स्वप्नातलं भविष्य (भाग ८)

संध्याकाळचे सहा वाजायला आले होते.......

संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मामांचा पत्ता नव्हता. सुहास नैनाला घेऊन बाहेर निघाला होता. रेखाला आज घरात एकटं राहावसं वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरून तो डोळे नसलेला पण हासणारा चेहेरा हलत नव्हता. कशीतरी तिला अर्घा पाऊण तास झोप लागली होती. त्यामुळे डोळ्यावर एकप्रकारची पेंग होती. ती सुहासला म्हणाली, " जायलाच पाहिजे का बाहेर?, मामा आल्यावर जा ना. " तो काळजीच्या सुरात म्हणाला, " खरं तरं तूही ये. घरी बसून तुझी भीती आणखीन वाढेल. येतेस ? " मान हालवून ती म्हणाली, छे छे, असं घर बंद करून कसं चालेल? मामांनाही आवडणार नाही आणि गेले दोन तीन महिने मी इथे आहे वाड्याला कुलुप लागलेलं कधी पाहिलं नाही. त्यापेक्षा तुम्ही आज जाऊच नका ना. " तिच्या बोलण्यात भीती असली तरी नैना ऐकणार नाही म्हणून तो नैनाला घेऊन बाहेर गेला. त्यानि लवकरच येण्याचं ठरवलं. तिनी दोन्ही तिन्ही कंदिल साफ करून लावले.\" ती \"खोली बाहेरून बंदच होती. तरीही तिला आज एवढी भीती वाटली नाही. दुपारचा प्रकार फारच भयानक होता. तिला पडणाऱ्या स्वप्नाची आठवण झाली. खरं तर तिनी आईच्या तोंडून पण वाड्याबद्दल फारसं कधी ऐकलं नव्हतं. मग तिलाच हे स्वप्न का पडलं ? .... आणि ते खरं सुद्धा झालं. आता काय करायचं ? वाडा सोडून जायचं तरी कुठे ? आपण सुहास बरोबर गेलो तर ? पण तिनी तो विचार झटकून टाकला. आपण काहितरीच विचार करतोय . मग आपण काय करायचं. हा सुहास मध्ये आला आणि हे असं काही झालं की काय ? पडत होतं स्वप्न तर काय बिघडत होतं ? सुहासला येऊन एक आठवडा झाला . तिनी स्वतःच्या नोकरीचा विचार केलाच नाही. विचारांच्या भोवऱ्यात ती स्वैपाकघरत आली. यांत्रिक पणे तिनी चूल पेटवली. कणीक मळायला घेतली. पण तिला जरा अस्वस्थच वाटत होतं. आज तिचं कामात मन अजिबात नव्हतं. थोड्याच वेळात सुहास आला . मग आठ वाजेपर्यंत त्यांची जेवणं झाली. सुहास तिच्याबरोबर गप्पा मारीत होता. ती त्याला जेमतेमच प्रतिसाद देत होती.


करमणुकीचं कोणतही साधन त्यांच्याकडे नव्हतं. साडेनऊ च्या सुमारास तिनी खोलीत जाऊन अंथरूण तयार केलं . नैना सुहास बरोबर बाहेर खेळत होती. बिछान्यावर ती बसली. दहा वाजून गेले. सुहासनी पण त्याचं आणि मामांचं अंथरूण तयार केल . ती नैनाला घेऊन खोलीत आली. मनात नसतानाही तिनी नैनाला एक दोन गोष्टी सांगितल्या. अकराच्या सुमारास मामा आले. त्यांचा चेहेरा उद्विग्न दिसत होता. बाहेर काहीतरी झालं असावं. त्यांचं जेवण झालं . ते दिवाणखान्यात आल्या आल्याच त्यांना विचारलं., " मामा काही प्रॉब्लेम आहे का ?. त्यावर ते म्हणाले, " नाही रे. हे खेडवळ लोक साले, कोणीतरी त्यांना भडकवतो आणि तहसीलदाराकडे ते तक्रारी करतात. वाड्यामागची जागा म्हणे त्या जाधवाची आहे. इतकी वर्ष हा लेकाचा झोपला होता की काय ? " . "कोण हा जाधव ? " सुहासनि सहज विचारलं. " जाउ दे , आहे एक, तुला माहित नाही . " असं म्हणून मामा अंथरूणावर पडले. झोपायला बारा वाजले.

