स्वभावाला औषध नसते (भाग ५ अंतिम)

कहाणी एकत्र कुटुंबातील वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची.


स्वभावाला औषध नसते - अरे संसार संसार
(जलद कथामालिका लेखन स्पर्धा )

एकत्र कुटुंब म्हटले की वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकाच छताखाली गुण्या गोविंदाने कसे काय राहू शकतात? हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न असतो.

कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार स्वभाव जरी वेगळे असले तरी अनेक कठीण प्रसंगी एकीचे बळच कामी येत असते. तसेच हाताची पाचही बोटे जरी सारखीच नसली तरी एकीनेच त्यांना काम करावे लागते. अगदी तसे स्वभावाला जरी औषध नसले तरी काही वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचे परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य देखील कुटुंबाला एकजुटीने काम करायला भाग पाडते.

जसे की सुभाषरावांमुळेच अजूनही घर एकत्रच होते. अनिताने प्रयत्न करूनही घराचे तुकडे झाले नाहीत. त्यामुळेच मुलांचे शिक्षण देखील व्यवस्थित सुरु होते.
त्यातच आता राहुल सरकारी खात्यात ॲग्रीकल्चर ऑफिसर म्हणून नियुक्त झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.

घरखर्चात आता राहुलची खूप मदत होवू लागली. आता वरचेवर ताराच्या तब्बेतीच्या कुरबुरी देखील वाढल्या होत्या. त्यामुळे राहुलने आता आईला शेतात जाण्यास बंदी केली. घरच्यांनीदेखील त्याचे म्हणणे मान्य केले. अनिताला मात्र हे जास्त काही रुचले नाही. पण राहुल आता कमावता झाल्यामुळे आणि घरातही वेळोवेळी त्याची मदत होवू लागल्याने तिलाही आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

रोहितच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील पूर्णपणे राहुलने घेतली होती. सुभाषरावांवरचा खर्चाचा बराचसा भार आता त्याच्यामुळे हलका झाला होता.

पुढे काही दिवसांतच सुभाषरावांनी आणि राहुलने मिळून नवीन घर बांधण्याचा विचार एकमताने पक्का केला. सर्वांनी मिळून, एकमेकांच्या मदतीने जसा जमेल तसा खर्चाचा भार वाटून घेतला. आणि प्रत्येकाचा विचार करून आलिशान असा टुमदार बंगला बांधला. प्रत्येकासाठी सेपरेट अशी व्यवस्था त्यात करण्यात आली.

बांधकाम पूर्ण होताच राहुलचे लग्न ठरले.  दुसऱ्या पिढीतील घरातील सर्वात मोठी सून लक्ष्मीच्या पावलाने रीनाच्या रुपात घरी आली.

घर जरी बांधून तयार असले तरी अजून चूल मात्र एकच होती. वर्षभर एकत्र कुटुंबाचा तिनेही चांगलाच अभ्यास केला. खर्चावरुन होणारे वाद अजूनही सुरुच होते. हिराकडून आणि राहुलकडून रीनाला घराचा पूर्ण इतिहास समजला आणि तसेही ती स्वतः प्रत्येकाचा स्वभाव जवळून अनुभवत होती. त्यामुळे सगळे चित्र तिच्यासमोर उघड होते.

ताराला मिळणारी वागणूक तिलाही दिसत होती. अनिताकडून ताराचा वेळोवेळी होणारा अपमान तिलाही सहन होत नव्हता. परंतु, एखादी व्यक्ती अशी अपमानास्पद वागणूक कशी काय  सहन करू शकते? हाही विचार तिला बेचैन करून सोडायचा.

न राहवून ती ताराला अर्थातच तिच्या सासूला म्हणाली,
"आई.. का तुम्ही एवढं सहन करता? तुम्ही असं ऐकून घेता म्हणून समोरून तशी वागणूक मिळते तुम्हाला. अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो."

"हे बघ रीना, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि तो असा कुणाच्या सांगण्यावरून नाही ग बदलता येत. घरात शांतता नांदावी असे वाटत असेल तर एकजण रागात असताना दुसऱ्याने शांत राहण्यातच शहाणपण आहे ना. घर, संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारच. त्यात आपले एकत्र कुटुंब  मग या गोष्टी होतच राहणार."

"आई पण पूर्वी ठीक होते, आता नाही ऐकून घ्यायला पाहिजे तुम्ही. तेव्हा तुमची मजबूरी होती पण आता काय प्रॉब्लेम आहे?"

"हे बघ रीना, आपली वेळ होती तेव्हा त्यांनीच आपल्याला आधार दिला. आज काकांमुळेच राहुल इतक्या उंचीवर पोहोचला. मग असे असताना हे कसे विसरायचे आपण? आपली गरज संपली मग म्हणून लगेच प्रतिकार करणे मला तरी पटत नाही बघ. जावू दे, एखाद्याला सवय असते चिडचिड करण्याची. एकत्र कुटुंबात एकमेकांना समजून घेतच पुढे जायचे असते. आपल्या माणसांच्या चुका आपणच पोटात घालायच्या आसतात."

सासूचा हा समजूतदारपणा पाहून रीनाचा ताराप्रती आदर कैकपटिने वाढला. खऱ्या अर्थाने तारा आणि सुभाषराव या दोन व्यक्तींनाच एकत्र कुटुंबपद्धतीचा खरा अर्थ समजला होता जणू. आणि त्यांच्या समजूतदारपणामुळेच आज कुटुंब एकत्र टिकून होते. आनंदाचे हे दिवस त्यांच्यामुळेच लाभले होते घराला.

पुढे काही दिवसांतच अनिताच्या आग्रहास्तव सगळेजण नव्या घरात शिफ्ट झाले. चुली देखील विभागल्या गेल्या. आता कुठे अनिताच्या मनाप्रमाणे सर्व घडले होते. त्यामुळे तिच्याही स्वभावात हळूहळू बदल होताना सर्वांना दिसत होते.

पण जरी सगळे वेगळे झाले असले तरी सण समारंभ मात्र गुण्या गोविंदाने एकत्र येवूनच साजरे होवू लागले. भांडण तंटा, कलह, जुन्या वाईट गोष्टी सारे काही विसरुन एकीचा वारसा सगळे मिळून जपत होते.

खरंच, एखाद्याच्या स्वभावाला औषध हे नसतेच. मग अशावेळी एक चुकत असताना दुसऱ्याने समजून घेत नाती जपली तर कुटुंबाचा पाया अधिक भक्कम होण्यास मदतच होते. आणि त्यामुळेच एक ना दिवस घराचे गोकुळ बनते. फक्त प्रत्येक नात्यात विश्वास आणि संयम हा असायलाच हवा.

स्वभावाला नसले औषध जरी..
एकमेकांशी साथच असते प्यारी..
कितीही झाले मतभेद तरी
एकिनेच वाढते संसाराची गोडी..
वेगवेगळ्या स्वभावाची माणसे
नांदतात जेव्हा एकाच छताखाली,
तेव्हा झाले जरी मतभेद तरी
एकमेकांना समजून घेतच
ओढावी लागते संसाराची गाडी...
समज गैरसमज बाजूला ठेवून
आनंदाने लढावी आयुष्याची ही लढाई..

समाप्त

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all