Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वप्नपंखी 2

Read Later
स्वप्नपंखी 2

कथेचे नाव - स्वप्नपंखी

राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा

विषय - सामाजिक कथा

"काय झाले निशा तुला लग्न करायला? मुलगा शेतकरी आहे याच्यामध्ये काही वाईट आहे का? तो स्वतः कष्ट करून मिळवून खात आहे शिवाय आपल्यालाही खाऊ घालत आहे. जर शेतकऱ्याने पिकवणे बंद केले तर आपण कोठून खाणार याचा विचार केलाय का? तुम्ही सारासार विचार करा आणि मग निर्णय घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला असे काही करू नका. यात नाही म्हणण्यासारखे मुळीच काही नाही." आजोबा जवळजवळ सर्वांवर ओरडलेच.

"अहो आजोबा, तुम्ही माझे लग्न त्या चिखलातल्या बैलाशी लावून देणार आहात का? मला काही त्या काळ्या मातीत जायचे नाही बरं का. मी इतकी कोमल नाजूक, माझी काही स्वप्नं आहेत, मलाही काहीतरी वाटते, तुम्ही माझा सारासार विचार करा ना. माझ्या शिक्षणानुसार मला मुलगा हवा आहे. मी जे काही शिकले आहे त्यानुसार तुम्ही शोधा. अशा अडाणी माणसाशी मला लग्न करायचे नाही." निशाने स्पष्टपणे आजोबांना सांगितले.

"अगं निशा, अडाणी कुठे आहे तो? चांगला बीएससी एग्रीकल्चरल झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारे शेती पिकवतो, शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करतो शिवाय भरघोस उत्पन्न घेतो. हे बघ, पुढे जाऊन तू नक्की सुखात राहशील. कुठल्याही नात्याची सुरुवात ही कष्टातून झाली की पुढे जाऊन सुख हे मिळतेच. सुरुवातीपासूनच जर सुखात लोळण घेतली तर त्या सुखाची किंमत कधीच कळत नाही. तेव्हा तू माझा बोलण्याचा विचार कर आणि या मुलाशी लग्न करायला तयार हो. तू जर याला नकार दिलास तर मी पुढे कोणत्याच बाबतीत तुला साथ देणार नाही. तुझा माझा संबंध संपला. तुझा निर्णय तू सर्वस्वी घ्यायला रिकामी आहेस." आजोबा म्हणाले.

आजोबांच्या अशा बोलण्याने निशा गोंधळून गेली. तिला काय करावे? समजेना. \"आजोबा लग्नाच्या बाबतीत माझ्यावर जबरदस्ती का करत आहेत? माझ्या मनासारखा एखादा मुलगा मला निवडायची संधी का मिळू नये? मी एक मुलगी आहे म्हणून? मी एक अबला आहे म्हणून माझे जीवन या सर्वांवर अवलंबून आहे म्हणून? माझे मी स्वतःचे निर्णय घेण्याची सुद्धा मला मुभा मिळू नये मी कोणी परकी आहे का? यांचीच तर नात आहे ना मग यांना माझ्या भवितव्याचा चांगला विचार करावा असे का वाटत नसावे? हे मला त्या मातीत नेऊन ढकलत आहेत पण मला तिथले जीवन नको आहे. लहानपणापासून कधीही शेती पाहिली नाही. नेहमी गाडीवरून जायचे यायचे, आम्ही अगदी श्रीमंती नाही पण मिडल क्लास लोक आहोत, शहरातील जीवन जगणारी मी अशा एका खेड्यात ते सुद्धा शेतकऱ्याशी लग्न करायला कशी तयार होऊ? थोडा तरी आपल्या स्टेटसचा सवाल आहे ना? माझ्या सगळ्या मैत्रिणी परदेशात जाऊन स्थित झाल्या आहेत आणि मी एका खेडेगावात जाऊ? एका शेतात गेल्यावर त्या सगळ्या मला हसणार नाहीत का? कॉलेजमध्ये असताना माझी एक्टिवा आणि मी आम्ही दोघी एकमेकांना भेटलेल्याशिवाय करमत नव्हते, जीन्स टॉप याशिवाय कधी कपडे घातलेच नाहीत, सगळी कॉलेजची मुले माझ्याकडे वळून वळून पाहायची पण मी कुणालाच भाव दिला नाही आणि आत्ता या अशा बैलासोबत मी लग्न करायचे. सगळे मला काय म्हणतील? बापरे विचार करून करून माझे डोके फुटायची वेळ आली आहे पण हे आजोबा ऐकायलाच तयार नाहीत. मी काय करू?\"

