Login

स्वप्नपंखी 3

Marathi katha

कथेचे नाव- स्वप्नपंखी 
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा 
विषय- सामाजिक कथा

"आजोबा, मला माफ करा. मी तुमच्या म्हणण्यानुसार हे लग्न करू शकत नाही. माझ्या सुद्धा काही आशा आकांक्षा आहेत. मला सुद्धा वाटते, की माझ्या स्वप्नातला राजकुमार हा एक मोठा हिरो असावा, तो मला अलगद जपणारा असावा, मला त्या मातीत जाण्यात कसलाही इंटरेस्ट नाही. मी तिथे जाऊन माझा संसार फुलवू शकत नाही. अगदी स्वप्नातही मी तिथे कधी जाण्याचा विचार केला नाही आणि तुम्ही मला आता तिथे नेऊन ढकलत आहात? हे मला कदापि मान्य होणार नाही. मी लग्न करेन तर माझ्या स्वप्नातील राजकुमाराशीच. बाकी मी काय मत मांडू? हा मुलगा राहू द्या. तुम्ही दुसरा मुलगा शोधा." निशाचे हे बोलणे ऐकून आजोबांना खूप राग आला. ते रागाने थरथर कापू लागले. त्या रागातच ते म्हणाले, 

"निशा, तुझे लग्न झाले तर या मुलाशीच होणार आहे. नाहीतर तू दुसरीकडे लग्न करून गेलीस तर तुला एक रुपयाही खर्च करणार नाही. शिवाय तुम्हाला या घरातून चालते व्हावे लागेल. या इस्टेटीतून तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही." आजोबांचे हे बोलणे ऐकून निशा पुन्हा शांत झाली. तिला काय बोलावे तेच समजेना. 

आई-बाबांसाठी आपल्याला अशी अड्जस्टमेंट करावी लागणार आहे हे निशाने मनोमन ठरवले आणि काहीही केले तरी आता या लग्नापासून माझी सुटका नाही असेही तिला वाटले. ती थोडावेळ विचार करून तिने स्वतःचा निर्णय बदलला. "ठीक आहे आजोबा, मी तुम्ही आणलेल्या मुलाशी लग्न करायला तयार आहे." असे निशा म्हणताच तिच्या आईबाबांना आश्चर्य वाटले. 

"अगं निशा, तू हे काय बोलत आहेस? तिथे तू कशी राहशील? त्या गावात तुला करमेल का? तुझ्या मैत्रीणी, आपले नातेवाईक काय म्हणतील?" निशाचे आईबाबा म्हणाले.

"त्यांचे तुम्ही सांगू नका. आपली मुलगी सुखात आहे की नाही इतकेच पहायचे. बाकी कुठेच लक्ष द्यायचे नाही." आजोबा ओरडले.

"पण माझ्या काही अटी आहेत त्या तुम्ही मान्य करायला हव्यात." निशा म्हणाली. 

"ठीक आहे. बोल तुझ्या काय अटी आहेत?" आजोबा म्हणाले. 

"माझी पहिली अट अशी आहे की तिथे मी गेले तर शेतामध्ये काही काम करण्यास जाणार नाही. दुसरी अट मला जेव्हा हवे तेव्हा मी इथे माहेरी येऊन हवे तितके दिवस राहणार. मला तिथे कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. माझ्यावर कोणतीच बंधने लादली जाणार नाहीत." निशा म्हणाली. 

"अगं बाळा, तुला कोण काम करायला पाठवतंय? तू फक्त घर सांभाळायचे. बाकी तिथे गडी कामगार असतातच ना? तुला काही तिथे जाऊन राबावे लागणार नाही. शिवाय एक लक्षात ठेव वेळप्रसंगी कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कोणतेही काम करण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असावीच लागते.. नव्हे असतेच. नेहमी सूट बूट घालून खुर्चीमध्ये बसून काम केले तरच ते खूप मोठे असे नाही. चिखल मातीमध्ये जाऊन कष्ट करून घाम गाळून पीक काढणाऱ्या त्या शेतकऱ्याचे कष्ट पहा. किती कष्टातून ते पीक उत्पन्न घेतात आणि आपण मात्र बाजारामध्ये गेल्यावर त्याचा भाव करत बसतो. शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला दिसतच नाहीत. त्यांचे कष्ट आपल्याला कधी जाणवतच नाही. त्यांची मुले बिन लग्नाची राहिली आहेत त्याचा सारासार विचार कुणीच करत नाही. सगळे फक्त स्वार्थी आहेत. स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. आता तू सुद्धा फक्त तुझ्या फायद्याचा विचार करत आहेस. तिथे जाऊन मी सुखी संसार करेन असे एका शब्दाने म्हणाली नाहीस तू! तूच काय घरातले एकानेही म्हटलं नाही. मला खात्री आहे की तू तिथे जाऊन नक्की सुखाचा संसार करशील. एक शेतकरी कोणाला उपाशी ठेवत नाही तर तो दुसऱ्याला दुःख कसे देईल? बघ तुला मी काय म्हणतोय ते एक दिवस नक्की आठवेल." आजोबा म्हणाले. 

"सुखाचा संसार आणि मी. आजोबा काय बोलताय तुम्ही? मला लहानपणापासून पाहत आला आहात ना? माझा स्वभाव, माझे वागणे तुम्हाला माहित नाही का? आपण इथे शहरात राहतो. मी तर लहानपणापासून कधी साध्या चिखलात देखील खेळले नाही. जर मोठा पाऊस पडला तर माझे पाय खाली टेकायला नको होते. इतके असून मी त्या मातीत कशी राहीन? असे तुम्हाला एकदाही वाटले नाही का? तासन् तास मोबाईल, लॅपटॉप याच्यासमोर राहणारी मी तिथे जाऊन त्या शेतात काय काम करू शकणार आहे? कधी घराच्या बागेत गेले तर तेवढाच फेरफटका मारून येते आणि तिथे शेतात काम करावे अशी तुमची इच्छा आहे हे मला जमणार नाही." निशा म्हणाली. 

"तुला तिथे कोण शेतात काम करायला घेऊन जात आहे? फक्त शेतकऱ्याशी लग्न कर इतकेच माझे म्हणणे आहे आणि तुला ते कोणत्याही परिस्थितीत मान्य करावे लागणार आहे." आजोबा म्हणाले. 

आई-वडिलांसाठी आणि आजोबांच्या इच्छेखातर निशा हे लग्न करण्यास तयार झाली आणि ती तिच्या खोलीत गेली.
'याच्याशी लग्न करण्यास काही हरकत नाही. समोर मस्त हिरवाई पसरलेलं शेत, घरासमोर प्रशस्त अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, सकाळचे ते कोवळे ऊन आणि ती निसर्गाची उधळण. सकाळी सकाळी निसर्गाच्या सानिध्यात मॉर्निंग वॉकला जायचे सुख काही औरच. नंतर गरमागरम चहा, अहाहा! नवऱ्याशी झालेल्या मनमुराद गप्पा. तो शेतात गेला की मी त्याचा डबा घेऊन जाईन. मग काय? निसर्गाच्या सान्निध्यात दोघे राजाराणी निवांत जेवण करू. आयला, मी एवढा साधा विचारच केला नाही. खरंच आजोबा म्हणाले तसे मी तिथे सुखात राहीन का? तिथे राहून माझी तब्बेत सुधारेल. मस्त मैत्रीणींना पिकनिकसाठी बोलावेन. वाह! काय आयडीया आहे. भारीच.' निशा पुन्हा तिच्या स्वप्नात गुंग झाली. ती नेहमी स्वप्न पाहत असायची. तिला स्वप्नात रमायला आवडायचे. त्यानुसारच ती तिचे निर्णय घेत होती.

आईबाबांसाठी ती लग्न करायला तयार झाली होती. तिच्यामुळे त्यांच्यावर वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून तिने इतका मोठा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयामुळे घरातील सर्वांना राग आला होता. पण आजोबांना खूप आनंद झाला होता. खरंतर सध्याची परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे. शेतकरी मुलांची लग्नं होत नाहीत ही खूप गंभीर परिस्थिती आहे आणि यावर तोडगा निघायला हवा असे त्यांना नेहमी वाटायचे. पण तेवढेच वाटून ते शांत बसले नाहीत तर आपल्या नातीचे एका शेतकरी मुलाशी विवाह करून बदल घडवण्याची सुरूवात त्यांनी स्वतःपासूनच केली. इतरांना उपदेश देणारे बरेच आहेत पण स्वतः अंमलात आणणारे थोडेच. त्यातीलच एक निशाचे आजोबा. त्यांना अगदी नात्यातील एक शेतकरी मुलगा ज्याचे लग्नाचे वय होते तो एका कार्यक्रमात भेटला. तो निर्व्यसनी, सभ्य आणि चांगला वाटला. आजोबांनी तिथेच त्याची चौकशी केली तर सर्वांचे त्याच्याबद्दलचे मत चांगलेच आले. त्यांनी तेथेच त्याचा नंबर घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या मनात हा विषय घोळत होता. आता ते सत्यात उतरणार होते. एक परिवर्तन आपण घडवणार याचा त्यांना अभिमान होता तर दुसरीकडे निशा तिथे नांदेल का? याची काळजी होती.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर

🎭 Series Post

View all