स्वप्नभंग ( लघुकथा )(मृणाल मोहिते)
"सुरेखा असं का केलंस ग.. आता या बाळाने कोणाकडे बघायचं?, आम्ही कोणाकडे बघायचं?,असा काय गुन्हा झाला होता आमचा कि अशीच निघून गेलीस, एकदा बोलून तरी पाहायचंस ना , काहीतरी केलं असत गं बाळा, तू असं जायला नको होतंस". सुरेखाच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला होता.
बाकीचे सर्व लोक, सुरेखाच्या सासरची मंडळी फक्त लांबून बघत होते. ज्या हातांनी तिला लहानाचं मोठं केलं त्याच हातानी आज तिला अग्नी द्यायची वेळ आली होती. तिच्या मागे दोन बहिणी , आई-वडील असा परिवार होता, हातावर चालणार पोट होत.
सुरेखा नावाप्रमाणेच सुरेख, उंच , देखणी , गहूवर्णीय. एका छोट्याश्या गावात साध्याश्या कुटुंबात राहणारी मुलगी. शालेय जीवनात सुद्धा बरी प्रगती होती. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण आईवडील यासाठी तयार न्हवते.
"आई-बाबा मला खरंच पुढं शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, तुम्हाला छान घर घेऊन द्यायचंय आणि प्रेमा आणि लताच शिक्षण पूर्ण करायचं आहे."
" सुरेखा , बाळ तुला माहित आहे ना आपल्या घरची परिस्थिती कशी आहे ते, तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशीच आमची पण इच्छा आहे, पण सगळीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसतात ग " अशा शब्दात आईने सुरेखाला समजावण्याचा प्रयत्न केला.
हे ऐकून सुरेखाचे डोळे पाणावले. आईवडिलांना देखील तिच्या डोळ्यात आलेले पाणी दिसत होते
"बाळा, अगं नको रडूस बाळा , यावर काहीतरी उपाय काढू आपण, परवाच तुझ्या आत्यासोबत बोलणे झाले , तिच्या बघण्यात एक स्थळ आहे, मुलगा चांगला आहे, सधन कुटुंब आहे, त्यांच्या फार काही अपेक्षा नाहीत, चांगली मुलगी असावी एवढीच काय ती अपेक्षा. त्यांची म्हणे पुढे शिकवायची देखील तयारी आहे. आपण बोलणी करूया . आणि ठरवूया काय करायचं ते"
" अहो तुम्ही याबद्दल काहीच बोलला नाहीत माझ्याशी" आईने बाबांकडे कटाक्ष टाकत विचारले.
" अगं उद्या बोलून ते कधी येतील हे समजलं कि तुम्हाला सांगणारच होतो , पण लेक रडायला लागली आणि गलबलून आलं बघ मला"
"लता, जा आणि आईला सांग येत्या रविवारी आपल्या सुरेखाला बघायला येणार आहेत."
"ऐकलं बरं मी, रविवार म्हणजे अगदी दोन दिवसांवर आलाय, करते मी सगळी तयारी."
बघता बघता रविवार उजाडला. आदेश आणि त्याच्या घरचे म्हणजे आईवडील आणि पैपाहुणे पहायला आले. त्यांची पसंती त्यांनी लगेच दिली.
"आम्हाला मुलगी पसंत आहे,फक्त आम्हाला उशीर नकोय, येत्या आठवड्यातच लग्न उरकून टाकूया, आम्हाला तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही, तुमची मुलगी आता आमची झाली असं समजा, आणि खर्चाचा विचार करू नका, आता तुमची सर्व जबाबदारी आमची. "
हे सर्व ऐकून सुरेखाच्या आईवडिलांचे मन अगदी सुखावले. यानंतर येत्या आठवड्यातील तारीख काढून सुरेखा आणि आदेशचे लग्न लावून दिले. लग्नाला चार पाच महिने झाले, अधून मधून सुरेखा माहेरी यायची. सर्व ठीक आहे असं सांगायची, पण कधी कौतुकाने सासरबद्दल बोलली सुद्धा न्हवती. सुरेखाचे गाव तसे फार काही लांब न्हवते, पण तिने कधी स्वतःहून या असं सांगितलं नाही, ना कधी तिच्या सासरचे लोक बोलवत, आपापल्या पोटाची तजवीज करताना सुरेखाच्या घरचे देखील कधी तिच्या घरी गेले नाही, सुरेखाची ख्यालीखुशाली तिच्या आत्याकडून कळत असे. त्यामुळं त्यांना वाटे कि आपली मुलगी फार सुखात आहे. पण खरी परिस्थिती वेगळीच होती.
लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून सुरेखाच्या घरच्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरवात केली. सुरेखा सर्वांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती पण तिच्या कामात सर्वचजण नेहमी चुका काढत असत.
"माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही, तू माझी बायको नाहीस, माझं आधीच एका मुलीवर प्रेम आहे, पण माझ्याघरी आंतरजातीय लग्न मान्य न्हवतं म्हणून मी नाईलाज म्हणून तुझ्याशी लग्न करत आहे." असं आदेशन पहिल्याच दिवशी सांगितलं.
हे सर्व ऐकून सुरेखाला तिच्यावर आभाळ कोसळल्याप्रमाणे वाटले. ती रडू लागली. आदेशने तिच्याकडे दुर्लक्ष आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेखा उठली पण तिला उत्साह असा काही वाटतच न्हवता .
तिचा पडका चेहरा बघून सासू सुरेखावर ओरडली " तुला असं तोंड पाडून बसायला आणलेलं नाही, आम्हाला आमची इज्जत प्रिय आहे, तू सगळं ऐकून हे घर सोडून जाणार नाहीस, कारण तुझी घरची परिस्थिती बरी नाही, आणि आम्हाला फुकट राबणारं माणूस मिळावं म्हणून तुला करून आणलंय , त्यामुळं लवकर पडकं थोबाड सरळ करायचं आणि कामाला लागायचं."
यानंतर घरच्यांचा विचार करून ती मोलकरणीप्रमाणे काम करत होती. आणि शिक्षण वगैरे गोष्टीतर लांबच राहिल्या. तिला दोनवेळचं जेवायला मिळत होत, हेच तिच्यासाठी सध्या खूप होत. एकेरात्री मात्र तिच्या दुःखांचा कडेलोट झाला. आदेश तिला कधी बायकोची किंमत देत न्हवताच , पण एकदा दारू पिऊन आल्यानंतर त्याने तिच्या शरीरावर आघात केला , तिच्यावर बलात्कार केला . आधी तीच मन दुखावलं होत पण आता तिच्या मनावर आणि शरीरावर आघात झाला होता, त्यातूनच तिला दिवस गेले. तिला या बाळाला वाढवावे का असे वाटे, कारण हे बाळ तिला तिच्या अत्याचाराचे प्रतीक वाटे, परंतु तिने स्वतःला समजावले आणि बाळ हे आपलाच एक भाग आहे, या सर्व झालेल्या गोष्टीत त्याची काय चूक? आणि आता मला याचाच आधार आहे. असा सर्व विचार करून तिने बाळाला स्वीकारले. पण या घटनेनंतर तिचा त्रास आणखी वाढला. कारण घरातल्याना कळून चुकले कि आता हि दोन जीवाची आहे, आणि तिला कोणाचा आधार नाही. सुरेखाला माहेरी जायला परवानगी दिली नाही, आणि तिच्या माहेरी मात्र आम्ही इथे तिची चांगली काळजी घेऊ शकतो त्यामुळं माहेरी पाठवीत नाही असं सांगितलं. अशाच त्रासात तिने एका मुलीला जन्म दिला.
याघटनेनंतर आदेशने नीचपणाचा कळसच गाठला . " हे मुल माझे नाही, आपल्यात काहीही नातं नसतांना ,तु कुलटा आहेस, असं म्हणून तिला मारहाण देखील सुरु केली."
या सर्व दुःखाचा निचरा व्हायला काहीच रस्ता नसल्याने तिला मृत्यूचा मार्ग जवळचा वाटला. आणि एका सुरेखस्वप्न भंगले.