स्वप्नपंखी 6

एक आगळीवेगळी सामाजिक कथा


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

"अजिबात नाही. मी शहरात जाण्याचा विचार स्वप्नात देखील केलेला नाही. माझी नाळ ही मातीशी जोडलेली आहे आणि मी माझ्या मातीला सोडून कुठे जाणार नाही. मी हाडाचा शेतकरी होतो, आहे आणि नेहमी असणारच. मी शेती सोडून नोकरी करण्याचा विचार कधीच करणार नाही. इथे माझे आई-बाबा आहेत. मी लहानाचा मोठा येथे झालो आहे. माझी माती सोडून मी दुसरीकडे जाणार नाही." रोहनने निशाला ठणकावून सांगितले.

"आम्ही देखील लहानाचे मोठे एका ठिकाणी होऊन लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी संसार थाटतोस ना? मग तुम्हाला काय बिघडले. तुम्ही देखील माझ्यासाठी इतके करायला नको का? या शेतीमध्ये काय आहे? या चिखलात काम करायचे आणि इथे राहायचे मला अजिबात आवडत नाही. घरच्यांनी जबरदस्तीने माझे लग्न लावून दिले आणि आता मला हे सगळे बघायला लागत आहे. मी म्हणते ते ऐका. आपण शहरात जाऊ." निशा म्हणाली.

"अजिबात नाही म्हणजे नाही. मी हे गाव, इथली इथली माती सोडून कुठेही जाणार नाही. मी एक शेतकरी आहे आणि माझी या मातीशी नाळ जोडलेली आहे. यापासून मला कोणीही वेगळे करू शकत नाही. हवे तर तुला मी मुक्त केले आहे. तू या बंधनातून मुक्त आहेस. तू कुठेही जाऊ शकतेस. तसेही आपले लग्न होऊन आपण पती-पत्नी या नात्यांमध्ये अजूनही बांधलो गेलो नाही. आपले मन अजून एक झाले नाही. तेव्हा तू मुक्तच आहेस. तुझा मार्ग मोकळा आहे. बाकी माझं मी पाहून घेईन." रोहन म्हणाला.

"म्हणजे? तुम्ही माझे काहीच ऐकून घेणार नाही. मी इतकं सांगत आहे तुम्ही स्वतःचेच खरे करणार आहात. ठीक आहे, मग माझे मी पाहून घेईन." असे म्हणून निशाने तोंड वळवले आणि रोहन रागाने तिथून निघून गेला.

\"हा काही माझे ऐकणार नाही त्यामुळे मलाच काहीतरी करावे लागणार आहे, यासाठी काहीतरी विचार करावा लागणार आहे.\" असे म्हणून निशा विचारात पडली. विचार करता करता तिला एक छान कल्पना सुचली आणि ती त्याच विचारात गुंग झाली. स्वप्ने पाहता पाहता कधी सकाळ झाली हे तिचे तिलाच समजले नाही. नेहमीप्रमाणे तिचे आवरून ती बाहेर जाऊन बसली. ती जाईपर्यंत तिच्या सासूबाईंनी सारे काही आवरले होते. लग्न होऊन आठ दिवस होत आले तरी निशाने शिरा सोडला तर बाकी काहीच पदार्थ बनवला नव्हता. ती शहरातली, शिवाय मोठ्या घरातली शिकलेली होती म्हणून तिला कुणीच काहीच बोलत नव्हते. ती काही करत नव्हती या गोष्टीचे रोहनला खूप वाईट वाटत होते पण तो देखील उगीच वाद नको आणि घरच्यांना त्रास नको म्हणून काहीच बोलत नव्हता.

निशाने माहेरी रोहनबद्दल काहीतरी खोटे सांगून जायचा प्रयत्न केला पण तिच्या आजोबांसमोर तिचे काही चालले नाही म्हणून ती शांत बसली. शेवटी तिने आखलेल्या प्लॅननुसार काम करू लागली. तिने तिच्या मैत्रिणींना फोन केला आणि घरी येण्याचा आग्रह केला. काहीतरी कारण सांगून त्या सर्व मैत्रिणींना तिने घरी बोलावले. तिच्या सगळ्या मैत्रिणी शहरात राहणाऱ्या शिवाय दंगामस्ती करणाऱ्या होत्या.

