स्वप्नपंखी 9

एक आगळीवेगळी सत्य परिस्थितीवर आधारित सामाजिक कथा


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

निशा घरातून पहिल्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रीण आणि ती तिच्या घरात गेल्यावर पाहिले तर तिच्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. त्या दोघींना निशाच्या घरातून निघण्यासच उशीर झाला होता त्यामुळे तिच्या मैत्रिणीच्या घरी जाण्यास आपसूकच उशीर झाला होता. त्या दोघी घरात पोहोचतातच तोपर्यंत त्यांना पाहून मैत्रीणीच्या सासूबाईंचा आवाज आला.

"किती उशीर झालं गेली आहेस? तुला लवकर येता आले नाही का? आता स्वयंपाक कधी करणार आणि आम्ही जेवणार कधी? आज मावशी येणार नाही हे माहीत होतं ना? तरी इतका उशीर का झाला? थोडं लवकर येता येत नव्हतं का? माझ्या गोळ्या असतात तुला माहित नाही का? काडीचीही अक्कल नाही, नुसता इकडे तिकडे फिरत बसतेस." त्या दोघी आत येताच मैत्रिणीच्या सासूबाई बरळू लागल्या. ते पाहून निशाला कसेतरीच वाटू लागले. आपण उगीचच इथे आलो असे तिला वाटले. पटकन दोघीजणी आवरून आल्या आणि निशा मैत्रिणीला स्वयंपाक करण्यासाठी मदत करू लागली. नंतर निशाला राहण्यासाठी तिच्या मैत्रिणीने रूममध्ये सोय केली. तो दिवस गेला पण उद्या काय? हा प्रश्न निशाच्या मनात होताच.

अखेर दुसरा दिवस उजाडला. निशा तिचे सारे काही आवरून बाहेर आली. आजही बाहेर मैत्रीणीच्या सासूबाईंची बडबड सुरूच होती. तिचे मिस्टर ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट करतो आणि तिथेच जेवतो असे म्हणून तावातावाने निघून गेले. ते सगळे पाहून निशाला काही समजेना. तिने हळूच मैत्रिणीच्या रूममध्ये पाहिले तर ती झोपली होती. तिने जवळ जाऊन पाहिले तर ती तापाने फणफणत होती. मग तिला सगळ्या गोष्टीचा अंदाज आला आणि तिला खूप वाईट वाटले.

\"माझ्या पायात फक्त काटा रुतला होता तर माझ्या सासर्‍यांनी मला मलमपट्टी करण्यास देऊन माझी विचारपूसही केली होती. थोडासा ताप आला होता तर सासूबाईंनी अगदी जेवण करून माझ्यासाठी वरण-भात घेऊन त्या आल्या होत्या, तर नवऱ्याने डॉक्टरांना घरी घेऊन येऊन औषध पाणी करून तो रात्रभर माझ्या उशाशी बसला होता. अशा सगळ्या सुखाला मी लाथ मारून इकडे आले आहे. या मैत्रिणी तर खूप मोठ मोठ्या गोष्टी बोलत होत्या, सुखाची भाषा बोलत होत्या. पण इथे येऊन पाहिले तर वास्तव खूपच वेगळे आहे. एखाद्या वेळेस हिच्या बाबतीत असे घडले असेल पण बाकीच्या तरी मजेतच असतील ना.\" असा विचार करत निशा बसली होती. मैत्रीण उठल्यानंतर तिने तिला दवाखान्यात दाखवले आणि इंजेक्शन वगैरे करवून घरी आणून तिला जेवायला घालून निशा स्वस्थ बसली होती. इतक्यात तिला दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला.

"अगं निशा, काय करतेस? कशी आहेस? आता एकदम ओके आहेस ना?" दुसरी मैत्रीण म्हणाली.

"नाही ग. हिला ताप आला आहे. दवाखान्यातून येऊन आताच झोपली आहे. मी एकटीच बसून आहे बघ. काय करू काही करमेना." निशा म्हणाली.

"अरेरे! तू माझ्याकडे यायला हवी होतीस. बरं ते जाऊ दे. एक काम कर संध्याकाळी माझ्या मिस्टरांच्या ऑफिसची पार्टी आहे. तू इकडे ये. आपण मस्त एन्जॉय करू. मग तू इथेच रहा." दुसरी मैत्रीण म्हणाली.

"अगं, ऑफिसचे पार्टी आहे ना? मग मी कशी येऊ? मी आलेले चालेल का?" निशा म्हणाली.

"हो चालेल ग. तसेही दोन मेंबर्स ना घेऊन आले तर अलाऊड आहे. आमच्या सोबत कोणीच नाही तू आलीस तरी चालेल." असे म्हणून तिने फोन ठेवला आणि निशा तिच्या तयारीला लागली. आता संध्याकाळी पार्टी आहे म्हटल्यानंतर तिला थोडं लवकरच जावे लागणार होते. तिने तिचे सामान पॅक केले. मैत्रिणीसोबत ती जेवली होती त्यामुळे तिचा निरोप घेऊन ती त्या घरातून दुसऱ्या मैत्रिणीकडे जायला निघाली.

त्या मैत्रिणीकडे गेल्यावर थोडा वेळ त्या दोघींच्या गप्पा झाल्या आणि संध्याकाळ होऊन गेल्यानंतर त्या दोघी पार्टीला जाण्यासाठी तयारी करू लागल्या. बराच वेळ झाला तरी त्या दोघे आवरत होत्या आणि मैत्रिणीचा नवरा बाहेर वाट पाहत बसला होता. दोघीही आवरून बाहेर आल्या आणि मग ते तिघेजण पार्टीला गेले. तिथे गेल्यानंतर बरेच जण आले होते. काही वेळातच पार्टीला सुरुवात झाली. ओळख वगैरे झाल्यानंतर सगळेजण खुर्चीमध्ये जाऊन बसले. मैत्रीणीचा नवरा त्याच्या मित्रांसोबत गप्पागोष्टी करत बसला होता आणि या दोघी बोलत बसल्या होत्या. इतक्यात मैत्रिणीचा नवरा त्याच्या मित्रांसमवेत तिची ओळख करून देण्यासाठी तिथे आला. पार्टीमध्ये नाच गाणी दंगामस्ती सारे काही सुरू होते. सगळेजण एकमेकांशी बोलत होते. निशाची मैत्रीण देखील नवऱ्याच्या मित्रांसोबत ओळख करून घेत होती. इतक्यात त्याचा एक मित्र तिला डान्स करण्यासाठी बोलावू लागला. ती मैत्रीण नाही म्हणत होती पण तिच्या नवऱ्याने तिला जाण्यास आग्रह केला त्यामुळे नाईलाजस्तव तिला जावे लागले. निशा मात्र हे लांबूनच पाहत होती. डान्स करता करता ती व्यक्ती मैत्रिणीच्या शरीराला स्पर्श करत होता. त्या मैत्रिणीला तो स्पर्श नको होता हे तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते. तिचा नवरा देखील लांबून उभारून ते सर्व काही पाहत होता पण तो तिथे जाऊन काही बोलत नव्हता. हे पाहून निशाला रोहनची आठवण झाली, त्या गावाची आठवण झाली.

ते एक छोटेसेच गाव होते. तेथील लोक फार काही शिकलेले नव्हते पण तिथे स्त्रियांचा मान ठेवला जायचा. निशा रोहनच्या मित्रांसमोर आली की ते मित्र अगदी आदरपूर्वक तिच्याशी बोलत होते. त्यांच्या नजरांतून तिला तो आदर दिसत होता. पण इथे अगदी नवरा समोर असला तरीही हे प्रकार चालू होते याचा अर्थ जसे दिसते तसे मुळीच नसते. आत्ता या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या जागी रोहन असता तर त्याने माझ्याबाबतीत असे काही होऊ दिलेच नसते. त्याने माझी योग्य ती काळजी घेतली असती, माझ्या मनाविरुद्ध तो काही वागला नसता, मी तिथे फक्त थोडेच दिवस होते पण त्याने माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट केली नाही. यावरून मला काय ते समजायला हवे. खरंच आयुष्यात येऊन मी खूप मोठी चूक केली आहे आणि ती चूक मला सुधारायला हवी.

पण आता खरंच उशीर झाला आहे. रोहन या क्षणी माझा स्वीकार करेल का? असे म्हणतात की मुलीने एकदा उंबरठा ओलांडला की तिला पुन्हा त्याच्या आत जाता येत नाही. लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणजे झालं. खेडेगावात तर सगळे नावे ठेवतात. मग आता मी काय करू? कसे करू? पुन्हा गेले तर त्या घरात मला घेतील का? माझा स्वीकार करतील का? अशा अनेक प्रश्नांनी निशाच्या मनात थैमान घातले होते. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असे तिला वाटत होते.

रोहन निशाचा स्वीकार करेल का? यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर

🎭 Series Post

View all