स्वप्नपंखी 5

एक सामाजिक कथा


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

निशा नाराज होऊन खोलीत गेल्यानंतर सगळे शांत झाले. तेव्हा रोहनच्या आईने रोहनला तिची समजूत घालण्यास पाठवून दिले.

"रोहन, तिची समजूत घालून बाहेर घेऊन ये जा. आज तिचा पहिलाच दिवस आहे आणि घरची लक्ष्मी अशी उदास झालेली मला आवडणार नाही. सगळेजण तिची अशी चेष्टा मस्करी का करत आहात? तिला या गोष्टींचा काही अंदाज नाही, तिने या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत त्यामुळे थोडासा वेळ हा लागणारच ना. लक्ष्मी आज आल्याबरोबर तिची चेष्टा मस्करी करून तिच्या आनंदावर विरजण घालत आहात हे तुम्हाला शोभते का? मुळात एका शेतकऱ्याला त्यांनी मुलगी दिली आहे हे तरी तुम्ही जाणून रहा. त्या मुलीला फुलपाखरासारखे जपायचे आहे की तिची चेष्टा मस्करी करून तिला उदास करायचे आहे हे तुम्हीच ठरवा. इतकी चांगली मुलगी मिळाली हेच नशीब समजा. तिला रूळायला थोडा वेळ लागेल, थोडसं तिच्या कलाने घेऊया ना. आपण तिला चिडवत राहिलो तर तिचे मन इथे कसे रमले? रोहन जा, तिला घेऊन ये बघू." असे रोहनच्या आईने सांगितल्याबरोबर रोहन आत गेला आणि निशाची समजूत घालू लागला.

"निशा तुला राग आला का? अगं, रागावू नकोस. ते सगळे तुझी चेष्टा मस्करी करत होते. तू त्यांचे म्हणणे मनावर घेऊ नकोस. सगळे आपलेच आहेत आणि चेष्टा मस्करी करत हसत खेळत आनंदी जीवन जगूया ना. आजच आपल्या संसाराला सुरुवात झाली आहे आणि तू अशी रूसून आलीस हे बरोबर नाही. चल बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहेत." रोहन म्हणाला.

"मग ते सगळे मला बोलले ते बरोबर आहे का? त्यांनी अशी चेष्टा का करावी? हे त्यांना शोभते का?" निशा म्हणाली.

"अगं, त्यांनी थोडीशी गंमतच केली आहे त्यात तुला राग येण्यासारखे काय आहे? तुला शेतामध्ये काम करायला किंवा गाई म्हशीचे शेण काढायला थोडीच कोणी पाठवणार आहे? मी तरी पाठवेन असे वाटते का? एवढा तरी विश्वास नाही का तुझा माझ्यावर? असे पहिल्याच दिवशी रागावून तू तडकाफडकी आत यायला नको होतीस." रोहन म्हणाला.

"त्यांनी माझा असा अपमान केला त्यामुळे मला खूप वाईट वाटले. याआधी मला असे कोणीच बोलले नव्हते आणि या घरात मी पहिलेच पाऊल टाकले तर माझा इतका अपमान झाला हे मला अजिबात आवडले नाही." निशा म्हणाली.

"अगं सगळे आपलेच लोक आहेत. ते तुला बोलण्यासाठी किंवा तुझा अपमान करण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. अगदी सगळे चेष्टा मस्करी करत असतात, हसत खेळत ते बोलले आहेत. त्यांनी मुद्दामून केलेलं नाही. आमच्या इकडे सगळे असेच चालते." रोहन म्हणाला.

"तुमच्याकडे चालत असेल पण मला हे काही चालणार नाही. इथून पुढे जर असे काही आढळले तर याचे परिणाम वाईट होतील. मी ते अजिबात खपवून घेणार नाही." असे म्हणून निशा बाहेर गेली.

गृहप्रवेशानंतरचे सर्व विधी अगदी व्यवस्थित पार पडले. त्या दिवसानंतर निशाला कोणीच काही बोलले नाही. निशाला काही आवडत नसेल म्हणून तिच्याशी कोणी बोलायला जात नव्हते. नंतर निशा पाच परतावणीसाठी माहेरी गेली. माहेरी गेल्यावर तिचे सर्वांनी गोड कौतुक केले. माहेरात ती मजा मस्ती करू लागली. पाच परतावणीनंतर ती पुन्हा सासरी आली.

