स्वप्नातलं भविष्य (भाग २)

अपघाताला कंपनी जबाबदार नसल्याने.......

अपघाताला कंपनी जबाबदार नसल्याने , अविनाशला कंपनी कडून काहीच पैसे मिळाले नव्हते. केवळ सौजन्य म्हणून सह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून पैसे दिले होते. ते हजार दीड हजार रुपये भरले असतील. त्यातून तिचा दैनंदिन खर्च निदान काही दिवस तरी भागला होता.तशी ती फार मोठ्या गावात राहात नव्हती. पायांना चटके बसत होते. नैनाचं बोट धरून ती दिशाहीन पणे चालली होती. आता ती दमली होती. घरापासून एका लांबच्या वळणावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली. तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळू लागली . पदर तोंडाला लावून मुठीत नाक पकडून ती मुसमुसू लागली. एका हातामे नैनाला तिने अधीरपणे कवटाळले. आणि तिचा बांध फुटला. आता मात्र तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. काही मिनिटे अशीच बसून ती सुन्न होऊन राहिली. पहिला प्रश्न तिला कुठे जायचं हा होता. अविनाशचे किंवा तिचे या गावात कोणीच नातेवाईक नव्हते. नाही म्हणायला तिची आत्या होती. पण आत्या दोन वर्षांपूर्वीच गेली होती. आत्याचं नाव मनात येताच तिला मागचं सर्वच आठवू लागलं. मनाचा वेग एवढा असतो की काही वर्षसुद्धा काही मिनिटात डोळ्यासमोरून जातात. तिचं तसच झालं.


अविनाश बरोबर तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी आत्या म्हणाली होती., "रेखा अगं तू इतकी चांगली दिसतेस , तो काय आहे सांग बरं. पुरुषाचं सौंदर्य पाहायचं नसतं तरी त्याची कर्तबगारी पाहायला नको का ? असे काय पैसे मिळतात गं त्याला ? कसलं ग तुमचं प्रेम , विचार तरी करता कां गं ? " पण त्यावेळेला जग आपल्याला अगदी तुच्छ वाटत होतं. तिला त्यांची पहिली भेट आठवली. त्याने तिला रस्ता ओलांडताना एका ट्रकने उडवण्यापूर्वी बाजूला खेचलं होतं. आणि ती त्याच्या मिठीत अडकली होती. नंतर होणाऱ्या त्यांच्या गाठी भेटी जादूने मंतरल्या सारख्या होत. दोघांनाही एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे. ती त्यावेळेला मॅट्रिकला होती. तस तिला डोक चांगलं होतं. पण तिचं या सगळ्यामुळे अभ्यासातलं लक्षच उडालं. परिणामी तिला कसातरी सेकंड क्लास मिळाला. तरी आत्याला संशय आलाच होता.ती म्हणाली होती, "रेखे , तुझं लक्ष हल्ली कस कावरं बावरं आहे. काही \"चाललयं \" वाटतं. नाहीतर आजपर्यंत मार्क अगदी चांगले पडत होते. " मग मात्र तिने आत्याला लाजत बुजत सगळं सांगितलं होतं.वडील लहानपणीच वारले होते आणि आई ती पाचवीत असतांनाच वारली. तिचा सांभाळ आत्यानेच केला होता. आत्याला मागेपुढे कोणीच नसल्याने तिने भाचीला सांभाळायचं ठरवलं होतं. अविनाशबद्दल ऐकल्यावर आत्या म्हणाली होती " अगं स्व्तःच्या पायावर उभी राहायला शीक, रेखे. हा समाज मोठा वाईट आहे बघ. मी बघ कशी रंडकी आहे . चार लोकांची कामं करीत जगत आले. नेहेमीच दुसऱ्याचा आधार घेऊन जगणं वाईट आहे. निदान पुढे शिकून घे , मग तरी लग्न कर. " तिचं म्हणणं खरं होतं. आपण काही चांगल्या शिकलेल्या नव्हतो की कमावत्याही नव्हतो. पण अविनाशचं आकर्षण एवढं होतं की आपल्याला कोणाचंही ऐकायची इच्छा नव्हती. आणि आपलं स्वतःचं घर होणार ही कल्पनाच रम्य होती. दोन वर्षांपूर्वी आत्याही सोडून गेली होती. " आई कुठे जायचं आपण ? " नैनाने तिला गदागदा हालवीत विचारले. आणि ती भूतकाळाच्या विळख्यातून बाहेर आली. नैनाच्या निरागस चेहऱ्यावर हात फिरवीत तिला जवळ घेत म्हणाली, "मी आहे ना ?.... मी करीन बरं काहीतरी. " पण ती काय करणार होती ? नैना तिला बिलगली. तिच्या मनात आलं. नैना एवढी छोटी , पण तिलाही काय झालय याचा अंदाज आला असावा. नाहीतर तिने पण घरी जायचय म्हंटलं असतं.