"अगं निशा, विचार काय करतेस? सरळ होकार देऊन टाक. तू आयुष्यभर सुखी राहशील. तुला कसली चिंता राहणार नाही. जास्त विचार करू नकोस. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू माझ्यावर विश्वास ठेवून घे. मी तुझ्या भविष्याचा विचार केलाय." आजोबा तिला समजावत होते.

"अहो बाबा, तुम्ही तिच्यावर तुमचा निर्णय लादू नका. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती तिच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करू दे. तरच तो संसार सुखाचा होईल नाहीतर लग्न करूनही काही उपयोग होणार नाही. सुरुवातीला दोघांची मने जुळायला हवेत. जर मन जुळले नाही तर संसार कसला होणार? शेवटी तिचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. तिला निर्णय घेऊ दे." निशाचे बाबा म्हणाले.

"तू मधे काही बोलू नकोस. मला निशाकडून उत्तर ऐकायचे आहे. बोल निशा तुला हा मुलगा पसंत आहे ना? तू माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस ना? तुझे मत लवकर सांग." आजोबा म्हणाले.

"अहो बाबा, पण मी तिचा बाप आहे. तिचे सुख कशात आहे हे मला समजते. माझ्या लेकीची बाजू मी घेणार नाही तर कोण घेणार?" निशाचे बाबा म्हणाले.

"मग आम्ही कोणी परके आहोत का? आम्हाला तिचे सुख कशात आहे हे समजते. मी सुध्दा तुझा बापच आहे. तू जास्त बोलू नकोस." निशाचे आजोबा म्हणाले.

"पण बाबा, माझं ऐकून तरी घ्या." निशाचे बाबा म्हणाले.

"मी काही एक ऐकणार नाही. बोल निशा, तुझं काय म्हणणं आहे?" निशाचे आजोबा म्हणाले.

"मी काय सांगू आजोबा? माझ्याबरोबर ज्या मुली शिकत होत्या त्या आता मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन स्थित आहेत. मी एकटीच खेड्यात कशी जाऊ? माझ्यावर त्या सगळ्या हसतील ना? शिवाय मला काय म्हणतील? मला एका खेड्यामध्ये जायचे नाही. प्लीज असं का करताय तुम्ही? दुसरं स्थळ आणा ना मी ते पाहिन." निशा म्हणाली.

"अगं, मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन तुला कष्टच भोगावे लागणार आहे. जसे दिसते तसे अजिबात नसते. नोकरी केले तरी महिना अखेरीस पैसे पुरत नाहीत. कितीही श्रीमंत असला तरी त्यांच्याकडच्या अपेक्षा मोठ्या असतात. त्यांच्या मताप्रमाणे तुला वागावे लागते. दुरून डोंगर साजरे असे म्हणतात ना? तेच खरे. तू मोठ्या शहरात गेलीस तर तुला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यापेक्षा या मुलाशी लग्न कर. तुझ्यापर्यंत कोणतेच संकट येणार नाही याचे गॅरंटी मी देतो." निशाचे आजोबा म्हणाले.

"अहो बाबा, तुम्ही असे का हट्टाला पेटले आहात. हे लग्न नको म्हणताना तुम्ही ऐकून का घेत नाही? माझी मुलगी आहे मी माझ्या मनाप्रमाणे मुलीसाठी स्थळे आणेन. तुम्ही तिला अजिबात स्थळं आणू नका." निशाचे बाबा जवळजवळ ओरडतच म्हणाले.

"ठीक आहे. तुमच्या मनाला जसे येईल तसे करा पण तुम्हाला माझ्या प्रॉपर्टीमधील एकही हिस्सा मिळणार नाही. माझे कोणी ऐकणार नसेल त्याला काहीच मिळणार नाही." निशाचे आजोबा असे म्हणताच सगळेच शांत झाले.

आता पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//