सवाष्ण शुक्रवारची

कथा एका सवाष्णीची


कथेचे नाव :शुक्रवारची सवाष्ण..
विषय : स्त्री आणि परावलंबित्व
स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

" उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. आपल्याकडे जिवतीची पूजा करतात. सवाष्ण जेवायला बोलावतात. माझी एक मैत्रीण येणार आहे जेवायला. उद्या ती जेवेपर्यंत काही खायचे नाही. तिची ओटी भरायची." सुधाताई मीराला सांगत होत्या. नुकतेच लग्न झालेली मीरा सासरच्या पद्धती समजून घेत होती.. ओटीसाठी तिने नारळ, छानसा खण, गजरे सगळे आणून ठेवले.. सकाळी सुधाताईंनी स्वयंपाक करायला घेतला. मीरा फक्त त्यांच्या हाताखाली काम करत होती. त्या

सुधाताईंनी सांगितलेल्या बाई जेवायला आल्या. मीराने सुधाताईंनी सांगितली तशी ओटी भरली. तिला हे सगळे करायला खूपच मजा येत होती. तिच्या माहेरी हे सगळे काही नव्हते त्यामुळे उत्साहाने तिने हे तिच्या जिवलग मैत्रिणीला नेहाला सांगितले.
" मस्त ग. परत कधी करशील तेव्हा मला नक्की बोलव हं. मलापण आवडते हे सगळे."
" नक्की बोलवेन." मीराने वचन दिले..

पुढच्या वर्षीचा श्रावण आला. मागच्या वर्षीचे वचन लक्षात ठेवून मीराने सुधाताईंना विचारले.
" आई, मी माझ्या एका मैत्रिणीला सवाष्ण जेवायला बोलावले तर चालेल का?"
" हो बोलाव की. त्यात काय विचारायचे?" सासूबाईंच्या होकाराने खुश झालेल्या मीराने नेहाला जेवायला बोलावले. यावेळेस मीराने स्वतः सगळा स्वयंपाक केला. सुधाताई लक्ष देत होत्या. नेहा अगदी नटूनथटून सवाष्ण जेवायला आली होती. तिला बघताच मीराने भजी तळायला घेतली. तोपर्यंत सुधाताई नेहाशी गप्पा मारत बसल्या. बोलता बोलता गाडी मुलांवर आली.
"किती वर्ष झाली लग्नाला?"
" या वर्षी सात पूर्ण होतील.."
" अरे व्वा. छानच. किती मुले मग? की हम दो हमारा एक?" तो प्रश्न ऐकून नेहाचा चेहरा पडला.
" नाही काकू. अजून आम्ही वाट बघतोय." यावर सुधाताई काहीच न बोलता आत गेल्या. नेहाला थोडे विचित्र वाटले. तोच मीराने पाने घेतल्याची वर्दी दिली. सुधाताई जेवायला आल्या, पण मगाचचा उत्साह विरल्यासारखा झाला होता. ते बघून नेहा आणि मीराचाही जेवायचा उत्साह गेला. कसेतरी पानात वाढलेले संपवून सुधाताई निघून गेल्या. त्यांचे काहीतरी बिनसले हे मीराला कळले पण ती गप्पच राहिली. ओटी भरून झाल्या झाल्याच नेहा निघाली. ती जाताच आत गेलेल्या सुधाताई बाहेर आल्या.
" मीरा, या नेहाला मूलबाळ नाही?"
" नाही आई.."
" मग तिला तू कसे जेवायला बोलावलेस?"
" आई तिने मागच्या वर्षीच मी येऊ का असे विचारले होते म्हणून बोलावले." मीराला आपले काय चुकले तेच कळत नव्हते.
" तुला खरेच माहीत नाही की माहीत नसल्याचा आव आणते आहेस. आज आपण जिवतीची पूजा करतो. लेकुरवाळ्या सवाष्णीला आपण जेवायला बोलावतो आणि तू? माझीच चूक झाली. मीच माझ्या ग्रुपमधल्या मैत्रिणीला बोलवायला हवे होते. आता परत पुढच्या शुक्रवारी सवाष्ण बोलवायला हवे." सुधाताई वैतागल्या होत्या. मीराच्या डोळ्यात पाणी आले.
" आमच्याकडे खरेच हे काही करत नाही. मला हे काहीच माहित नव्हते." फक्त एवढेच बोलून ती आत आवरायला गेली. खरेतर तिला खूप काही बोलायचे होते. पण तिने स्वतःला आवरले..