मग तिला एकदम प्रभा मामाची आठवण झाली. गावापासून लांब एका बाजूला प्रभामामाचं घर होतं. घर कसलं प्रचंड वाडाच म्हणा ना. एवढ्या मोठ्या वाड्यात तो एकटाच भुतासारखा राहायचा. मूळचा सावकारी करणारा मामा पैसा सांभाळून होता. बाजूच्या खेडेगावांमधून अडलेल्या लोकांना वस्तू गहाण ठेऊन तो कर्ज देत असे. आणि त्यांना पैसे फेडता नाही आले की वस्तू हडप करीत असे. त्याच्या व्याजाची आकारणी अडलेल्या माणसांना कधीच कळत नसे. दुसऱ्याला फसवण्यासाठीच त्याचा जन्म झाला होता की काय कोण जाणे. गावात, तो चोरीचा मालही विकत घेतो अशी वदंता होती. एक दोन वेळा तालुक्याच्या गावाहून पोलिसांचा छापाही पडला होता पण त्यांना काहीच सापडलं नव्हतं. म्हणून त्याची सुटका झाली. मामा आता साठीला आलेला होता. आत्तापर्यंत त्याची दोन लग्न होऊन गेली होती. पण दोन्ही ही बायका जिवंत नव्हत्या. त्याला मूल बाळही नव्हतं. गावात, मामा करणी करतो, भानामती करतो असं बोललं जायचं. पणं ते काही खरं नव्हतं. हा आता त्याच्या वाड्याच्या मागे एक माळरान होतं आणि त्यावर एक न वापरलं जाणारं कब्रस्तान होतं. त्याला लागून नदीचं पात्र जात होतं. त्यामुळे वारा भन्नाट यायचा. असल्या भारल्या सारख्या जागेमुळे मामाबद्दल नाही नाही ते प्रवाद निर्माण झाले असावेत. खरं खोटं माहित नाही. मामा तसा एक्कलकोंडाच होता. कोणातही न मिसळणारा. रेखाच्या आईचा हा दूरदूरचा भाऊ. आई त्याला राखी बांधायची. तो रेखाच्या लग्नाला आला होता. इतकच नाही तर त्याने तिला एक सोन्याची साखळी ही आहेर म्हणून दिली होती. अजूनही ती साखळी तिच्या जवळच होती.

रेखाने पटकन नैनाला उचललं आणि भराभर पावलं टाकित ती अर्ध्या तासात मामाच्या वाड्याशी पोचली. वाड्याचं गंजलेलं लोखंडी गेट दोन्ही हातांनी जोर लावून तिने उघडले. ती आत शिरली. पायऱ्या चढून ती मुख्य दरवाजा पाशी आली. वाडा चांगला दुमजली होता. तळमजल्यावरचा मुख्य दरवाजा एका चार खणी दिवाणखान्यात उघडत होता. तिथे जाड सतरंजीची बैठक होती. त्यावर शिसवी( कोरीव ) उतरत्या आकाराचं बैठ टेबल होतं. टेबलावर दौत टाक व काही कोरे कागद ठेवलेले होते. बाजूच्या भिंतीला लागून एक भलं मोठं काचेचं कपाट होतं. त्यात काही पुस्तक , जुनी दफ्तरं व बऱ्याचशा गहाणवटीच्या वस्तू होत्या. वाडा दक्षिणाभिमुख असल्याने प्रवेशदाराच्या समोरच्याच भिंतीवर कोणीतरी सांगितलं म्हणून एक मारुतीची तसबीर लावली होती. त्याखाली लाल्ररंगाने "अश्वत्थामा बलिर्व्यासो....... " हा श्लोक लिहिला होता. दरवाजा उघडाच होता. आतून कसलाच आवाज येत नव्हता. ऊन जेमतेमच आत यायचं. मामा कुठेतरी आत असावा. रेखानं दार वाजवलं आणि "प्रभामामा .... " अशी हाक मारली .