रेखाला धड झोप लागली नाही. ती पाणी प्यायला म्हणून उठली. तिने कंदिल मोठा केला. कंदिलाच्या प्रकाशात तिला आपलं प्रतिबिंब दिसलं. चेहेरा गोरा असूनही आता काळसर चॉकलेटी रंगाचा झाला होता. चेहेऱ्यावर लहान लहान सुरकुत्या पडत होत्या. पाहता पाहता त्या गडद झाल्या. आता तिचा चेहेरा म्हाताऱ्या स्त्री सारखा दिसू लागला. तिला कळेना हे काय होतय ?.... हळूहळू तिच्या नाकावरचं मास , ओठ , पापण्या, सगळच आक्रसू लागलं. तिने हाताने स्वतःच्या चेहेऱ्यास चाचपून पाहिले. सुरकुत्या पडल्यामुळे कातडी आता वाळू लागली. गाल आत शिरले. वाळलेल्या ओठातून दात पुढे येऊ लागले. डोळे खोल गेले. तिचं लक्ष सहज हातांकडे गेलं. तिथेही तसच होतं. हातांवरची कातडी आक्रसून कोपऱ्याजवळच्या सांध्याजवळ जमा होऊ लागली. बोटांची हाडं दिसू लागली. नखं लहान होती तरी आता ती डाकिणीच्या नखांसारखी ती बाहेर येऊ लागली. छाती बसकट झाली. गळ्याजवळची कातडी इतकी सुकली की तिची श्वास नलिका तेवढी शिल्लक राहिली. . सबंध अंगावर एक प्रकारची मरगळ आली. ती घाबरली . आता कोणाला बोलावणार ...? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं जवळ जवळ सांगाड्यातच रुपांतर झालं. ती स्वतःशीच म्हणाली , " काय करू मी ? " पण उत्तर सुचलं नाही. भीत भीतच तिनी प्रतिबिंबाकडे पाहिलं. तिचे दात आता पूर्णपणे बाहेर आले आणि एकमेकांवर घट्ट बसले. ....." अगदी, दा त खि ळ ब स ल्या सा र खे. आणि तिच्या दातांच्या फटीतून रक्तवर्णी लस गळू लागली. तिने "शी " म्हणून ओरडायचा प्रयत्न केला. पण जबड्याची हालचाल बंद झाली. डोळ्यात पाणी आलं. ........ मग तिला तिच्या मागे हालचाल जाणवली. कुणाची तरी सावली तिथे होती. .... मागे "क म ळी " उभी होती. जशी थडग्यात होती अगदी तशीच. ती हासत हासत फणकारून म्हणाली, " कार्टे. , मला परत तिथेच दडवून ठेवलीस काय ? वाड्यावर का नाही आणलस ? तुझा तो मामा हलकट मेला, जबरदस्ती केलीन मुडद्यानी आणि गळा आवळला. अर्धवट जिवंत असतानाच म्हशानी थडग्यात पुरलीन. तू पण पुन्हा पुरलीस मला. तुला आता रोज रात्री मी अशीच झोंबणार . लक्षात ठेव. मी आता या खोलीतच राहणार आहे. तुला सोडणार नाही. आता कितीही बोंब मार , काही उपयोग नाही. तुझी मुलगी लवकर उठणार नाही. " हिः हीः हिः हीः ... ती दुष्टपणाने हसली.