दिवस जात होते. मीरा दोन मुलांची आई झाली. नेहाच्या प्रार्थनेला पण यश आले. तिच्याघरी पण पाळणा हलला. मीराचे शुक्रवारचे व्रत सुरूच होते. त्यानंतर मात्र तिने कधीही स्वतःहून कोणाला बोलावले नाही. सुधाताई त्यांच्या मैत्रिणीला बोलवत. स्वतः उरलेले तीन शुक्रवार कोणाच्या ना कोणाच्या घरी जेवायला जात. सगळे सुरळीत चालू असतानाच मीराचे सासरे अचानक वारले. सुधाताई सैरभैर झाल्या. त्यांचा संसारातला रसच कमी झाला. त्या विरक्त व्हायला लागल्या. इतके वर्ष असणारा त्यांचा ग्रुपही दुरावला. ते त्यांच्या मनाला खूप लागले. पण त्या बोलून दाखवत नव्हत्या.
श्रावण आला. मीराने भीतभीतच स्वाष्णीचा विषय काढला. सुधाताईंनी त्यांच्या मैत्रिणीला बोलावले. त्या आल्या. जेवल्या. अजून चार ठिकाणी जेवायला जायचे आहे असे म्हणाल्या. पण एकाही शब्दाने तू येशील का? असे सुधाताईंना विचारले नाही. त्या गेल्यावर सुधाताई खूप वेळ रडत होत्या. त्यांचा स्वभाव बघता मीराची हिंमत झाली नाही त्यांची समजूत काढायची. आईशी बोलताना तिने ही घटना आईला सांगितली आणि विसरूनही गेली. नंतर एक दिवस नेहाचा फोन आला.
" मीरा, तुला या शुक्रवारी आमच्याकडे यायला जमेल का?"
" शुक्रवारी? काही खास आहे का?"
" हो. माझा वाढदिवस. काकूंना घेऊन येशील का? तू दे त्यांना फोन मी बोलते त्यांच्याशी." सुधाताईंनी खूप आढेवेढे घेतले पण शेवटी होकार दिला. शुक्रवारी दोघी सासूसुना निघाल्या. मुलांना सांभाळायची जबाबदारी मीराच्या नवर्‍याने आनंदाने घेतली होती. दोघी नेहाकडे पोहोचल्या. तिथे कोणीच पाहुणे नव्हते. आत पदार्थांचा घमघमाट सुटला होता. नेहा स्वागताला उभी होती.
" या."
" अग, बाकी कोणीच नाही आले का?"
" आले ना,प्रमुख पाहुणे." नेहा हसली.
आत छान पाने सजवून ठेवली होती. ताटाभोवती रांगोळी.
" तुम्ही बसा. मी आलेच.." आतून नेहा ओटीचे सामान घेऊन आली. ते बघून सुधाताई थोड्या बाजूला सरकल्या. नेहा ते घेऊन त्यांच्या दिशेने गेली.
" तुम्हाला चालेल की नाही मला माहित नाही. पण मी हे करणार आहे." तिने सुधाताईंना कुंकू लावून त्यांची ओटी भरली. स्वतःच्या हाताने केसात गजरा माळला. हाताला अत्तर लावले. आणलेल्या बांगड्या दिल्या. सुधाताईंचेच काय मीराचेही डोळे पाणावले.
" मी.." सुधाताईंना बोलवेना. नेहाने त्यांच्या हातावर थोपटले.
" मीराने स्वयंपाक कसा झाला हे मला विचारले नाही तेव्हाच मला समजले होते, तुम्हाला मी आलेले आवडले नव्हते. काकू तेव्हा अनेक वर्ष मी हे सगळे सहन करत होते. मूलबाळ नाही म्हणून डोहाळजेवण, बारसे टाळत होते. मला कुठे कमीपणा वाटायचा नाही. पण लोकांकडून अपमान, सहानुभूती नको असायची. मीरा माझी खूप जवळची मैत्रीण. तिला हे सगळे माहित होते. म्हणून तिने माझ्या इच्छेला मान देऊन बोलावले होते. तेवढाच बदल. पण तिने ते नको होते करायला."
" माझे चुकले ग.." सुधाताई कसेतरी बोलल्या.
" नाही काकू. तुमचे बरोबरच होते. लेकुरवाळ्यांच्या पूजेला मुले नसणारीचे काय काम?"
" नाही ग.." सुधाताईंना काय बोलावे समजत नव्हते. " तुला सगळे समजले होते तरिही तू आज मला बोलावलेस? ओटी भरली?"
" हो काकू. कारण मूल नसताना लोकांची जी वृत्ती मला त्रास देत होती तीच वृत्ती आज काका नाहीत म्हणून तुम्हाला त्रास देते आहे. आपण कितीही स्वावलंबी झालो तरीही नटणेथटणे, ओटी भरणे, कुंकू लावणे या गोष्टींसाठी पुरुषांच्या, मुलांच्या अस्तित्वावर अवलंबून रहाणे मला पटत नाही. हे परावलंबित्व तोडण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न.. बरोबर आहे ना?"नेहाने विचारले..
" हो ग.. अगदी बरोबर.." सुधाताई खूप दिवसांनी हसत म्हणाल्या..


या कथेतून कोणत्याही सणाच्या विरूद्ध लिहायचे, बोलायचे नाही.. पण काही रूढींचा स्त्रियांना कसा त्रास होऊ शकतो हे दाखविण्याचा एक प्रयत्न..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई