राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- सामाजिक कथा
निशाला तिची चूक समजली होती, पण आता रोहन तिला घरात घेईल की नाही याची शंका होती. सकाळी सकाळी ती तिचे सगळे काही आवरून तिच्या घरी म्हणजेच माहेरी जायला निघाली. तिच्या मैत्रिणीने कितीही आग्रह केला तरी ती तिथे थांबली नाही. अगदी चहा सुद्धा न घेताच ती तिथून निघाली कारण तिला तिची चूक समजली होती आणि आपण भयंकर अपराध केला आहे असे तिला वाटत होते. \"त्या सगळ्या मैत्रीणी माझ्याशी खोटं बोलल्या. त्या भले सांगत होत्या पण मला त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा याचे भान राहिले नाही. मी रागात होते त्यामुळे नको नको ते विचार माझ्या मनात येत होते. मी कोणाचेच काहीच ऐकले नाही. मी मैत्रीणींचे ऐकून घ्यायला नको होते. आता माझ्या घरचे तरी मला समजून घ्यावेत हीच अपेक्षा आहे.\" असे निशा मनातच म्हणत होती.
निशा तिच्या माहेरी गेली. स्वतःच्याच घरात जायला तिला आज लाज वाटत होती. थोडा वेळ ती बाहेरच थांबली आणि नंतर थोडेसे धाडस करून ती आत गेली. आत गेल्यानंतर तिने पाहिले तर तिचे आजोबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यांच्यासमोर जायला तिला भीती वाटत होती. आता काहीही करून या सगळ्या गोष्टीला सामोरे जावेच लागणार होते. तिने थोडेसे धाडस केले आणि ती आजोबांसमोर गेली पण त्यांच्यासमोर तिच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडले नाही. ती तशीच स्तब्ध त्यांच्यासमोर उभी राहिली.
"अगं निशा, तू सकाळी सकाळी इथे? काही झाले आहे का? तुझ्यासोबत जावईबापू आले आहेत का? अगं मग त्यांना आत बोलवायचं ना. कुठे आहेत ते?" आजोबांचा आवाज ऐकून घरातील सगळेजण बाहेर आले आणि निशाला पाहून आश्चर्यचकित झाले.
"आजोबा, मला माफ करा माझं चुकलं." असे निशा म्हणाली आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ही काही भांडण वगैरे करून आली आहे की ते घर सोडून आले आहे? हिला तिथे करमत नाही का? तिथले लोक काही बोलले का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आले होते. आता सर्वांचे लक्ष निशा काय बोलते इकडे होते पण निशा काहीही न बोलता तिथेच आसवे गाळत उभी होती. या सगळ्यामुळे कोणालाच काहीच कळायला मार्ग नव्हता.
"अगं, बोल ना काहीतरी. असे का मधेच अडखळलीस. तुला तिथे कोणी काही म्हटले का? की तू काही म्हणून आलीस? काहीतरी बोल ग." आजोबा म्हणाले.
निशाने रडतच सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. तो प्रकार ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. कोणाला काय बोलावे तेच सुचेना. सगळे फक्त एकमेकांकडे पाहत उभा राहिले. क्षणभरासाठी तिथे शांतता पसरली होती.
"आजोबा, मला माझी चूक समजली. मी असे करायला नको होते पण रागाच्या भरात मी असे वागले. आता मी खरं सांगते मला माझ्या सासरी जायचे आहे. तिथली माणसे खूप चांगली आहेत. माझ्याशी खूप मायेने वागतात. मला त्यांचे प्रेम कधीच समजले नाही पण आता या क्षणी मला ते समजून आले आहे आणि मला पुन्हा तिथे जायचे आहे. ते मला घरात घेतील की नाही माहित नाही त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे." निशा रडतच म्हणाली.