शेवटी निशाच्या सांगण्यावरून तिच्या सगळ्या मैत्रिणी निशाच्या घरी यायला निघाल्या पण मैत्रिणी येणार आहे त्याची पूर्वकल्पना निशाने घरात कुणालाच दिली नव्हती. शहरात जाऊ असे सांगितल्यापासून रोहन तिच्याशी एक अक्षरही बोलला नव्हता; त्यामुळे त्यालाही यातील काहीच माहित नव्हते. अचानक दोन-तीन गाड्या घरासमोर येऊन थांबल्यावर निशाच्या सासूबाई आश्चर्याने घराकडे आल्या. घरासमोरच शेती असल्यामुळे घरामध्ये कोण आले गेले की त्यांना समजत होते. आता यावेळी कोण आले असेल? असा विचार करून त्या घरी आल्या. त्या सर्वांना पाहून निशाच्या सासूला काय करावे ते समजेना. त्या बाहेरील नळावर हात पाय धुवून आत गेल्या आणि त्यांनी निशाला हळूच विचारले, "कोण ग या पोरी? तुझ्या ओळखीच्या आहेत का?"

"हो. या माझ्या मैत्रिणी आहेत. मला भेटण्यासाठी इथे आल्या आहेत." निशा म्हणाली.

"अच्छा, तुझ्या मैत्रिणी आहेत होय. मला वाटलं कोणीतरी पाहुणे असतील. बरं बरं असू द्या." असे म्हणून निशाच्या सासूबाई पुन्हा कामाला लागल्या. त्यांनी सर्व मैत्रिणींना पाणी दिले. पाणी पाहून निशाच्या मैत्रिणी एकमेकींकडे पाहू लागल्या. "इतके गढूळ पाणी! बापरे! निशा तू असले पाणी पाहतेस! तुझी तब्येत बिघडत नाही का?" एक मैत्रीण म्हणाली.

"अगं, मी अॅक्वाचेच पाणी पिते. माझ्यासाठी वेगळे पाणी आहेत. पण यांना माहित नाही ना की तुम्ही हे पाणी पिणार नाही." असे म्हणून निशाने आतून दुसरे स्वच्छ पाणी आणले आणि ते मैत्रिणींना दिले. त्यानंतर सगळ्यांना गप्पा मारत बसल्या.

जुन्या आठवणींना जणू उजाळा आला होता. प्रत्येक जण कॉलेजमधील आठवणी, शाळेतील आठवणी काढून गप्पा मारत बसले होते. निशा देखील त्या सर्वांसोबत गप्पा मारत बसली होती. तिचे मन आज खूप फ्रेश होते कारण तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणी तिथे आल्या होत्या. प्रत्येक जण आपापल्या सासरमधील आणि नवऱ्याची गमती जमती सांगत होत्या. तेव्हा निशा फक्त त्यांचे बोलणे ऐकत बसली होती. शाळा कॉलेजमधील गमती जमती सांगताना तिचा उर भरून येत होता. त्यावेळी आपण किती छान होतो, जे मनाला येईल ते करायचो असे काही क्षण तिला मनात वाटू लागले आणि आजोबांनी आपले खूप वाईट केले असेही तिला वाटू लागले. काही क्षण शांत राहत तर काही क्षण बोलत ती तिथे बसली होती.

आज मैत्रिणींना पाहून तिला खूप समाधान वाटले होते. आजचा दिवस सगळ्यात भारी आहे तिला वाटत होते. लग्नानंतर तिला तिथे मुळीच करमत नसल्याने आज मैत्रीणींसोबत बोलताना दिवस कसा जात होता हे तिचे तिलाच समजत नव्हते.

मैत्रीणींसोबत निशा बसली होती पण तिच्या मनात काय चालू असेल? पुढे नक्की काय घडेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर

🎭 Series Post

View all