दोघांना स्पर्धा बघण्यासाठी यायचे असेल तर येऊ शकता.
अजून एक ही स्पर्धा जिंकणाऱ्याला पाच लाख रुपये रोख मिळणार आहेत."

शेवटचे वाक्य मधुकरराव मुद्दाम आनंदी ताईकडे बघत म्हणाले.

'पाच लाख रुपये रोख'..... आनंदी ताई स्वतःशी

मधुकर रावांच्या पाठिंब्यामुळे विजयचा विरोध मावळला होता. पण तरीही आपल्या परीने तो अनघाला कोणत्या ना कोणत्या कामात अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
********
स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. स्पर्धा मोठी असल्याकारणाने शहरात ठीक ठिकाणी स्पर्धेचे पोस्टर्स लागले होते. शहरातल्या नामांकित इन्स्टिट्यूटने या स्पर्धेमध्ये आपले स्पर्धक पाठवले होते. सुर रंजनी तर्फे स्वरा आणि रागिनी म्हणजेच स्वरागिनी हा ग्रुप होता.

स्वरा ही आईबरोबर मन लावून रियाज करत होती.
स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रदीप,स्वरा, विकास, अनघा,रागिणी आणि मधुकरराव हॉलमध्ये पोहोचले.

स्टेज कडे पाहून रागिणीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बाबांच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरले. डोळ्यातले पाणी रागिनीने डोळ्यातच आटवले आणि ती पुढच्या तयारीला लागली.

विजय आणि आनंदीताई मात्र तिथे आले नव्हते.
स्पर्धेला सुरुवात झाली. एकाहून एक चांगले गायक तिथे उपस्थित होते. सुरुवातीला ग्रुप मधील प्रत्येकाला एक एक गाणं म्हणायचं होतं. स्वराने अर्थातच गणपती बाप्पाच्या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर रागिनी गाणं म्हणण्यासाठी उभी राहिली.
सर्वात प्रथम मनामध्ये तिने बाबांना नमस्कार केला आणि गायला सुरुवात केली


ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

तिच्या या गाण्याने उपस्थित लोकांच्या मनात स्वरागिनीने घर केले.
या गाण्याबरोबरच आपलीच टीम विजेती होणार यावर प्रदीपची खात्री पटली. स्पर्धेतील पहिल्या फेरीचा निकाल लागला होता.दहा ग्रुप मधून पाच ग्रुप सिलेक्ट झाले होते. त्यामध्ये स्वरागिनी तीन नंबरला होत्या.

तिसरा नंबर जरी आला असला तरी रागिणीचे गाणे मात्र प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले होते. हॉलच्या बाहेर पडताना प्रत्येकाच्या ओठावर स्वरागिनीचेच नाव होते.

पहिल्या फेरीनंतर या स्पर्धेची उत्सुकता अजूनच वाढली होती. प्रत्येक ठिकाणी आता या स्पर्धेविषयी चर्चा रंगताना दिसू लागली. यामध्ये विजयचे ऑफिसही अपवाद नव्हते.

"अरे विजय तुझी मुलगी एवढी छान गाते तू कधी सांगितलं नाही."
ऑफिस मधील एक सहकारी विजयला म्हणाला.

यावर विजय काय उत्तर द्यावे हा विचार करत असतानाच

"अरे मुलगीच नाही तर वहिनी ही खूप छान गाता. याने आपल्याला कधी सांगितले नाही. तिसरा नंबर आला आहे दोघींचा."

ऑफिसच्या सहकाऱ्यांकडूनच विजयला पहिल्या फेरीचा निकाल कळाला होता.
सहकाऱ्यांकडून होणाऱ्या कौतुकामुळे विजयलाही आता या स्पर्धेची उत्सुकता वाटू लागली होती.

दुसरीकडे आनंदी ताईंची ही अशीच परिस्थिती होती.
त्यांच्या मैत्रिणीमध्ये आता रागिनी आणि स्वराची चर्चा जास्त होत होती.

"खूप छान गाते हो तुझी सून आणि नात."
एक मैत्रीण

" मग सून आणि नात कोणाची आहे. मीच बसून दोघींचा रियाज करून घेते."
फुशारकी मारायची संधी मात्र आनंदी ताईंनी सोडली नाही.

त्या दिवसापासून मात्र त्यांचा स्वरा आणि रागिनी विषयी असलेला राग कमी झाला.
विजयला ही कुठेतरी अपराध्यासारखे वाटत होते. पण रागिणीला पाठिंबा देण्यात त्याचा इगो पुढे येत होता. मधुकर रावांनी हे ओळखले.

" विजय, माणसाने जर चूक लक्षात आली की ती सुधारण्याचा लगेच प्रयत्न करावा."
मधुकरराव विजयला म्हणाले.

"काय बाबा काय बोलताय तुम्ही मला समजले नाही."
विजय गडबडून म्हणाला.

" हीच वेळ आहे विजय आपल्या निरागस लेकीच्या मनात स्वतःविषयी प्रेम निर्माण करण्याची नाहीतर आयुष्यभर त्या लेकराच्या मनात आपल्या बाबांविषयी अढी निर्माण होईल."
एवढं बोलून मधुकरराव तिथून निघून गेले.

विजयच्या कानात मात्र बाबांचा आवाज सतत घुमू लागला.
दुसरी फेरी ही झाली. स्वरागिनीची विजयी घौडदौड तिसऱ्या म्हणजे शेवटच्या फिरीपर्यंत येऊन पोहचली.आता शेवटची फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला येऊन पोहचली होती.

इकडे शेवटची फेरी आली तरी विजय कधी आणि कसे बोलायचे याच विचारात होता.
शेवटच्या फेरीसाठी स्वरा आणि रागिणी जीव ओतून प्रॅक्टिस करत होत्या.

स्पर्धेचा दिवस उजाडला. देवाला नमस्कार करून सगळे निघाले. बराच वेळ प्रयत्न करूनही आज रागिनिला कॅब मिळत नव्हती.

" आई किती वेळ अजून कॅब यायला."
विकास ने विचारले

"हो रे...आज कॅबच मिळत नाहीये.बाबा तुमच्या मोबाईल वरून एकदा ट्राय करता का? प्रदीप सरांचाही दोन वेळेस कॉल येऊन गेला."

"आई कॅब मिळाली नाही तर...."

स्वराचा नर्व्हस झालेला चेहरा पाहून रागिणी म्हणाली
"मिळेल बेटा काळजी करू नकोस."

"काही गरज नाही कॅब बुक करायची. आपण आपल्या कार ने जाणार आहोत."
विजयचे हे बोलणे ऐकून सगळे जण दोन मिनिट त्याच्याकडे पाहत राहिले.

सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून विजय म्हणाला,
" मी ही येणार आहे."

हे एकूण स्वरा
"खरचं बाबा तुम्ही येणार आमच्याबरोबर असे म्हणत बाबांकडे पळत गेली."

तिला पळत आलेलं पाहून विजयने आपले दोन्ही हात पुढे करून तिला उचलून घेतले आणि छातीशी कवटाळले.

हे बघून मधुकरराव हळूच म्हणाले
" देर आये दुरुस्त आये."

चला मग स्वरा गाडीत जाऊन बसू आपण. मधुकरराव सगळ्यांना घेऊन बाहेर गेले.आता विजय आणि रागिणी दोघेच होते.

विजय रागिनी जवळ येत म्हणाला,
" रागिणी माझे चुकले..."
मध्येच रागिणी त्याला थांबवत म्हणाली,
"माझ्या स्वराच्या पाठीशी आज तिचा बाबा उभा आहे यातच सगळे काही आले.उशीर होतोय आपल्याला निघायला हवे."