"बाळा ते एका शेतकऱ्याचे घर आहे. तेथील माणसे खूप साधी आहेत. त्यांच्या मनामध्ये असे नक्कीच काही नसणार. ते तुला सांभाळून घेतील आणि घरातही घेतील. माझा विश्वास आहे. एक शेतकरी जगाचा पोशिंदा असतो तर त्यांच्या सुनेला अंतर देणार नाहीत. आपण जाऊया." असे आजोबा म्हणाले तेव्हा निशा येऊन आजोबांना बिलगली.
"आजोबा, मी तर माझ्या स्वप्नातच असायचे. स्वप्न हेच सत्य असावे असे मला वाटायचे पण सत्य परिस्थिती काही वेगळी होती हे मला आत्ता जाणवत आहे." निशा म्हणाली.
"पोरी, हे वयच असते. आपण मात्र हरळून न जाता मोठे जे सांगतात त्याचे आकलन करावे. मी नेहमीच तुझ्या चांगल्याचा विचार करत होतो. आजच्या जगात शेतकऱ्याला कोणी मुली देत नाहीत. सर्वांना नोकरीवाला हवा असतो. पण खरंच शेतकरी इतका वाईट असतो का? हे अनुभवण्यासाठीच मी तुझे लग्न मुद्दामहून शेतकऱ्यांशी केले. तुला ते पटले नव्हते हे मला समजत होते पण माझा निर्णय, माझी पारख चुकीची नाही हे तुला आता पटले ना? पण आता तुला त्याची सत्यता पटली." आजोबा म्हणाले.
"हो आजोबा, तुम्ही म्हणता ते खरे आहे." निशा म्हणाली.
थोड्यावेळाने निशा फ्रेश वगैरे होऊन जाण्याची तयारी करू लागली. सर्वजण तिची भेट घेऊ लागले. सगळी तयारी झाल्यावर आजोबा आणि तिचे बाबा तिला सोडण्यासाठी तिच्या सासरी गेले. सासरी गेल्यावर निशाने सर्वांची मनापासून माफी मागितली.
"अगं पोरी, यात तुझी काही चूक नाही. तुला जे वाटले ते केलेस. खरं तर शहरातली मुलगी इथे नांदेल की नाही असे आम्हाला वाटत होते. तू गेल्यानंतर आम्ही खूप घाबरलो होतो आणि तेव्हाच तुझ्या आजोबांना फोन केला होता पण त्यांनी सारे काही सावरून घेतले आणि आज तुला तुझी चूक समजली. आमची काही इच्छा नाही बाळा. तुम्ही दोघे नवरा बायको सुखाने संसार करा इतकीच आमची अपेक्षा आहे." निशाची सासू म्हणाली.
"आजोबा, म्हणजे तुम्हाला हे सगळे माहित होते तरीही तुम्ही शांत बसलात. थँक्यू आजोबा." निशा म्हणाली.
"तुमच्या सुखासाठी सारे काही करावे लागते बाळा." आजोबा म्हणाले.
सगळेजण बोलत बसले असता रोहन त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याच्या पाठोपाठ निशा देखील गेली.
"रोहन, मी तुला खूप चुकीचे समजले. मला माफ कर. आय मीन अहो, मला तुम्ही माफ करा." निशा म्हणाली.
"रोहन, मी तुला खूप चुकीचे समजले. मला माफ कर. आय मीन अहो, मला तुम्ही माफ करा." निशा म्हणाली.
"तू माझ्या आयुष्याचा आलीस आणि माझे आयुष्यच बदलून गेले. पण जेव्हा तू माझ्या आईला काही बाही बोललीस ना तेव्हा माझा राग अनावर झाला आणि मी तुझ्यावर हात उगारला. खरं तर मला हात उचलायला नको होता. मला माफ कर." रोहन म्हणाला.
"तुम्ही हात उगारलात म्हणूनच तर मी पुन्हा तुमच्या आयुष्यात आले." असे म्हणून निशा रोहनच्या मिठीत जाऊन विसावली आणि दोघांच्या संसाराला छान सुरुवात झाली.
समाप्त.
©®प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा- कोल्हापूर
जिल्हा- कोल्हापूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा