Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

स्वप्नातील भयाण सत्य

Read Later
स्वप्नातील भयाण सत्य
कथेचे नाव :- स्वप्नातील भयाण सत्य
विषय :- काळ आला होता पण...
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा..
जिल्हा :- मुंबई


"अरे तुला कितीवेळा सांगितलंय मी...खाताना तरी मोबाईल बाजूला ठेवतं जा...एवढं काय असतं त्या डबड्यामध्ये कोणास ठाऊक?" सुलक्षणा ताई त्यांच्या चोवीस वर्षीय मुलावर (सौरभवर) चिडून बोलल्या.

"अग आई आजचे अपडेट्स बघतं होतो." सौरभ मोबाईल मध्येच बघतं बोलला.

"हम्म..! म्हणून काय खाणं पिणं सोडून द्यायचं का?" सुलक्षणा ताईंनी त्याच्या हातातून मोबाईल खेचून घेतला आणि तो बंद केला.

"आई!!" सौरभ आईवर थोडा चिडला.

"खा! आधी.." सुलक्षणा ताई डोळे मोठे करत म्हणालीतसा सौरभ गुपचूप खाऊ लागला, पण पटापट खात असल्यामुळे खाता खाता त्याला ठसका लागला होता.

"अरे हळू ना!" सुलक्षणा ताई त्याला पाणी देऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला

थोड्यावेळाने, त्याच खाऊन झालं तसा तो ऑफिससाठी निघाला, पण तो हेल्मेट न्यायला विसरला.

"अरे हेल्मेट तर घेऊन जा!" सुलक्षणा ताई शोकेसमध्ये ठेवलेलं त्याचं हेल्मेट हातात घेऊन दरवाजापर्यंत आल्या पण तोपर्यंत तो गेलेला होता..."आजही हा हेल्मेट न्यायला विसरला." सुलक्षणा ताई मनाशीच म्हणत आपल्या कामाला लागल्या.

******

सौरभ ऑफिससाठी घरातून निघून गेलेला आणि ट्रॅफिकमध्ये अडकला गेला. गेला अर्धा तास तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता. पुढे एक ऍक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं त्यामुळे टाईमपास म्हणून तो ब्ल्यूटूथ हेडफोन कनेक्ट करून मोबाईलमध्ये सॉंग्स ऐकत असतो..

थोड्यावेळाने, सगळं पूर्ववत होतं. तसं सौरभ पुढे जातो पण पुढच्याच सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस त्याला अडवतात. म्हणून सौरभ हेडफोन कानातून काढतो.

"काय हेल्मेट कुठेय? अरे आताच इथे एक ऍक्सिडेंट झाला तेही हेल्मेट न घातल्यामुळेच. तुम्ही हेल्मेट न घालता सुसाट गाड्या चालवता आणि मग असे ऍक्सिडेंट होतात. मग घरच्यांचा जीवाला घोर आणि स्वतःच्या जीवाला त्रास." ट्रॅफिक पोलीस वैतागत म्हणाला.

"ओ काका! डोक्याची मंडई नका करू ओ! आधीच ऑफिसला जायला उशीर झालाय. त्यात अजून उशीर करू नका नाहीतर हाफ डे लागेल माझा..काय असेल ते घेऊन मॅटर सेटल करा इथेच." सौरभ उद्धटपणे बोलला.

"हम्म! मॅटर सेटल करा म्हणे." हवालदार त्याच्याकडून पावती फाडतात आणि ह्यापुढे हेल्मेट घालूनच गाडी चालवायची ही ताकीदही त्याला देतात त्यावर सौरभ नुसतं "हो" मध्ये मान डोलावतो आणि पुन्हा हेडफोन घालून पुढे निघून जातो.

पुढच्याच सिग्नलवर एक खूप मोठा ऍक्सिडेंट होतो. एका ट्रकने, एका बाईकला उडवलेल असतं आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. तो मोठया आवाजात हेडफोनवर गाणी ऐकत असतो. त्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकने एवढे हॉर्न देऊन सुद्धा त्याला आवाज जात नाही. लगेचच आजूबाजूला लोकं गोळा होतात..एक दोन जण त्याला उचलून गाडीत ठेवतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात.

*****

हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टर त्याला आय.सी.यू मध्ये शिफ्ट करतात. तो एका बाजूला पडला असल्याने डाव्या हाताला, पायाला आणि डोक्याला जब्बर मार बसला होता आणि रक्तही खूप गेलं होतं, त्यामुळे रक्तही चढवाव लागणार होतं. एका माणसाने सौरभ फोनवरून त्याच्या आईला सुलक्षणा ताईंना फोन केला त्या लगेचच तिकडे आल्या. आपल्या मुलाची अवस्था बघून त्यांना रडू कोसळलं.

थोड्यावेळाने, डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात, त्याच्या डोक्याला जब्बर मार लागला असल्याने चोवीस तासांच्या आत जर तो शुद्धीवर नाही आला तर त्याच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे हे ऐकुन सुलक्षणा ताई तिथल्या बाकड्यावर हताश बसतात. त्यांना काहीच सुचतं नसतं. त्या तश्याच हॉस्पिटलमधल्या गणपतीच्या मूर्तीजवळ गेल्याा आणि प्रार्थना करू लागल्या..

