स्वप्न की सत्य ? ( भाग 2 )

About Love


स्वप्न की सत्य ? ( भाग 2 )


सुनिलराव कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि सरलाताई शाळेत शिक्षिका होत्या. मुलगा सुजय इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता व मुलगी सेजल BCA च्या पहिल्या वर्षाला होती.
असे हे हसरं- खेळतं चौकोनी कुटुंब !
आईवडिलांचे आपल्या दोन्ही मुलांवर जीवापाड प्रेम होते.
मुलांच्या सुखासाठी दोघेही मेहनत घेत होते. घरात शिस्त, संस्कार तर होतेच पण आईवडिलांची मुलांबरोबर मैत्रीही होती. आईवडील म्हणून त्यांचा मुलांना आदरयुक्त धाक होता पण मनातले सुखदुःख सांगण्याचे मैत्रीचे नातेही होते.

सेजलने 12 वी. नंतर BCA ला ऍडमिशन घेतले होते. 12 वी.पर्यंतच्या मैत्रीणींनी पुढे वेगवेगळे क्षेत्र निवडले होते.त्यामुळे सेजल ला कॉलेजमध्ये सर्व नवीन मैत्रीणी भेटणार होत्या. एक दोन जणींशी चांगले जमायला लागले होते. त्यात मीनलशी जरा जास्तच जमायला लागले होते व त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी झाल्या होत्या.

मीनलचे वडील बँकेत नोकरीला होते व आई गृहीणी होती. मीनलला छोटा भाऊ होता,तो 11 वी. ला होता.
मीनलच्या वडिलांची बदली मुंबईला झाल्याने, ते सर्व मुंबईला राहयला आले होते.मीनलसाठी कॉलेज,मैत्रीणी, व शहर हे सर्व नवे होते. पण सेजलशी मैत्री झाल्यावर,आपलं कोणीतरी भेटल्यासारखं तिला वाटत होतं.तिने घरात सेजलबद्दल,तिच्या कुटुंबाबद्दल, आपल्या मैत्रींबद्दल सर्व काही सांगितले होते. तिने सेजलला घरी बोलवून आईवडिलांशी ओळखही करून दिली होती.
सेजलचे व तिचे घर जास्त दूर नव्हते. त्यामुळे त्या एकमेकींकडे जाऊ-येऊ शकत होत्या.

सेजलने तिला आपल्या घरी सर्वांशी ओळख करून देण्यासाठी बोलावलेच होते आणि तिला काही शॉपिंग करायची होती. तिला इकडचे काही माहित नव्हते त्यामुळे सेजलला बरोबर घेऊन जाणार होती. यासाठी ती सेजलच्या घरी पहिल्यांदा आली होती.
सेजलने सांगितलेल्या पत्त्यानुसार ती बरोबर आली होती,बेल वाजवून लवकर दरवाजा उघडला नाही आणि दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तिला पाहताच तिची ह्रदयाची धडधड वाढली होती. काय बोलावे? या विचारातच तिने घाबरत घाबरत त्या व्यक्तीला "सेजल इथेच राहते ना?"
हा प्रश्न विचारला.
आपण मुलांबरोबर एवढे बोलत नाही. पण एवढे घाबरतही नाही. मग, या व्यक्तिला पाहून असे का झाले? या विचारात असताना ती व्यक्ती आपल्याशी काही तरी बोलते आहे,हे तिच्या लक्षात आले.
त्यांचे बोलणे सुरू असतानाच सेजलच्या आईचा आवाज आला.
आईशी बोलताना तो ही गोंधळून गेला होता व दारातच उभा राहिलेला होता. त्याच्या आईने मला आत बोलवले तरी हा आपल्याच विचारात सोफ्यावर बसलेला.
हे असे त्याचे वागणे आणि माझी ह्रदयाची वाढलेली धडधड काही वेगळेचं सांगत आहे.
या विचारात मीनल सोफ्यावर बसली होती व सेजलची आई पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली होती.

"हॅलो मीनल "
असा आवाज देत सेजल मीनलला येऊन भेटली.
आईने मीनलसाठी पाणी व नाश्ताही आणला. मीनलने फक्त पाणीच घेतले. नाश्ता नको म्हणाली.
पण सेजलच्या आईने व सेजलने खूप आग्रह केला तेव्हा थोडेसे खाऊ लागली.
तेवढ्यात सुजय मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी हॉलमध्ये आला होता,जे तो मगाशी घाईगडबडीत विसरला होता.
तो हॉलमध्ये येताच, मीनलच्या हातातील चमचा नाश्त्यासह खाली पडला. सेजल व तिची आई तिच्याकडे बघतच राहिल्या पण तिच्या या कृतीने सुजयचेही तिच्याकडे लक्ष गेले होते.


क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all