स्वभावाला औषध नसते (भाग ३)

कहाणी एकत्र कुटुंबातील वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची.


स्वभावाला औषध नसते - अरे संसार संसार
(जलद कथा मालिका लेखन स्पर्धा)

संसाराची आर्थिक घडी बसवणे आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणे ही महत्त्वाची कामगिरी सुभाषराव करत होते. तीन भाऊ आणि त्यांची फॅमिली तसेच घरातील सर्व आर्थिक व्यवहार सुभाषराव एकटे पाहत होते.

प्रकाशराव मात्र कमावत असूनही या साऱ्यांपासून थोडे अलिप्तच होते. ते घरातील इतरांना खटकत जरी असले तरी समोर बोलायची कोणी हिम्मत करत नव्हते.

अनिताची खूपदा या गोष्टीवरून चिडचिड व्हायची. यावरून सुभाषराव आणि तिच्यात अनेकदा वादही व्हायचे. पण त्यावेळी बोलून काहीही उपयोग नाही, हे त्यांना ठावूक होतेच. कारण अनिताच्या मनात काय चालले आहे ते चांगलेच ओळखून होते सुभाषराव. वेगळा संसार थाटण्याचे तिचे स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झाले नव्हते.

सुभाषराव घराचा कणा होते. आता जर वेगळे झालो तर राहुल आणि रोहितच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजा. त्यात त्यांचा मोठा भाऊ म्हणजे राहुलचे वडील मुलांच्या शिक्षणाला दुय्यम मानणारे. मुले शिकली काय आणि नाही शिकली काय, त्यांना काहीही फरक पडत नव्हता. त्यामुळेच ताराला मात्र मुलांच्या भविष्याची काळजी लागून राहायची.

दोन्ही मुले अभ्यासात हुशार होती. त्यामुळे सुभाषरावांनाही त्यांचा हेवा वाटायचा. ते जमेल तसे मुलांच्या अपेक्षा पूर्ण करत होते. अर्थातच त्यांचा पगारही जेमतेमच होता. त्यात त्याला अनेक वाटा. त्यामुळे म्हणावा तसा पैसा हातात टिकत नव्हता. असे असतानाही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत.

या सगळ्यांवरुन मात्र घरातील बायकांमध्ये मतभेद होत होते. जगाला दिसत नसले तरी आतून मात्र घराच्या भिंती पोखरल्या गेल्या होत्या. त्यात सगळ्यात जास्त ताराला ऐकून घ्यावे लागत होते.

तिच्या शांत स्वभावाचा आधी सासू आणि आता लहान जावा फायदा घेत होत्या. घरातील मोलकरणीसारखी तिची अवस्था झाली होती. स्वयंपाक सोडून बाकी सगळी कामे ती करायची. बाकीच्या जावा सणावाराला माहेरी गेल्या की सर्व कुटुंबाची जबाबदारी मात्र तारावर एकटीवर असायची.

हळूहळू आता सगळेच जण तिला गृहीत धरू लागले. घरात प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत होता. पण ताराला मात्र स्वतःची अशी मते नव्हतीच.

घरात कोणीही उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे. एवढेच तिचे काम झाले होते. तिला मात्र होणारा त्रास सहनही व्हायचा नाही आणि सांगताही यायचा नाही. फक्त मुलांसाठी ती सारे सहन करत होती. तिला फक्त आपल्या मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे एवढीच अपेक्षा होती. तोपर्यंत तरी या घराचे तुकडे होवू नयेत. अशी तिला मनापासून वाटायचे.

पाहता पाहता राहुल बारावीला गेला. दहावीला चांगले गुण मिळवल्यानंतर आता बारावीला देखील सर्वांच्या अपेक्षा त्याने वाढविल्या होत्या. आणि यावेळीही तो सर्वांच्या अपेक्षांना खरा उतरला. ह्यावेळी बोर्डात आला होता तो. तारा सहन करत असलेल्या त्रासाचे तिला असे हे गोड फळ मिळाले.