तेवढ्यात मामा उठले. त्यांना तशी झोप लागलीच नव्हती. त्यांनी सुहासकडे पाहिलं. तो झोपला होता. त्यांच्या मनात आलं. कितीतरी दिवस झाले रेखाला हात लावण्याची संधी मिळत नव्हती. आज पाहू. ते मांजराच्या पावलाने हातातला कंदिल सांभाळत रेखाच्या खोली कडे गेले. दरवाजा ढकलला. पण तो आतून बंद होता. रेखाचे कमळी मध्ये पूर्ण रुपांतर झाले होते. कमळी म्हणाली, " ऊठ , दार उघड, तो नीच आलाय बघ." रेखा जोरात एखाद्या जनावरासारखा हुंकार देऊन उठली. दरवाजाकडे पाय घाशीत , म्हणजे पायांची हाडं घाशीत गेली. तिने अडसर दूर केला. दरवाजाबाहेर कंदिल घेऊन मामा उभे होते. ते आत आले. त्यांचं लक्ष अजून रेखाच्या चेहेऱ्याकडे गेलेलं नव्हतं. ते लंपटपणे म्हणाले, " फार दिवस झाले , आज एकांत मिळालाय, ये. " त्यांनी कोपऱ्यात कंदिल ठेवला आणि हात पुढे केला. रेखातली कमळी उसळली. तिला मामांना घोळसून मारायचं होतं. तिने रेखाचा हडकुळा हात पुढे करून मामांच्या हातात ठेवला. मामांची नजर रेखाच्या चेहेऱ्याकडे गेली. त्यांनी चेहेरा पाहिला मात्र , आणि ते सर्रकन मागे सरले. घाबरून ओरडले, " ए.. ऽ कोण आहेस तू? "पटकन खोलीतून बाहेर पडण्याच्या धडपडीत उंबऱ्याला अडखळून पडले. त्यांचा पाय कंदिलाला लागला आणि तो आडवा झाला. त्यांनी पळता पळता मागे वळून पाहिलं , रेखा कमळीच्या आवाजात विचित्र हसत म्हणाली, " अरे , काय घाबरतोस , ये की मुडद्या.... " आणि तिनी दरवाजा बंद केला. मामा दिवाणखान्यातल्या त्यांच्या अंथरूणाशी आले. हसण्याच्या आवाजाने सुहास पण जागा झाला. त्याने विचारलं , " काय झालं मामा .....? ते म्हणाले , " काही नाही रे, स्वप्न ... दुसरं काय ? " अर्थातच त्याचं समाधान झालं नाही. पण उठण्याचा त्रास कशाला घ्यायचा , म्हणून तो परत झोपला. मामांना कळेना , कमळी घरी कशी आली ? त्या विचारातच त्यांना झोप लागली .


