स्वप्न की सत्य ? ( भाग 1 ) ( एक अधुरी प्रेमकहाणी )

About Love


स्वप्न की सत्य ? ( भाग 1 )


"अरे, सुजय दाराची बेल वाजते आहे,दरवाजा उघड ना ."
किचनमध्ये कामात असलेली सुजयची आई सुजयला म्हणाली.
हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या व मोबाईलमध्ये गुंग असलेल्या सुजयला दाराची बेल वाजत असल्याचे लक्षात आले नव्हते, आईने आवाज दिल्यावर, सुजय \"हो उघडतो\" असे आईला सांगून दरवाजा उघडायला गेला.

दरवाजा उघडताच मोगऱ्याच्या सुगंधाने मुग्ध होऊन तो समोरच्या व्यक्तीकडे पाहतच उभा राहिला.

"सेजल इथेच राहते ना ? "
त्या व्यक्तीच्या प्रश्नाने भानावर येऊन सुजय म्हणाला,
" हो..हो..इथेच राहते .."

"मी तिची मैत्रीण मीनल , सेजल आहे का घरात ? "
तिने सुजयची नजर चुकवत विचारले.
ती बोलत असताना त्याच्या कडे पाहत नव्हती.
बोलतानाही ती घाबरल्यासारखी वाटत होती.

सुजयलाही तिच्याशी बोलताना वेगळीच फिलिंग वाटत होती. काय बोलावे? हे ही त्याला लवकर सूचत नव्हते.
मुलींशी बोलताना सुजय घाबरतो,असे नव्हते. पण तिला पाहून त्याची मनस्थिती वेगळीच झाली होती. व त्यामुळे तो पूर्णपणे गोंधळून गेला होता.

"कोण आहे रे सुजय ? " असे सुजयला विचारत त्याची आई किचनमधून हॉलमध्ये आली.

" आई, सेजलची मैत्रीण ..मीनल."
तो हे जेव्हा आईला सांगत होता,तेव्हा आईलाही त्याच्या वागण्यात, बोलण्यात काहीतरी वेगळेपण जाणवले. सुजयचे चित्त थाऱ्यावर नाही, असेच आईला वाटले.

" अरे, मग बोलव ना घरात, बाहेरचं उभं करणार का तिला ? " आई त्याला म्हणाली व "ये गं आत ." असे स्वतः ती मीनलला म्हणाली.

"नमस्कार काकू, मी मीनल ,सेजल ची मैत्रीण."
मीनल सुजयच्या आईला म्हणाली.

सुजयच्या आईने हसत तिचा नमस्कार स्विकारला व तिला म्हणाली,

"अगं, काय झाले ..ये ना आत . "

पण ती बाहेरच उभी होती.
आईच्या लक्षात आले की, सुजय दारातच उभा असल्याने तिला आत येता येत नव्हते.

" अरे, दारातच काय उभा आहे, तुझ्यामुळे ती पण बाहेरच उभी आहे ना,लक्षात नाही आले का तुझ्या ? "
आई सुजयला म्हणाली.

"अरे हो ,सॉरी हं, विसरलोचं मी ,या ना आत ..."

असे सुजय मीनलला म्हणाला, व पुन्हा सोफ्यावर बसून मोबाईल मध्ये गुंग झाला.

मीनल घरात आली आणि बसण्यासाठी जागा शोधू लागली. सोफ्यावर सुजय बसलेला होता आणि त्याची आई कुकरची शिट्टी वाजली त्यामुळे गॅस बंद करण्यासाठी किचनमध्ये गेली होती.

आई किचनमधून हॉलमध्ये आली तेव्हा, मीनल एका जागी उभी होती.
तिला उभी असलेली पाहून बोलली,

"अगं,तू उभी का? बस ना .."

सोफ्यावर सुजय बसलेला होता त्यामुळे ती बसली नव्हती.
हे ध्यानात येताच आई सुजयला म्हणाली,
" सुजय तू बेडरूममध्ये जा ."

आईच्या आवाजाने त्याने मोबाईल मधील लक्ष काढून वर पाहिले तर मीनल एका जागी उभी होती .
"सॉरी हं ,असं मीनलकडे पाहत तो बेडरूममध्ये गेला."

मीनल व सुजयची आई या दोघी सोफ्यावर बसून गप्पा मारू लागल्या.

"सेजल आंघोळीला गेली आहे,येईलच आता.
ती बोलली होती मला की, तू येणार आहे असे. "
सुजयची आई मीनलला म्हणाली.


क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all