स्वप्न की सत्य ? ( भाग 5, अंतिम भाग )

About Love


स्वप्न की सत्य ? ( भाग 5 )

" सुजय,तू मला कधी विसरणार नाही ना ? माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे..इतके की,मी हे जग सोडून गेले तरी ते प्रेम कधी कमी होणार नाही...कधीच नाही. मी तुझीच आहे...आणि मी तुझीच राहणार नेहमीचं..."

मीनल सुजयला रडत रडत सांगत होती.

" मीनल, हे काय बोलते आहेस आणि तू अशी रडत का आहेस ? माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मी तुला कधीही विसरणार नाही , कारण ...तू नेहमी माझ्या जवळच तर राहणार आहेस .."

असे सुजय मीनलला म्हणत होता पण त्याचे हे शब्द ऐकायला मीनल त्याच्या जवळ नव्हती. तो आवाज देत होता आणि ती दूरदूर जात होती.

कसल्यातरी आवाजाने सुजयला जाग आली.आणि पाहतो तर काय ...तो एकटाच बडबडत असतो ,मीनल नसतेच आजूबाजूला. म्हणजे आपण आता जे पाहिले ते स्वप्न होते तर..किती घाबरलो मी. स्वप्न होते तरी मीनल माझ्यापासून दूर चालली आहे , हे पाहून किती त्रास होत होता मला.

आणि मीनल येथे कशी येईल ,ती तर गावाला जवळच्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नाला गेली आहे ना!

पाणी पिण्यासाठी तो बेडरूममधून किचनमध्ये जाणारच होता, तेवढ्यात त्याला हॉलमध्ये आई,बाबा व सेजल दिसले. आई व सेजल तर खूप रडत होत्या आणि बाबांच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. काय झाले ते सुजयला सांगण्याचे धाडस त्यांना होत नव्हते.


जवळच्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी मीनल व तिची फॅमिली गावी गेलेली होती.लग्न छान पार पडले होते. एक दोन दिवसांत ते सर्व मुंबईला परतणार होते. मीनलचे सुजयशी तसे रोज बोलणेही व्हायचे.इकडे आल्यावर ती त्याला सरप्राईज दाखवणार होती. त्या दिवशी तिने नेहमीप्रमाणे खूप छान गप्पा मारल्या होत्या. पण ती मुंबईला येण्यासाठी निघाली आहे, हे नव्हते सांगितले. ती ते अजून एक सरप्राईज देणार होती.
तिच्या वडिलांना मुंबईत महत्त्वाचे काम आल्याने ते एकटेच मुंबईला येणार होते.पण मीनलही त्यांच्या बरोबर येण्यास निघाली होती. तिला सुजयला भेटण्याची ओढ लागली होती ना..
आई व भाऊ एक दोन दिवसांनी येणार होते.

मीनलच्या वडिलांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने गाडीला अपघात झाला होता. मीनल व तिचे वडील दोघेही जागीच गेले होते.सुजयच्या वडिलांना गावाकडून मीनलच्या नातेवाईकांचा तसा फोन येतो.

मीनलचे व तिच्या वडिलांचे असे अचानक जाणे ,ही दोन्ही कुटुंबासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट होती. त्यातून सावरणे खूप अवघड होणार होते.

सेजल ने आपली जीवलग मैत्रीण व आपली होणारी वहिनी गमावली होती.
सुजय तर काही बोलतही नव्हता व रडतही नव्हता. त्याच्या साठी हा खूप मोठा आघात होता. त्याला साध्या व सरळ वाटणाऱ्या आपल्या प्रेमकहाणीचा इतका भयंकर शेवट होणार होता. हे माहित नव्हते.
त्यांच्या प्रेमकहाणीत काही ट्विस्ट नव्हते, व्हिलन नव्हता. पण नियतीच त्यांच्या प्रेमकहाणीचा व्हिलन ठरली होती.

जेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्व पोहोचले, तेव्हा मीनलच्या देहाकडे पाहून वाटतच नव्हते की, ती आपल्याला सोडून गेली आहे असे.
सुजय तिला भेटण्यासाठी तिच्याजवळ गेला आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन रडू लागला. तेव्हा तिच्या हातावर त्याच्या नावाचे टॅटू काढलेले दिसले. आणि हे चं सरप्राईज ती आल्यावर दाखवणार होती. पण हे सरप्राईज ती दाखवण्याच्या अगोदरच नियतीने सुजयला खूप मोठे सरप्राईज दिले होते.
सुजयच्या नावाचे मंगळसुत्र न घालता त्याच्या नावाचे टॅटू काढून ती देवाघरी गेली होती आणि जाता जाता रात्री सुजयच्या स्वप्नात येऊन त्याला भेटून गेली होती.

सुजयला तर स्वप्न कोणते व सत्य कोणते हे चं कळत नव्हते.

आपण मीनलसोबत जे क्षण जगलो ते सत्य होते की आयुष्यातील एक सुखद स्वप्न !
आणि रात्री जे पाहिले ते खरचं एक स्वप्न होते की आयुष्यातले यापुढचे भयानक सत्य!


दोन वर्षांनी सेजलचे लग्न झाले होते. ती संसारात रूळायचा प्रयत्न करत होती. सुजय तर लग्न करायचेच नाही असे म्हणतं होता. पण मीनलची आईने व भावाने त्याला समजावून सांगितले. त्याचे आईवडिलही त्याला लग्न करण्याचे सांगतात, तेव्हा तो आईवडिलांनी पाहिलेल्या मुलीशी लग्न करतो.

नियती मुळे अपूर्ण राहिलेली,
मीनल व सुजयची प्रेमकहाणी ही \"एक अधुरी प्रेमकहाणी\" म्हणून लिहीली गेली.


समाप्त


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all