इकडे रेखातल्या कमळीने दार लावून घेतलं. रेखाची झोप तर केव्हाच उडली होती. ती भिंतीला टेकून बसली होती. तोंडातून गळणारी घाण अजून थांवत नव्हती. रात्र सरता सरता चार वाजायला आले. चारचा कोंबडा दूर कुठेतरी आरवला. कमळी म्हणाली, " आता मी जाते माझ्या जागी. पण परत येईन रोज रात्री, लक्षात ठेव. केव्हापासून मी तुझ्या स्वप्नात येत्ये , पण तू काहीच केलं नाहीस. " मग रेखाला कसला तरी झटका बसल्यासारखं झालं आणि ती बसल्याजागी कोलमडली. तासाभरात ती पूर्ववत झाली. तिला झोप लागली होती. ज्या अवस्थेत ती पडली होती , त्याच अवस्थेत ती झोपली होती. सकाळचे आठ वाजले तरी रेखा उठेना. म्हणून सुहास अस्वस्थ झाला. मामाही झोपले होते. पण ते उशिरा आले हे त्याला माहित होतं. मग त्याने प्रथम मामांना उठवले आणि रेखाबद्दल विचारले, पण एक शब्दही बोलले नाहीत. मग सुहासने रेखाच्या खोलीचे दार वाजवले. पण आतून कोणताच आवाज आला नाही , म्हणून त्याने जोरजोरात वाजवला. रेखा जणूकाही जमिनी त पुरली गेली असल्याच्या भावनेत झोपली होती. अंगावरचे पांघरूण तिला जड दगडासारखे वाटत होते. मग ती अर्धवट जागी झाली. कोणीतरी अंगावरच्या दगडावर ठक ... ठक .. करीत असल्यासारखे तिला वाटलं. पण कोण असावं ? असं तिच्या मनात आलं. मग मध्येच तिला डुलकी लागत होती. तिच्या लक्षात आलं कोणीतरी दार वाजवीत होतं. कोण असेल ...? तिला कळत नव्हतं. ती जागी झाली. तिचं अंग आणि डोकं अगदी जड झालं होतं. तिने मग नैनाला उठवलं‌. साडी सारखी करीत तिने दार उघडलं. दारात सुहास उभा होता. "रेखा , अगं आठ वाजून गेल्येत , तुला आज एवढी झोप कशी लागली ? " उत्तरादाखल तिने "काय माहित " अशा अर्थी खांदे उडवले. नैनाला उचलून तिने स्वैपाक घर गाठले‌. सकाळची सगळी कामं तिने जड मनाने उरकली. मग ती स्वैपाकघरात स्वस्थ वसली. तिला रात्रीचा प्रसंग आठवला. ती परत शहारली. मामांचं तिला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आजही तेच होणार या कल्पनेने तिची छाती धडधडली् ही कमळी कोण आहे ?..... नैनाची चिंता तिचा अभ्यास वगैरेंची तिला आता फिकिर वाटेनाशी झाली. स्वतःचं आयुष्य जणू पणाला लावल्यासारखी ती वागत होती. बराच विचार करून तिने स्वतःवर ताबा मिळवला. निदान तिला तरी तसं वाटलं. ... रात्र व्हायला अजून बराच अवधी आहे. तिने मनाला बजावले. तिला झोप नसल्याने फेकल्यासारखं वाटत होतं. मामा तिच्या नजरेला नजर देत नव्हते. आज प्रत्येक जण अगदी स्वतंत्रपणे वागत होता. जणू दुसरा अस्तित्वातच नव्हता. सुहासने विचार केला . आठवड्यावर दोन दिवस झाले. आणखी दोन दिवसानी मी जाणार. काय वाटेल ते होवो. तरी त्याचं मन सारखं रेखाचाच विचार करीत होतं. लग्नाबद्दल रेखाने अजिबातच पुष्टी न दिल्याने त्याची निराशा झाली होती. पण आता तिला त्याने संधी साधून परत विचारण्याचे ठरवले होते. ती नाही म्हणाली तरी आणि हो म्हणाली तरी आपण परवा जायचच. ती हो म्हणाली तर एक प्रकारच्या उत्साहात जाता येईल. ...... जेवणं झाली. ...... मामा बैठकीवर कसलेसे कागद पाहात बसले होते. रेखाला ऐकू यावं या हेतूने त्याने मामांना जरा मोठ्या आवाजात सांगितलं, " मी परवा निघतोय. दहा बारा दिवस झाले मला येऊन. यापेक्षा जास्त थांबणं मला कठीण आहे. .........

