Login

स्वप्न की सत्य ? ( भाग 4 )

About Love


सत्य की स्वप्न ( भाग 4 )

मीनलला अगोदरपासूनच मुलांशी बोलायला आवडत नव्हते. त्यामुळे तिची मुलांबरोबर मैत्री कधी झालीच नव्हती. प्रेम वगैरे या गोष्टींपासून तर ती खूप दूर होती. आपण व आपले जीवन अशा शांत स्वभावाच्या मीनलच्या मनात सुजयच्या पहिल्या भेटीपासून चलबिचल सुरू झालेली होती.सेजलच्या मैत्रीने तर ती सुखावली होतीच पण सुजयच्या अस्तित्वाने ही तिला आनंद व्हायचा,त्याला पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी ती उत्सुक असायची. सुजयप्रमाणे तीही त्याच्याशी प्रत्यक्ष बोलत नव्हती पण जेव्हा सर्वांसमोर बोलायची संधी मिळायची तेव्हा ती बोलण्याचाही आनंद घ्यायची.

एकमेकांबद्दल एवढी ओढ असूनही , दोघांनी आपल्या मनातील भावनांना एकमेकांसमोर शब्दरूपात कधी व्यक्त केले नव्हते.

"दादा व मीनल , मी आज तुम्हांला येथे एकत्र का बोलावले असेल ? याची कल्पना तुम्हां दोघांना आली असेलचं.."
सुजय व मीनलला कॉफीच्या निमित्ताने त्यांना कॉफीशॉप बोलवून सेजल विचारत होती.

सुजय व मीनल शांत चेहऱ्याने एकमेकांकडे व सेजलकडे पाहत होते.

"मला माहित आहे की,तुमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही ते कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवले जाणार नाही.
जेव्हा सुजयला गाडीवरून पडल्यामुळे थोडीशी दुखापत झाली होती,तेव्हा मीनलला खूप टेंशन आले होते,ती सारखी चिंतेत असायची. हे मला जाणवत होते.आणि मीनलचा ताप उतरत नव्हता म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते,तेव्हा दादा तुझा उतरलेला चेहरा मी पाहिला होता.

दादा आसपास असताना मीनल , तू किती आनंदी, प्रसन्न असते व दादा,तू मीनलला भेटण्यासाठी किती उत्सुक असतो,हे अनेकदा मी पाहिले आहे .
तुम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम करीत आहात मग व्यक्त करा ना ..तुमच्या मनातल्या भावना... तुमचे पुढचे काम मी सोपे करते.मी आईबाबांना व मावशी काकांना सांगते. सेजलच्या या सुखदायी सरप्राईज नंतर सुजय व मीनल आपल्या प्रेमाच्या भावनांना शब्दरूप देवून एकमेकांच्या प्रेमाचा स्विकार करतात.

सेजलने जेव्हा आपल्या आईबाबांना व मीनलच्या आईबाबांना दादा व मीनलच्या भावनांविषयी सांगितले, तेव्हा त्या सर्वांनाही आनंदच होतो.
मीनलसारखी संस्कारी सून भेटल्यामुळे सुजयचे आईबाबा आनंदी होते आणि सुजयसारखा कर्तृत्ववान जावई भेटल्याने मीनलचे आईबाबा खूश होते.

दोन्ही घरातून सुजय व मीनलच्या प्रेमाच्या गाडीला ग्रीन सिग्नल मिळाल्याने गाडी प्रेमाच्या गावाचा आनंद घेत होती.

"अरे यार मीनल ,आपले प्रेम किती साधे ,सरळ आहे. आपल्या स्टोरीत ना प्रेमाचा त्रिकोण ना चौकोन. ना तुझ्या घरातून विरोध ना माझ्या घरातून विरोध. ना काही सस्पेन्स ना काही थ्रिल.
प्रेमात असे काही असले तरचं प्रेमात मजा येते ना.
मस्त असं पळून जावं ,लग्न कराव ..असं मला वाटायचं ."

सुजय मीनलला असे गंमतीने म्हणायचा.
त्याच्या या बोलण्यावर रागही यायचा व हसू ही यायचे.

"नको रे असं बोलू..लोक आपले प्रेम मिळविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी काय काय करतात.. आणि आपल्याला आपले प्रेम विना कष्ट मिळाले आहे,यातचं आपले भाग्य समजं. आपण खरचं भाग्यवान आहोत.त्यामुळे आपल्या प्रेमात कसलीही अडचण नाही. मी देवाला प्रार्थना करते.. आमची ही प्रेमकहाणी विना अडथळा पूर्ण होऊ दे."

मीनल सुजयला म्हणायची.

मीनल व सुजय आपल्या प्रेमाचा आनंद घेतच होते पण आपले करियरही घडवत होते.
सुजय इंजिनिअरिंग नंतर MBA करत होता.व एका कंपनीत नोकरीही करत होता. मीनल व सेजल दोघीही MCA करत होत्या.

सुजयचे MBA पूर्ण झाल्यानंतर, सुजयच्या व मीनलच्या लग्नाचे घरातले ठरवणार होते.
सेजलसाठीही वरसंशोधन सुरू केले होते.
मीनल आपली वहिनी म्हणून आपल्या घरात कायमची येईल या विचाराने सेजल खूप आनंदात होती. मीनलबरोबर जास्त दिवस राहता यावे म्हणून ती तिचे लग्न करण्यास नकार देत होती.