खडतर परिस्थितीतही शिक्षण घेवून आज त्याने हे घवघवीत यश मिळवले. त्यामुळे सुभाषरावांच्या कष्टाचे मात्र चीज झाले होते.

पुढे मेडिकलला जाण्याची राहुलची खूप इच्छा होती. पण घरची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ते शक्य नव्हतेच मुळी. त्याची हुशारी पाहून मग त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी सुभाषराव मात्र झटत होते. खूप चौकशी केल्यानंतर राहुलला ॲग्रीच्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविण्यात आले. नशिबाने सरकारी कॉलेजात त्याचा नंबर लागला नि कॉलेजच्या फीची चिंता मात्र मिटली.

त्यावेळी परिस्थिती अशी होती की बाहेर राहायचे म्हटले तरी खर्च हा होतोच. पण राहुलला मात्र परिस्थितीची जाणीव होती. त्याने त्याच्या गरजा मात्र मर्यादित ठेवल्या. घरी कोणत्याही गोष्टीसाठी कधी हट्ट केला नाही. फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कारण रोहितचेही शिक्षण सुरू होते. त्याचाही खर्च वाढला होता. त्यामुळे बारीकसारीक गोष्टींचा तो खूप विचार करु लागला होता.

जेव्हा कधी तो घरी यायचा तेव्हा ताराला मात्र एक गोष्ट हमखास बोलायचा, "आई तू काळजी करू नकोस, अजून काही दिवस हा त्रास सहन कर. तुझेही दिवस येणार बघ लवकरच."

लेकाचे असे समजुतदारीचे बोलणे ऐकून ताराला मात्र त्याचा अभिमान वाटायचा.

अनिताला मात्र का कोण जाणे पण ताराच्या स्वभावाचा खूपच राग यायचा. तारासोबत त्यामुळे ती जास्त बोलणे टाळायची. घरात काहीही वाद झाले तर ते फक्त अनितामुळेच व्हायचे. हे आता एव्हाना सर्वांनाच समजले होते. सुभाषरावांच्या स्वभावाचा देखील अनिताला खूप राग यायचा.

"कधी थांबवणार आहात आता ही समाजसेवा. ज्याचे त्याला पाहू द्या आता. बस झाले सर्वांसाठी करणे. खूप केले आता. कितीही केले तरी शेवटी कोणी कोणाचे नसते हे ध्यानात ठेवा. उद्या राहुल, रोहित शिकले, नोकरीला लागले तर तुम्हाला देणार नाही त्यांची कमाई आणून." ... अनिता

"पण त्यांनी मला पुढे जावून काही द्यावं या अपेक्षेने मी करतच नाही काही. मुले हुशार आहेत. त्यांना आता सद्ध्या गरज आहे आपली. वेळेला नाही मग नाती काय कामाची? आणि याला समाजसेवा नाही म्हणत. आपल्या माणसांची काळजी करणं म्हणतात."

"बसा मग आयुष्यभर सगळ्यांचीच काळजी वाहत."

हे असे वाद आता वारंवार होवू लागले होते घरात.

"माझा नवरा सगळं करतो" त्यामुळेच सगळं सुरळीत सुरू आहे. नाहीतर माहित नाही तुमची काय अवस्था झाली असती.?" असे बोलून  ती सर्वांचाच अपमान करायची.

त्यामुळे सारे काही करूनही काहीच उपयोग होत नव्हता.

"बोलून दाखवायचेच होते तर मग आधी करायचेच कशाला.? आमच्या नशिबात आहे ते घडलेच असते कसेही." अशी कुजबूज घरातील इतर लोक करायचे. घरात कुणालाच अनिताचे वागणे आवडायचे नाही. तिच्यासोबत तोंडावर गोड बोलणारे पाठीमागे तिला नावे ठेवायचे.

अनिताच्या हिटलरशाहीला आणि घरातील रोजच्या वादाला आता घरातील सर्वचजण कंटाळले होते. सुभाषरावांनी अनेकदा समजावूनही तिच्यात काही बदल व्हायचा नाही.
शेवटी काय तर स्वभावाला औषध नसतेच हे अनिताने देखील सिद्ध केले होते.

क्रमशः

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all