स्वप्नातलं भविष्य (भाग ५)

खडपा गेल्यावर रेखाला मामांचा खूपच राग आला......

खडपा गेल्यावर रेखाला मामांचा खूपच राग आला. मामा मात्र खुषीत दिसले. संध्याकाळचे सहा वाजले.
दोन्ही खोल्यांमध्ये आणि स्वैपाकघरात कंदिल लावले. कंदिलाच्या मंद प्रकाशात मामा कुणाची तरी वाट पाहत असल्याचे तिला दिसले. नक्कीच
ते गंगीची वाट पाहात असणार. हे नक्की काय आहे ? मामा गंगीची वाट का पाहतायत ? तिचा काही वेळ तरी असाच गेला. मग एकदम तिला
आठवलं दोन दिवसांपूर्वी मामांचे डोळे विचित्र लालसेने लकाकत होते.त्यावेळी आपल्याकडे ते रोखून पाहात होते. आत्या म्हणालीच होती ,
मामा बुभुक्षितासारखा बघतो. खरं की काय ? आपण इथे कुठे अडकलोय ? बाहेर तरी कोणाकडे आपल्याला थारा आहे ? आपण अविनाश
असताना अगदीच पुढचा विचार कसा केला नाही.? पण आपल्याला तरी काय माहीत अविनाश असा सुरुवातीलाच आपली साथ सोडून जाईल
म्हणून.?


मामा वाट पाहात होते. पण कुणीही आलं नाही . गंगी की कोण तीही आली नाही की खडपाही
फिरकला नाही. मग आज आपली पाळी की काय ? ती कल्पनेनेच शहारली. मामांच्या तोंडावर निराशा आली. रात्रीची जेवणं कशीतरी
उरकली. मामाचा जेवणातला उत्साह पार गेला होता. नाहीतर जेवताना ते सतत बडबड करीत. ते जेवढे गप्प राहिले तेवढी रेखाची
भीती वाढू लागली. झोपताना तिने हळूच खोलीच्या दाराला अडसर लावला. नैनाला आज लवकर झोप येत नव्हती. तिला गोष्ट ऐकायची
होती. कशितरी दामटून तिने तिला झोपवली. साडेअकराच्या सुमारास ती गाढ झोपली. मग मात्र तिला डुलकी यायला लागली. तिला झोप
लागून जेमतेम तास झाला असेल, तक्तपोशीतून पाय घाशीत चालल्याचा आवाज मोठ्याने येऊ लागला. तो बराच वेळ येत राहिला. तिची
झोप मोडली . आज आवाजाबरोवर बोलण्याचाही आवाज येत होता. कोण होतं बरं वर ?. .... नक्कीच दोघे असणार. तिने आवाज न करता
खोलीचा अडसर दुर केला. ती मामांच्या बैठकीच्या खोलीत हळूच डोकावली. पण तिथे मामानव्हते. कुठे गेले असतील तिला कळेना. मग ती
मागे आली. तिचे लक्ष सहज बंद खोल्यांकडे गेलं त्यांची कुलपं तशीच होती. पण
कुलुप नसलेली खोली मात्र अर्धवट उघडी होती. आता मात्र तिची छाती धडधडू
लागली. या क्षणी इथून नैनाला घेऊन पळून जावं अस वाटू लागलं. पण काय करणार ?
त्यापेक्षा हे काय रहस्य आहे ते तरी
पाहावं मग काही दिवसांनी इथून निघून जावं. ती दबक्या पावलांनी अर्धवट उघड्या खोलीकडे पोचली. तिने आत पाहिले. काहीच हालचाल
नव्हती. म्हणून ती आत शिरली. भिंतीतल्या जिन्यावरून कंदिलाचा पिवळत प्रकाश पाझरत होता. जिन्याच्या पायथ्याशी काळोखात पूर्ण
बुडलेली ती उभी होती. धीर करून ती दोन पायऱ्या चढून ती वर उभी राहिली. आता तिला बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. मामा म्हणत होते.
"सदा, जेव बाळा. जेव. बघ रेखानी छान जेवण केलय बघ. "
.... हा सदा कोण ??? आणखी एक पायरी वर
चढून तिने पाहिले.
तिला पाठमोरे बसलेले दिसले. मध्ये ठेवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात तिला समोर वेड्या वाकड्या अवस्थेत बसलेला एक माणूस दिसला.
माणूस कसला जिवंत प्रेतच ते . डोक्यावरचे केस विलक्षण वाढलेले.खप्पड चेहेऱ्यावर कवटीच्या खोबणीत खोल बसलेले मोठे पण निस्तेज डोळे ,
टोकदार नाक , वाढलेली दाढी आणि दात पुढे असलेला करपट चेहरा.
विक्षिप्तपणे " आ " करून मामांच्या हातातला घास
घेण्यासाठी पुढे
वाकला होता. त्याच्या ओठाच्या कोपऱ्यातून भरमसाठ लाळ गळत होती. मामांनी त्याला घास भरवला. आणि मग तो रडणाऱ्या आवाजात हसू
लागला. शी... हे भूत आहेकी काय ? आणि मामा त्याला का जेऊ घालत होते ?

