#कथा- सुटका

कथा आवडल्यास लाईक नक्की करा:)

कथालेखन!
                  सुटका
रात्रीचे अडीच वाजले तरी त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. अशा कित्येक रात्री त्याने काळजीत घालवल्या होत्या. काय करू कुठे जाऊ काहीच मार्ग दिसेना.कुठून दुर्बुद्धी झाली आणि तसल्या पार्टीत गेलो. चकाचक वातावरण, कधी न पाहिलेलं, न अनुभवलेलं अमर्याद स्वातंत्र्य, ओसंडून वाहणारं तारुण्य आणि तिचं मदमस्त आव्हान.. बळी पडला आणि घात झाला, कायम आजारपणं, अशक्तपणा आल्यावर शंकेची पाल चुकचुकली आणि शंका खरी निघाली HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट बघून तो नखशिखांत हादरला. माळकरी, ईश्वर सेवेत रमणारे आईबाप, सज्जन सोज्वळ बायको, चार वर्षांचं गुणी लेकरू.. काय करू? कसं करू? सगळेच प्रश्नचिन्ह.. बायकोला विश्वासात घेतलं, घ्यावंच लागलं. नशिबानं ती निगेटिव निघाली.पण पुढे काय? या असल्या आजाराचं कळल्यावर आपल्या नंतर कोण करणार तिच्याशी लग्न? आणि आई-बाबा तर लोक लाजेनंच हाय खातील. नाही, हे बाहेर येता कामा नये, काय व्हायचं ते होऊ देत,दवाखान्यात जायचं नाही, हे बाहेर येऊच द्यायचं नाही. मरणाच्या भीती पेक्षा मोठी भीती या अशा मरणाची, विठुराया वाचव रे बाबा.. या सगळ्या विचारात कधीतरी डोळा लागला.. सकाळी जो तो बोलत होता एका नवीन आजारावर, भयंकर आहे म्हणे.. लक्षण साधी.. सर्दी, खोकला, ताप,हातोहात पसरतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सांगणाऱ्यांची भीतीने गाळण उडाली होती पण त्याचा चेहरा खुलला होता. देवा पावलास रे. पुढील काही दिवस सगळीकडे हाहाकार, जिकडेतिकडे पेशंटच्या रांगाच रांगा, हजारो भरती, लाखो वेटिंग लिस्टमध्ये.. वाढत जाणारी मृत्यू संख्या आणि त्यात हा एक.. संतुष्ट, समाधानी,..अंतर राखून का होईना शोक करणाऱ्यांची, सांत्वन करणाऱ्यांची गर्दी वरून बघणारा. इच्छामरण काय फक्त भीष्मा लाच नव्हतं असं म्हणणारा..
Copyright-मोनाली पाटील
द हेग, नेदरलँड्स.