Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वप्नपंखी 7

Read Later
स्वप्नपंखी 7


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

निशा मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करत बसली होती. प्रत्येक जण आपापल्या सासर मधल्या गमती जमती सांगत होत्या. तसेच सासरमध्ये आपण किती सुखात आहोत याचे वर्णन करत होत्या. मैत्रिणींनी केलेले वर्णन पाहून निशाला खूप वाईट वाटत होते. ती तशीच शांत बसून होती. आपण आपल्या सासरबद्दल काय वर्णन करावे? इथे वर्णन करण्यासारखे तर काहीच नाही याचे तिला दुःख होत होते. ती तशीच त्यांचे बोलणे ऐकत बसली होती.

"अगं, आमच्या घरामध्ये चार-पाच नोकर आहेत. सासू-सासरे मला इतके फुलासारखे जपतात ना की काही बोलायलाच नको. नवरा तर खूप प्रेम करतो, अगदी कोणतीही वस्तू मागायच्या आधी माझ्या हातामध्ये असते. सगळ्या बाजूने मी सुखी आहे." एक मैत्रीण म्हणाली.

"अगं ते तर काहीच नाही. माझ्या घरामध्ये इतक्या सुख सोयी आहेत की मला काही करावंच लागत नाही आणि आठवड्यातून आम्ही दोन तीनदा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. शिवाय यांच्या पार्टीज् वगैरे असतात तिकडेही जायचं होतं. घरामध्ये मी फक्त थोडाच वेळ असते. बाकी माझ्या भिशी, शॉपिंग करणे ही सगळी कामे करता करता दिवस कसा जातो समजतच नाही." दुसरी मैत्रीण म्हणाली.

"हो मला तर साधी शिंक आली तरीसुद्धा डॉक्टरांना बोलावले जाते इतके मला जपतात. जमिनीवर माझे पाय ठेवले जात नाहीत. अगदी पायामध्ये स्लीपर असल्याशिवाय मी जमिनीवर पायच ठेवत नाही. इतक्या सगळ्या सुख सोयी आहेत." तिसरी मैत्रीण म्हणाली.

अशा एक ना अनेक गोष्टी प्रत्येक मैत्रिणी सांगत होत्या आणि निशा फक्त त्यांच्याकडे पाहत बसली होती.
"काय ग निशा? तुझ्याबद्दल सांग ना थोडंसं. तुझ्या घरच्यांबद्दल बोल ना काहीतरी. असे आमच्याकडे काय पाहत बसली आहेस?" एक मैत्रीण म्हणाली.

"काय सांगू तुम्हाला. खरं तर हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झाले आहे. मला इथे मुळीच लग्न करायचे नव्हते पण माझ्या आजोबांनी जबरदस्तीने माझे लग्न केले आहे. आता मला इथे मुळीच करमत नाही. मला इथे राहायचं नाही पण काय करू? माहेरचे दार हे माझ्यासाठी बंद आहेत. आलीसच तर पाहुण्यासारखे चार-आठ दिवस रहा म्हणतात पण सासर सोडून तिकडे गेलेले माझ्या आजोबांना आवडत नाही. त्यामुळे काय करावे मला काहीच कळेना." निशा म्हणाली.

"ठीक आहे. तू काही काळजी करू नकोस. यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आपण काहीतरी करूया." असे त्या मैत्रिणी बोलत होत्या. निशा आणि तिच्या मैत्रिणींच्या गप्पा सुरू होत्या म्हणून निशाच्या सासूबाई पुन्हा थोडं काम होतं ते उरकून येऊ या उद्देशाने शेताकडे गेल्या. निशाच्या हायफाय मैत्रिणींना पाहून काय बोलावे? कसे रिएक्ट व्हावे? हे ईशाच्या सासूला काही समजेना. बऱ्याच वेळाने त्या शेतातून घरी आल्या. बाहेर हात पाय धुवून त्या डायरेक्ट स्वयंपाक घरात गेल्या. त्यांनी मस्तपैकी कांदा चिरून पोहे फोडणी घातले आणि ते कांदेपोहे प्रत्येक प्लेटमध्ये घालून त्यामध्ये एक एक लाडू ठेवून त्या सगळ्या प्लेट्स ट्रेमध्ये घालून निशाच्या सासुबाई ते घेऊन बाहेर आल्या. टेबलवर सगळ्या डिशेस ठेवून "पोरींना नाष्ट्याला पोहे केले आहेत ते घ्या." असे म्हणून त्या आत जाऊ लागल्या.

"ईईई निशा कांदेपोहे! आम्ही आता लहान आहोत का? नाश्त्यासाठी असले पदार्थ खायला, की मुलगी पहायला आलो आहोत. मैत्रिणी आल्यानंतर कुणी कांदेपोहे करतं का?" मैत्रीण म्हणाली.

"नाही ग पोरींनो. आता तुम्ही नाश्ता करून घ्या आणि थोड्या वेळाने मी जेवायलाच बनवते. मग तुम्ही जेवण करून घ्या. मी काही तुम्हाला नाश्त्यावर पाठवणार नाही. हे शेतकऱ्याचे घर आहे आणि तुम्हाला इथे जेवल्याशिवाय जाता येणार नाही." निशाची सासू म्हणाली.

"अरे देवा! नाश्त्याला पोहे आहे तर जेवायला काय असणार? नको बाबा त्यापेक्षा आम्हाला काहीच नको निशा." मैत्रीण म्हणाली.

"अगं, असं काय करता यार. तुम्ही पहिल्यांदा इथे आला आहात मग तसेच कसे जाणार?" निशा म्हणाली.

"अगं, मग तुझ्या या कामवालीला सांग ना काहीतरी चांगले बनवण्यासाठी. आम्हाला हे असले काही आवडत नाही ग. जर असलेच देणार असशील तर मला सांगायचे तरी होते. मी काहीतरी ऑर्डर मागवून घेऊन आले असते ना. इथे या तुझ्या शेतात पार्सलदेखील येणार नाही. असले खाण्यापेक्षा राहू दे तू काही न दिलेलेच बरे." मैत्रीण म्हणाली.

निशाच्या मैत्रिणीच्या तोंडून कामवाली हा शब्द ऐकून निशाच्या सासूला खूप वाईट वाटले. आता काय बोलावे हे तिला समजेना. तिचे डोळे पाणावले. तिथे एक क्षणही राहू नये असे ते वाटत होते. तिने तोंडाला साडीचा पदर लावला आणि ती झटकन आत गेली. या गावामध्ये तिच्या मुलामुळे तिला मान मिळाला होता. तिचा मुलगा भरघोस उत्पन्न घेत असल्याने त्याचे गावामध्ये नावलौकिक झाले होते त्यामुळे रोहनची आई म्हणून तिलादेखील गावातील लोक मानत होते. पण आता या निशाच्या मैत्रिणींनी तिला कामवाली म्हणून तिचा अपमानच केला होता आणि यामध्ये निशा काहीच बोलली नाही याचे तिला जास्त वाईट वाटत होते.

"जाऊ दे ग. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. मी तुमच्यासाठी काहीतरी सोय करेन." निशा म्हणाली.

"ठीक आहे. पण तुझ्या या मोलकरणीला इथले प्लेट्स तरी आत नेऊन ठेवायला सांग. या पोह्यांचा वास घेऊन मला मळमळत आहे." एक मैत्रीण म्हणाली

"हो हो. मी नेऊन ठेवते." असे म्हणून निशा उठत होती इतक्यात दुसरी मैत्रीण म्हणाली, "अगं, बस ना. मी बोलवते थांब तिला घेऊन जायला." असे म्हणून त्या मैत्रिणीने हाक मारली.

"ओ मावशी, या सगळ्या प्लेट्स आत घेऊन जा. असले काही पदार्थ आम्हाला आवडत नाहीत." असा आवाज ऐकताच निशाच्या सासुबाई बाहेर आल्या आणि त्यांनी सर्व प्लेट्स उचलायला सुरुवात केली.

"निशा तुझी कामवाली भारी आहे ग. सगळं काही ऐकते. इथल्यापेक्षा आमच्याकडे पाठवलीस तर तिला जास्त पगार देऊ." मैत्रीण म्हणाली.

"माझ्याकडे सुद्धा पाठव चालेल मला. माझी भरपूर कामे पेंडिंग आहेत. आमची मावशी एखाद्या वेळेस सुट्टीवर असली की ही सगळी कामे करेल." असे एक झाल्यावर एक सगळ्या मैत्रिणी निशाच्या सासूबाईंना कामवाली समजून बोलू लागल्या. अर्थातच हे त्यांचे सारे काही मुद्दामून चालू होते. त्या सगळ्या मैत्रिणींना या निशाच्या सासू आहेत हे माहीत होते पण त्या सगळ्या मुद्दामून बोलत होत्या.

"अगं निशा, तुझी कामवाली खूप हळू काम करते ग. तुझं सगळं ऐकते पण आता ह्या सात आठ प्लेट उचलायला किती वेळ लावतेय बघ." दुसरी मैत्रीण म्हणाली. तेव्हा निशा जागची उठली आणि एक एक प्लेट ट्रेमध्ये भरू लागली. निशा प्लेट भरताना तिच्या सासूबाई तिच्याकडेच पाहत होत्या.

"अगं ये, निशाकडे असे का पाहतेस? तुझी तुझी कामे करत जा." असे म्हणून तिच्या मैत्रिणीने निशाच्या सासूबाईंचा हात धरला. तेव्हाच रोहन तिथे आला. त्याच्या कानावर त्या मैत्रिणींचे थोडेफार शब्द पडले होते त्यामुळे त्याला त्यांचा खूप राग आला होता आणि या सगळ्या गोष्टीवर निशा काहीच बोलली नाही म्हणून तिचा जास्त राग आला होता. तो तावातावाने आत आला आणि त्यांने निशाच्या कानाखाली जोरात चपराक मारली.

"ही माझी आई आहे." रोहन ओरडला.

यापुढे काय होतंय ते वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//