सर्वजण स्पर्धेच्या ठिकाणी पोहचले.आज हॉल पूर्णपणे भरलेला होता.स्टेजवर जाण्याआधी रागिणी ने आईचे दर्शन घेतले आणि म्हणाली,
"आई, आज इथे बाबा असायला हवे होते."

"आहे इथेच आहेत ते.तुझ्या गाण्यात आहेत."
अनघा म्हणाली.

रागिणी आणि स्वरा स्टेजवर आपल्या जागेवर जाऊन बसल्या होत्या. स्पर्धा सुरू होण्यासाठी वेळ होता.स्वराला शेवटच्या फेरीचे टेन्शन आले होते ती रगिनीला म्हणाली,

" आई, आज जर आपला एक नंबर आला नाही तर आपण हारू ना.माझ्याकडून काही चुकले तर..."

रागिणी स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

" स्वरा स्पर्धा म्हंटले की कोणीतरी हरणार आणि कोणीतरी जिंकणार .आपल्या हातात असतं फक्त मनापासून प्रयत्न करून आपले बेस्ट देणे. तू प्रत्येक फेरीत खूप छान गायली आहेस.आणि आज तर आपण जिंकणारच.का विचार ?"

"का ?"

"कारण आजपर्यंत माझे बाबा माझ्या बरोबर होते. आज तुझे देखील बाबा तुझ्या बरोबर आहेत."

प्रेक्षकांमध्ये बसलेल्या विजयकडे बघत रागिणी म्हणाली.
स्वरा ही हे ऐकून खुश झाली.आणि म्हणाली

" आई आज पहिल्यांदा बाबा माझं गाणं ऐकणार ना म्हणून मी छानच गाणार."

रागिनीला आपल्या मुलीचे कौतुक वाटले.
स्वरा मोठ्या आत्मविश्वासाने गायली. शेवटची फेरी मोठ्या जोशात पार पडली.
आता सगळ्यांना उत्सुकता होती ती रिझल्टची.परीक्षकांनी निर्णय घोषित केला

"पहिला नंबर आहे...स्वरागिणी".

हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.स्वरा तर आनंदाने नाचू लागली. रागिनि मात्र शांत होती. बाबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर होते.पारितोषिक घेण्यासाठी दोघींना ही वरती बोलावले.

पारितोषिक स्वीकारल्यानंतर परीक्षकांनी स्वरकडे माईक देऊन दोन शब्द बोलायला सांगितले

" मला खूप छान वाटते आहे पुढे आई बोलेल " एवढं बोलून स्वराने माईक रागिनिकडे दिला

तिच्या या बोलण्याने हॉल मध्ये हास्याचे कारंजे उडाले.
आता सगळ्यांचे लक्ष रागिणी कडे होते.

" आजचा दिवस माझ्या आयुष्यात ला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि यासाठी प्रदीप सरांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी मला माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली.माझे कुटुंब माझ्यासोबत उभे राहिले म्हणून आज ही स्पर्धा आम्ही मायलेकी जिंकू शकलो. आयोजकांना शेवटची विनंती आहे, आतापर्यंत खूप छान व्यवस्थापन झाले पण त्यांनी मला आता परवानगी दिली तर माझ्या बाबांना श्रद्धांजली म्हणून गाण्याच्या दोन ओळी मला गायच्या आहे."
एवढं बोलून तिथे असणाऱ्या आयोजकांकडे बघितले.
त्यातले एक जण पुढे येऊन म्हणाले

"नेकी और पूछ पूछ"
त्यांनी रागिनीला गायला सांगितले...टाळ्यांचा आवाज झाला.

रगिनी मनात बाबांना म्हणाली,
" बाबा आज तुमची रागिणी स्टेजवर गात आहे.गाण्याची पहिली स्पर्धा मी जिंकले आहे. ह्या दोन ओळी तुमच्यासाठी..
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे......

समाप्त.


तुझेच मी गीत गात आहे.
स्वरागिनी.
**************
सुजाता इथापे.
0

🎭 Series Post

View all