दोन चार घास खाल्ल्यावर ते सदा नावाच भूत म्हणालं, " प्रभा, मला बाहेर काढ ना.... मला खाली ने...

कमळी ?... ‍जेवली ? ... कमळी जेवली ?. मारू नको ... मारू नको तिला.... प्रभा मला बाहेर काढ ना .... मला बाहेर काढ ना. "
ही कमळी कोण ? काय माहित्त. ... तो वेडेवाकडे हात वारे करीत ओरडत उभा राहिला. त्याच्या अंगात जुन्या पद्धतीचा अर्ध्या बाह्यांचा सदरा
आणि खाकी हाफ पँट होती. ती चांगलीच घाबरली. आणि तिचा खालच्या पायरीवरचा पाय फटकन सटकला. ती एक पायरी आवाज करीत खाली आली. आवाजासरशी मामा गर्रकन वळून जिन्याकडे धावले. रेखा पण पटकन उडी मारून कशी तरी आपल्या अंथरूणा पाशी
पोचली . डोक्यावर पांघरूण घेऊन ती पडून राहिली. कोण आहे ? कोण आहे ? म्हणत मामा खाली आले. पण त्यांना कोणीही दिसले नाही.
त्यांनी रेखाच्या खोलीत पाहीले पण ती झोपलेली दिसली. मांजर असावं असा समज करून ते परत वर गेले‌. सदा अर्ध्या जिन्यात उभा होता.
त्याला दामटून त्यांनी खाटेला बांधला. त्याचं भेसूर आवाजातलं ओरडणं ऐकून रेखाच्या अंगावर काटा आला. मामा कंदिल घेऊन खाली आले
आणि सदाची ताटवाटी त्यांनी स्वैपाकघरातल्या मोरीत नेऊन ठेवली. " साल्याला रोज खायला घालतो म्हणून मस्ती आलेली आहे झालं. खाणं
बंद केलं पाहिजे " असं पुटपुटत ते दुसऱ्या दाराने दिवाणखान्यात शिरले व थोड्याच वेळात घोरू लागले. .... ती विचार करीत होती. हा सदा
मामांचा भाऊ तर नाही ? वेडा ? बाप रे. .. ही कमळी कोण ? सदाच्या चेहेरा तिच्या डोळ्यासमोरून जाईना. त्याचे ते निस्तेज डोळे. जणू
काही बरेच दिवसांनंतर कबरीतून काढलेले प्रेतच. शून्यात टक लावून पाहणारे दिशाहीन डोळे काही केल्या तिच्या डोक्यातून जाईनात. खूप
लांबवर त्याला काहीतरी दिसत असावे. आता तिला " त्या " खोलीत जाण्याची भीती वाटू लागली.
गावात गावदेवीची जत्रा भरली. मामा सकाळीच तयार झाले. जाताना त्यांनी नैनासाठी शंभर रुपये दिले
आणि तिला जत्रेला घेऊन जायला सांगितले. ते मात्र एकटेच निघून गेले. रेखाला जत्रेला जाण्याचं काहीच कौतुक नव्हतं. तिने लहान पणी
खूप वेळा जत्रा पाहिली होती. तिला पाहायचं होतं की वाड्याच्या " त्या "खोलीतून बाहेर जाणारा दरवाजा उघडा का होता . आणि तो कुठे जात होता. वाड्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते धोक्याचं नव्हतं का ?. पण मामांना सुरक्षिततेची गरज भासत नसावी. किंवा त्यांचे काही इतर
उद्योग अव्याहत चालू राहावे म्हणून तर तो उघडा ठेवला नव्हता ना ? मागे कब्रस्तान होतं. मामा नक्की काय करित असतील ? तिला वरच्या
खोलीतल्या सदाबरोबर मामांचीही भीती वाटू लागली. तिला सारखं इथून पळून जावस वाटत होतं. पण जायचं कुठे. तिची कुतरओढ ती
सांगणार तरी कोणाला ? खरच स्वतःच घर आणि माणूस असण् किती गरजेचं आहे तिला जाणवलं. तिला अविनाशची आठवण झाली. तिच्या
जवळ साधा त्याचा फोटोही नव्हता . नेसत्या वस्त्रानिशी तिला पहिली जागा सोडावी लागली होती. तिच्या तोंडातून अचानक हुंदका फुटला.
आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला इतकं असुरक्षित कधीच वाटलं नव्हतं. आधी आई, नंतर आत्या , आणि नंतर अविनाश अशा आधारानिच तर
ती जगत आली होती. तिला आत्याची तीव्रतेने आठवण झाली.ती म्हणाली होती दुसऱ्याच्या आधारानी असं किती दिवस तू जगणार . तिच्या मनाची अवस्था कोंडल्यासारखी झाली होती. बाजूलाच लिहित बसलेल्या नैनाने तिला एकदम विचारलं, " आपण जायचं ना जत्रेला ? "
तिला हालवून ती पुन्हा म्हणाली, " चल ना , जाऊ या ना आपण. " ती भानावर आली.