वेळ असाच जात होता. सौरभला अंडर ऑब्जर्वेशन ठेवलं होतं. चोवीस व्ह्यायला एक तास बाकी होता, एव्हाना सौरभचे फ्रेंड्स आणि काही नातेवाईकही आलेले होते. सगळे सुलक्षणा ताईंना सांभाळत होते

चोवीस व्हायला एक मिनिटं बाकी होता. सगळे आयसीयूच्या बाहेर उभे राहून रूमच्या दिशेने नजरा लावून होते.

थोड्यावेळाने, डॉक्टर बाहेर येतात, तसे सगळ्यांचे कान आणि डोळे डॉक्टर काय बोलतायत ह्यावर स्थिरावलेले असतात.

"आय एम सॉरी..ही ईज नो मोअर..आम्ही नाही वाचवू शकलो त्याला..डोक्याला जब्बर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला जर त्याने हेल्मेट घातलं असतं तर कदाचित..." डॉक्टर जसे हे बोलले तसं  सुलक्षणा ताईंनी एकच हंबरडा फोडला. डॉक्टर त्यांच्या नातेवाईकांना "ह्यांना सावरा" असं म्हणत निघून गेले.

****

सौरभला घरी आणलं गेलं. सुलक्षणा ताईंना अश्रू अनावर होत होते. आपल्या लेकाला अश्या अवस्थेत बघायला कोणत्या आईला आवडल असतं. त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, पण आता काहीच उपयोग नसतो.

"आज जरा का तू हेल्मेट घातलं असतंस तर असं घडलंच नसतं रे बाळा तरी तुला सांगत होते हेल्मेट घाल, पण तू हेल्मेट न घालता गेलास." सुलक्षणा ताई रडत बोलत होत्या.

"आता ह्यांच्याकडे कोण बघणार? एकुलता एक मुलगा होता. तोही गेला!" एक नातेवाईक कुजबुजले.

थोड्यावेळाने, सगळी तयारी होते तसं सौरभला घेऊन जातात...त्याला नेताना पाहून सुलक्षणा ताईंना पुन्हा एकदा हंबरडा फोडतात. त्यांना हे सगळं सहनच होत नसतं. त्याही हट्टाने लोकांसोबत जातात. सगळे अंतविधी होतात आणि त्याची चिता पेटू लागते. ते पाहुन सुलक्षणा ताई जोरजोराने ओरडत रडू लागतात..

"सौरभ..सौरभ...सौरभ!"

"आई...!!" सौरभ दचकून झोपेतून जागा होतो. आजूबाजूला बघतो तर तो त्याच्या बेडवर असतो.

"काय रे काय झालं? एवढ्या जोरात का ओरडलास...?" सौरभच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन सुलक्षणा ताई त्याच्या रूममध्ये धावत गेल्या आणि त्याला विचारलं.

"नाही! काही नाही.." सौरभ म्हणाला

"काय रे! बरं वाटतं नाहिए का?" सुलक्षणा ताई स्वतःच्या पदराने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत सौरभला विचारलं तशी तो त्यांना मिठी मारतो.

"अरे..! अशी मिठी आता मला नाही मारायची अशी मिठी मारणारी आता घेऊन ये बाबा लवकर" सुलक्षणा ताई हसत त्याला चिडवत म्हणाल्या.

"काय ग आई..!" सौरभ जरा चिडत तर जरा लाजत म्हणाला.

"बरं तू ये फ्रेश होऊन मी तोपर्यंत नाश्ता बनवते." सुलक्षणा ताई बोलून रूममधून निघून गेल्या.

तो पुन्हा एकदा विचारात जातो. त्याला स्वप्न पडलेलं खरंतर आठवतं नसतं, पण स्वप्न खूप भयंकर होतं हे मात्र त्याला जाणवतं असतं. तसाच तो फ्रेश व्ह्यायला जातो

****

आज नाश्ता करतानाही शांतपणे नाश्ता करत होता. मोबाईल हातात न घेता.

"सौरभ काय रे आज सूर्य कुठे उगवला..? आज चक्क खाताना मोबाईल हातात नाही." सुलक्षणा ताई त्याला चिडवत म्हणाल्या.

"अग! तूच नेहमी म्हणतेस ना..खाताना मोबाईल हातात घेऊ नये म्हणून म्हटलं जरा आईचं ऐकाव." सौरभही त्यांच्या तोडीस तोड उत्तर देतो.

"शहाण्या! असंच माझं इतरही ऐकत जा." सुलक्षणा ताई त्याच्या कान पकडुन म्हणाल्या.

"अग हो आई!...पण माझा कान तर सोड." सौरभ कळवळत म्हणतो तसं त्या  सैरभचा कान सोडतात.

थोड्यावेळाने, त्याचं खाऊन होत तसा तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो. नेहमीप्रमाणे हेल्मेट विसरेल म्हणून सुलक्षणा काकू शोकेसमधून हेल्मेट काढायला जातात पण तिथे हेल्मेट नसतं त्या तश्याच बाहेर येऊन बघतात तर सौरभने हेल्मेट घालून स्कुटी स्टार्ट केलेली असते आईला बाय करण्यासाठी थांबलेला असतो. तो आईला \"बाय\" करतो आणि निघून जातो. तश्या त्याही गालात गोड हसत आपल्या कामाला निघून जातात.

काही प्रसंग किंवा स्वप्न आपल्याला आपल्या चुकांची किंवा आपण आपल्या माणसांसाठी किती महत्वाचे आहोत ह्याची जाणीव करून देतात.

समाप्त_

©®_✍नम्रता जांभवडेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

नम्रता दर्शना जनार्दन जांभवडेकर "जननी"

हातात येता लेखणी..✍मन होते व्यक्त अन् उडू लागते फुलपाखरावानी!

//