Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्वप्नपंखी 4

Read Later
स्वप्नपंखी 4


कथेचे नाव- स्वप्नपंखी
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा

निशाने लग्नासाठी जेव्हा होकार दिला तेव्हा आजोबांनी त्या मुलाला फोन लावला आणि निशाबद्दल त्याला सांगितले. अचानक आलेल्या स्थळामुळे तो मुलगा गोंधळून गेला. त्याला काय बोलावे सुचेना.

"अहो आजोबा, तुमची नात शहरात लहानाची मोठी झालेली शिवाय तिथेच शिकलेली. ती इथे आमच्या खेड्यात राहिल का?" रोहन म्हणाला. त्या मुलाचे नाव रोहन होते.

"का नाही राहणार? ती नक्की राहिल. माझा विश्वास आहे. आमच्या नातीला सगळे संस्कार दिले आहेत तिला तिथे रमायला थोडा वेळ लागेल पण ती तिथे नक्कीच रमेल याची मला खात्री आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त पाहण्याचा कार्यक्रम कधी करायचा ते सांगा. आम्ही त्याप्रमाणे तयारी करतो." आजोबा म्हणाले.

"ठीक आहे. आई बाबांना विचारून मी सविस्तर तुम्हाला सगळे कळवतो." असे रोहन म्हणाला.

ठरल्याप्रमाणे पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रोहन त्याचे आई-बाबा आणि त्याचे काही नातलग निशाला पाहण्यासाठी तिच्या घरी आले. शहरातले त्यांचे घर पाहून ते सगळे भारावून गेले. इतक्या मोठ्या घरातली मुलगी आम्हाला कसे काय द्यायला तयार आहेत अशी शंका देखील त्यांच्या मनामध्ये आली. ते सगळे येऊन बसले. निशाच्या आजोबांनी त्या सर्वांचे स्वागत केले. घरची बाकीची मंडळी थोडी शांतच होती कारण कोणाला हे स्थळ मनापासून आवडले नव्हते. रोहन हा दिसायला अगदीच राजबिंडा होता. कुस्ती आणि व्यायाम या सर्वामुळे त्याची शरीरयष्टी अगदीच बळकट होती. त्या शरीरयष्टीमुळे तो आणखीनच रुबाबदार दिसत होता. शिवाय तो निर्व्यसनी होता त्यामुळे सारे जण मुलाकडे पाहून शांत झाले. दाराच्या अडून निशाची बहीण सर्व लोकांची पारख करत होती तेव्हा तिने रोहनला पाहिले. रोहनला पाहून ती अवाक् झाली आणि बहिणीकडे गेली.

"अगं दी, मुलगा हॅण्डसम आहे बरं का. मला तर खूपच आवडला. अगदी सलमान खान आहे हं. लगेच होकार देऊन टाक." बहीण म्हणाली.

"अगं राणी, रूप बघून संसार करता येत नाही ग. त्यासाठी बॅकग्राऊंड चांगला हवा." निशाची आई म्हणाली.

"हो आई, पण रूप नसेल तरीही आपण प्रेम करू शकत नाही ना? सगळं हवं. पण सगळे काही आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही ना?" बहीण म्हणाली.

"पण प्रेम ठरवून होत नाही ना? आणि त्यासाठी मन तिथे रमायला हवं. आजूबाजूचा परिसर तितकाच महत्त्वाचा असतो." निशा म्हणाली.

त्यांचे बोलणे सुरू असतानाच निशा बाहेरचे बोलावणे आले. निशा बाहेर गेली. सर्व पाहुण्यांना नमस्कार करून ती तिथे बसली. मुलीला पाहून झाले. निशा सर्वांना आवडली. तसे तिच्यात नावडण्यासारखे काहीच नव्हते. ती सुंदर होतीच. सर्वांची पसंती आल्यावर लगेच मुलीकडील सर्वजण मुलाचे घर वगैरे पाहून आले. आजोबांपुढे कुणाची नकार द्यायची हिंमत नव्हती म्हणून सगळे शांत बसले होते.

फायनली सुपारी फुटली आणि लग्नाची तारीख ठरली. अगदी जवळची तारीख ठरली होती. लग्नाचा सगळा खर्च निशाच्या आजोबांनी उचलला होता. लग्न हे त्यांच्या शहरातच झाले कारण सगळ्या पाहुण्यांना सोयीस्कर होईल असेच ठिकाण त्यांनी निवडले होते. हाॅलमध्ये सगळे पाहुणे मंडळी जमले होते. निशा लाल रंगाची शालू नेसून हॉलमध्ये आली होती. त्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अगोदरच सुंदर असलेली निशा या नवरीच्या वेशामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. सगळे पाहुणेमंडळी अवाक् होऊन तिच्याकडे पाहत होते. इतकी सुंदर मुलगी एका शेतकऱ्याशी लग्न करायला कसे तयार झाली असेल? असा प्रश्न सर्वांना पडला होता. इतक्या मोठ्या शहरात लहानाची मोठी झालेली एका खेडेगावात कसे काय राहणार? याची चिंता सगळ्यांना लागली होती. त्यातील काहीजण निशाच्या निर्णयाचे कौतुक करत होते. खरंच अशा विचाराच्या मुली प्रत्येक घरामध्ये असत्या तर आज शेतकरी मुलांची लग्न हा चिंतेची विषय नसता. तर मुलाकडची मंडळी म्हणू लागली की मुलाने नशीब काढले. आज शेतकऱ्याला मुली मिळत नसताना इतकी सुंदर बायको एका शेतकऱ्याला मिळत आहे खरंच याचे नशीब खूप चांगले आहे असे म्हणत होते. अशा एक ना अनेक गप्पांना त्या कार्यालयामध्ये जणू उधाण आले होते. ज्याच्या त्याच्या तोंडातून याच विषयावर चर्चा सुरू होत्या.

रोहन देखील हॉलमध्ये आला होता. गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये तो आणखीनच रुबाबदार दिसत होता. त्याची उंची आणि तब्येत अगदी व्यवस्थित असल्यामुळे तो खूप हँडसम दिसत होता. मुली तर त्याच्यावर फिदा झाल्या होत्या पण तो एक शेतकरी आहे असे म्हटल्यावर तोंड मुरडून बाजूला बसल्या. निशाला काही कळत नाही का? अशा शेतकऱ्याशी कोणी लग्न करतं का? तिला हवे तसले स्थळ मिळाले असते. अगदी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरदार असलेला मुलगा सहज मिळाला असता पण तिने एका शेतकऱ्याचे लग्न का केले असेल? असा प्रश्न तिच्या मैत्रिणींच्या मनामध्ये येत होता.

रोहनला पाहून निशा मनोमन खूश झाली. इतका हँडसम मुलगा माझ्या आयुष्यात येणार आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. शेतामध्ये थोडीच मला काम करावे लागणार आहे. बाकीचे लोक आहेतच की. शिवाय मी नोकरी केलेली चालते किंवा मी बिझनेसही काढू शकेन. बऱ्याच गोष्टी या खेडेगावात करता येतात. त्यापैकी कोणतीही गोष्ट मी करेन. तसे पाहायला गेले तर हा शेतकरी अजिबात वाटत नाही. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी याला शेती सोडून नोकरी करण्यास आपण प्रोत्साहन देऊ म्हणजे हा नोकरदार होईल. आम्ही दोघे नोकरी करू लागलो की मग जवळच्या शहरात जाऊन सेटल होऊ मग काय निवांतच. अशा विचारांमध्ये, स्वप्नामध्ये निशा गुंग झाली होती. पण स्वप्न हे स्वप्नच असते आणि वास्तव हे काही वेगळेच असते हे त्या वेडीला कोण सांगणार?

अशा चर्चातून निशा आणि रोहन यांचा विवाह अखेर संपन्न झाला. सगळे पाहुणे मंडळी आपापल्या घरी जाऊ लागले. निशाची सासरी जाण्याची वेळ झाली. सगळ्यांचे आवरावर झाल्यानंतर सामानाची बांधाबांध करून सगळेजण गाडीत जाऊन बसले. पण काही केल्या निशाचा पाय निघत नव्हता. सगळ्यांचा निरोप घेऊन कशीबशी ती गाडीतून सासरी जायला निघाली. गाडी जशी चालू झाली तशी तिच्या मनात एक प्रकारची चलबिचलता सुरू झाली. लग्न झाले पण संसार कसा करायचा? मी पहिल्यांदा खेड्यात जात आहे. तेथील वातावरण कसे असेल? या विचारात ती मग्न होती आणि बघता बघता तिचे सासरचे घर आले. गाडीतून उतरल्या बरोबर समोर वाजंत्रीने तिचे स्वागत झाले आणि माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला. घरामध्ये जाताच ती भारावून गेली. तिला कसलातरी वास येऊ लागला.

"शीऽऽ कसला वास येतोय?" असे म्हणून तिने नाकाला हात लावला.

"शेणाचा वास येतोय ग. काय सुनबाई शेणाचा वास कधी घेतला आहे का? उद्यापासून आता तुम्हाला शेण काढावे लागणार आहे. आता सासूबाईंना थोडीशी विश्रांती मिळणार." रोहनचे बाबा म्हणाले.

"वहिनी, तुम्ही शेण काढतानाचा व्हिडिओ काढूया आणि तो तुमच्या स्टेटसला आणि फेसबुकला ठेवूया. बघूया किती जणांचे लाईक कमेंट्स काय काय येतात. मजा येईल ना." रोहनचा मित्र म्हणाला.

"आता असा वास आपल्याला रोज सहन करावा लागणार. याची सवय करून घ्यायला हवी." आत्या म्हणाल्या.

असे एकापेक्षा एक सगळेजण निशाची चेष्टा मस्करी करत होते. ते पाहून निशाला खूप राग आला आणि ती तावातवाने खोलीत जाऊन बसली. कुणालाच काही समजेना. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. एकतर ही शिकलेली आणि शहराकडची मुलगी; हिला चेष्टा मस्करी केलेले खपत नसावे. आता काय करावे? इतका वेळचा सगळ्यांचा उत्साह निघून गेला आणि निशाच्या नाराजीमुळे सगळेच उदास होऊन बसले.

पहिल्याच दिवशी निशा नाराज झाली. आता पुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//