ती पुन्हा हाक मारणार तेवढ्यात प्रभामामा बाहेर आला.त्याच्या अंगावर फक्त धोतर आणि गळ्यात जानवं होतं. तुपकट चेहेऱ्याचा मामा त्याच्या हिरवट डोळ्यांमुळे लबाड वाटायचा. तो जेवढा गोरा होता तेवढाच बेरकी होता. कदाचित त्याच्या धंद्यात हा बेरकीपणा लागत असावा. त्याला सबंध टक्कल होतं आणि डोक्याच्या मागच्या बाजूला अर्धचंद्राकृती पांढरे केस होते. थोडक्यात त्याचा अर्धा चांद उतरला होता आणि अर्धा बाकी होता. थोडेसे दात पुढे असलेला मामा छातीवरचे केस कुरवाळित , तिला आपादमस्तक न्याहाळित म्हणाला, " अरे, रेखा तू ? ये. ये. .... अशी न कळवता आणि सामानाशिवाय कशी आलीस ?, काय भानगड आहे ? काय गं ? त्या शितोळ्यानी तुला बाहेर काढली कि काय ? हरामखोर लेकाचा. " रेखाच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती मानेनेच हो म्हणाली. ...... ती जास्त बोलत नाही असं पाहून मामा म्हणाला., " मला वाटलचं. तरी मी तुला अविनाश गेल्यावर सांगत होतो , तू इथे येऊन राहा. एवढ्या मोठ्या वाड्यात माणसं नाहीत. पण तू ऐकलं नाहीस. तुझ्या आत्याचं तू ऐकलस . आता इलाज नाही तेव्हा मामाची आठवण झाली काय ?.... बरोबर आहे ना ? " रेखाला आठवलं. त्याला आत्या आणि आत्याला तो आवडत नसे. आत्या तिला म्हणायची, "रेखे, हा मामा बायकांकडे कसा बुभुक्षितासारखा बघतो बघ. " पण रेखाला ते पटलं नव्हतं. एवढया प्रेमाने ज्या मामाने मला सोन्याची साखळी दिली तो असा कसा असेल ? पण तिने आपलं मत स्वतः जवळच ठेवलं. आणि आज खरोखरीच मामाचाच आधार घ्यायची वेळ आली . "मी , मी आत येऊ का ? " रेखाने अधीरपणे विचारले. त्यावर मामा म्हणाला, " अगं हे काय तुझं बोलणं झालं ? तुझा मामा इतका काही निर्दय नाही(म्हणजे थोडातरी निर्दय होता). तू असं कर आजच्या दिवस विश्रांती घे. स्वैपाक कर. संध्याकाळी पाच वाजता तुला आणि हिला , काय नाव हिचं ? (रेखाने तिचं नाव सांगितलं. ) नैना ? शांतिलालच्या दुकानातून कपडे घेऊन ये. माझं खातच आहे तिथे. .. चल आत चल., मी अंघोळ करून घेतो. " असं म्हणून तो विहिरी जवळ बांधलेल्या न्हाणीघराकडे गेला.


तिने सर्व वस्तू शोधून स्वैपाक केला. तासाभरातच सगळ्यांची जेवणं झाली. मग सगळेच थोडे लवंडले. पाच वाजून गेल्यावर तिने चहा केला. संध्याकाळी ती शांतिलालच्या दुकानात गेली. मामांना गावात मामाच म्हणत असत. शांतिलालच्या दुकानात तिला अपेक्षेपेक्षा चांगली वागणूक मिळाली. मुळात ती दिसायलाही चांगली होती. मामांकडून आलेली आहे म्हंटल्यावर तिची जास्तच सरबराई करण्यात आली. शांतिलाल शेठचा मुलगा महेश जातीने तिच्याकडे लक्ष देत होता. तिला जरा आश्चर्य वाटलं. आज सकाळच्या प्रकारापेक्षा काही वेगळच अनुभवाला मिळेल असं तिला कोणी सांगितलं असतं तर तिने त्याला गाढवात काढलं असतं. खर्चाची खात्यावर नोंद करून ती घरी आली. तो दिवस तर चांगलाच गेला. मग दैनंदिन जीवन चालू झालं. वाड्याच्या वरच्या मजल्यावर सात आठ खोल्या होत्या. पण त्यांना सर्वांना कुलपं होती. अर्थातच रेखाला वर जाण्याची वेळ आली नाही. तिला उत्सुकता होती. पण तिने मामाला काहीही न विचारण्याचं ठरवलं. त्याला आवडेल न आवडेल.

(क्र म शः)

🎭 Series Post

View all