रात्री परत सगळा तमाशा कमळीने केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणं झाल्यावर तो रेखाच्या खोलीत तिला भेटायला गेला. दरवाजातून आत पाहिलं, रेखा सतरंजीवर सैरटासारखी मुद्रा करून बसली होती. नैना तिच्या समोर बसून त्यानेच शिकवलेली चित्रं काढीत होती आणि रेखाला दाखवीत होती. रेखा तटस्थ दिसलि, म्हणून सुहासने आत येत विचारले, " अशी कोणत्या विचारात गढली आहेस ? " त्यावर ती घाईघाईने म्हणाली, " छे, छे, कुठे काय ? " याचा अर्थ तिला काहीच सांगायचे नव्हते. तिला आपल्याबद्दल विश्वास वाटत नसावा. तिला पुढच्या आयुष्याचा विचार करायचाच नाही का ? त्याच्या मनात आलं . मग त्याने तिला पटकन विचारल, "मी तुला लग्नाबद्दल विचारलं ते तुला आवडलं नाही का ?निदान नाही तरी म्हण. मी परवा जाणार आहे. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " मला माहित आहे तुम्ही जाणार आहात ते. पण मला सांगा, माझ्यासारख्या कमजोर स्त्री शी लग्न करून तुम्ही काय साधणार आहात ? " तो पुन्हा अजिजीने म्हणाला, "रेखा नीट विचार कर. तू मला आवडतेस आणि नैनाला पण मी सांभाळायला तयार आहे. ...... तुला .... मी आवडत नाही का ? " हे ऐकल्यावर रेखाच्या चेहेऱ्यात असा काही बदल झाला की सुहास दचकला. येणारा आवाज तिचा नसावा असं त्याला वाटलं. ती म्हणाली, " आज रात्री ये, मी तुला याच उत्तर देईन ". तरीही तो धीर करून म्हणाला, "रात्री ? असल्या शुभ प्रश्नाला रात्रीचा मुहूर्त कशाला ? तू निशाचर आहेस का? " असं म्हंटल्यावर तिला कालची रात्र आठवली. तिचे डोळे लालसर झाले. रागाने ती फुत्कारली, " मला निशाचर म्हणतोस काय ? मग येच रात्री. जा आता. " एकदम संचारल्यासारखा तिचा चेहेरा झालेला पाहून सुहास काही न बोलता निघून गेला. त्याला काही सुचेना. तो काही न सांगता बाहेर निघून गेला. मामांना काय वाटेल याची त्याला पर्वा नव्हती. तो बाहेर गेला खरा, पण बाहेर ऊन चांगलच तापलं होतं. दुपारचे तीन वाजत होते. कुठे जाऊन बसायचं. असा विचार करीत तो नकळत नदीकाठाकडे जाऊ लागल. वळणावर राहणाऱ्या एका गावकऱ्याने ते पाहिलं. तो ओरडला. " ओ पावणं नदीवर उन्हाच्या टायमाला कशापायी चालला ? " सुहासने मागे पाहिले. गावकरी वाहणा वाजवीत त्याच्याकडेच येत होता. सुहास त्याला पाहून थांबला. त्यावर तो गावकरी म्हणाला, " या गावातलं दिसत न्हाई तुमी. इकडं कुनीकडं आला ? " सुहासने त्याला मामांकडे आलेला असून तो त्यांचा भाचा आहे असे सांगितले. त्यावर गावकरी सावध होत म्हणाला, "असं . माझं नाव जाधव. माझं घर ह्ये सामने हाय बगा. या की राव वाईच चा बी घेऊ आनि गप्पा मारू. नदीकाठाकडं कुठं जाता. या या ... " सुहासलाही ते पटलं. तो त्याच्यामागे गेला. घरात गेल्यावर त्याने एक सतरंजी अंथरली आणि सुहासला बसायला सांगितलं. आतून पाणी आणलं. मग दोघेही स्वस्थ झाल्यावर तो म्हणाला, " पावणं असं आहे बगा, गैरसमज करून घेऊ नका. पण हे तुमचे मामा हाय ना , लई चांबट मानूस. अवो वाड्यावर मी नोकर व्हतो. आता काय सांगणार हा मामा बायामानसाच्या बाबत एकदम असा बगा (असं म्हणून त्याने आपले बोट नाकाकडे नेलं. ) अवो , सवताच्या दोन बायका ह्यानं खाल्ल्या. पन समाधान न्हाई. अजून बाईच्या मागं हायेच. काय म्हनावं याला ? " "तुम्हाला काही अनुभव आहे ? का आपल्या गाव गप्पा आहेत ह्या ? सुहासने मधेच विचारलं. त्याला थोडा राग आला होता. " अ न भ व ? जाउ द्या , तुमाला इस्वास वाटत न्हाई. " जाधव थोडा चिडून म्हणाला. मग तो म्हणाला, " तुमी कोनत्या गावी ऱ्हाता ? काय करता ? " सुहास मग म्हणाला, " अहो विषय बदलू नका. मामांचा तुम्हाला वाईट अनुभव आला ना ? मग सांगाच. त्यावर तो म्हातारा खाली मान घालून म्हणाला, " जाऊ द्या. कशाला विचारता. झाली लुसकानी भरून थोडीच निघनार ? " नाही नाही, आता तुम्हाला सांगावच लागेल. "सुहासने जोर दिला .


