स्वप्नातलं भविष्य (भाग ६)

वाड्यात काय झालं असेल........

वाड्यात काय झालं असेल ? काल बांधलेला सदा सुटून खाली आला कसा ? शीः ... तिने मग देवीचे दर्शन घेतले. आणि ती जत्रेत नैनाला घेऊन मिसळून गेली. थोडं फार खाणं झालं होतं. अडीच तीनच्या सुमारास ती वाड्याच्या गेटजवळ परत आली. आतून मामांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ते कोणाशी तरी बोलत होते. तिला वाटलं खडपा. नैनाच्या हातात दोन तीन जत्रेतल्या शिट्ट्या आणि गॅसचे एक दोन फुगे होते. तिचा मूड खेळण्याचा होता. पहिल्या पायरीवर आल्या वर तिला दिसलं की एक गव्हाळ वर्णाचा तरूण मुलगा मामांशी बोलत होता. मामांशी बोलता बोलता तो थांबला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. साधारण साडीतही ती आकर्षक दिसत होती. लाल गोऱ्या रंगावर हलक्या गुलाबी रंगाची साडी चांगलीच शोभून दिसत होती. मूळच्याच आखीव भुवयांखाली असलेले चंचलतेने हालणारे तेजस्वी डोळे , तरतरीत नाकाखाली असलेली छोटीशी जिवणी , आणि एकूणच कमनीय बांधा असल्याने सुहास तिच्याकडे पाहातच राहिला. मामांच्या सराईत नजरेतून हे सुटले नाही . ते म्हणाले, " अरे हो, सुहास तू हिला ओळखली नसशीलच. " थोड्या तुच्छतेनेच ते म्हणाले, " आपली चंद्रा माहित असेलच तुला, तिची ही मुलगी. नवरा गेला शिवाय पदरात एक मुलगी , त्यातून घरमालकानी जागा ताब्यात घेतली, मग म्हंटलं , राहा इथेच. तिलाही आधार . " सुहास अंदाजानेच खरं आहे म्हणाला. मामानी मग रेखाला सुहासची ओळख करून दिली. "रेखा हा सुहास . माझा सख्खा भाचा . (म्हणजे ती सख्खी नव्हती असं दाखवायचं होतं की काय ? ) इंजिनियर आहे , आता दुबईला जायचाय , नोकरीसाठी. " ती खालच्या मानेने आत शिरली. आधी तिने "त्या" खोली कडे पाहिले, तिला बाहेरून अडसर होता. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. मग ती स्वैपाकघरात शिरली. तासाभरात स्वैपाक करून ती पानं वाढली असल्याचं सांगाय्ला दिवाणखान्यात गेली, तर सुहास चक्क तिला नैनाबरोबर खेळताना दिसला. नैनाला पण त्याच्याशी खेळताना आनंद वाटत होता. मुलाचं बरं असतं. त्यांना पटकन कोणाशीही मैत्री करता येते. मोठ्या माणसांना का करता येत नाही ? तिच्या मनात आलं. जेवणं होईपर्यंत संधाकाळचे पाच वाजत आले. मग सगळेच थोडे लवंडले.