घाईघाईने तिने कपडे बदलले. आणि स्वैपाकघराची खिडकी लावायला म्हणून ती आत गेली.

खिडकी लावता लावता . ती परत भूतकाळात शिरली. तिला भास होऊ लागला, अविनाश आपल्या मागे उभा आहे आणि तो आपल्या
डोक्यावरून हात फिरवतोय. परंतु ती लवकरच भानावर आली. तिला खोलीत कोणीतरी असल्याची जाणिव झाली. खिडकीवरचा हात तसाच
ठेऊन तिने मान मागे वळवली. काही अंतरावर(म्हणजे स्वैपाकघराच्या दारशी) सदा उभा होता. तोंडाच्या कोपऱ्यातून लाळ गळणारा, शून्यात
पाहणारा, बोलण्याचा ताळमेळ डोळ्यांच्या हालचालीशी नसलेला, गलिच्छ सदा उभा होता. मधूनच तो गळणारी लाळ शर्टाच्या बाहीला
पुसत होता. वर्च्या ओठाची कमान झाल्याने आतल्या काळवंडलेल्या हिरड्या आणि वेडेवाकडे पुढे आलेले दात विचकीत तो तिच्याकडे पाहात
होता. अंगात तोच सदरा आणि तीच खाकी पँट होती. ती चरकली. आणि ओरडली, " ए, तू दूर हो. , पुढे येऊ नकोस. ... बघ मी मारीन . "
नकळत तिचा हात खिडकीत ठेवलेल्या जड स्टीलच्या पातेल्यावर पडला. सदा हासत म्हणाला, " ए, तू कमळी ना ? तू ... तू प्रभाशी
करतेस ते ... ते माझ्याशी कर ना. ... हिः ही : हीः.... " ती घाबरून दोन पावलं मागे सरकली. त्याच्या हालचालींकडे रोखून पाहात
आपल्याला जायला जागा मिळते का ते शोधीत होती. तो सावकाश स्वतःचा तोल सांभाळीत एकेक पाऊल पुढे येत होता. तिची पातेल्यावरची
पकड घट्ट झाली. मी याला हे फेकून मारीन. ती स्वतःशीच पुटपुटली. एक दो न पावलं ती मागे सरकली. पण खिडकी खालची भिंत तिच्या पायाला लागली. आता आणखी मागे सरकणं कठीण होतं. तो पुढे येतच होता. दरवाजा त्याच्या मागेच होता. तिला एकदम लंगडीच्या खेळाची
आठवण झाली. पी. टी. च्या बाईंनी सांगितलं ते आठवलं. तुम्हाला जर दुसऱ्या खेळाडूला चकवायचं असेल तर डावीकडे जातोय असं दाखवून
पटकन उजवीकडे वळायचं. म्हणजे धरणारा खेळाडू गोंधळतो. आणि आपल्याला सहज पळता येतं. पण इथला खेळाडूकाय ताकदीचा होता
याचा तिला अंदाज नव्हता. तरीही तिने पातेलं हातात धरून डावीकडे वळल्याचे दाखवले. सदा पण तिकडे भेलकंडला आनी तोल सावरताना
धडपडला. तेवढ्यात उजवी बाजू मोकळी झाल्याचे पाहून ती खारीच्या वेगाने दरवाजातून पळाली. नैनाच्या हातातली पाटी फेकून देऊन
तिला तयार न करताच ती मुख्य दरवाजातून गेटजवळ आली. आणि एकदाची रस्त्यावर आली. बापरे, काय दम लागला होता तिला. दोन
चार मैल धावल्यागत तिची अवस्था झाली होती. छाती चांगलीच धपापत होती. ऊन अजून चढलं नव्हतं. सुटकेचा निश्वास सोडून ती जत्रेच्या
मैदानाच्या दिशेने चालू लागली.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all