तो ऐकत नाही असं पाहून जाधव म्हणाला, " ठीक हाय. बघा मी वाड्यावर धा पंधरावर्ष नोकर व्हतो. ह्या मामाचा काका व्हता तवापासून. काका मामाना हिडीस फिडिस करायचा. फार वाईट वागवायचा. मामाना आई आनी एक बहीन बी व्हती. काका याना पैसा बी द्यायचा न्हाई.बहीन इधवा. गाव सोडून गेली. तिला येक मुलगा व्हता(म्हणजे सुहास) मामांची बायको व्हती . ती गेली. पोटी पोर झालं न्हाई म्हनून दुसरी बायको आनली. ती बी गेली , तिला बी पोर झालं न्हाई. आनी मामा वांझोटा तो वांझोटाच ऱ्हायला बगा. वंशाला दिवा न्हाय. मंग काका बी गेला. काकाला आनखी येक पोर हुती , ती गावातच हुती(म्हणजे रेखाची आई) . काका गेल्यावर मामा झाले मालक. सर्वच ताब्यात घेतलन. सावकारीचा धंदा करून लोकांना फशिवलं. बक्कळ पैसा कमावला. एक चुलत भाऊ बि व्हता. त्याचं नाव सदा(म्हणजे रेखाचा खरा मामा). त्याला वेड लावलं मामानी. दिस दिस खायाला घालीना मामा. बिचारा कंटाळला. पयले पयले त्यांची मारामारी व्हायचि. मंग मामा त्याला खोलीत कोंडून ठेवायचे̱. घाण घाण शिव्या घालायचे. का तर तो काकाचा मुलगा. मिळकतीचा वारस. त्याची गावात ऱ्हानारी बहीन कधी आली नाही. येक दीड वर्षा पूर्वी माझी मुलगी , कमळी नाव तिचं, तिला पोर व्हत न्हाई म्हनून नवऱ्यानं सोडलीन. ती घरीच असायची. या मामाला कसं कळलं , काय माहित ? मला म्हनाला, " कमळीला वाड्यावर आन. झालं तर पोर हुईल बी. वाड्याला वंशाचा दिवा मिळंल. तुलाबी मिळकतीत वाटा देईन. मला मिळकतीचा लोभ सुटला. मी इचार केला , नंतर वाटा कशाला ? आत्ताच वाटा घ्यावा. हा मामा फिरला तर ? मग मामा म्हनाला, चल ठीक आहे, कमळीला आनशील तवापासून वाड्याच्या मागची नदीपर्यंतची जमीन तुझी. पाह्यजे तर लिहून देतो. भडव्यानी मग कागदावर लिहून दिलं. आणि आता फिरला लेकाचाम्हनून तर तहशीलदार कडे कंप्ल्रेटी केलि. . मी कमळीला मग समजावली. बघ रानी सारखी ऱ्हाशील. ती न्हाईच म्हनत व्हती. पन मी तिला भरीस पाडलं. तसंही तिच्याशी आता कोण लग्न करनार व्हतं. ? जिंदगीभर तिला सांभाळणार तरी कशी ? मी तिला एका रात्री वाड्यावर आनली. नंतर मात्र तिला आज तागायत पाह्यली न्हाई. ति ना कधी वाड्यावर दिसली , ना माझ्या घरी वापस आलि. माझी कमळी .... (त्याच्या डोळ्यात पाणी आलं) " डोळे पुसून तो म्हणला, " मी रोज मामांना इचारायचो, कमळी कुठं हाय ? तशी म्हनायचा कशाला फिकिर करतोस , इथे आहे ति वाईट आहे का ?. मग त्यानी मला एक दिवस वाड्यावरून हाकलून दिलं. हराम खोर साला, मारला पायजेल साल्याला. , माझी मुलगी मिळाली की काय वाटेल ते कर. मला तुजी जमीन नको अन कायबी नको. " तो मुसमुसून रडू लागला.

(क्र म शः)

🎭 Series Post

View all