तिला वाटलं, कोण हा सुहास ? हा का इथे आलाय ? तिला आता पुरुषांची भीतीच वाटायला लागली. दोन चार दिवस् चांगले गेले. आता सुहासशी ती थोडंफार बोलू लागली. ती त्याला \"अहो\" म्हणायची. त्यावर तो तिला म्हणाला , " अहो म्हणू नकोस . उगाचच मोठं झाल्यासारखं वाटतं. तो मात्र तिला एकेरी नावानेच हाक मारी. तिच्या आस्ते आस्ते लक्षात आलं , की ती नकळत त्याच्या आवडी निवडी सांभाळू लागली होती. अधून मधून तोही नैनाला घेऊन बाहेर फिरायला जायचा. येताना अर्थातच तिच्या हातात काही ना काही वस्तू असायची. मग एक दिवस त्याला तसं न करण्याविषयी सांगितलं. कारण सुहास निघून गेल्यावर ननाला या सगळ्या गोष्टींची सवय लागेल. मामा कधी कधी सुहासला घेऊन बाहेर जात. मोठमोठ्या लोकांशी त्याच्या ओळखी करून देत. त्यात ते भाव खात की सुहास हा आपला भाचा आहे. त्या त्यांना मोठेपणा वाटे. असाच एक दिवस संध्याकाळी सुहास नैनाला घेऊन बाहेर जायला निघाला होता. त्याने सहजच रेखाला विचारले, "तू पण येतेस का ?घरी बसून काय करणार आहेस. मलाही गावाची फारशी माहिती नाही. आपण नदीचा भाग पाहून येऊ. " त्यावर ती नाही म्हणाली. मग मामा पण तिने बाहेस जाऊन यावे असं म्हणाले. मग ती तयार झाली. ते तिघेही निघाले. बाड्याच्या पुढे काही अंतर गेल्यावर एक उतरता कच्चा रस्ता लागला जो नदीकडे जात होता. संध्याकाळचे सहा वाजत होते. ते तिघेही नदी काठावर पोचले. नदीला पाणी बेताचच होतं. पाण्याचा फार वापर होत होता असं नाही. पात्राच्या काही भागातून ती खळखळ आवाज करीत वाहात होती. तर काठाजवळ पाणी संथ होते. काही ठिकाणी हिरवट काळसर शेवाळही माजले होते. काठावरच्या वाळूत त्यांना बसण्याची जागा मिळाल्यावर नैना त्यांच्या आजूबाजूला खेळू लागली. बसल्या जागेवरून सुहास नैनाला पाण्यात दगड फेकून दाखवीत होता. तीही खूष होऊन दगड फेकीत होती. अधून मधून रेखालाही मौज वाटू लागली. सुहास रेखाला म्हणाला, " तू ही टाक ना दगड . बघ मी टाकतोय तो दगड कसा उड्या मारीत जातो ते. " थोडावेळ ते तिघेही दगड टाकीत राहिले.

