Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वप्नपंखी 8

Read Later
स्वप्नपंखी 8


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

"यु ब्लडी, तुला काही कळतं का? एवढ्या जोरात मारायचं असतं का? माझं काय चुकलं? मी काय केलं? तुझी हिंमत कशी झाली मला मारायची?" निशा जवळ जवळ ओरडतच म्हणाली.

"तू माझ्या आईला नावे ठेवत होतीस. मग मी तुझा हार घालून सत्कार करू? की हातावर हात ठेवून बसू." रोहन रागातच म्हणाला.

"अरे रोहन, तू तिला काय मारतोयस? थोडं शांत रहा. तिची काहीच चूक नाही." रोहनची आई म्हणाली.

"अगं आई, तू तिची का बाजू घेतेस? ती आता काय म्हणाली तू ऐकले नाहीस का?" रोहन म्हणाला.

"ती कुठे काय म्हणाली? ती तर काहीच म्हणाली नाही." रोहनची आई म्हणाली.

"तेच ना. ती तर काहीच म्हणाली नाही." रोहन म्हणाला.

"काहीच म्हणाली नाही तर तिला का मारलेस? तिला मारायचा तुला कोणी अधिकार दिला?" रोहनची आई म्हणाली.

"अगं आई, तुला या तिच्या मैत्रिणी काही बाही बोलत होत्या तेव्हा हिने तुझी बाजू का घेतली नाही? या माझ्या सासूबाई आहेत असे तिने का सांगितले नाही? ती शांत का बसली? तिला बोलता आले नाही का? इतके होऊनही तू तिचीच बाजू घेत आहेस. जिथे चुकले तिथे चुकलेच. मी कोणाचे समर्थन करण्यासाठी येथे आलो नाही. माझ्या आईला असे वेडेवाकडे बोललेले मी खपवून घेणार नाही. जर इथे राहायचे असेल तर रहा नाहीतर दरवाजा उघडा आहे." असे रोहन निशाकडे पाहून म्हणाला.

रोहन जे काही बोलला त्याचा निशाला खूप राग आला होता. त्याने तिच्या मैत्रिणींसमोर तिच्या थोबाडीत मारली होती त्याचा देखील तिला राग आला होता. तिथे तिला एक क्षणही रहायची इच्छा नव्हती. तिने रागातच तिच्या आजोबांना फोन लावला आणि तिथे घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली पण तिच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. उलट त्यांनी तिची समजूत घातली आणि दोन दिवसात मी येऊन जाईन असे त्यांनी तिला सांगितले. त्याक्षणी निशा रागात होती त्यामुळे तिला तिथे एक क्षणही रहावे असे वाटत नव्हते. आजोबांनी देखील तिला समजून घेतले नाही याचाही तिला खूप राग आला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, रागाने अंग थरथरत होते, रागाने तिचे डोळे लालबुंद झाले होते. तिच्यासमोर रोहन एक क्षणही थांबला नाही. तो लगेच तिथून निघून गेला. रोहनची आई निशाची समजूत घालत होती पण निशाचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते. तिच्या मैत्रिणी ते सगळे पाहून स्तब्ध उभ्या होत्या. रोहन गेल्यानंतर एकेक जणी बोलू लागल्या.

"अगं निशा, तू इतके का ऐकून घेत आहेस? त्यांना प्रत्युत्तर द्यायचं ना? जाब विचारायचा. तू तर काहीच बोलली नव्हतीस शिवाय आम्हाला कुठे माहित होतं या तुझ्या सासूबाई आहेत म्हणून आम्ही इतक बोललो." एक मैत्रीण म्हणाली.

"हो ना. या तर कामवाल्या बाई सारख्या दिसल्या म्हणून आम्हाला वाटले की या कामवाल्या बाईच आहेत. आम्ही मुद्दामहून नाही केलं." दुसरी मैत्रीण म्हणाली.

"पण तिच्या नवऱ्याने समजून न घेता असे वागायला नको होते. मी तर निशाच्या जागी असते तर तेव्हाच घर सोडून निघून गेले असते. मला खूप राग आला असता. निशा सारखे मला अजिबात जमले नसते." तिसरी मैत्रीण म्हणाली.

"हो ना. इतकी शिकलेली, सुंदर मुलगी मिळायला पण भाग्य लागते, यांना ते भाग्य नकोच आहे तर काय करायचे?" निशाची मैत्रीण म्हणाली.

"निशा, तू इथे एक क्षणही थांबू नकोस. चल लवकर." निशाची मैत्रीण म्हणाली.


"अगं पण मी कुठे जाऊ? आता आजोबा काय म्हणाले पाहिलेस ना तू?" निशा म्हणाली.

"अगं, मग त्यात काय एवढं? तू आमच्याकडे चल. थोडे दिवस रहा आणि मग तुझ्या घरीच रहा. तोपर्यंत त्यांना सगळी परिस्थिती समजेल. मग ते तुला घरात घेतील. त्यानंतर तुला तिथे राहता येईल." मैत्रिणींच्या बोलण्यावर निशा विचार करू लागली.

खूप विचार करून झाल्यानंतर निशाने मनात काहीतरी ठरवले आणि ती तिच्या रूममध्ये गेली. तिने बॅग घेतले आणि त्यामध्ये एक एक करत कपडे भरू लागली. आता ती रागात होती. त्यात तिच्या मैत्रिणींनी भरीला भर तिच्या मनात खूप काही भरवले त्यामुळे तिचा राग आणखीनच वाढला आणि त्या रागाच्या भरात ती नको असलेला निर्णय घेत होती. पण यावेळी तिला अडवणार कोण? रोहनने तर तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. तो घरातून निघून गेला होता. रोहनच्या आईने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. निशाने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. तिच्या मनामध्ये आधीच राग होता त्यात ती कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्या रागाच्या भरात तिने सगळे कपडे भरून बॅग पॅक केली.

दोन्ही बॅगा घेऊन ती बाहेर आली आणि
"चला ग मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे." असे म्हणून निशाने घराचा उंबरठा ओलांडला. यावेळी निशा रागात होती त्यामुळे तिने असा निर्णय घेतला. पण एकदा घराचा उंबरठा ओलांडल्यावर त्या स्त्रीला पुन्हा आत येण्याची परवानगी मिळेलच असे नाही याची मात्र तिला जाणीव नव्हती. तिला मुळातच तिथे यायचेच नव्हते. जिथे आपल्याला यायचे नाही तिथला विचार कशाला करायचा असे तिने ठरवले होते. मुळातच मनाविरुद्ध लग्न झालेली निशा आज मुक्त स्वैर संचार करण्यासाठी बाहेर पडली होती पण थोडे दिवस मैत्रिणींच्या सोबत रहावे म्हणून ती मैत्रिणीकडे गेली.

एक एक मैत्रिणीकडे थोडे थोडे दिवस राहावे असे तिने ठरवले होते आणि त्यानंतर आपल्या घरी जायचे, मग घरी जाऊन सर्वांना घडलेली हकीकत सांगायचे असे ठरले. त्यानुसार ती पहिल्या मैत्रिणीकडे गेली.

त्या मैत्रिणीकडे गेल्यानंतर काय घडते? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//