तिने सुरुवातीलाच रोहनला सांगितले होते की आपल्या दोघांमध्ये सध्या फक्त मैत्री होईल. जेव्हा आपल्या दोघांची मने जुळतील तेव्हा आपण नवरा बायको म्हणून राहायचे. रोहनने देखील या गोष्टीला मान्यता दिली होती. दुसऱ्या दिवशी ती थोडी उशिरा उठली कारण माहेरात तिला लवकर उठायची सवय नव्हती. उठल्यानंतर तिचे सगळे आवरून ती बाहेर आली. बाहेर पाहते तर कोणीच नव्हते. मग ती स्वयंपाक घरात गेली. तिच्या सासूबाई ओटा पुसत होत्या. ते पाहून तिला आश्चर्य वाटले. \"इतक्या लवकर! आता कुठे आठ वाजले आहेत आणि या ओटा सुद्धा आवरत आहेत! म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी आवरत असतील का?\" असा निशाने मनात विचार केला.

"आई, रोहन आय मीन हे कुठे आहेत? आणि तुम्ही एवढ्या लवकर ओटा स्वच्छ करत आहात! रात्री आवरायचं राहिलं होतं का?" निशा म्हणाली.

"अगं, आता स्वयंपाक सगळा झाला आहे. तुझे सासरे आणि नवरा दोघेही न्याहारी करून शेताकडे गेले आहेत. शेतामध्ये आता खूप काम आहे ना. मलाही जायचे आहे म्हणून मी सुद्धा लवकर सगळे आवरून घेतले. तू सुद्धा फेरफटका मारायला येतेस का?" निशाची सासू म्हणाली.

"नको नको. तुम्ही जा." असे म्हणून निशा तिथेच थांबली. थोड्या वेळाने तिच्या मनात विचार आला की बाहेर जाऊन तरी पहावे म्हणून तिने बाहेर जाऊन पाहिले तर समोर हिरवीगार शेती पाहून तिचे मन शांत झाले, तिला प्रसन्न वाटले. ती तशीच पुढे पुढे जाऊ लागली. अशीच अनवाणी पायाने चालत असताना तिच्या पायामध्ये काटा घुसला. आजूबाजूला कोणीच नव्हते. ती एकटीच जात असल्याने पायात काटा घुसला आहे हे पाहून ती रडू लागली. तिच्या डोळ्यावाटे अश्रूधारा वाहू लागल्या कारण याआधी ती असे काट्याकुट्यातून कधीच चालली नव्हती.

निशा रडतच घरी आली. ती घराजवळ आल्यावर तिला अशा अवस्थेत पाहून तिचे सासरे तिची विचारपूस करू लागले.
"अगं बाळा, तुला काय झालं? तू अशी का लंगडतेस? आणि तू रडत का आहेस?"

"माझ्या पायामध्ये काटा टोचला आहे आणि माझा पाय खूप दुखत आहे." असे म्हणून निशा पुन्हा रडू लागली

"रडू नको बाळा. पहिला पाय स्वच्छ धुऊन घे. मग मी तुला एक मलम देतो ते लाव." असे सासऱ्यांनी सांगताच निशाने पाय स्वच्छ धुऊन घेतले आणि त्यांनी दिलेले मलम लावून ती आत बसली. बराच वेळ पाय तसाच धरून ती बसली. संध्याकाळी जेव्हा रोहन आला तेव्हा त्यांने पाहिले तर निशा पाय आखडून बसली होती. त्याने तिची विचारपूस केली तेव्हा तिच्या पायामध्ये काटा टोचला आहे असे त्याला समजले आणि बराच वेळ तिने पाय आखडून धरल्यामुळे तिचे अंगही दुखत होते आणि तिला तापही आला होता.

रोहन लगेच डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तिला तपासून इंजेक्शन आणि औषध दिले. डाॅक्टर गेल्यावर निशाच्या सासूबाईंनी गरम गरम वरण आणि भात तिच्यासाठी आणले. निशाला जेवायची मुळीच इच्छा नव्हती पण तिच्या सासूबाईंनी जबरदस्तीने दोन घास तिला खाऊ घातले. त्यानंतर औषधे घेऊन ती झोपी गेली. रोहन रात्रभर तिच्या उशाशी कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत बसला होता. बऱ्याच वेळाने तिला जाग आली आणि थोडे फ्रेश देखील वाटत होते. तिच्या उशाशी बसलेल्या रोहनला पाहून तिला तिच्या आईची आठवण आली.

"एक विचारायचं होतं; विचारू का?" निशा म्हणाली.

"हो विचार ना, बिनधास्त विचार." रोहन म्हणाला.

"तू शहराच्या ठिकाणी एखादी नोकरी कर ना. मग आपण दोघे तिथे जाऊन राहू. मी सुद्धा नोकरी करेन. आपला संसार तिथे छान फुलेल. मला इथे अजिबात करमत नाही." रोहनला ज्याची भीती होती तेच घडत होते.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर

🎭 Series Post

View all