काही तरी विचारायचं म्हणून रेखाने विचारले, " तुम्ही दुबईला कधी जाणार आहात ? " तो म्हणाला ,बहुतेक पुढच्याच महिन्यात जावं लागेल. पण इथल्याही काही ऑफर्स आहेत . मी अजून काही ठरवलं नाही. कां ग ? " त्यावर तिने सहज विचारल्याचे सांगितले. तिच्या मनात आलं हा आताइथे किती दिवस राहणार आहे ?. पण आपण असं कसं विचारणार ? जणू काही तिचे विचार वाचल्यासारखा सुहास म्हणाला, " बहुतेक मी येत्या रविवारी जाईन. लहान पणी केव्हा तरी मी वाड्यावर राह्यलोय् पण आता काहीच आठवत नाही. आठवतात ते फक्त कंदील आणि त्यांच्यामुळे वाढणारा काळोख. तशी मला वाड्याची भीतीच वाटायची. तव्हा एक बाई असायच्या , दोन नोकर असायचे. त्या बाई म्हणजे "मामी " होत्या. मी पाचसहा वर्षाचा असताना आलो होतो. नंतर इथे यायला मला जमलं नाही. मग वडील गेले. आईनी फार कष्ट केले आणि माझं शिक्षण पूर्ण केलं. प्रभा मामा सारखा बोलवायचा पण कधी जमलच नाही. मग त्याने रेखाला तिच्या विषयी विचारलं. समोर गडद होणारा काळोख पाहून ती म्हणाली, " आपल्याला निघायला पाहिजे. " आणि ती उभी राहिली. तिने त्याच्या प्रश्नाला अशा रितीने बगल दिली. त्याला ते जाणवलं , हे तिलाही जाणवलं. परत जाताना त्याची नजर वाड्याकडे गेली.ती वाड्याची मागची बाजू होती. नदीजवळून तिकडे जाणारा रस्ता दलदलीने भरलेला होता. त्याला लागून वरच्या बाजूला माळरान होते. त्यावर एक वापरात नसलेले "कब्रस्तान " होते. त्यावरील अंधूक दिसणारे काँग्रेस गवत पाहून ती अस्वस्थ झाली. ते लवकरच घरी पोचले. मामा म्हणाले, "फार उशीर झालाय, स्वैपाकाचं बघ.. ती आत् शिरली. तिचं लक्ष परत "त्या " खोलीकडे गेलं. आता अडसर दर झाला होता. म्हणजे खोली उघडी होती तर. ती दबकतच स्वैपाकघरात गेली. ती कामात गुंतली होती . सुहास सहज म्हणून स्वैपाकघरात आला. ती भाकरीचं पीठ मळत होती. समोर चूल पेटली होती. चुलीच्या लाल पिवळ्या ज्वाळांचा रंग तिच्या चेहेऱ्यावर पडला होता. सुहास तिथेच काही अंतरावर बसला. तिला ते फारसं आवडलं नाही. पण त्याने तिच्या नापसंतीकडे लक्ष दिले नाही. चुलीच्या प्रकाशात ती त्याला अधिकच आकर्षक वाटली. काहीही असलं तरी ती त्याला आवडली होती. प्रथम तिला पाहिली त्यापेक्षा ती आता त्याला किती तरी पट जास्त आकर्षक भासली. तो आपल्याकडे पाहतोय हे पाहून तिने पदर सारखा केला. ती थोडी अस्वस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावर नापसंतीची सूक्ष्म छटा आली. तिने त्याला काही पाहिजे का असे विचारले. त्यावर त्याने वेळ जात नाही म्हणू न आपण आलो असं तिला सांगितले. खरं तर त्याला तिला परत परत बघावसं वाटत होतं. येत्या रविवारी त्याला जायचं होतं. जेमतेम चार पाच दिवस राहिले होते. मग तो धीर करून म्हणाला, " तू मघाशी तुझ्याबद्दल बोलण्याचं सोडूनच दिलस. बोल ना, तुझं आधीचं आयूष्य कसं होतं ? पुढे तू काय करणार आहेस ? "

ती जरा कडवटपणे म्हणाली, " ज्या आयुष्यात अपयशाशिवाय काही हाती आलं नाही , त्या बद्दल काय सांगायचं ? तुमच्या मनात जर काही वेगळं असेल ना तर ते काढून टाका. "

त्यावर तो म्हणाला, " तुला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली असावी असं वाटतं. माझ्या मनात जगावेगळं काही नाही. पण रेखा खरं सांगू ? सांग ना, तू परवांगी देशील तरच सांगतो. ...


ती म्हणाली, " एवढं बोललात , आता बोलून तरी टाका. मला कसली आल्ये सिद्धी ? एकच सांगते , माझ्या सारख्या सामान्य आणि कमनशीबी मुलीचा तुम्ही फार विचार करू नका. .... ‍जरा वेळ विचार करून तो धाडसाने म्हणाला, " हे बघ रेखा , तू मला फार आवडलीस. यू आर ए पर्फेक्ट वाईफ फॉर मी. ....... तिची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी त्याने तिच्या चेहेऱ्याकडे पाहिले. तवा तापला होता. त्यावर नवीन भाकरी टाकीत ती म्हणाली, "सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात. तुम्हाला माझ्यासारख्या एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न करण्याची काय गरज आहे ? तुम्हाला चांगली शिकलेली नोकरी करणारी मुलगी सहज मिळेल. माणसानी नेहेमी आपली पातळी पाहावी, त्यच्या खालच्या पातळीवर उतरू नये. " ...... थोडा वेळ शांततेत गेला. मग तो काही न बोलता मामांच्या हाका ऐकून निराशेने उठून बाहेर गेला.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all