Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वप्नपंखी 1

Read Later
स्वप्नपंखी 1


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा

विषय - सामाजिक कथा


"हे बघा, मी निशासाठी एक स्थळ आणले आहे. मुलगा खूप चांगला आहे. घरचे सारे काही चांगले आहे. मला तर मुलगा पसंत पडला आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या. यंदा तिचे लग्न लावूनच देऊया. जास्त दिवस मुलीला घरात ठेवू नये. मला तर हे स्थळ योग्य असेच वाटते." निशाचे आजोबा बोलत असताना हे शब्द निशाच्या कानावर आले आणि ती खूप आनंदून गेली. जणू काही ती लग्नाळू बनली होती. कधी एकदा स्वप्नातील राजकुमार भेटतो आणि कधी एकदा लग्न करते असं तिला झालं होतं. या धुंदीतच ती रूममध्ये गेली आणि बेडवर तिने अंग टाकले.

निशा मॉलच्या गेटपाशी उभी होती. तिच्या हातात खूप सार्‍या शॉपिंग बॅग होत्या. ती कोणाची तरी वाट पाहत तिथे उभी होती आणि समोरून एक मोठी गाडी आली. त्यातून तिच्या स्वप्नातला राजकुमार उतरला. तो दिसायला एकदम हँडसम, उंच, देखणा, गोरापान, त्याने जिन्स आणि ब्लॅक शर्ट घातला होता. डोळ्यावर गॉगल, पायामध्ये शूज घातलेला तो एक तरुण मुलगा होता. त्याला पाहून निशाच्या मनात संगीत वाजू लागले. \"हाच आपल्याला मिळायला हवा. याच्यासारखा जोडीदार मिळाला तर मी जणू स्वर्गातच असेन. किती हँडसम आहे हा!\" असे ती मनातच म्हणू लागली. इतक्यात तो तरुण तिच्यासमोर आला आणि त्याने तिच्या हातातील सगळ्या बॅगा घेतल्या आणि गाडी ठेवल्या. तो पुन्हा आला आणि तिचा हात हातात घेऊन तिला त्याने गाडीत बसवले. आता तो गाडी चालवू लागला. गाडीमध्ये..

\"निले निले अंबर पर.. चांद जब आये.. प्यार बरसाये.. हमको तरसाये..\" हे गाणे सुरू झाले आणि तिला एक सुखद धक्का बसला.

\"कोण असेल हा हॅण्डसम? याने मला का गाडीमध्ये बसवून घेतले आहे? आणि आम्ही कोठे चाललो आहोत? कुठेही जाऊ दे, पण याची कंपनी मला सुखावह वाटते. हा माझ्यासोबत रहावा असे वाटत आहे. किती छान दिसतोय हा! जणू चाॅकलेट बाॅय! माझ्या डोळ्यात बदाम येत आहेत. सगळे जग गुलाबी भासत आहे. हा क्षण इथेच थांबावा असे वाटत आहे. ही शांतता, हे मधुर गाणे, सोबत हॅण्डसम हिरो. अहाहा! किती रोमँटीक बनतेय मी. मला खूप छान वाटतंय.\" निशा मनातच म्हणत होती.

"हाय, मी राकेश. नाईस टू मीट यू. तुझ्या आजोबांनी तुझ्यासाठी माझे स्थळ आणले आहे. मी इंजिनीयर असून पुढे एमबीए सुद्धा केले आहे. माझी स्वतःची एक मोठी कंपनी आहे. आमचा खूप मोठा बंगला आहे. घरामध्ये आई-बाबा आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा असे आम्ही तिघेजणच राहतो. घरामध्ये भरपूर नोकरचाकर आहेत. मला कशाचीही कमी नाही शिवाय तू. माझ्या आयुष्यामध्ये माझी राणी म्हणून तू येशील का? माझे आयुष्य सुखकर बनवशील का? तसेही मी रीतसर मागणी घालण्यासाठी आई-बाबांसमवेत तुमच्या घरी येणार आहे, पण मला तुझे मत जाणून घ्यायचे होते म्हणून मी असा अचानक आलो. तुझा फोटो पाहिला होता त्यावरून तुला मी लगेच ओळखलो." हे सगळे राकेशच्या तोंडून ऐकताच निशा अवाक् होऊन त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला काय बोलावे तेच समजेना.

\"इतका हॅण्डसम मुलगा माझा जीवनसाथी होणार! किती आनंदाची गोष्ट आहे. खरंच मला खूप आनंद झालाय. माझ्यासारखी सुखी मीच.\" असे मनात म्हणत निशा आनंद व्यक्त करत होती. तिच्या मनामध्ये आनंदाचे उमाळे फुटत होते.

"निशा, अगं तुला आजोबा बोलावत आहेत." असा बहिणीचा आवाज ऐकून निशा भानावर आली.

\"अरे अरे, हे तर स्वप्न होते पण असाच राजकुमार जर मला मिळाला तर.. आजोबांनी नक्कीच माझ्यासाठी चांगला मुलगा पाहिला असणार. तो माझ्या स्वप्नातला राजकुमार असावा, माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा असावा, माझे सगळे हट्ट पुरवणारा असावा. आजोबा नक्कीच या स्थळाविषयी बोलण्यासाठीच मला बोलावत आहेत.\" असे मनात म्हणून निशा ताड्कन उठली आणि ती लगेच आजोबांसमोर गेली.

"आजोबा, मला तुम्ही बोलावलं." निशा म्हणाली.

"हो बाळ, बस इथे. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." असे आजोबा म्हणाले.

"हा आजोबा बोला ना, त्यात काय एवढं?" निशा म्हणाली.

"हे बघ बाळ, मी तुझ्यासाठी एक स्थळ आणले आहे. मुलगा खूप चांगला आहे. त्याचा स्वभाव एकदम छान आहे. निर्व्यसनी आहे शिवाय चांगला पैलवानदेखील आहे. त्याची तब्येत छान आहे, उंच असा त्याचा बांधा आहे, त्याची पाच एकर शेती आहे, मोठा बंगला आहे, तुला शोभेल असाच तो मुलगा आहे. यावर तुझे काय मत आहे?" आजोबा म्हणाले.

"आजोबा, मुलगा तुम्हाला पसंत आहे म्हणजे झाले. मी काही यावर बोलणार नाही. तुमची पसंती तीच माझी पसंती असणार आहे. तुम्ही वडीलधारे आहात, तुम्ही माझ्यासाठी योग्य असेच स्थळ आणाल ना? माझा चांगलाच विचार केला असाल. माझी काहीच हरकत नाही. तुम्ही ज्या मुलाशी माझे लग्न लावून द्याल त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे." निशाची हे बघणे ऐकून सगळेजण अवाक् होऊन तिच्याकडे पाहू लागले.

"तूच माझी गुणाची मुलगी माझे सारे काही ऐकतेस. तुला एकटीला सगळ्या गोष्टींचा विचार आहे. बाकी घरचे सगळे असे अडाण्यागत बोलत आहेत. त्यांची बुद्धी कुठे गेली आहे काय माहित? निशा बाळ, तू एकदा पाहून घे आणि मला सांग. यांचे एकही काही ऐकू नकोस. हे तुला भुरळ घालतील, तुला काही बाही सांगतील पण तू तुझ्या मतावर ठाम रहा. मला सगळ्या दृष्टीने हे स्थळ योग्य वाटत आहे." निशाचे आजोबा म्हणाले.

\"आजोबा असे का बोलत आहेत?\" हे निशाला काही समजेना. तिने तिच्या घरच्यांकडे पाहिले. प्रत्येकजण तिला नको नको म्हणून खुणावत होते पण तिला काही समजेना. ती सर्वांकडे एकटक पाहू लागली आणि दुसरी नजर आजोबांकडे वळवली.

निशाचे आजोबा घरातील जेष्ठ होते. सगळा कारभार त्यांच्या हातामध्ये होता. त्यांच्यासमोर कोणाची कधी बोलायची हिंमत होत नव्हती. ते जे म्हणतील तीच पूर्व दिशा असे होते. त्यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केले होते. त्यांची दोन मोठी कपड्यांची दुकाने होती. त्यांचे बालपण एका छोट्या खेड्यात गेले होते. पण शिक्षण घेऊन ते व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आले होते परंतु त्यांची खेड्याची नाळ अजून तुटली नव्हती. आपल्या घरातील कोणीतरी त्या खेड्यात जावे आणि आपले पुन्हा आपल्या मातीशी नाळ जोडावे असे त्यांना सारखे वाटत होते.

निशा मात्र या सर्व गोष्टीमुळे गोंधळून गेली होती. तिला घरच्यांच्या मनात नक्की काय चालले आहे? हे समजत नव्हते. ती घरच्यांकडे पाहून काय असे खुणावत होती पण कुणाला बोलायची हिंमत नव्हती. तरी धाडसाने तिची आई समोर आली आणि म्हणाली, "हे काय निशा? तू पहिला सगळी चौकशी करून घे. मुलगा काय करतो? कसा आहे? सगळी चौकशी करून घे आणि मग तू निर्णय घे. आधीच तुझा निर्णय तू देऊ नकोस. तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. लग्न हे तुझ्या मर्जीनेच होईल कारण शेवटी संसार हा तुलाच करायचा आहे." आईचे हे बोलणे ऐकून निशा आणखीनच बुचकळ्यात पडली.

"म्हणजे? मुलगा नक्की काय करतो? तो चांगला आहे. सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे. पण मुलगा नक्की काय करतो? हे मला जाणून घ्यायचे आहे. सांगा ना कोणीतरी." निशाच्या या बोलण्याने सर्वजण एक सुरात म्हटले, "मुलगा हा शेतकरी आहे.."

"ईईईई शेतकरीऽऽऽ" निशा एकदम ओरडली आणि सगळेजण तिच्याकडे पाहू लागले. आता कोणाला काय बोलावे? ते समजेना. निशाच्या या बोलल्याने तिच्या आजोबांना खूप राग आला.

निशा त्या शेतकरी मुलाबरोबर लग्न करेल का? की त्याला नकार देईल. तिचा तिच्या आजोबांसमोर तिचा टिकाव लागेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//